TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


याज्ञवल्क्यविश्वामित्रसमागमः
श्रीगणेशाय नमः । एके दिवशीं गाधिपत्नी जात । शोकसमाकुल ती वनांत । कन्येची आठवण येत । भेटण्या तिला समुत्सुक ॥१॥
वस्त्रधनान्वित ती जात । ज्यावनीं ऋचीक जे राहत । बैसोनिया रथांत । आश्रम कोठे तिज दिसेना ॥२॥
आश्रमाच्या जागीं होतें । हेमशीभाढयनगर परतें । तें पाहून विस्मित चित्तें । विचार करी तो मनांत ॥३॥
कोणाचें हें दिव्य नगर । देवांनीं निर्मित कीं हें सुंदर । कोठे गेला जामात वेदवर । भार्गव माझ्या कन्येसह ॥४॥
कन्येची आठवण मनांत । होता झाली शोकसंतप्त । कोणी पुरुष पाहिला अज्ञात । नगरद्वारी त्यावेळीं ॥५॥
भयातुर त्यासे विचारित । कोणाचें हें नगर सांग त्वरित । तेव्हा तो पुरुष सांगत । ऋचीकांचे नगर हें ॥६॥
मी त्यांचा प्रमार्जक असत । ते ऐकून आश्चर्यचकित । राणी म्हणे जाउनी सांग साद्यंत । ऋषिपत्नीस माझ्या सुनेला ॥७॥
जननी तुझी पुरद्वारीं आली । तुझ्या दर्शना आसुरली । पुरुषें निरोप देता धावली । गाधिकन्या महोत्साहें ॥८॥
मातेसमीप जाऊन । तिला गेली सदनीं घेऊन । जावयाचें वैभव पाहून । विस्मित झाली गाधीपत्नी ॥९॥
म्हणे आपुल्या कन्येस । हें वैभव अलौकिक विशेष । आतां तू विनवी आपुल्या पतीस । पुत्रप्राप्तीसाठी मुली ॥१०॥
मजला नाहीं एकही सुत । बंधुहीन तूं हे जाणत । तुझ्यासाठीं माग सुत । तैसाचि याची मज साठीही ॥११॥
गाधिकन्या ऋचीकाप्रत । याचना त्यापरी जेव्हा करित । तेव्हा चरु अग्निकुंडात । सुतप्राप्तीस्तव निर्मिले ॥१२॥
तो पुरोडाश द्विविध असत । ब्रह्मक्षत्र तेजयुक्त । अतुल तेजें आवाहन करित । नंतर देत पत्नीला ॥१३॥
हा चरु तू खावयाचा । दुसरा जननीस द्यावयाचा । विसर पडूं नये साचा । माझ्या या वचनाचा तुज ॥१४॥
हे दोन चरु प्रभावयुक्त । भक्षण करिता पुत्रलाभ होत । शुचिस्मितें मनोवांछित । पुरव आपुलें जननी चेंही ॥१५॥
ऐसें सांगून स्नानार्थ जात । मुनी ऋचीक तीर्थाप्रत । माध्यान्हकाळीं उचित । संध्यावंदनादी करावया ॥१६॥
कन्या हर्षोत्फुल्ल होऊन । मातेसी सांगे वर्तमान । तेव्हां जननी म्हणे कन्ये मान । माझी एक विनंती तू ॥१७॥
तुझा चरु मी भक्षीन । माझा चरु तुजसी देईन। कन्या मानी मातेचें वचन । बदलले चरु तैसेची ॥१८॥
चरु भक्षण करुनी । दोघीही अति आनंदित मनीं । रानी गेली स्वराज्यीं परतुनी । कालांतरानें काय झालें ॥१९॥
माता सुता गर्भवती । दोघी झाल्या मुदित्त चित्तीं । आपुल्या पत्नींच्या मुखावरती । उग्र तेज दिस ऋचीकला ॥२०॥
त्यास मनीं संशय येत । तो स्वपत्नीसी विचारित । क्षात्रधर्मी तुज आदर वाटत । ऐसें मजला दिसतसे ॥२१॥
तेव्हां ती होत भयभीत । सत्य स्थिती त्यास सांगत । चरुंची अदलाबदल झाली असत । तें ऐकूनि मुनि विस्मित ॥२२॥
म्हणें आपुल्या भार्येप्रती । तुझा भराता होईल तपस्वी निश्चिती । तुझा पुत्र धनुर्धारी जगतीं । होईल दारुण निःसंशय ॥२३॥
तेव्हां त्याची पत्नी विनवित । द्विजगुणयुक्त पुत्र मज आवडत । तैसा न होता जीवघात । करीन मीं हें सुनिश्चित ॥२४॥
ऋचीक म्हणे कांतेप्रत । तुझ्या पुत्राचा पुत्र तैसा होईल जगांत । तैसी प्रार्थना करुन विष्णूप्रत । गर्भास विज्ञापना करी ॥२५॥
ऋचीकाची पत्नी जन्म देत । महाप्रतापी जमदग्नीप्रत । त्या जमद्ग्नीचा पुत्र होत । द्विजोत्तम परशुराम ॥२६॥
नऊ महिने पूर्ण होत । तिकडे गाधिपत्नी होत प्रसूत । महाभागासी जन्म देत । तपोनिधि विश्वामित्रासी ॥२७॥
विश्वामित्र यौवनभावीं प्रवेशत । तेव्हा स्वराज्यीं त्यास बसवित । स्वतःतपार्थ वनात जात । आदरपूर्वक गाधिराजा ॥२८॥
त्यानंतर राज्य करित । विश्वामित्र विधिसंमत । एकदा तो जात वनांत । मृगयेसाठीं कालांतरानें ॥२९॥
अनेक पशू मारिले । क्षुधा पिपासांदीनीं गांजलें । वनांत फिरता विश्वमित्र पातले । उतम वसिठाहश्रमांत ॥३०॥
तेथ प्रवेश करुन । वसिष्ठासी केलें नमन । सैन्यासहित त्यासी भोजन । वसिष्ठानें तें दिलें ॥३१॥
कामधेनु होती आश्रमात । तिच्या बळें सारें भोजन पुरत । तें रहस्य कळता विश्वामित्रापत । नंदिनी मज देई म्हणे ॥३२॥
परी वसिष्ठें नकार दिला । विश्वामित्रा क्रोध आला । बलात्कारें त्या कामधेनूला । पकडून न्या म्हणे तो ॥३३॥
विश्वामित्राचे दूत । त्या दुष्टाची आज्ञा पाळण्या जात । परी कामधेनू त्या सर्वां संहारित । आपल्या प्रभावयोगानें ॥३४॥
तेव्हां विश्वामित्रं स्वतःजात । चाबकानें धेनूस मारित । त्यासमयीं महासैन्य निर्मित । कामधेनू क्षणांत ॥३५॥
कामधेनू निर्मित सैन्यांत । तैसेंचि विश्वामिर सैन्यांत । घोर युद्ध झालें विलंबित । नष्ट विश्वामित्र सेना झाली ॥३६॥
विश्वामित्र पराजित होत । भग्नहृदय स्वगृहा परतत । प्रधानांच्या स्वाधीन करित । राज्य आपुलें त्या वेळीं ॥३७॥
नंतर गेला घोर वनांत । शंकराचे तप आचरित । शंभर वर्षे ऐसीं जात । तेव्हा शिव प्रसन्न झाले ॥३८॥
अस्त्रविद्या सुसंपूर्ण त्वरित । शंकर विश्वामित्रा देत । तेव्हां पुन्हां तो वसिष्ठाश्रमीं जात । शस्त्रास्त्रे समग्र घेऊन ॥३९॥
आपुल्या सेनेसह गेला । वसिष्ठाश्रम त्यानें जाळला । अग्न्यस्त्रांचा प्रभाव दाखविला । विश्वामित्रें गर्वानें ॥४०॥
वसिष्ठ तेव्हां युद्ध करित । ब्रह्मदंड घेऊन करांत । सर्व अस्त्रें भग्न करित । विश्वामित्रें जी सोडिलीं ॥४१॥
ब्रह्मदंडानें पराजित । केलें विश्वामित्रा त्वरित । तेव्हां विश्वामित्र भयभीत । पळूं लागला आसमंती ॥४२॥
विप्र वसिष्ठाचें सान्त्वन । प्रयासें करिती ब्राह्मण जन। बांधिला पुनरपि त्यानें आश्रम नूतन । प्रवेश मग करी त्यांत ॥४३॥
विश्वामित्रही घरीं परतला । मनीं खिन्न फार झाला । ब्रह्मबळाचा प्रभाव उमजला । क्षात्रबळा तुच्छ मानी ॥४४॥
विश्वामित्र करी विचार । ब्रह्मदंडे नाशिलीं सत्वर । माझी सर्व अस्त्रें घनघोर । आतां पुन्हां तप करावें ॥४५॥
ऐसा निश्चय करुन । राज्य सोडून जवळ केलें वन । ब्राह्मणत्व सिद्ध व्हावें म्हणून । करुं लागला परम तप ॥४६॥
गायत्रीमंत्राचे पुरश्चरण । राजर्षि करी निराहार राहून । ऐसीं दहा हजार वर्षे जप करुन । ब्रह्मदेव तोषविला ॥४७॥
ब्रह्मा वर माग म्हणत । तेव्हां विश्वमित्र ब्राह्मणत्व मागत । विधि म्हणे अन्य कोणताही वर देत । तपस्वी विश्वामित्रा तुज ॥४८॥
ब्रह्मदेव ऐसें दशवार । सांगे परी मुनी करी न स्वीकार । ब्राह्मणत्व लाभावाचून अन्य वर । कोण्ताही अमान्य तया ॥४९॥
तपःप्रभावें त्याच्या व्याप्त । दिंगतर देवादी आज्ञा पाळित । आपुल्या प्रतापें बलयुक्त । गाधिपुत्र म्हणे ब्राह्मणांसी ॥५०॥
मी ब्रह्मर्षि झालों आतां तपाप्रभावें तत्त्वतां । राजर्षित्व जन्मे लाभतां । ब्रह्मर्षी मुख्य मज म्हणा तुम्हीं ॥५१॥
सर्व ब्राह्मण भयभीत । त्याची आज्ञा स्वीकारित । त्यास नमरतेंने वंदित । परी वसिष्ठ मुनिवर्य तें न मानी ॥५२॥
राजर्षि ऐसेचि हाक मारी । विश्वामित्रा तें क्रोध भारी । वसिष्ठा मारण्या नानापरी । यत्न त्यानें बहु केले ॥५३॥
परी तो महामुनि न मरत । तेणें विश्वामित्र अति दुःखित । परतला आपुल्या आश्रमांत । तेजस्वी तो महाभागा ॥५४॥
त्या समयीं तेथ येत । महातेजस्वी याज्ञवल्क्य आकस्मित । ब्राह्मणांपासून संजात । साक्षात योगीश्वर वंद्य ॥५५॥
त्यासी यथान्याय पुजून । भक्तिपूर्वक कर जोडून । विश्वामित्र बोले वचन । सफल माझा जन्म आता ॥५६॥
सफळ तप स्वाध्याय सर्व । तुमचें दर्शन घडलें अपूर्व । ब्रह्मभूत तुम्ही मान्य निगर्व । आगमन कारण सांगावें ॥५७॥
महामुने तुमची आज्ञा पाळीन । तुमचा दास मी होऊन । प्रभो मज उपदेशावें ज्ञान । जेणें कल्याण मज लाभेल ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते याज्ञवल्क्यविश्वामित्रसमागमो नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:49:51.8630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

engaged column

  • पु. भित्तिस्तंभ 
RANDOM WORD

Did you know?

घर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site