TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


दंभासुरविजयः
श्रीगणेशाय नमः । ब्रह्मदेव करी स्तवन । वक्रतुंडा तुला नमन । अनंतानंतपारा तुज वंदन । महात्म्या तुला विघ्नेशा ॥१॥
भक्त प्रियासी भक्तसंरक्षकासी । अभक्तांच्या कामनाशकासी । सर्वदात्या निर्गुणासी । निरुपा तुला नमन असो ॥२॥
निर्मलासी गुणात्म्यासी । अनंत मुखें धारकासी । सिंहवाहना अनादिरुपासी । सर्व प्रिया तुज नमन असो ॥३॥
वेदांतवेद्य देहासी । नाना भोग करासी । अनंत उदरसंस्थिसी । गजवक्त्रा नमन असो ॥४॥
मात्राधारकासी अमेय शक्तीसी । मायामोहकासी चतुर्बाहुयुतासी । आधार रहिता स्वानंद पतीसी । एकदंतासी नमन माझें ॥५॥
सिद्धी बुद्धी प्रदायकासी । ब्रह्मभूतासी देवासी । सिद्धी बुद्धी घरासी । विघ्नहर्त्या तुज नमन असो ॥६॥
वक्रतुंडा जरी तूं प्रसन्न । तरी देई हें मज वरदान । तुझी भक्ती दृढ होऊन । बंधमुक्त मीं व्हावें ॥७॥
तुझ्या आज्ञेनें प्रवृत्त । झालों सृष्टिरचना करण्या त्वरित । विघ्नहीनता असावी त्यांत । ऐसें प्रार्थितो। गणाधीशा ॥८॥
मी सर्वांचा निर्माता असत । गजानना तुम्ही ऐसे सांगत । तरी माझ्या घरीं रहावे प्रमुदित । पुत्रभावें करुनिया ॥९॥
तूं साक्षात ब्रह्मभूत । जरी होशील माझा सुत । तरी मी राजस बंधनयुक्त । होईन यांत संशय नसे ॥१०॥
आपुल्या माता पित्यांस । जरी तू बंधयुक्त केलेस । तरी वेदादिका सर्वांस । मिथ्या भाव येईल ॥११॥
तुझिया नामग्रहण मात्रें होत । ब्रह्मप्राप्ती जगतांत । तरी तूं पुत्रभावें मम गुहांत । राहता काय न लाभेल? ॥१२॥
तुझें लालन पालन करावें । तुझ्या सेवेत मीं रंगावें । निरंतर पूजनीं रमावें । ऐसी माझी इच्छा असे ॥१३॥
ब्रह्मयाचें वचन ऐकून । गणपती देई वरदान । सृष्टिरचना कार्यीं निर्विघ्न । विधी जाहला त्या वेळीं ॥१४॥
गजानन म्हणे त्यासी । जें जें मनीं तू वांछिलेसी । तें तें मिळेल तुजसी । पुत्र तुझा मी होईन ॥१५॥
मायेच्या अंशें मी समुद्‌भुत । पुरवीन तुझे वांच्छित । जो भक्तिभावें हें स्तोत्र वाचित । तो मज आवडती होईल ॥१६॥
ऐसें देऊन आश्वासन । वक्रतुंड पावला अंतर्धान । ब्रह्मदेव विमनस्क होऊन । स्तब्ध क्षणभरी ॥१७॥
वक्रतुंड प्रसादानें निर्मिलें । नंतर जग त्यानें सगळें । चराचरमय जें झालें । कृतकृत्यता निर्मून तें ॥१८॥
स्वसुखांत होता स्थित । वक्रतुंडाचें स्मरण करित । वायुवेगानें एकदा कंपित । त्यापासून दंभ प्रकटला ॥१९॥
पुरुषरुप त्याचें असत । चतुर्बाहु धर धनुर्धर दिसत । खळ तो गदाचक्र त्रिशूळयुक्त । पर्वतासम महाकाय ॥२०॥
रुपपूर्ण तेजपूर्ण । अतु वीर्यधर महान । महाकाय तो पाहून । विस्मयें ब्रह्मा त्यास म्हणे ॥२१॥
हे महाबला पराक्रमा । रुप लावण्ययुता परमशोभना । कोठून आलास? काय कामना? । कोणाचा तू सांग मज ॥२२॥
मेघगंभीर तेव्हा वचन । विधात्यासी बोले हंसून । तूं माझा पिता असून । कैसे न जाणिसी स्वपुत्रासी ॥२३॥
तुझ्या शरीराचें झालें कंपन । त्यांतून माझा जन्म पावन । आतां धन्य करी नांव ठेवून। मजला ताता योग्य ऐसें ॥२४॥
राहण्यासी द्यावा निवास । कैसे करुं उदरभरणास । नेमून द्यावे मज कार्यास । जनका ऐसी मम प्रार्थना ॥२५॥
त्याचें तें वचन ऐकून । पद्मसंभव म्हणे हसून । तूं मज ओळखसी सज्ञान । दंभानें तूं ऐसे म्हणसी ॥२६॥
म्हणोनी दंभ नाना होशील । दांभिक तू महा खल । यथा रुचि भोगशील । नानाविध भोग तूं ॥२७॥
जेथें जेथें तूं जाशील । तेथें तेथें तूं प्रिय होशील । महा असुरा तूं सबळ । जगतामाजी सर्वदा ॥२८॥
ब्रह्मदेवासी प्रणाम करुन । विधिपूर्वक प्रदक्षिण घालून । पुनः पुन्हा करुन नमन । निघाला दंभ तेथोनी ॥२९॥
तो स्वचित्तांत करी विचार । मजला म्हणे दांभिक फार । त्या विधीचा गर्व सर्व । हरीन मी निश्चयेसी ॥३०॥
ऐसा विचार मनीं करुन । शुक्राचार्यासी जाई शरण । मंत्रोपदेश घेऊन । घोर तप आचरी तो ॥३१॥
एका पायावरी उभा राहत । निराधार तो तप करित । ऐसी वर्षे अयुत । उग्र तप त्यानें केलें ॥३२॥
त्याच्या तपें चराचर व्याकुळ । सर्व झाले भयविव्हळ । तेव्हां देवांसहित तत्काळ । ब्रह्मदेव तेथ आले ॥३३॥
काष्ठासम तो अचल होता । मनांत होती भावपूर्णता । उग्र तप तें पाहून तत्त्वतां कमलासन तुष्ट झाला ॥३४॥
नंतर दंभासी तो म्हणत । वर माग महाभाग इच्छित । पुरवीन तुझें सर्व ईप्सित । यात संशय कांहीं नसे ॥३५॥
ब्रह्मयाचे वचन ऐकून । दंभ परम हर्षित होऊन । आदरे त्यास नमन करुन । स्तुतिस्तोत्र गात असे ॥३६॥
सृष्टिकर्त्या सृष्टिहर्त्यासी । सृष्टिपात्रा प्रजापतीसी । ब्रह्मा विष्णु शिवात्मकासी । त्रिमूर्तिरुपा नमन माझें ॥३७॥
तूं हे सर्व जग निर्मिलेंस । तुझाचि आधार तयास । तूं निद्रित उदास । जग सारें नष्ट होईल ॥३८॥
चराचरमय होऊन । क्रीडा करिसी अनुदिन । एक असूनी अनेक होऊन । महाप्रभो खेळ करिसी ॥३९॥
अणूहून तूं लहान । मोठयांत तूं अससी महत्तम । ब्रह्माकारे स्थित समान । स्तवन करण्या मीं असमर्थ ॥४०॥
माझें महत्भाग्य उदेलें । तेणें तुमचे दर्शन झालें । सर्व पापहर ऐसें भलें । आनंद मज वाटतसे ॥४१॥
जरी तूं प्रसन्न झालासी । माझ्या भक्तिभावें तोषलासी । तरी देई तूं मजसी । मनोवांच्छित वरदान ॥४२॥
त्रैलोक्याचें राज्य द्यावें । पंचभूतात्मककारीं मरण न यावें । असामान्य माझें स्थान असावें । संग्रामांत सर्वदा ॥४३॥
अखंड ऐश्वर्यसंयुक्त । आरोग्यादि समन्वित । सर्व सुख मज व्हावें प्राप्त । ऐसा वर मज द्यावा ॥४४॥
त्याच्या तपानें संतोषित । वर देण्यासी उत्सुक होत । म्हणे दंभा तूं जें जें प्रार्थित । तें तें सर्व तुज मिळेल ॥४५॥
ऐसें बोलून अंतर्धान । ब्रह्मा झाला तेथून । दंभही गेला स्वगृही परतून । आनंद वाटून मानसीं ॥४६॥
नगर शृंगरिलें समग्र । ‘शोभन’ नाव त्या देत सुंदर । सर्व शोभायुत मनोहर । नगरीं ऐशा राही तो ॥४७॥
त्या महाबळीच्या नगरांत । दैत्य गण सर्व येत । शुक्रे जे पाठविले त्वरित । अभिनंदनार्थ दंभाच्या ॥४८॥
ब्रह्मवादी मुनी जे असत । त्यांसि घेऊन समवेत । शुक्राचार्य स्वयं येत । नंतर अभिषेकास्तव त्याच्या ॥४९॥
शुभ लग्नीं शुभ मुहूर्त । दैत्य राज्यीं त्यास बसवित । मंगल राज्याभिषेक करित । ब्राह्मणा करवी त्यावेळीं ॥५०॥
दंभ दैत्यराज झाला । असुरांनी महोत्सव केला । हृष्ट पुष्ट जनीं शोभला । नगर परिसर त्या समयीं ॥५१॥
सत्कार सन्मान घेऊन । असुर गेले परतून । प्रमुख दैत्य अति दारुण । ते राहिले नगरांत ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्ततुंडचरिते दंभासुरराज्याभिषेकी नाम एकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:51.3630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

CANDRAKETU II(चन्द्रकेतु)

  • A vidyādhara King. See Muktāphalaketu). 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site