मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशायनमः । पार्वती म्हणे सांगावें । विराटाचें रुप बरवें । कैसें तें त्याच्या कार्यासवें । विशद करी महाभागा ॥१॥
शिव म्हणती ऐक पार्वती । पांच कोटी योजनें अती । विस्तारें आसंमती । त्याच्या देहीं स्थावरजंगम ॥२॥
चौदा भुवनें संस्थित । विराट देहीं सामावत । कैसें तें सांगतों समाहित । मन करोनी ऐक तूं ॥३॥
त्या विराटाच्या पायांतून । पाताळ निर्माण होऊन । गुल्फांतून रसातल उत्पन्न । पार्ष्णीभागा निर्मी महातल ॥४॥
त्याच्या जांघापासून । तलातल होय उत्पन्न । सुतल जानु भागांतून । वितल मांड्यांतून त्याच्या ॥५॥
कटिसंधींतून अतल । कटींतून भूलोक अमल । नाभींतून भुवर्लोक निर्मल । हृदयापासून स्वर्लोक ॥६॥
महर्लोक कंठांतून । जनो लोक तो मुखांतून । तपोलोक ललाटांपासून । सत्यलोक शिरःस्थित ॥७॥
ऐशा प्रकारे देहरुप धरी । विराट तो महापुरुष सत्वरी । सहस्त्रमुखे धारण करी । सहस्त्रशीर्ष सहस्त्र पाय ॥८॥
हजारो हात हजारो कान । सहस्त्र उदरें महान । ऐसा प्रभु तो सर्व व्यापून । मर्त्यांत स्वप्रकाशरुप ॥९॥
अमृत भोक्ता मर्त्यांत । त्याच्या अंतरीं होय स्थित । हिरण्यगर्भ नामें ख्यात । विराजे तो स्वप्नरुपें ॥१०॥
बाहेर वैश्वानर असत । जाग्रत्‍ वैराट संज्ञा लाभत । हिरण्यगर्भ कोशीं स्थित । स्वप्न वैराटधारक ॥११॥
दोघांच्या समभावानें होत । बाह्य अंतर रुपयुक्त । ईश्वर नामे वैराट असत । सुषुप्तीचा धारक ॥१२॥
त्रिविध ऐसें विराट रुप कथिलें । पार्वती तुलजा येथवरी बोधिलें । ऐसें तुरीय आत्मरुप जे झालें ॥१३॥
आतां ऐक विभिन्न उत्पत्ती । अल्पभाव युक्त नाना रीती । चराचरमयी परी ती । विराडू अज्ञानावृत झाला ॥१४॥
त्यानें घोर तप केलें । एकाक्षर विधानें गणेशा ध्यायिलें । हृदयांतरीं ह्या प्रभूस पूजिलें । दिव्य सहस्त्र वर्षांवरी ॥१५॥
त्याच्या तपानें ध्यान भावानें । प्रत्यक्ष प्रकटून गणपतीनें । बोध केला प्रसन्नमनें । म्हणे इच्छित वर माग ॥१६॥
गणेशाचें सहसा दर्शन । होतां त्वरित पायां पडून । म्हणे धन्य माझा जन्म ज्ञान । धन्य शरीर दृष्टीही ॥१७॥
धन्य माझी संपदा होत । देवा तव पदकमलाचें दर्शन घडत । ऐसें बोलून स्तुती करित । गणेश ब्रह्म नायकाची ॥१८॥
भगवान विश्वधारक मुदित । आनंदून विराट स्तोत्र गात । नमस्कार गणनाथा पुनीत । गणांच्या पतीस नमन माझे ॥१९॥
विघ्नेशाला परेशाला । विघ्नहर्त्यास सिद्धिबुद्धिपतीला । नानासिद्धि प्रदायकाला । नमन नाना ज्ञानप्रदासी ॥२०॥
नमस्कार त्या ब्रह्माला । ब्रह्मरुपासी मनोवागतीताला । योग्यांच्या हृदयीं जो वसे त्याला । नाना अवतार धारकासी ॥२१॥
भक्तसंरक्षका नमन । महेशा शिवासी वंदन । सर्वत्र समभावासी प्रमाण । नमस्कार विष्णुरुपधासी ॥२२॥
तेजोराशीपतीस नमन । भानुरुपधरा नमन । नानामायाभेदयुक्ता वंदन । निर्मळासी नमो नमः ॥२३॥
सर्वरुपधरास नमस्कार । मायाहीना मायाधारा नमस्कार । गुणांचा ज्याच्या नसे पार । नाना ब्रह्मस्वरुप जो ॥२४॥
ऐशा गणेशा तुज नमन । अनुग्रह कृपया करी महान । ऐसे स्तुतिस्तोत्र गाऊन । मौन धरिलें तयानें ॥२५॥
वैराट पुरुष उभा राहत । ओंजळ हातांची जोडित । त्याच्या भक्तिभावें संतुष्ट होत । गणेश प्रभू त्या वेळीं ॥२६॥
वर माग शंका नको मनांत । मागसी तें देईन त्वरित । तूं रचिलें जें स्तोत्र पुनीत । प्रीतिकार तें मज सर्वदा ॥२७॥
जो हें स्तोत्र भावसहित । नेमें वाचील भक्तियुत । त्याचे मनोरथ पूर्ण होत । सिद्धी तया प्राप्त होय ॥२८॥
जें जें मनीं वांछील भक्त । तें तें मी पुरवीन अविरत । भक्तिमुक्तिप्रद निश्चित । स्तोत्रवाचन श्रवणही ॥२९॥
ऐसें बोलता गणनाथा वंदित । वैराट देव तेव्हां त्वरित । भावपूर्णमनें वचन बोलत । विघ्नहरा त्या प्रभूला ॥३०॥
माझ्यावरी तुष्ट झालास । तरी देवेशा देई वरास । तुझी भक्ती दृढ होण्यास । मोह जेणें नष्ट होय ॥३१॥
सृष्टीची निर्मिती करीन । स्थिती तैसा संहारही करीन । तुझ्या प्रसादें करुन । भक्तांसी भुक्तिमुक्तिप्रदा ॥३२॥
हे महाप्रभो गजानना । ऐश्वर्य अतुल दे ही कामना । जें जे येईल माझ्या मना । तें तें लाभा तव प्रसादें ॥३३॥
शिव सांगती पार्वतीस । तथास्तु ऐशा वचनास । बोलून अन्तर्धानास । पावला तत्क्षण गणधिप ॥३४॥
विराट हृदयीं हर्षभरित । गणेशातें सतत ध्यात । हे देवि पार्वति आचरत । गुणेश तप तो उत्तम ॥३५॥
नाना अण्डयांत स्थित । वैराट तप करित । स्वकर्मी तेणें ते महात्मे संस्थित । निर्विघ्न गणेशवरदानाने ॥३६॥
ऐशीं ब्रह्माण्डे अनन्त । त्यांचा ठाव अज्ञात । हेरबंदेवावाचुनी खचित । अगम्य संख्या तयांची ॥३७॥
गणनाथासही सतत । संख्या करणें कठिण जात । जेवढी गणना शब्दशास्त्रांत । त्याच्या पार ब्रह्मांडें ॥३८॥
म्हणौनी कोणा न जमली । अद्यापि त्यांची मोजदाद भली । अनन्त ब्रह्मांण्डे हीं झालीं । जगांत ख्याती म्हणोनी ॥३९॥
ऐसा तो प्रभावयुक्त । गणेश माझ्या हृदयीं वर्तत । ध्यानलोभी भक्तेश असत । भक्तवत्सल गजानन ॥४०॥
नाना ब्रह्मांडाचे वर्णन । ह्या अध्यायी कथिलें महान । पंचदेववर प्रदान । ऐकावें पुढिले अध्यायीं ॥४१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‍ मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते नानाब्रह्मांडवर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.