TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ५०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


दिवोदासमहिमवर्णनम्‍
श्रीगणेशाय नमः । विश्वामित्राचा भक्तिभाव पाहत । याज्ञवक्कय तेव्हां संतुष्टचित्त । मुनिपुंगव महायोगी त्यास म्हणत । तुज भेटण्याखास आलों ॥१॥
जाणून तू झालास दुःखित । काही मनोवांछित तुज अप्राप्त । आता काय कारण तें सांप्रत । सांग महामते मुनिपुंगवा ॥२॥
तुझ्या दुःखाचें कारण जाणून । नंतर तें दुःख दूर करीन । युक्तीनें ज्ञानोपदेश करुन । सांग सारें मनमोकळें ॥३॥
विश्वामित्र तेव्हा सांगत । मी आचरिलें घोर तप वनांत । त्यायोगें ब्रह्मा प्रसन्न होत । परी इच्छित वर मज न दिला ॥४॥
वसिष्ठ मला जनसमुदायांत । राजर्षि ऐसें संबोधित । कोणत्या उपायें ब्राह्मणत्व प्राप्त ।मज होईल तें सांगा ॥५॥
सर्वमान्यता महाभाग्य लाभत । ब्राह्मणत्व जेणें मज लाभत । तें सारें प्रयत्नें मी करित । ऐसा माझा दृढ निश्चय ॥६॥
तें ऐकता याज्ञवक्य म्हणत । राजर्षे तूं चिंता न करी चित्तांत । ब्रह्मर्षी तूं होशील निश्चित । उपाय त्यास्तव तुज सांगतो ॥७॥
महाघोर अभिमान । मनांतला दे सोडून । मत्सरा सारा मनापासून त्यागितां क्षेम प्राप्त होय ॥८॥
माझ्या वचनीं विश्वास ठेव । जेणें लाभेल कल्याण ठेव । कथा एक अभिनव । याविषयीं तुज सांगतों ॥९॥
काशीश्वराची मनोरम कथा । ऐक विश्वामित्रा हरेल व्यथा । निर्मळ होऊन तत्त्वतां । ब्राह्मण तूंही होशील ॥१०॥
काशीविश्वेवर न सोडित । काशी नगरी प्रलयींतात । वियोग त्या नगरीचा न होत । क्षणभरही सह्य त्यासी ॥११॥
काशीनगरी महेश्वर । उभयतांसी तेणें गर्व फार । तेव्हां विघ्न दारुण वियोगकर । उत्पन्न झालें एकदा ॥१२॥
मुद्‌गल म्हणती दक्षासी । ऐकोनि या वचनासी । कौशिक विचारी याज्ञवल्क्यासी । प्रेमयुक्त चित्तानें ॥१३॥
विघ्न कोणतें काशीला । तैसे बाधलें शिवाला । ज्यानें पीडिलें अविमुक्ताला । ऐसें विघ्न कोणतें? ॥१४॥
याज्ञवल्क्य तेव्हां सांगत । साठ वर्षे वृष्टी न पडत । तेणें बाधलें सर्व भूतले होत । नष्टप्राय सचराचर ॥१५॥
प्रजाक्षय तो पाहत । पितामह ब्रह्मा झणीं जात । सूर्यंवंशस्थित  दिवोदासाप्रत । राज्य सोडुनी तप करी जो ॥१६॥
भक्तिभावें मोक्ष वांछित । म्हणोनि घोर तप करित । तपप्रभावें योगानें होत । दुसरा सूर्य जणू तेव्हां ॥१७॥
ब्रह्मादेव त्याला म्हणे वचन । दिवोदासा ऐक माझें विज्ञापन । तुजसी काशीचें राज्य पावन । महामते दिलें असे ॥१८॥
त्याचा करी स्वीकार । तेव्हां दिवोदास म्हणे सत्वर । राज्यपालनीं न रमे विचार । मोक्षार्थी वासनाहीन ॥१९॥
जरी काही द्यायचें असेल । तरी मोक्ष द्या मज निश्चल । प्रजापतें हें मनोगत अचल । ऐसें आपण जाणावें ॥२०॥
ब्रह्मदेव पुनरपि तयास । म्हणे करीं लोकहितास । राज्य करी महाभागा सुयश । मजवरी करी उपकार ॥२१॥
तूं राजयवरी बसता । वृष्टि होईल महा अद्‌भुता । अन्यथा भूलोकनाश आतां । म्हणोनि मानी माझें वचन ॥२२॥
तो दयायुक्त महामती । लोकसंरक्षणाची इच्छा उपजली चित्तीं । काशीचें राज्य अमल कीर्ती । देववर्जित तें स्वाकारी ॥२३॥
देवांचें अखिल राज्य स्वर्गांत । मनुष्यांचे पृथ्वीवर ख्यात । पाताळीं नागराक्षस वसत । म्हणोनि पूजिन शंभूसी मीं ॥२४॥
सर्वांनी स्वधर्मे रहावें । जरी आपणा वाटे मी राज्य करावें । ऐसें दिवोदासांचे उत्तर बरवें । ऐकून म्हणे ब्रह्मदेव ॥२५॥
होईल तुझ्या जें मनांत । काशीराज्य दिलें तुजप्रत । दिवोदास बुद्धिमंता त्वरित । स्वीकारावें तें आता ॥२६॥
नंतर ब्रह्मा काशींत । जाऊन शंकरा प्रणाम करित । म्हणे शंकरा जाई मंदाराप्रत । मरीचि जेथ तप करी ॥२७॥
त्यासी वर द्यावा जाउनी । नाहीतर मरेल तो मुनी । जगद्‌गुरो आपुल्या मनीं । भक्तप्रेम नाहीं का? ॥२८॥
ब्रह्मयाचें वचन ऐकून । शिव गेला त्याच्यासह उन्मन । देवर्षि गणयुक्त होऊन । ब्राह्मणा त्या वर देण्यासी ॥२९॥
तेथ मंदारीं जाऊन । मरीचीस म्हणे वर माग मी प्रसन्न । तेव्हा तो म्हणे सदाशिवा पावन । मोक्ष देउनी करी मज ॥३०॥
ऐसें वरदान मागत । तपाच्या दुःखानें प्राण सोडित । शिवसारुप्य त्या महामुनीस प्राप्त । कैलासीं गेला तत्क्षणीं ॥३१॥
या वेळीं ब्रह्मा विनवीत । शंभूसी हात जोडुनी विनीत । आता तूं राही मंदारांत । सोड काशी नगरीसी ॥३२॥
तेथ अनावृष्टीचें दुःख पातलें । त्याचें निवारण पाहिजे झालें । म्हणोनि काशीचें राज्य दिलें । दिवोदासासी आग्रहें मीं ॥३३॥
जरी पृथ्वीवर नसेल । तरी मज तें चालेल । नाहीतर राज्य मज सकल । अवनीचेंही न इष्ट ॥३४॥
महादेवा लोकरक्षणार्थ केली । ती अट मी मान्य त्या वेळीं आतां तुम्ही पाहिजे सोडिली । काशीपुरी क्षमा करुन ॥३५॥
माझा अपराध क्षमा करी । तेव्हां शिव म्हणें तैसेंचि करीं । पार्वती गणसंयुक्त मंदरी । राहिला शिव तदनंतर ॥३६॥
अविमुक्त जें काशीपुर । ते दैवानें नेलें दूर । आतां कोणत्या कर्मे सुंदर । तीर्थी पुनरपि त्या निवास? ॥३७॥
ब्रह्मदेवचें वचन न होत । मिथ्या कदापि जगतांत । आतां मी काय करावें जगांत । काह्सीविरहें दुःखित ॥३८॥
मी विश्वेश्वर असत । परी माझ्या स्वाधीन कांहीं नसत । विश्वनाथ हें नाव होत । व्यर्थ आतां निःसंशय ॥३९॥
अन्य सर्व प्राण्यासमान । झालों मी जो होतों महान । आतां त्या विघ्नराजा शरण । जाण्याविन ना अन्य गती ॥४०॥
माझ्याही अनुभवा आलें । विघ्नरुप त्याचें हें असलें । अहंकारविहीन केलें । महात्म्यानें त्या मला ॥४१॥
ऐसा निशय करी मनांत । पर्वतावरी त्या तप करित । गणपतीस ध्यातसे अविरत । काशीलाभार्थ आदरें ॥४२॥
तिकडे काशीनगरी आचरित । शंभुवियोगें दुःखित । विघ्नेशा ध्यात मनांत । निश्चल चित्तें तप उग्र ॥४३॥
तिचाही अहंकार गेला । शिवाचा विरह जाहला । त्याच्या प्राप्ती साठी केला । तिनें खटाटोप तपाचा ॥४४॥
दिवोदास धर्मानें राज्य करित । तेणें वृष्टि सर्वत्र पडत । तेव्हां स्थावरजंगम जग होत । सुखी मोदयुक्त त्याच्या राज्यीं ॥४५॥
स्वधर्मरत वर्णाश्रम असत । पापाचा लेशही नसत । दिवोदास जेव्हां राज्य करित । धर्म सर्वत्र नांदला ॥४६॥
हृष्टपुष्ट जन झाले । वृक्ष पुष्प फळांनी लगडले । गायींचे स्तनही झाले । घटांसम दुग्धप्रचुर ॥४७॥
स्वाहा स्वधायुत । देव पितर होत मुदित । यज्ञादि कर्में नित्य होत । दिवोदासाच्या राज्यांत ॥४८॥
ऐसे नानाविध भोगयुक्त । सर्व प्रजा होती सुखांत । तो राजा नित्य यात्रा करित । प्रथम पूजी ढुंढीसी ॥४९॥
नंतर पूजी विश्वेश्वरास । जगदंबेस काशीत । मणिकर्णिका तीर्थास । भागीरथीस माधवाला ॥५०॥
नंतर जैगीषव्यगुहेत । कालभैरवा दंडपाणीस पूजित । धर्महीनास मारण्यास । दंड हातीं घेत असे ॥५१॥
ऐशी ऐशी वर्षे उलटत । परी पापाचा अंशही न शिरत । धन्य दिवोदास जगांत । निष्पाप अकलंक राज्य करी ॥५२॥
देव मनीं विचार करीत । सर्व विस्मित ते स्वर्गांत । देवराज्य विनष्ट केलें म्हणत । पृथ्वीवरी दिवोदासें ॥५३॥
म्हणोनि किमर्थ भूतला-वरी । रहावें आपण याउपरी । राजर्षि आपणासवें स्पर्धां करी । त्यास फसवूंया आपण ॥५४॥
नंतर अग्नीस बोलाविती । क्रोधयुक्त इंद्रदेव म्हणती । दिवोदासाच्या राज्यीं स्थितीं । तुज नाही सोडून जा ॥५५॥
इंद्रासी आज्ञा ऐकत । अग्नी लुप्त झाला काशींत । जन सारे वन्हिहीन होत । दिवोदासासमीप जाती ॥५६॥
त्यांचें वचन ऐकत । दिवादास स्वयं अग्निरुप घेत । तपोबळानें सर्व पृथ्वींत । ऐसा प्रभाव तयाचा ॥५७॥
ऐसे नानाविध भावें देव जात । क्रमानें ते काशी सोडित । तेव्हा त्यांची त्यांची रुपें घेत । स्वयं दिवोदास राजा ॥५८॥
वायु आदींची रुपें घेत । राजा देवांचे कृत्य तें जाणत । पृथ्वीवर तया लोक अज्ञात । विश्वामित्रा,ऐशी स्थिती ॥५९॥
ऐसा बहु काळ गेला । देववृंद विस्मित झाला । देवांचें कार्य करीत राहिला दिवोदास परामद्‌भुत ॥६०॥
नंतर देवगण समस्त । ब्रह्मदेवासी शरण जात । दिवोदासा मोहविण्या त्यक्त । निर्जरांनीं पृथ्वी तें ॥६१॥
ते ब्रह्मदेवासी सांगत । आमुची रुपें घेऊन करित । आमुची कार्यें परम अद‌भुत । विहारहीन आम्हां केलें ॥६२॥
आता विभो काय करावें । ते आम्हांसी सांगावें । ऐकून त्यांचें वचन आघवें । ब्रह्मा म्हणे तयांसी ॥६३॥
आपण तेथ त्वरित जावें । दिवोदासासी विनवावें । आपापलें स्थान मागावें । देईल तो यांत संशय नसे ॥६४॥
ब्रह्मदेवाचें वचन मानित । इंद्रमुख्य देव जात । त्वरित दिवोदासा भेटत । प्रणाम करी तो विनयानें ॥६५॥
त्यासी उठवून देव सांगत । आम्ही तुजवरी प्रसन्न समस्त । द्यावे आमुचीं स्थानें परत । दिवोदास तैसें करी ॥६६॥
स्वतः एक देहांत । नरदेहें तो राज्य करित । नंतर अग्नि आदी देव जात । सुस्थित निजस्थानीं तें ॥६७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते दिवोदासमहिमावर्णन नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:51.9270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ex-dividend

  • लाभांश-रहित (शेयर क्रय) 
  • Stock-exch. (with the value of a pending dividend excluded from the sale price of a security, the buyer not being entitled to the dividend when paid - opposed to cum divident) लाभांशरहित 
RANDOM WORD

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site