मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूत सांगे मुनींस । पुढील कथा ती सुरस । कैलासी शिव चिंतेस । करी अपुल्या मानसी ॥१॥
देवी आगंतूक शत्रुसदनीं । गेली असे म्हणोनी । काय होईल तेथ, मनीं । शंभू चिंताग्रस्त ऐसा ॥२॥
कैलासाचे रम्य शिखर । तथ ‘वटवृक्ष’ एक थोर । त्याच्या छायेत परमेश्वर । बैसला होता नंदीसहित ॥३॥
गण असंख्य सभोवार । योगिजन सेविती सादर । नाना प्रकारें मनोहर । कथा सांगती विनोदार्थ ॥४॥
परी शंकरा अपशकुन । नानाविध भयंकर होऊन । सर्वही तेणें क्षुभितमन । उत्पात शंकाकुल झाले ॥५॥
इतुक्यामाजी नारदमुनी । आले तथ मग्न गायनी । नारायण म्हणोनी । घोष केला दिव्य स्वरें ॥६॥
कल्याणदायी शिव वंदिती । नारदासी अतिप्रीती । संभाषण त्यासवे करिती । तेव्हां सांगे कटु वार्ता ॥७॥
नारद म्हणती धन्य सती । त्रिभुवनी तिच्यासम नव्हती । कामिनी अद्वितीय ती होती । सार्थ केले नाम तिने ॥८॥
शिवनिंदा कर्णी एकता । जाळिली निजतनू त्वरिता । तृणासम अर्पिली देहलता । यज्ञाग्नीत उडी घागली ॥९॥
नारदाचे तें वचन । वज्राघातसम ऐकून । म्हणे मुनिवरा पावले का निधन । खरोखरी प्रिया माझी? ॥१०॥
तेव्हा नारद काही न बोलत । शंभूच्या क्रोधें भयभीत । हयाचा शोकाग्नी त्वरित । भस्म करील या विचारें ॥११॥
ऐसा मनीं विचार करुन । नारदें धरिलें तेव्हां मौन । त्या मौनाचा अर्थ समजून । शोकसागरीं शिव बुडाला ॥१२॥
शंभू तेव्हां विलाप करित । शक्ती मज सोडून जात । शक्तिहीन मी अशक्त । सर्वकार्यीं सर्वदा ॥१३॥
कैसी गेलीस मज त्यागून । अर्धे अंग माझें असून । आतां जीवित अर्थशून्य । तुजवांचोनी प्रिये वाटे ॥१४॥
आतां मी देहत्याग करीन । सतीवाचून व्यर्थ जीवन । पाण्यावाचुनी जैसा मौन । ऐसा शंभू विलाप करी ॥१५॥
योगी करिती सांत्वन । परी न झालें दुःखशमन । चिंतामग्न मनीं होऊन । विचार करी तो मानसी ॥१६॥
विघ्नकर्त्यानें हें विघ्न । आणिलें मी गर्व धरिला म्हणोन । परमेश्वर मीच महान । गर्वखंडन आज झालें ॥१७॥
अतुलशक्तियुक्त सती । अर्धांगी जगन्माता होती । अर्धनारीश्वर स्थिती । वियोग नव्हता ज्ञात मला ॥१८॥
मी आहे शक्तियुत । नित्य एक ईश्वर जगांत । अखंड ऐश्वर्य माझें असत । गर्व ऐसा मज जाहला ॥१९॥
विघ्नराजा चित्तीं न स्मरलें । म्हणोनी विघ्न हें आलें । माझें जीवित नष्ट झालें । कन्ताविरहें पोळलों मी ॥२०॥
ऐसा विचार करुन । मनीं गणपतीस आठवून । भक्तिभावें त्यास पुजून । उत्तम रुप ध्यायिलें तें ॥२१॥
चार बाहू मोठें शरीर । गजमुख तो लंबोदर । कर्णकुंडलांचे तेज अपार । मुकुट मस्तकीं विराजे ॥२२॥
रत्नमाला कंठी रुळत । नाभीपर्यंत त्या लोंबत । पायीं नूपुर किंकिणी करित । रुमझुम ऐसा गोड निनाद ॥२३॥
सिद्धि बुद्धी उभ्या असत । दोन्हीं बाजूस शोभा विलसत । चिंतामणी भूषवीत । वक्षःस्थळ त्या गजाननाचे ॥२४॥
एकचित्तें ध्यान करुन । शंकरें केलें त्यास प्रसन्न । ब्रह्मरुपधर गणेशा स्तवून । विविध प्रकारें त्यावेळीं ॥२५॥
हृदयीं जो विराजत । निराकार वा साकार असत । विघ्नराज स्तोत्र म्हणत । गणेशासी गोषवाया ॥२६॥
विघ्नराजा तुला नमन । विघ्नहर्त्या तुला वंदन । विघ्नकर्त्या अभिवादन । विघ्नपति तुज गणेशा ॥२७॥
लंबोदरा वक्रुतुंडाला । त्रिगुणात्मकरुपें जो विनटला । निर्गूणत्वें परी जाहला । साक्षात्‍ ब्रह्म स्वरुप जो ॥२८॥
माझें पुनः पुन्हां नमन । भवबंध तोडी त्यासी पावन । भक्तांचा पालक होऊन । अभक्तांना भिववी जो ॥२९॥
अभक्तांना अज्ञान । भयभतीत दे लोटून । ऐश्या हेरंबा तुज नमन । वेदविद्या शाश्वता ॥३०॥
अनंत आननें रुपें असती । अनंत बाहू चरण असती । अनंत कर कर्ण उदरें तीं । धारणकर्त्या तुज नमन ॥३१॥
गणनायका तुला वंदन । अनादिपूज्या तुला नमन । सर्वरुपा मनोमन । करितों प्रणाम पूर्णमूर्ते ॥३२॥
अखंड लीलाकर तूं देवा । महोत्कटा तुज भजावा । महात्म्या तुज वंदावा । ऐसी माझी अभिलाषा ॥३३॥
प्रारंभीं रजोमय विधि निर्मून । त्याच्याकरवी सृष्टी रचून । सत्त्वात्मका विष्णूस कल्पून । पालन अखंडविक्रमा करिशी ॥३४॥
अन्तीं तमोरुप शंभू निर्मून । शक्तीनें संहार करुन । गुणेशा तूं पूर्ण केले वचन । वेद सर्वही गुण गाती ॥३५॥
अशा तुला शरण येतों । मायामया तुज स्मरतों । गुणेशाच्या अतीत असतो । गणराज आदिब्रह्म तूं ॥३६॥
स्वानंद नामक नगरात । तूं सिद्धिबुद्धीसहित । परेशा नित्य निवास करित । गणेशा तुला शरन आलों ॥३७॥
योग्यांच्या हृदयीं नित्य स्थित । वेदांनाही अगम्य असत । मनाची धांवही होय कुंठित । स्वरुपवर्णनीं जयाच्या ॥३८॥
ऐशा वक्रतुंडा हृदयांत । सांप्रत मीं शंभू चिंतित । अर्धनारीश्वर नसे सांप्रत । सतीविनाशें गणेशा ॥३९॥
शक्तिहीन मी आता झालों । अर्धनारीश्वरपदा अंतरलों । माझ्याच कर्मे मी जाहलों । विनष्टप्राय जगतात ॥४०॥
नाना ऐश्वर्ययुक्त शक्ती । गणपप्रभो हरविती ती । ईश्वरपदासी मुकलो, सती । देवदेवा नष्ट झाली ॥४१॥
निर्गुण मीं सदैव असत । परी शक्तियोगें सगुण होत । शक्तिविहीन सांप्रत । हेरंबा मी काय करुं ? ॥४२॥
एक पदही ना चालवत । गणेश्वरा विकल मी सर्वांगांत । म्हणोनी कृपया देवा सशक्त । करी मजला तू आतां ॥४३॥
तेव्हां तो गणाधिप प्रकटात । त्याच्या पुढती अकस्मात । मधुर मुदुस्वरें म्हणत । आनंदाने शंकरासी ॥४४॥
अहो शंभुदेवा मज पहावें । महेश्वरा शोकांत का बुडावें? । पुनरपि शक्तियुक्तत्व बरवें । लाभेल तुम्हां निःसंशय ॥४५॥
माझ्या वचनीं विश्वास ठेवा । ईश्वर मीच हा भाव त्याजावा । ब्रह्मांडमंडळीं मजसम नसावा । कोणीही हा गर्व धरिला ॥४६॥
म्हणोनी सहसा विघ्न निर्मिले । तेणे तुम्हांस कष्ट झाले । परी मोहपटल तें फिटलें । सांप्रत झाली स्मृती माझी ॥४७॥
तुम्हीं केलेंत ध्यान । तैसेंची बहुविध माझें स्तवन । त्या योगें मी झालों प्रसन्न । निःसंशय तुम्हांवरी ॥४८॥
देवी सती तीच होईल । हिमाचलसुता अमल । त्या पार्वतीस वरशील । शिवशंकरा तूं पुनरपी ॥४९॥
त्वरित होऊन तुमचें मिलन । तिच्यासह माझी भक्ति करुन । ईश्वर तूं शक्तियुक्त होऊन । माझ्या प्रसादें शाश्वत ॥५०॥
तू जेव्हां जेव्हां स्मरशील । तेव्हां तेव्हां पावशील । माझी मूर्ती सुखद होईल । सदा शिव तुज लागीं ॥५१॥
ऐसा वर देऊन । अन्तर्धान पावला तेव्हां गजानन । शंकर शक्तिशाली होऊन । पुनरपि स्वकार्यी मग्न झाला ॥५२॥
गणेशातें स्मरुन चित्तीं । जटा आपटी क्रोधें अती । तेव्हां त्या जटाभारांतून उत्पत्ती । महाबाहू वीरभद्राची ॥५३॥
तीन मस्तकें तीन पदयुक्त । शूलधारी तो दिसत । साक्षात्मृत्युरुप द्युतिमंत । ऐसा वीरभद्र जन्मला तैं ॥५४॥
शंकरांसी प्रणाम करोनी । उभा राहिला कर जोडोनी । आज्ञा करा, तुमचा दास म्हणोनी । महादेवासी विनवितसे ॥५५॥
त्याचें तें वचन ऐकून । शंकर म्हणती आनंदूत । यज्ञासह दक्षाचे हनन । सांप्रत सत्वरी तूं करावें ॥५६॥
जैसी आज्ञा महाराज । केलीत तैसेंचि करितों आज । अट्टहास करोनी सहज । सांगतसे तें वीरभद्र ॥५७॥
त्याच्या हट्टहासें त्रिभुवन । सर्व झालें कंपित उन्मन । भयविव्हळ होऊन । शंकाकुल सारे जण ॥५८॥
नंतर वेगें जाऊन । नानाविध रुद्र निर्मून । आपुल्या शरीरापासून ॥ वीरभद्र वेढी यज्ञाते ॥५९॥
नंदिकेशादी गणही जाती । सर्व होते क्षुब्ध चित्तीं । संतप्त खदिरांणारासम दिसती । ब्रह्मांड गिळू पाहती ते ॥६०॥
दक्षसदनीं अपशकुन । तेव्हा होती शंकित मन । देव तैसेची मुनिजन । म्हणती काय होईल आता ॥६१॥
सर्व झाले विहृल चित्ती । तितुक्यात महाबळ रुद्र येती । वीरभद्रासवें ते वेढिती । दक्षयज्ञां चहुबाजूंनी ॥६२॥
नंदी भृंग रिटी भृंगी । पुष्पदंतादी गण वेगीं । मृत्यूसम भक्षावया लागीं । मुख पसरोनी धावले ॥६३॥
अवचित आले यज्ञी विघ्न । धरुनी मारिती दक्षा उन्मन । पळती सैरावैरा भिऊन । दक्षाचे अनुचर दशदिशांत ॥६४॥
यज्ञमंडप मोडून टाकिला । क्षणांत सर्वत्र आकांत माजला । देवमुनींनाही दिला । रुद्रें प्रसाद क्रोधाचा ॥६५॥
दारुण पीडा सर्वांसी । मारिती रुद्रगण ऋषिपत्नींसी । तैसेची पीडिती देवांगनांसी । हाहाःकार सर्वत्र ॥६६॥
मारमारुनी करिती जर्जर । प्रसंग ओढवला दुर्धर । दुष्टपतींच्या योगें अपार । दुःख सार्‍या पत्नीजनांना ॥६७॥
शिवद्वेष्टे तुमचे पती । त्याची भोगा ही फलप्राप्ती । आम्हां रुद्रगणां नाही भीती । कळि काळाची विश्वांत ॥६८॥
ऐसें ऋषिपत्नींस संबोधून । देवपत्नींसी सांगती गर्जून । मनीं प्रहर्षित होऊन । यज्ञाहुती गण भक्षिती ॥६९॥
खाऊन टाकिती यज्ञान्न । वेदींत लघुशंकादी करुन । विष्ठादी तेथ टाकून । भरष्ट करिती यज्ञभूमी ॥७०॥
तेव्हां शंकर क्रोधसंतप्त । धनुर्बाणधर तेथ येत । साक्षात्प्रलयाग्नी तो वाटत । युद्धासो तोंड लागले तें ॥७१॥
तुमुळ युद्ध तेव्हां होत । रुद्रगणांसह देव लढत । स्वयं शंकरही भाग घेत । मर्मभेदी बाण सोडिती ॥७२॥
पूष्णोदंतास नाराचें भेदिलें । भगदेवाचे नेत्र फोडिले । शंकरें देव जर्जर केले । भयंकर विनाश ओढवला ॥७३॥
धर्मासी घट्ट पकडून । नंदिकेश बोले हसोन । शिवहीन यज्ञीं धर्मा स्थान । कोणतें तें सांग दुष्टा ॥७४॥
तेजस्वी गणांत जो सर्वाधिक । तो भृंगी पकडी एकाएक । कश्यपादी मुनिवरां धाक । तेव्हां हृदयीं बहु वाटे ॥७५॥
पुष्पदंतें ताडिलें वरुणास । भैरव धरी देवेंद्रास । तेव्हां येत मूर्च्छा तयास । दृश्य भयानक ते होते ॥७६॥
वीरभद्र आपुल्या बळें करुन । दक्षासी भूतलीं पाडवून । त्याचा करीतसे अपमान । शिवनिंदेचें फळ देई ॥७७॥
शंखचक्रगदाधर । विष्णूही लढू लागला घोर । होता बहुत सेनासंभार । शस्त्रास्त्रेंही अगणित ॥७८॥
विष्णू महा पराक्रम करित । अनेक रुद्रगणं ठार मारित । भूत पिशाच वेतालादिक होत । भयभीत तेव्हां अत्यंत ॥७९॥
हाहाकार माजला शिवसैन्यात । तेव्हा शंभू गणाधिपा ध्यात । विष्णूवरी बाण सोडित । भूवरी पाठवी तयासी ॥८०॥
परी पुनरपि सावध होऊन । नारायणअस्त्र सोडून । शंकरांवरी जे भयानक महान । जगत्संहारा समर्थ ॥८१॥
तेव्हां शंभू सोडी पाशुपत । अस्त्र आपुले प्रख्यात । त्यायोगें विष्णूचें अस्त्र होत । प्रभावहीन तत्काळ ॥८२॥
ते दोघे नभांत लढत । संघर्षातून त्या अग्नी पसरत । सर्व पृथ्वी जाळण्या धावत । भयक्रान्त त्रिभुवन ॥८३॥
इतुक्यामाजी वीरभद्र देत । दक्षशिर आहुती यज्ञाग्नींत । शिवनिंदक पशुमुख होत । नष्ट तेव्हां दक्षाचें ॥८४॥
नानाविध कोलाहल करिती । छिन्न भिन्न सारे सुर होती । आता त्राता न उरला म्हणती । मुनीहि झाले भयोद्विग्न ॥८५॥
सारे दशदिशां पळती । पिशाचें त्यांसी ओढिती । अति दारुण पीडा देती । आक्रोश भरला गगनांत ॥८६॥
तें विष्णूसी क्रोधे येत । तो सुदर्शन चक्र फिरवीत । मृत्यूसम तें सोडित । शंकरावरी त्वेषानें ॥८७॥
परी शंकरासमीप जाऊन । सदर्शन करी त्यास नमन । उभे ठाकले लीन होऊन । शंभू त्रिशूळ करी घेत ॥८८॥
क्रोधें आरक्त मुखकमळ । विष्णूवरी उगारी त्रिशूळ । विष्णूचा ओढवला काळ । सक्षात्‍  मृत्यू पुढे उभा ॥८९॥
परी तेव्हां अघटित घडत । दिव्य आकाशवाणी होत । ‘हरा, तू हरीस न मारी म्हणत । कोप त्यजुनी शांत होई ॥९०॥
तुझें शिवशोभन रुप दावी । तुझी कृपा आता व्हावी ॥ स्वयंभू ब्रह्मा तेथ प्रकटवी । रुप आपुले क्षणाधीत ॥९१॥
हे संहारकारका रुद्रा शंकरा । विष्णूचा वध करु नका वीरा । जगताचा उद्धार करी हरा । वाचवी त्यासी प्रलयातून ॥९२॥
शिवा शांतरुपा तुज नमन । महादेवा रुद्रपते वंदन । पशुपते तुज अभिवादन । आम्हीं सारे करीतसीं ॥९३॥
तूं संहाररुप साक्षात्‍ असशी । अवेळी कां संहार करिशी । तूं महाबाहू परमेश्वर असशी । नमस्कार तुला भक्तिभावें ॥९४॥
ब्रह्मदेव ऐसे स्तवन करित । तेणें महादेव होत शांत । विधी विष्णूस आज्ञापित । नमन करी तूं शिवासी ॥९५॥
विष्णू करी शिवा वंदन । उभा राहे लज्जित होऊन । तेव्हां ब्रह्मा मधुर वचन । वृषभाध्वजातें बोलत ॥९६॥
आतां यज्ञ शांत झाला । जो हविर्भाग येथें उरला । तो रुद्रा तुझाचि झाला । सेवी त्याते सदाशिवा ॥९७॥
विघ्नेशमायेनें पीडित । दक्षादिक झाले संभ्रान्त । मोहितांचे प्रचेष्टित । मनावरी न घ्यावें तूं ॥९८॥
हे सर्वही मूढ झाले । विघ्नेशरोषें धर्म विसरले । परी आता शरण आले । शरणागतांसी दया करी ॥९९॥
म्हणोनी प्रसन्न होई आता । सर्वांना तू सुखदाता । पुनरपी यज्ञप्रारंभ तत्त्वता । रुद्रा करी तूं दयाळा ॥१००॥
देवांचे तैसेचि मुनींचे । स्त्रीजनादिक दासांचे। यथापूर्व जीवित साचें । करी शंकरा दयाघना ॥१०१॥
तें वचन शंकरें मानिलें । देवमुनींना पूर्ववत केलें । स्त्रीदासांदिका रक्षिलें । भयमुक्त तेव्हां सर्व होत ॥१०२॥
भगासी नेत्रदान केलें । पूषासी हवियोजकत्व दिलें । रुद्रतेजें सर्वही झाले । रुपतेजे युक्त पुनः ॥१०३॥
दुःखाचा झाला अन्त । परत गेला ते कृतान्त । ते सगळे शंकरा वंदित । विनम्रभावें पुनः पुन्हा ॥१०४॥
दक्षाचे मस्तक अग्नींत । होते तेव्हां दग्ध होत । तें पाहून शिव आज्ञापित । भृंगी गणास त्या वेळीं ॥१०५॥
भृंगी तूं जाई बाहेर । ज्यासी प्रथम पाहशील समोर । शिर त्याचें कापून सत्वर । ते आण मजपाशी ॥१०६॥
तेचि मस्तक दक्षासी लावीन । दग्ध शिर पुनरपि देईन । कृपाप्रसाद दाखवीन । ऐशापरी तयावरी ॥१०७॥
भृंगी शिवाज्ञेनुसार । जेव्हां गेला बाहेर । तव पाहे एक सुंदर । बोकड उभा मार्गांत ॥१०८॥
हा प्रथम मी पाहिला । ऐसा विचार मनीं केला । शिर त्याचें कापून निघाला । शंकरासी तें द्यावया ॥१०९॥
त्यानें जे आणिलें अजशिर । तेचि जोडिलें दक्षधडावर । चमत्कार दावी श्रीशंकर । दक्षाते दे संजीवन ॥११०॥
दक्षासी अजाचे मुख लागत । ब्रह्मदेव त्याला सांगत । शंकराची स्तुती जो करित । कल्याण होय तयाचें ॥१११॥
दक्ष करी तेव्हा स्तवन । शिवशंकराचे परम पावन । त्यागुनी सर्व अभिमान । भक्तीभावें सर्वेश्वराचें ॥११२॥
ह्या विश्वाचा जो आधार । तया शंकरा नमस्कार । कालरुप जो सर्पभूषणधर । ऐशा रुद्रा मीं नमितों ॥११३॥
कालांतरानें मुळें रुजती । तैसीच वृक्षादिकांची उत्पत्ती । शीतोष्ण काळ येती । काळ त्याचें कारण ॥११४॥
सूर्य आकाशीं तळपत । नक्षत्रें ग्रहगोल चमकत । ह्या सर्वांसी कारण होत । काल हा स्वयं एकटा ॥११५॥
कालवशात्‍ वृष्टी होत । अथवा दुष्काळ पडत । कालबळें ब्रह्मा निर्मित । सृष्टी सगळी पुनः पुन्हा ॥११६॥
कालामुळें शक्ति लाभून । विष्णू पृथ्वीचें करी पालन । स्वेच्छया शंभू करी दहन । संहार कालप्रभावाने ॥११७॥
जें जें काहीं विश्वीं असत । तें तें सर्व कालाधीन निश्चित । ब्रह्मा विष्णू शिव होत । तो काळजी निःसंशय ॥११८॥
ऐसे साक्षात वेद सांगती । कालरुपी शंकरमूर्ती । माझे अपराध असंख्य असती । मायागर्वे धुंद झालों ॥११९॥
दक्ष म्हणे जें केलें । तें सर्व अज्ञानें घडलें । दयासिंधो तुज विसरलें । माझें मन परमेशा ॥१२०॥
आतां मी तुज नमितों । क्षमा करी ऐसें प्रार्थितो । सगुणा तुज वंदितों । निर्गूणा तुला नमस्कार ॥१२१॥
तूंची सृष्टी निर्मिसी । तूंचि तिचा संहार करिसी । नानारुपें धारण करिसी । अनंत गुणराशी तू ॥१२२॥
किती गुण वर्णावे । ब्रह्मादिकांही न ठावे । तुझे मूळ स्वरुप आघवे । आदि अंत न कळे तयां ॥१२३॥
मज पामरा कैसे जमेल । गुणवर्णन अशक्य होईल । म्हणोनी मनोभावे अमल । प्रणाममालिका आरंभितो ॥१२४॥
ब्रह्ममया देवादी शिवास । पूर्णमूर्ते शंकरास । आदि मध्य अंतहीनास । भक्तभयविनाशका नमो नमः ॥१२५॥
ऐसें प्रेमगद्‌गद दक्ष गात । स्तुतिस्तोत्र उत्स्फूर्त । त्याच्या अजमुखातून येत । ललल्ललं ऐसा ध्वनी ॥१२६॥
महादेव ते संतुष्ट होत । बोकडाचे तोंड दूर करित । पुनरपी नराचें मस्तक लावित । मुनीश्वरहो भगवंत ॥१२७॥
यथापूर्व दक्षमुख झाले । तेव्हा शिव अति मधुर बोले । सर्वांसमक्ष शंकरे दिले । दक्षासी ऐसे आश्वासन ॥१२८॥
दक्षप्रजापति तू होशील । सर्वमान्यता तुज मिळेल । तू रचिलें ते स्तोत्र होईल । मजला प्रिय सर्वदा ॥१२९॥
तुझे हे स्तोत्र म्हणेल । जो नर मजला स्मरेल । त्यासी सर्व काम लाधतील । ऐसें मी सदा करीन ॥१३०॥
जगीं अखिल भोग भोगून । अंतीं उत्तम लोक लाभून । माझा प्रिय तो होऊन । शिवसायुज्य लाभेल ॥१३१॥
तू बोकडमुखें बोललास । तैसा ध्वनी उच्चारी जयासी । माझ्या समीप नर सुरास । वांछित संतुष्ट देईन मी ॥१३२॥
ऐसा वर दक्षां देऊन । शंभू पावला अन्तर्धान । सर्व गेले स्वगृही परतून । महर्षी मुनी संतुष्ट ॥१३३॥
दक्ष प्रसन्नचित्त रहात । स्वगृही तो पुनीत चित्त । तेव्हापासून शिवमंदिरात । जे भक्त करिती ललल्लल ध्वनी ॥१३४॥
त्याच्यावरी प्रसन्न होत । शिव त्यांसी वर देत । ऐसे हे दक्षचरित्र अद्‌भुत । कथिले चवथ्या अध्यायीं ॥१३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते दक्षचरित्रो नाम चतुर्त्योऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP