मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणे सूता । महाप्राज्ञा सांगे आतां । परमानंददायका उचिता । कथा अमृतरुपा तूं ॥१॥
महाप्राज्ञा आम्ही प्रसन्न झालों । उत्तम कथा ऐकून तोषलों । स्वानंदें परिप्लुत जाहलों । अमृतपानासम धन्य ॥२॥
पावलों कृतकृत्यता । दिव्य कथा सांग आतां । पंचदेवांनी तत्त्वता । काय केलें तें सांग ॥३॥
विस्तारपूर्वक यथान्याय । जेणें मुक्त होऊ आम्ही अभय । त्या मुनींचा आर्तभाव । भक्तिभावही पाहोनी ॥४॥।
ऐकून तयांचे वचन सांगत । हृष्ट होऊन पुन्हा सूत । पापविनाशिनी कथा अद्‌भुत । दक्ष म्हणे योगीश्वरा ॥५॥
मुद्‌गलें त्यास जैसें कथिलें तें महामुने मज आठवलें । महाभागा दक्षा जें ऐकिलें । पार्वतीनें शिवसन्निध ॥६॥
तिनें जें जें विचारिलें । जें जें त्या वेळीं ऐकलें । तें सर्व विस्तारें भलें । सांगेन तुजला या वेळीं ॥७॥
पार्वती म्हणे शिवासी । देवदेवेशा मज तारिलेसी । भगवंता कृतकृत्यतेसी । सांप्रत पावले कथामृतपानें ॥८॥
पांच देव ते समर्थ होत । वर लाभता काय करीत । महात्मे ते सर्व साद्यंत । सांग मजला प्रेमानें ॥९॥
गणेशभक्तियुक्त असत । तरी सांगा तें मला चरित । अथवा गणपत्यांचें जीवित । ब्रह्मदायक प्रभावयुत ॥१०॥
वृथा गप्पा मारण्यांत । आयुष्य न नासावें प्राज्ञें जगात । धन्य ते साधू सज्जन संत । प्रभावित गणेशभक्तीनें जे ॥११॥
मुद्‌गल म्हणती ऐसें वचन । पार्वतीचे महेश्वर तेणें प्रसन्न । महायश ते देवीस आलिंगून । स्मित करुन सांगती ॥१२॥
धन्य तूं जगीं पार्वती । तुझ्या जन्माचें सार्थक अन्तीं । भक्तीनें गणेश धरिला चित्तीं । म्हणोनि धन्यता वरानने ॥१३॥
जे नर गणेश भक्तियुत । ते ब्रह्मरुपी साक्षात । त्यांच्या दर्शनमात्रें मुक्ति लाभत । सर्वत्रांसी निःसंशय ॥१४॥
गणेशातें वगळून इच्छित । जो सिद्धी शाश्वत जगतांत । तो मूढात्मा नारकी असत । यांत संशय कांहीं नसे ॥१५॥
अन्य देवतांचे जे भक्त । गणेशाची पूजा न करित । त्यांना सिद्धी न लाभत । अंतीं पडती नरकीं ते ॥१६॥
अमृत त्यागून रुक्ष अन्न सेवित । दुर्मती तैसेच अविनीत । गणेशाची सोडून भजत । अन्य देवां त्यांची ही स्थिती ॥१७॥
आम्हां सर्वांचा गणेश पिता । तोची आमुची माता । ह्यांत संशय नसे चित्ता । ज्येष्ठराज ख्याती तयाची ॥१८॥
म्हणोनी सर्वांआधी पूजनीय असत । हें न जाणून पूजा करीत । जो मूढात्मा अन्य देवांची जगांत । नरकांत त्यासी टाकितसे ॥१९॥
गणेशाचें उल्लंघन करी । गणेशनिंदा जो जंतू करी । तो जरी माझी भक्ति करी । तरीही नरका पात्र होय ॥२०॥
आमुच्या गुरुचा द्वेषकारक । तो आमुचा कैसा उपासक । पार्वती धन्य तूं एक । गणेशाची भक्ति करिशी ॥२१॥
सर्वांचा मूळबीज असत । त्यातें भजसि तूं पुनीत । गणेशाची स्तुती करित । म्हणोनी कृतार्थ जन्म तुझा ॥२२॥
गणेशकार्यीं साहाय्य करिसी । त्या गणेशासी स्तविसी । सत्य हें एक तूं अससी । प्रिय अत्यंत गजानना ॥२३॥
मीही गणेश प्रार्थित । चिंतामणे प्रभो वर्णित । मम चित्तीं तूं निवास करीत । ऐक स्तुतिस्तोत्र तुझें ॥२४॥
हें गजानना महोदरा । गाणपत्यांचा संग बरा । लाभेल ऐसें करा । महाभागांची संगत ॥२५॥
हे द्विरदानाना त्यांच्यात । निवास व्हावा माझा जगांत । माझ्या पुढयांत पाठीं असोत । डाव्या उजव्या बाजूस ते ॥२६॥
त्यांचा वास सर्वत्र असावा । गाणपत्यांचा सहवास लाभावा । ज्यांच्या मुखारविंदांतून ऐकावा । गणेश चरिताचा महिमा ॥२७॥
भवबंधहर पूर्ण सुखदाता । सांप्रत जीवनान्तींही त्राता । ऐसा गणेश चरित महिमा तत्त्वता । अनुभव हा प्रत्यक्ष असे ॥२८॥
गाणपत्यांचें चरित । गणराट्‍ सेवनात्मक असत । ढुंढिभक्तिदायी जे विलसत । अहर्निश क्रियावन्त ॥२९॥
हे देवि तू मज तारलेस । कथा गणेशभक्तीनें सुरस । गणेशभक्तांची विचारलीस । तेणें पावन झालीस ॥३०॥
ऐसी ही कथा पावन । जो विचारी मनापासून । ऐकतो तसा सांगे रंगून । त्या सर्वांसी ब्रह्मभूयपदप्रद ॥३१॥
ती गाणेशी सुखदायिनी । तुज सांगतों मनमोहिनी । पंच देवासी गणेशें निर्मूनी । वरदान प्रभावानें ॥३२॥
ईश्वरज्ञान त्यांसी सांगत । वरद गणपति स्वयं जगांत । पंचलोक निर्मून विभागीत । पंचदेवांचीं वसतिस्थानें ॥३३॥
कैलासी शंकर वैकुंठीं विष्णू सौरलोकीं रवि वर्धिष्णू । शक्तिलोकीं जगन्मयी प्रभविष्णू । सत्यलोकीं ब्रह्मदेव ॥३४॥
मोदें ऐसे ते निवसत । ऐश्वर्य भोग भोगित । परस्परांच्या हितांत । सदैव मग्न ते असती ॥३५॥
ईश्वर सत्य संकल्पयुक्त । ब्रह्मरुपी स्वतःस मानित । परी कालांतरें निर्माण होत । मत्सर मानसीं तयांच्या ॥३६॥
मी सर्वांत श्रेष्ठतम ईश्वर । प्रभू सर्वांत थोर । ऐसा हृदयीं करिती विचार । विवाद करिती त्वेषानें ॥३७॥
तेव्हां स्वशरीरापासून निर्मिलें । पाणी विष्णूनें चहूकडे भलें । त्यांत यथासुख बहुकाल पहुडले । निद्रासुखांत निमग्न ॥३८॥
त्या जळांत शेवाळाची वेल वाढत । पृथ्वी कालांतरें त्यांत संजात । लीला म्हणून विष्णु निर्मित । नाभींतून कमळ एक ॥३९॥
तें उज्ज्वल कमल विस्तृत । शंभर योजनें पाकळ्या पसरत । मोहक तेजस्वी शोभिवंत । पाहून बोलला जनार्दन ॥४०॥
एकदां ब्रह्मा तेथ जात । पितामह तें कमळ पहात । हृदयीं होय अति विस्मित । कोणीं निर्मिलें कमळ म्हणे ॥४१॥
ऐसें हें परम शोभन । मनोहर पुष्प देदीप्यमान । तेथ नारायणासी पाहून । निद्रित महासागरीं तया ॥४२॥
ब्रह्मा स्नेहभावें उठवित । त्याच्या वचनें जाग येत । जनार्दन ब्रह्मदेवाचें स्वागत । करिते झाले आदरानें ॥४३॥
अहो पितामहा सुस्वागत । विराजावें या आसनांत । तेव्हां ब्रह्मा विचारित । कमळ हें तूं का रचिलें? ॥४४॥
परमशोभन हें कमळ रचिलें । मजला मोहविण्या ऐसें वाटलें । परी तूं हें विपरीत केलें । निर्माणकर्म माझें असे ॥४५॥
मी ब्रह्मा जगताचा निर्माता । सर्वादी सर्व भावनकर्ता । मी पृथ्वी निर्मिल्यावरी सत्ता । पालन करण्याची तुझी ॥४६॥
जर सृष्टी मी ना निर्मीन । जनार्दना पाळिसी तूं काय उन्मन । सर्वांची उत्पत्ती माझ्या अधीन । म्हणोनी ईश्वर मी असे ॥४७॥
ऐकून ब्रह्मदेवाचें वचन । विस्मित झाला जनार्दन । मधुर वाक्य बोलून । सांत्वन करी ब्रह्मयाचें ॥४८॥
विष्णू म्हणे मोहविण्या न निर्मिलें । तुजला हें कमळ चांगलें । केवळ क्रीडा करण्या सृजिलें । यांत संशय न धरावा ॥४९॥
परी तुम्ही मत्सरयुक्त । पितामहा वचनें केलें दुःखित । मी तुमचेंही पालन करित । जरी स्त्रष्टे तुम्ही जगीं ॥५०॥
माझ्याहून अन्य पालक नसत । तुमचा सर्वांचाही जगांत । पालक भावें महाविष्णुपद लाभत मजसम अन्य कोणी नसे ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुण्डचरिते ब्रह्मविष्णुविवादो नाम द्वादशोऽध्ययः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.