मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूत तेव्हां म्हणे मुनींसी । दक्षें मानिलें मुद्‌गलवचनासी । प्रणाम करोनिया तयासी । हितकारक तें पुसतसे ॥१॥
शौनक म्हणे सूता, संवाद । दक्षमुद्‌गलांचा विशद । मनोरंजक तो सुखद । ऐकावा ही इच्छा मनीं ॥२॥
म्हणोनी विस्तारपूर्वक । सांग सूता संतोषकारक । संभाषण ते भवतारक । आम्हां सर्व मुनींना ॥३॥
सूत म्हणे तुम्ही ऐका । मुनिजन हो कथा पावका । ऐकता जी मनुष्यादिका । अन्य कर्म उरेचिना ॥४॥
दक्षमुद्‌गलांचा संवाद । वर्णन करीन सुसंबद्ध । भवरोगमुक्तिप्रद । सारसर्वस्व जगतात ॥५॥
मुद्‍गलांचे वचन ऐकून । धर्मज्ञ दक्ष कर जोडून । विनीतभावें आनंदून । विनंती करी महायशासी ॥६॥
दक्ष म्हणे हो मुद्‌गला । पूर्व पुण्य मम आले फळा । म्हणोनी अति निर्मळा । दर्शन तुझे मज घडले ॥७॥
तुझे दर्शन मोक्षप्रद । भोगप्रद परलोकद । धर्मकारक विशुद्ध । पुण्यप्रद मज वाटे ॥८॥
शापामुळे बोध नष्ट । मजला होती बहु कष्ट । प्रजापतिपदीं अरिष्ट । दुर्भाग्याने आज आलें ॥९॥
यज्ञ माझा भंगला । अंतरात्मा त्रस्त झाला । विविध कष्टांते पावला । देह माझा मुनिश्रेष्ठा ॥१०॥
परी तुमच्या दर्शने मज । किंचित्स्फूर्ती वाटे आज । धन्य तुम्ही योगिराज । पावित्र्य तुमचें अलौकिक ॥११॥
विघ्नपती तो कोण असे । त्याचा निवास कोठे असे । स्वभाव त्याचा कैसा असे । हे सर्व सांगा मला ॥१२॥
किती असती अवतार । त्याचे स्तवन मी पामर । कैसे करु हे सत्वर । सांगा मजला महामुने ॥१३॥
पुण्य स्वरुप तो देव । कोणाचा अंश सावयव । कोणी पूजिला सदैव । विधिपूर्वक सर्व सांगा ॥१४॥
त्याने कोणा काय दिले । कोणत्या स्थळी तो संचरे । हे सर्व मला विस्तारें । कथन करा दयाघना ॥१५॥
त्या देवदेवेशा जाणून । हितावह तें घेईन । दक्ष बोले विनम्र वचन । सूत सांगे तै मुनींना ॥१६॥
मुनिजन झाले विस्मित । सूतासी तेव्हा ते प्रार्थित । कथन करी दक्षचरित । सर्वही सूता आम्हांसी ॥१७॥
दक्षप्रजापती कैसा । मूढत्व पावला ऐसा । प्रजापतिपदास कैसा । मुकला तें सांग सर्व ॥१८॥
यज्ञ कैसा झाला नष्ट । शंभू त्यावरी कां रुष्ट । हे सारे भयंकर अरिष्ट । दक्षावरी कां ओढवले ॥१९॥
हे महामते करी कथन । सूता सर्व हे आख्यान । मुनींचे रम्य वचन ऐकून । व्यासशिष्य संतोषला ॥२०॥
मधुर वचने तेव्हा सांगत । दक्षचरित्र ते पुनीत । कुतुहलपूर्वक ऐकत । मुनिजन सारे त्या वेळी ॥२१॥
शौनका ऐका लक्ष देऊन । कथा ही भुवनपावन । ऐकिली तैसी सांगेन । व्यासमुखातून पूर्वी मी ॥२२॥
ब्रह्मदेवास होते दहा सुत । दक्ष त्या माजी ज्येष्ठ असत । म्हणौनी ब्रह्मा त्यास करीत । रक्षक श्रेष्ठ प्रजापते ॥२३॥
राज्य मिळता उन्मत्त । जाहला गर्वे तो उद्धत । प्रजापतींत मी समस्त । श्रेष्ठ राजा अपूर्व ॥२४॥
माझ्यासम कोणी नसे । ऐसा गर्व तो करीतसे । पुढे काय वृत्त होतसे । ते ऐकावे सावधान ॥२५॥
एके दिवशी कैलासपर्वतीं । देव मुनिवर सिद्ध जाती । किन्नरगणही हर्षित चित्तीं । दर्शन घेण्या श्रीशंकरांचे ॥२६॥
गंधर्व अप्सरा नाग पुरस्सर । ब्रह्मा विष्णू महेन्द्र सत्वर । विद्याधरही स्वागसत्कार । शंकरांचा स्वीकरती ॥२७॥
सभेमाजी स्थानापन्न । झाले सर्वही पूजाप्रसन्न । डावीकडे विष्णूस बैसवून । उजवीकडे ब्रह्मा बैसविला ॥२८॥
बैसविले सर्व देव अतिथी । यथायोग्य मुनिश्रेष्ठा प्रीती । नंदीप्रमुख गण उभे राहती । शंकरांच्या जवळी तेव्हां ॥२९॥
प्रसन्नचित्त ते महामुनी । वसिष्ठादी स्तुतिगीतांनी । रंगले तेव्हां शंकरभजनीं । तीच स्थिती गंधर्वांची ॥३०॥
नारदादी गंधर्व गाती । सर्वही ललित गीतें किती । अप्सरा प्रेमें नृत्य करिती । पूजिती सारे ऐश्यापरी ॥३१॥
सह परिवार विराजले । शिवशंकर तेथ भले । कैलासीं तेव्हां पसरले । आनंदाचें साम्रराज्य ॥३२॥
करिती कथा नानविध सारे । आनंद दशदिशांत भरे । तेव्हां दक्षप्रजापति अतिसत्वरें । स्वयं तेथें येत असे ॥३३॥
शिव त्याचा करी सत्कार । स्वागत शब्द बोलून मधुर । परी तयास नमस्कार । ईश्वराने नच केला ॥३४॥
तेणें दक्ष कोपला । गर्वानें तो धुंद झाला । म्हणे पहा हो या जावयाला । अहंकार आहे केवढा ॥३५॥
मी असे याचा श्वशुर । पुत्रतुल्य हा मज शंकर । न केला मज नमस्कार । म्हणोनी सर्वथा हा त्याज्य ॥३६॥
ऐश्वर्याच्या गर्वे युक्त । स्वधर्मा विसरला शिव आसक्त । देवपंक्तींत बसण्या पात्र नसत । पिशाचांचा स्वामी हा ॥३७॥
वर्णाश्रमविरहित असे । नग्नरुपें भिक्षा मागतसे । सापांचीं भूषणें घालितसे । चितभस्में अंगलेप ॥३८॥
व्याघ्राजिन पांघरला । रुंडमाळा गळ्यात ल्याला । ऐसा हा दोषपूर्ण जाहला । अस्पृश्य सदा महात्म्यांन ॥३९॥
शिवनामें विलसे अशिव । अभिमानें सांगती ईशभाव । पिशाचराज हा कैसा देव । संभाशण यांसह करु नये ॥४०॥
ऐसे वदतां प्रजापती । ब्रह्मदेव त्यासी म्हणती । निंद्य सर्वथा तव उक्ती । परी दक्ष तें मानीना ॥४१॥
न मानिलें पित्याचें वचन । क्रोधयुक्त मनीं होऊन । निंदा बहुविध करुन । शंकराचे निंदितसे ॥४२॥
शिवनिंदा ऐसी ऐकतां । नंदिकेश्वर संतप्त तत्त्वता । सर्वांसमक्ष बोले वार्ता । क्रोधें आरक्त नयन त्याचे ॥४३॥
धिक्कार तुझा दक्षा व्यर्थ । प्रजापालपदीं तव काय अर्थ । मनीं धरोनिया स्वार्थ । शिवनिंदा तू दृष्टा करिसी ॥४४॥
शिवतत्त्व तू न जाणिसी । मदोन्मत्त ऐसा जाहलासी । दुर्मती तू काय ओळखसी । माया श्री शिवशंकरांची ॥४५॥
मायेचा खेळ हे करिती । परी स्वयं दोषरहित असती । म्हणौनी शिवपद भूषविती । कैसी निन्दा करिसी रे? ॥४६॥
शिवनिंदा तूं केली । तेणें तव मती भरष्ट झाली । नरकासी योग्य केली । कुडी आपुली तूं ज्ञानहीना ॥४७॥
जो जो करी शिवनिन्दा । त्यासी नरकप्राप्ती होय सर्वदा । शास्त्र सांगते आपदा । सदैव बाधे त्या निन्दका ॥४८॥
म्हणौनी ज्ञानहीन तूं होशील । राज्य तुझें नष्ट होईल । निंदी शिवा ते होईल । बोकडाचें मुख तुझें ॥४९॥
एसें ऐकून नन्दीवचन । प्रजापती म्हणे गर्जून । अरे दुर्बुद्धे तुज ज्ञान । झालें नाहीं शिवाचे ह्या ॥५०॥
तो आहे कर्मदूषित । वर्णाश्रमधर्म विहीन असत । कुवेषधारी पापयुक्त । ऐसा कोण अन्य असे? ॥५१॥
मृत्यूनंतर नरकवासी । होईल तो तू न जाणसी । ह्यास्तव तुम्हां शैवांसी ॥ अस्पृश्य मी मानतों ॥५२॥
जे जे जगीं शिवभक्त । ते ते होतील ज्ञानरहित । कलियुग होतां प्राप्त । जटाधर पाखंडी होतील ॥५३॥
शूद्र वेदपठण करतील । नागवे जगीं फिरतील। अंगीं भस्म लिंपतील । स्त्रीमांसमदिरासक्त ॥५४॥
नाना भोग परायण । ऐसे होतील शिवभक्त जाण । ऐकता दक्षाचे हे कुवचन । ब्रह्मा निंदी तयासी ॥५५॥
साक्षात्‍ ब्रह्मा प्रजापती । जेव्हा निर्भत्सना करी अती । क्रोधें मग त्वरित गती । परतला दक्ष ते स्वगेहीं ॥५६॥
सभेमध्ये जे जे स्थित । ते ते सारे परत जात । स्वस्थळीं अति खिन्न चित्त । दक्षवचनें दुखावलेले ॥५७॥
शिवही झाला मनीं व्यथित । ऐसी ही कथा द्वितीयाध्यायांत । दक्षनंदीविवाद कथित । सूत शौनकादी मुनींना ॥५८॥
आन्त्य ह्या मौद्‍गल राणीं । ऐसी ही कथा नामी । वक्रतुंड चरित्री रसखाणी । संपवितो दुसरा अध्याय हा ॥५९॥
इति श्री ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते दक्षनंदीविवादो नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः । श्री गजाननार्पणमस्तु ॥

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.