मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षास । दंभाच्या नगरीं महित्सवास । जन करिती सोल्हास । काही काळ महाभागा ॥१॥
एके दिनीं सुहुंड तैसा हुंड । महाबल रुक्मकेतु तो प्रचंद । दंभासुराचे राजधानींत उदंड । जमले दैत्यप सर्वही ॥२॥
मद्यप सकोप क्रोधा सुर । कामासुर बलाढय रासभासु । इत्यादि बहुत आले असुर । दंभासमीप त्या वेळीं ॥३॥
ते सर्वंही प्रणाम करुन । महात्मे म्हणती दंभासुरा पुजून । उत्सव करण्या देवनाशन । महाराज स्वस्थ काय बसलात? ॥४॥
आम्ही सर्वही तुम्हांप्रत । विज्ञप्ती करण्या आलों समस्त । आपुल्या बळें त्रिभुवनांत । असुरराज्य पसरवूंया ॥५॥
तुझ्या आज्ञेंत राहत । दैत्य दानव राक्षस प्रणत । ब्रह्मांडी तुझ्यासम नसत । बलवंत दंभराजा कोणी ॥६॥
यश तेज तुझ्यासम । कोणाचेंही नसें कर्म । आज्ञा देता अनुपम । शौर्यं जिंकूं सारें जग ॥७॥
दैत्येशांचे वचन ऐकून । दंभदैत्य मनीं हर्षून । भावयुक्त मनें अनुमोदन । देई त्यांच्या सूचनेला ॥८॥
माझ्या मनांतलें बोललात । जें इष्ट तैसें हित असत । तुमच्या साहाय्यें अल्पावधींत । जिंकीन चराचर जग सारें ॥९॥
ऐसें देऊन आश्वासन । शुक्रगुरुंना तेथ आणून । त्यांचें मत विचारुन । नगरांतून निघाला तें ॥१०॥
अपार सेना चतुरंगयुक्त । दंभासुराची नृपांसि जिंकित । पृथ्वीतळीं जे प्रतापयुक्त । नंतर जाती पाताळीं ॥११॥
तेथ नागांसी जिंकिती । नंतर स्वर्गावर स्वारी करती । तेव्हां देव सारे त्यासवें लढती । इंद्र नेतुत्व त्यांचें करी ॥१२॥
त्या वेळीं दैत्यगण बहुत । वज्रपातें दग्ध चूर्णित । चित्तीं झाले भयभीत । रणभूमी सोडून पळाले ते ॥१३॥
परी दंभासुर लढत । आपुल्या अमित वीर्ये गर्वित । चक्रघातें देवेंद्रा मूर्च्छित । केलें त्यानें त्वेषानें ॥१४॥
देवांवरी बाणवृष्टी करी । घायाळ विद्ध त्यांसी करी । संज्ञा मिळता गर्वित । इंद्र पळाला माघारीं ॥१५॥
जीविताशा त्याच्या चित्तीं । देवगण त्यासी अनुसरती । दैत्य बसला ऐरावतीं । विराजला देवेंद्रासनीं तो ॥१६॥
दंभ अमरपुरींत जात । आपुल्या स्वजनां हर्षवी बहुत । इंद्र देवगणासहित । शरण गेला ब्रह्मदेवासी ॥१७॥
ब्रह्मा जात विष्णूपत । विष्णु शिवाचा आश्रय घेत । शिव होऊनी क्रोधयुक्त । त्वरित आला रणांत ॥१८॥
त्या दैत्यराजा आव्हान देत । येई म्हणे तू लढण्या त्वरित । तेव्हां दंभदैत्य दैत्येशांसहित । सज्ज होऊन पातला ॥१९॥
देवदैत्यांचे रोमहर्षण । युद्ध झालें परम दारुण । परस्पर विनाशन । चाळीस दिवस अविरत तें ॥२०॥
भीतिसंयुत युद्ध झालें । रक्ताचे रद वाहले । प्रेतें पडुनी ते रंगले । उभयपक्षींच्या वीरांची ॥२१॥
तेव्हां दंभ क्रुद्ध होत । देवांसि तीक्ष्ण बाणांनी ताडित । देवराज पडती मूर्च्छित । रणभूमीवर त्या समयीं ॥२२॥
शंभू त्रिशूलानें ताडित । त्या महाबळासी क्षणांत । दैत्य भूमीवरी पडत । परी उत्साहें उठे पुन्हां ॥२३॥
आपलें बलवंत चक्र सोडित । शंकरावरी तो अकस्मात । त्या चक्रानें मूर्च्छित होत । अर्धा प्रहर शिवशंकर ॥२४॥
दैत्यराजाचें अति अद्‌भुत । महावीर्य पाहून खूण बांधित । माघारा पळाला वनांत । देवांसहित भय विहवल ॥२५॥
देवेंद्रा ऐसी माघार घेती । दैत्यनायक त्यांना हसती । अमरावातींत प्रवेश करिती । आनंदाने परिपूर्ण ते ॥२६॥
नंतर दंभासुर नेमित । दैत्यनायकां सत्य लोकांत । वकुंठांत कैलासांत । अमरावतीत अधिकारपदीं ॥२७॥
अनेक देवसदनांत । दानवांसी तो निवास देत । ऐसे करुन कर्म अद्‌भुत । परतला स्वनगरींत शोभन ॥२८॥
ऐसा तो उन्मत्त करित । त्रैलोक्याचें राज्य मजेंत । धर्मकार्ये नष्ट करा म्हणत । आज्ञा देई त्यासाठीं ॥२९॥
तत्काळ दैत्य जातो । ब्राह्मणां बांधून मारिती । यज्ञशाळ ते ध्वंसिती । यज्ञवृक्ष बहु तोडिले ॥३०॥
तीर्थांचा लोप केला । देवमंदिरें नेलीं रसातळाला । नानाविध प्रकारें केला । कर्माचा लोप त्यांनी ॥३१॥
त्यांच्या भयें कोणी भ्रष्ट होत । कोणी विप्र झाले मृत । काही वनीं पलायन करित । सिंह व्याघ्रादि संकुल जें ॥३२॥
तेथ संध्यादि कर्मविहीन । न स्वाहा न स्वधा पावन । वषट्‌कार लोपला विघ्न । वर्णाश्रम धर्मीं आलें असें ॥३३॥
दंभाच्या राज्यांत होत । वर्णसंकररुपा प्रजा जगांत । देवगण तेणें भयभीत । यज्ञाहुती नष्ट झाल्या ॥३४॥
मृतप्राय अथवा मृत । ब्राह्मण झाले अधर्मंरत । तेव्हा ब्रह्मदेवासी देव विनवित । तुझ्याविण कोण रक्षील आता? ॥३५॥
हे कमलासना तूच त्राता । तूच आमुचा प्राणधर्ता । सर्वांचा तू भाग्यविधता । तुजवीण गती न देवांसी ॥३६॥
तूच ब्रह्मभावित । आमुचें रक्षण करी संकटांत । दंभासुराचें भय अविरत । भिववी आम्हां सर्व देवांसी ॥३७॥
यज्ञकर्म नष्ट झालें । त्यानें आमुचें भोजन संपलें । म्हणोनि प्रपितामहा झाले । देव सर्वही मनीं उदास ॥३८॥
तूच अभय आम्हां दिलेस । तूंच आम्हां पाळिलेस । भुकेनें झालों कासाविस । तुझ्या पुढ्यांत प्राण सोडूं ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथम खंडे वक्रतुंडचरिते दंभासुरविजयो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP