मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणती मुद्‌गलांसी । गणेशकथा आल्हादक चित्तासी । म्हणोनि वामनाच्या कथेसी । सर्वज्ञा तू सांग मज ॥१॥
मुद्‌गल तेव्हा संतुष्ट होती । वामनचरित्र त्यास सांगती । ते ऐकावें भावभक्ति । मनोवांछित लाभार्थ ॥२॥
कश्यप मुनिशार्दूल होता । प्रजापतिसम त्याची योग्यता । अदिती त्याची ज्येष्ठ कान्ता । परम धार्मिक जी होती ॥३॥
तिच्यापासून कश्यपाचे सुत । इंद्रादिदेव झाले संजात । त्यांच्या विरुद्ध भावयुक्त । दैत्य जेही कश्यपसुत ॥४॥
दितीचे सुत समुद्यत । गर्वानें देवांसि मारण्या इच्छित । बलयुक्त त्या विष्णु मारित । नाना रुपें घेवोनिया ॥५॥
स्वर्गराज्य सर्वमान्य असत । तें प्राप्त करण्या न शक्त । तेव्हां दैत्य शरण जात । सकल नीतिज्ञा शुक्रासी ॥६॥
त्यांचा ऐकून वृत्तान्त । तो मुनिपुंगव दैत्यांस सांगत । सर्वज्ञ काव्य वेद पारंगत । हितकारक उपदेश ॥७॥
बलिदान व प्रमुख असुरांसी । शुक्र सांगे युक्तीसी । देवांची उत्पत्ति कैसी । यज्ञांत झाली ती कथा ॥८॥
यज्ञाधार असती सुर । तुम्ही यज्ञद्वेष्टे असुर । जरी कराल भक्ति भावपर । शंभर अश्वमेध तुम्ही ॥९॥
ऐसे यज्ञ जरी कराल । तरी सर्व सिद्धी पावाल । महाबाहू बळी हा होईल । इंद्रपदीं विराजमान ॥१०॥
देवांचा द्वेषभाव झाकळून । स्वर्गाधिकार लाभून । स्वर्गनिवासी होऊन । पूजनीय व्हा सर्वत्र ॥११॥
वाहवा शोभन उपदेश केला । ऐसें म्हणती त्या वेळेला । शुक्राच्या त्या वचनाला । मानिती ते महाभागा ॥१२॥
नंतर ते महाबळी निवडिती । आपुला नेता बलिराजासि मानिती । अश्वमेध यज्ञाची दीक्षा देती । आदरपूर्वक असुर सारे ॥१३॥
विरोचनापासून जन्मला । बळी तो विष्णुभक्त जाहला । अधर्मी रुचि नसे तयाला । कदापीही हें सत्य ॥१४॥
परी गणेशातें विसरुन । विष्णूचेंच करी तो स्मरण । विष्णुभक्ति प्रेरित होऊन । यज्ञारंभ करिता झाला ॥१५॥
त्याचें तें कर्म पाहून । विघ्नदेव हर्षितमन । म्हणे या असुरें गणाधिप पूजन । कार्यारंभीं न केलें ॥१६॥
भुक्तिमुक्ति प्रदाता । सर्व सिद्धिकार विभु जो दाता । त्यास विसरुनी सिद्धि वांछिता । असिद्धीच प्राप्त होते ॥१७॥
विष्णूच्या बळानें दैत्यांप्रत । सिद्धी कैसी होणार प्राप्त । तो जें करील यज्ञांत । यज्ञकर्म तें मी खाईन ॥१८॥
ऐसा विचार करुन । विघ्नदेव क्रोध संतप्त मन । स्वयें आला तेथ धावून । प्रवेशला हृदयीं देवराजाच्या ॥१९॥
बलिराजाच्या आज्ञेवरुन । संकल्प सोडिला महान । शंभर अश्वमेधांचा पावन । विप्रजनांनी त्यावेळीं ॥२०॥
शत अश्वमेधांचा संकल्प करित । प्रथम त्यांतला सुरु होत । तेव्हां इंद्र चिंतातुर मनांत । इंद्रपद माझें जाईल ॥२१॥
शत यज्ञप्रभावें होईल । बळिराजा इंद्र महाबळ । म्हणोनि शरण जाई विष्णूस तत्काळ । सुरनायक भयभीत ॥२२॥
प्रणाम करुनी, स्तुती करुनी । परोपरींने विनवोनी । इंद्र पार्थी विष्णूस नमूनी । बलियज्ञ विनाश करण्यासी ॥२३॥
त्यावेळीं तेथ येत । विघ्नदेव काळस्वरुपांत । बलवन्त विष्णूच्या चित्तांत । प्रवेश करता जाहला ॥२४॥
वज्रपाणीनें सांगितलें । बळिराजाचें कर्म जें झालें । देवांसी भयपूर्ण जेणें केलें । तें ऐकून विष्णू म्हणती ॥२५॥
अदितीनें कश्यपानें केलें । मजसाठी शत वर्षें तप संकोचले । त्यांच्या भक्तिभावें तोषलें । चित्त माझें त्यावेळीं ॥२६॥
प्रसन्न चित्तें म्हणे त्यास । मागा जे वर येईल मनास । तेव्हा ती म्हणे सोल्हास । पुत्र आमुचा तूं होई ॥२७॥
त्यांना तेव्हा आश्वासन । दिधलें इच्छित पूर्ण करीन । बळीचा यज्ञ नाशून । सफल करीन तें आता ॥२८॥
बळीनें जी केली होती । पूर्वे परम विष्णुभक्ती । तिची झाली विस्मृती । बलिविग्रह करण्या निघे ॥२९॥
अदिती कश्यपांचा सुत होत । वामन नामें विष्णु पुनीत । परी बळींचे सैन्य निरखित । तें तें जिंकण्या कठिण वाटे ॥३०॥
मनांत झाला क्षुभित । तेव्हा कश्यपा विचारित । बलिनाशाचा उपाय त्वरित । सांगा ताता महामुने ॥३१॥
षडक्षर वक्रतुंड मंत्र देत । कश्यप वामनासी त्वरित । विदर्भांत जाऊन तप आचरित । दहा वर्षें अति दारुण तो ॥३२॥
निराहार राहून तप करी । हृदयीं गणेशातें स्मरी । त्या उग्र तपें त्यावेळ हरी । गणेशाचें मानस ॥३३॥
सिंहवाहन वतुर्बाहुधर । सिद्धिबुद्धि समन्वित गजाकार । गजमुख एकदांत पाशांकुशाधिधर । सिंदुरारुण शूर्पकर्ण ॥३४॥
महोदर कोटि सूर्यासमान । तेजःपुंज गजानन । प्रकटला सुखनिधान । वामनापुढें प्रसन्न ॥३५॥
त्यास पाहून प्रणाम करी । हातांची ओंजळ जोडून अग्रीं । भक्तिभावें स्तवन करी । वामनरुपी श्रीविष्णू॥३६॥
विघ्नपतीसी भक्त विघ्नविनाशकासी । अभक्त विघ्नकर्त्यासी । गणेशाची वक्रतुंडासी । सर्वेशा तु नमो नमः ॥३७॥
पालकासी नानारुपधरासी । सर्वान्तर्यामीसी चराचरस्वामीसी । आपुल्या विभूतीनें सर्ववशकरासी । प्रजापतींच्या ब्रह्मां नमन ॥३८॥
यज्ञांत तू विष्णू असती । ईश्वरांत शंभू होती । देवांमाजी पुरंदररुपें वससी । प्रकाशमयांत सूर्य तूं ॥३९॥
अन्नांत चंद्र तूं अससी । नियंत्रकांत यमरुपें दिससी । जल चरांत वरुण होसी । गणाधिपा प्रभो तूं ॥४०॥
तूं वायू बळवंतांत । धनप कुबेर निधिवंतांत । अग्निरुप तूं दाहकांत । राक्षसांत तू निरृति ॥४१॥
शेषरुप तूं नागांत । शुक्राचार्य योगियांत । तूं सनत्कुमार कुमारांत । गृह सेनापतींत तूं ॥४२॥
सिंह वेषधर तूं मृगांत । ऐसा नाना स्वरुपें विलसत । जगरक्षणीं तूं तत्पर असत । स्तुती करण्या कोण समर्थ ॥४३॥
योगरुप तूं सनातन । वेद शेष ब्रह्याही तुझे वर्णन । करण्या असमर्थ असतां स्तवन । मंदमती मी कैसें करुं ॥४४॥
तुझ्या स्तुतीचा पार । कैसी मी अल्पबुद्धी जाणणार? यथाबुद्धी बोलिलों पामर । विघ्नपा तेणें संतुष्ट होई ॥४५॥
तुझें दर्शन मज लाभलें । तेणेंच कृतकृत्यपद मिळालें । मातापिता धन्य झाले । स्थान धन्य तप धन्य ॥४६॥
षडक्षर मंत्र धन्य असत । ज्यानें तुज आणलें येथ । ऐसें वर्णन करुन नाचत । भक्तिभावें पूर्ण तें ॥४७॥
रोमांचित झाला त्याचा देह । आनंदाश्रू ढाळी सरला संदेह । देहभाव टाकून विदेह । आनंदाच्या डोहीं बुडाला ॥४८॥
एकनिष्ठता झालीं प्राप्त । ऐसा तो महाभाग भक्त । त्यासी पाहून प्रेमपरिप्लुते । गणाधीश संतोषला ॥४९॥
म्हणे वामना भक्तीने । तैसेंचि तुझ्या स्तुतीनें । तोषलों मी तपानें । देईन तुज वांचितार्थ ॥५०॥
जरी असेल सुदुष्कर । दुर्लभ अशक्य फार । तेही वांछित सत्वर । तुझें वामना पुरवीन मी ॥५१॥
एसे त्याचें आश्वासन । ऐकू प्रणाम करी वामन । म्हणे गजाननासी वचन । दृढ भक्ती तुझी द्यावी ॥५२॥
ढुंढे देवरिपून बळीसी । मत्साध्य करावा अनायासी । जेव्हां स्मरेन मी तुजसी । तेव्हा प्रकट हो गजानना ॥५३॥
मज कदा न विघ्न बाधावे । जें जें कार्य हाती घ्यावें । ऐसें वरदान देवा द्यावें । गणेशा तूं वक्रुतुंडा ॥५४॥
सफल होईल मनोवांछित । ऐसा वर देऊन क्षणांत । गणेश अंतर्धान पावत । वामनें स्थापिला त्या स्थानीं ॥५५॥
अदोष नाम महाक्षेत्र उदेलें । तेथें विदर्भांत श्रेष्ठ झालें । वक्रतुंडकृपेनें भलें । सर्वसिद्धिद मनुष्यांसी ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते वामनवरप्रदान नाम षट्‌चत्वारिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP