मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ४५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्षासी मुद्‌गल सांगती । दंभाचे कौशल्य वर्णिती । असुर स्वभाव सोडून स्थिति । विगज्वर होत त्याची ॥१॥
प्रातःकाळीं उठून । दैत्यां सर्वां बोलावून । तयांसी म्हणे वचन । शुक्राचार्यां सन्निध ॥२॥
आपुल्या गुरुनें सांगितलें । तें मज योग्य वाटलें । वक्रतुंडा शरण पाहिजे गेले । कल्याणार्थ निःसंशय ॥३॥
तो सुरांचा न अधिपति । तैसाचि दैत्याधिप न जगतीं । ब्रह्माकारें सर्वत्र वसति । सिद्धिबुद्धि पतीची त्या ॥४॥
त्याचें तें वचन ऐकून । दानव सारे झाले खिन्न । दंभासुरासी सोडून । गेले आपापल्या घरीं ॥५॥
असुर जरी क्रुद्ध झाले । दंभासुरानें मनीं ठरविलें । गणेशाचें पूजन पाहिजे केलें । अन्य उपाय असेना ॥६॥
शुक्राचार्यांसहित गेला । दंभासुर शरण गणनाथाला । देवांच्या सन्निध जो विलसला । दंभाच्या नगरा बाहेर ॥७॥
साष्टांग नमन त्यासी करुन । करांची ओंजळ जोडून । यथान्याय पूजन करुन । गणध्यक्षाचें स्तवन करीं ॥८॥
ब्रह्मरुपासीं ब्रह्माकार शरीरासी । ब्रह्मासी ब्रह्मदात्या गणेशासी । देवेशासी दैत्यदानवरक्षकासी । सर्वत्र योगरुपासी नमन ॥९॥
भावहीनासी सिद्धिबुद्धिपतीसी । सिंहध्वजासी गणांच्या पतीसी । हेरंबासी एकदंतासी । अनंत विभवा तुज नमन ॥१०॥
विघ्नेशासी महाविघ्ननाशकासी । अपार गुणधारासी दैत्यदानवमर्दकासी । मनोवाणीमयासी । सर्वरुपासी नमन असो ॥११॥
मनोवाणीविहीनासी । योग्यांसी योगदायकासी । योगनाथासी योगासी । विश्वपतीसी नमस्कार ॥१२॥
मायाधारासी मायाचालकासी । मायाहीनासी सर्वत्र समभावधरासी । अव्यतासी व्यक्तिमूलधरासी । निर्मोह लंबोदरा तुज नमन असो ॥१३॥
सांगो वेदही समर्थ नसत । ज्याचें स्तवन करण्या जगतांत । योगींद्र त्रिमूर्तीही थकत । तेथे मीं काय स्तवणार पामर? ॥१४॥
ऐसें बोलून धरणीवर । भक्तिभावें पडला दंभासुर । त्याला उठवुनी सत्वर । गणाधीश बोलती तें ॥१५॥
दंभासुरा त्वां केलें स्तवन । तें जो वाचील भक्तियुक्त मन । अथवा ऐकवील अन्यांलागून । विनष्ट सर्व तो मिळवील ॥१६॥
पुत्रपौत्र कलत्रादींनी युक्त । धनधान्यादींनी संपृक्त । आधि व्याधि विनिर्मुक्त । उपद्रव सर्व नष्ट त्याचा ॥१७॥
एकवेळ दोन वेळ । वाचील अथवा त्रिकाळ । जो नर हें स्तोत्र अमल । प्रिय माझा तो होईल ॥१८॥
क्रोधवश तुज मारावयासी आलों । परी भक्तींने तव तोषलों । मारणार नाहीं तुज पावलों । चित्तीं आता समाधान ॥१९॥
तुझ्या चित्तांत जें कांक्षित । तें वररुपें मग त्वरित । भक्तिभावानें मी संतुष्ट । मागशील तें देईन ॥२०॥
गणेशाचें तें वचन । दंभ बोले ऐकून । हर्षभरित त्याचें मन । भक्तिनम्र त्यावेळीं ॥२१॥
माझ्यावरी तोषलासी । तरी हाचि वर देई मजसी । तुझ्या अचल दृढ भक्तीसी । माझ्या मनीं स्थान मिळो ॥२२॥
माझ्या जीववृत्तीची सोय करी । निवासही दे मज सत्वरी । कामना सफल होईल तुझी ॥२४॥
माझ्यावरी अव्यभिचारी । भक्ती तुझे जडेल खरी । आपुल्या स्थानीं राहून करी । आनंदानें ध्यान माझें ॥२५॥
तू मज नससी न्यून । देवही अधिक प्रिय कदापि न । आपापल्या धर्मीं राहून । उभयही तुम्हीं प्रिय मला ॥२६॥
आपुला धर्म जे सोडिती । त्यांवरी माझा कोप अती । त्यांचा नाश मी करितो जगतीं । ऐसे जाण महा असुरा ॥२७॥
आतां तूं निर्भय रहावें । जेथ कार्यारंभी विस्मृतिभावें । विसरतील जन सर्वभावें । दंभभावें तेथ राही तूं ॥२८॥
त्यांचा कार्यनाश तूं करी । कर्मारंभीं न पूजित जरी । त्यांचें कार्य निष्फल तरी । दंभासुरा तू करावें ॥२९॥
माझे प्रिय जे भक्त जगांत । त्यांना रक्षी प्रयन्तें विनत । दंभभावहीनता त्यांसी प्राप्त । ऐसें करी सर्वदा ॥३०॥
जेथ आरंभीं नसें माझें स्मरण । तैसेंचि पूजन मनन । तेथ तुझा भाग जाण । जीवितवृत्ति ती तुझी ॥३१॥
ऐसा वर दंभासि देत । गणेश नंतर अंतर्धान पावत । जयजयकार करुन परतत । देव मुनिगण सर्वही ॥३२॥
देव गेले स्वर्गांत । विसावले पाताळांत । आपापाल्या स्थानीं भयवर्जित । दीप्तिमंत ते राहती ॥३३॥
ऐशिया प्रकारें शांत । दंभासुर केला गजाननें विनीत । ब्रह्मदेवाचा होऊनि सुत । क्रीडा दाखवी वक्रतुंड ॥३४॥
जो हें चरित्र नित्य ऐकत । अथवा अन्यां ऐकवित । तो दंभभय विनिर्मुक्त । सनातन ब्रह्माप्रत जाई ॥३५॥
आतां वामनाची कथा सुरस । सांगेन दक्षा मी तुज सहर्ष । गणनाथ चरित्र अद्‍भुत सरस । ऐकता चिंता नष्ट होती ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते दंभासुरशांतिकथनं नाम पंचचत्वारिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP