मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशायनमः । मुद्‌गल सांगती तदनंतर । देव विप्रांसी ऐसें वचन उदार । देउनी स्मरण केलें क्षणभर । गणेश प्रचंड सैन्याचें ॥१॥
त्याच्या स्मरणमात्रें प्रादुर्भूत । तेथ गणसेना असंख्यात । प्रमोद आमोदकादी वक्रतुंड उद्भव्वत । चतुर्बाहू गजानन ॥२॥
नाना शस्त्रें घेऊन हाती । कोणी बसले सिंहावरती । कोणी तेव्हां मूषकावरती । कोणी होते मूषकवाहन ॥३॥
कोणी शेषारुढ अश्वारुढ । कटक कुंडलाचे प्रगाढ । मुकुट शोभता वरचढ । भयंकर वाटती शत्रूंतें ॥४॥
परी भक्तांची सुखदायक । महाशब्द ब्रह्मांड स्फोटकारक । महात्मे नाना क्रीडाकर सुरेख । सदा स्वानंदभावित ॥५॥
गणेश नामाचा महिमा । त्यासी जगीं न उपमा । परस्परां सांगती ये कामा । गणेश भक्तकार्यांत ॥६॥
वक्रतुंडा नमस्कार करिती । ओंजळ जोडून उभे राहती । गणाध्यक्षा विनविती । स्वामी इष्ट आज्ञा करावी ॥७॥
देवा आमुचें स्मरण । कां केलेत आपण निपुण । सांगा त्वरित त्याचें कारण । सर्व जनां तव दास करुं ॥८॥
त्यांचे तें वचन ऐकून । म्हणे तेव्हां तो चैतन्यघन । मेघगंभीर निःस्वन । महाभागांनो ऐका ॥९॥
मोदकाळी गणवरांनो आज । स्मरण न केलें मी सहज । मत्सरासुर दैत्याशीं युद्धकाज । उद्भवले अकस्मात ॥१०॥
त्या महावीर्यासी मी मारीन । युद्ध होईल महान । माझ्या सवें महाव्रतांनो राहून । तुम्ही आज लढावयाचें ॥११॥
वक्रतुंडासी आज्ञा ऐकती । गण सारे मुदित चित्तीं । प्रणाम करुनी त्यास म्हणती । स्वामी आम्हां आश्चर्य वाट ॥१२॥
मत्सरासुराचा नाश । एक गणही करण्या विशेष । समर्थ असतां अशेष । गणसेना कां बोलाविली? ॥१३॥
तुमच्या प्रसादें सुलभ असत । गणाधिपा आम्हां जगतांत । एका गणाचें पौरुष होत । कार्य सिद्धीस्तव पुरेसें ॥१४॥
गणांचे तें वचन ऐकिलें। गणाधिप तें प्रसन्न झाले । सर्वांसी आनंद देत म्हणाले । तुमचे बोल असत्य नसती ॥१५॥
मीच क्रीडार्थ दैत्य निर्मिला । मायाप्रभावें तोच माजला । जरी क्षणांत संहारिला । क्रीडा कैसी रंगेल मग? ॥१६॥
म्हणून महाभागांनो लढावें । त्याच्याशीं माझ्या सन्निध सर्वभावें । अष्टावरणहीन तो होता मारावें । मी त्यास हा संकेत ॥१७॥
गणाधिपाच्या वचना । ऐकून गण करिती गर्जना । तिनें दशदिशा निनादल्या मना । उत्साह चढला सर्वांच्या ॥१८॥
तो चमत्कार देव मुनी पाहती । चित्तीं विस्मित झाले अती । मत्सुरासुराचा मृत्यु मानिती । निश्चित आतां ओढवला ॥१९॥
नंतर सर्व गणांसह जात । देव मुनींसह त्या स्थानांत । जेथ मत्सर होता राज्य करित । वक्रतुंड अविलंबित ॥२०॥
प्रतापी स्वराज्यांत । महावीर नाना भोग भोगित । देवांगनांनी परिवृत । मद्यपानांदींत निमग्न ॥२१॥
जें जें चिंती तो मनांत । तें तें वरदान प्रभावें लाभत । तपाचा महिमा अति अद्‌भुत । गतकाळ तो न स्मरे ॥२२॥
माझ्यासम कोणी नसत । मीच धन्य या विश्वांत । ऐसा अभिमान त्याच्या मनांत । सदैव वास करीतसे ॥२३॥
एके दिवशीं सभेत । वीरांसह बसला होता मजेंत । अप्सरांचे नृत्य पहात । आकाश वाणी तें झाली ॥२४॥
मत्सरा तुज मारण्या आला । महाबळी वक्रतुण्ड देखिला । भयदायक ह्या आकाशवाणीला । ऐकतां घाबरला मत्सर ॥२५॥
त्याचा कंठ शुष्क झाला । सर्वांगाला कंप सुटला । त्वरित मूर्छित तो पडला । असुर झाले भयातुर ॥२६॥
कोणी हें कठोर वचन बोललें । त्यासी मारुय म्हणती पहिलें । म्हणोनि आकाशमार्गीं फिरले । शब्दवेध घ्यावया ते ॥२७॥
परी आकाशीं कोणी न दिसत । म्हणोनि ते परतले सभेंत । दैत्येशा सावध करित । सान्त्यन करितो परोपरीनें ॥२८॥
हृदयीं विकलता त्याच्या येत । भयविहवल होऊनी बोले स्वागत । हें वचन सत्य अथवा अनृत । होईल तें मज कळेना ॥२९॥
काळाचाही मी काळ । माझा मृत्यू कैसा ओढवेल । परी आकाशवाणीचें बळ । जाणतों असत्य ती न होय ॥३०॥
ब्रह्मांड अष्ट आवरणांनी संयुक्त । त्यांनीं जे प्राणी युक्त । त्यांच्याकडून मृत्यु न होत । ऐसा वर मज लाभलासे ॥३१॥
आकाशवाणीणें उल्लेखिला । कोण हा वक्रतुंड जंतू असला । जेव्हा भेटेल तो तयाला । क्षणमात्रांत मी मारीन निःसंशय ॥३२॥
त्याची बढाई ऐकती । प्रल्हाद प्रमुख त्यासी विनविती । करुं नको चिंता चित्तीं । महाभागा शत्रुपीडका ॥३३॥
तुझा मृत्यू जरी होईल । सूर्योदय तदनंतर थांबेल । शत्रुत्वभावें केला असेल । देवांनी हा कांगावा ॥३४॥
ही आकाशवाणी नसेल । देवांचे हें कपट अथवा छळ । मायाप्रभाव असे सबळ । अन्यथा कैसा तुज महामृत्यू? ॥३५॥
म्हणोनि ईश्वरासह देवांसी । आज नेऊं पंचत्वासी । तेणें शत्रुहीन अवस्थेसी । पोहोचूं आपण सर्व काळ ॥३६॥
छिद्रदर्शी देवांचा नाश होत । तें आपणां सुख अविरत । ऐकोनिया अति हर्षित । मत्सरासुर जाहला ॥३७॥
तुमचें बोलणें सत्य वाटत । जावें शत्रुनाशार्थ त्वरित । मत्सराची आज्ञा लाभत । दैत्यपुंगव तें निघाले ॥३८॥
देवांसी सर्वत्र शोधिती । गुप्त जागीं कोणत्या वसती । पुढें काय जाहली स्थिती । पुढिले अध्यायीं सुरस कथा ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते मत्सरासुरविचारणं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP