मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दैत्यांचे वचन ऐकत । मत्सरासुर तें सहसा मूर्च्छित । भयविव्हल भूमीवर पडत । सावध करिती सेवक त्यांसी ॥१॥
मत्सर एकदोन निमिषांत । सावध होऊन विलाप करित । काय होतें झालें या काळांत । विधिलिखित कळेना ॥२॥
तपानें जें अमरत्व । तैसेंचि पृथ्वींचे प्रभुत्व । स्वसामर्थ्ये अलौकिकत्व । प्राप्त केलें तें वृथा ॥३॥
देव बलवत्तर वाटत । प्रयत्न माझा निष्पल ठरत । माझ्यासाठीं असंख्यात । दैत्य संगरीं मरण पावले ॥४॥
माझे दोन पुत्रही दिवंगत । महाकाल जे काळाचे असत । आता मीही शोकसंतप्त । मरणार यांत न संशय ॥५॥
ब्रह्मांडधिपतीचे पुत्र । कैसे झाले मृत्युपात्र । आतां जगणें दुःख प्राय मात्र । मिथ्या वरदान कैसें झालें ॥६॥
अरेरे माझे महावीर । ज्यांनी विष्णु प्रमुखां जिंकले थोर । ते कैसे मृत्युमुखीं उदार । आज पडले न कळे मज ॥७॥
अरे माझ्या मुलांनो सांगा । मज सोडून गेलात जगा । दुःखाणंवी मी बुडत वेगां । उत्तर कांही न देता मज? ॥८॥
तुम्ही निष्ठुर कैसे झालात । वृद्ध मज ताता त्यागिलेंत । सुंदरप्रिया विषयप्रिया त्वरित । सांगा बाळांनो मज प्रती ॥९॥
माझ्या दिवंगत । पुत्रांनो तुम्ही होत । हें मर्मभेदक दुःख जाळित । ऐसा विलोप बहु केला ॥१०॥
दैत्येंद्र तो शोकसंतप्त । असुर सांत्वन उपाय उद्यत । वृद्ध त्यांतले त्यास म्हणत । दैत्येंद्रा ऐसें रडू नको ॥११॥
तुझे दोन सुत रणीं पडले । ते महा कीतिवंत झालें । देहाचे जन्ममरण ठरलें । निश्चित त्यांत काय आश्चर्य ॥१२॥
जो जो जन्मला तो तो मरणार । आत्म्यासी मरण कैसे असणार । जन्म ना मरण त्यासी उद्‌गार । ऐसे शास्त्रांत ऐकतों ॥१३॥
म्हणोनि मायामोह सोडून । स्वस्थ मानसांत होऊन । ऊर्ध्वक्रिया पुत्रांची करुन । सार्थक त्यांचे करी प्रभो ॥१४॥
अथवा ह्या मृत पुत्रांसी दूर ठेवून । त्या वक्रतुंडाचें करी हनन । अन्यथा त्यासी जावें शरण । जेणें कुशल सर्वांचे ॥१५॥
वीर रडती ऐसें न ऐकलें । परी तें आज पाहिले । शत्रूस हर्षकर असलें । शोक प्रदर्शन करुं नका हो ॥१६॥
ऐसे वृद्ध असुर बोधिती । तेव्हां तो मत्सर जागृत चित्तीं । जळूं लागला क्रोधें अती । संग्रामार्थ झणीं गेला ॥१७॥
सर्व सेना आपुला घेऊन । मत्सरासुर करी गमन । शंभू आदि सुर त्यां पाहून । भयभीत सर्वही जाहले ॥१८॥
वक्रतुंडा प्रणाम करुन । ते त्यास म्हणती ऐसें वचन । स्वामी दैत्य मत्सर प्रतापवान । चाल करुन येत असे ॥१९॥
ज्याच्या समोर मशकापरी । मानव सारे खरोखरी । देवही तृणाहून न भारी । ऐसा हा मत्सर बलवंत ॥२०॥
त्याच्या पुढे वशवती । सर्वार्थदायी सिद्धि असती । ज्याच्या भयें ब्रह्मांडे कांपती । तोच हा मत्सर आला असे ॥२१॥
ज्याच्या राज्यांत जन समस्त । असती दुःखविवर्जित । वृक्ष फळें देती सर्व ऋतूंत । मेघ वर्षती योग्य काळीं ॥२२॥
ज्याच्या आज्ञेचा वश होऊन । दिवाकर तळपे भिऊन । मत्सर राज्य भोगी म्हणून । शिशिर ऋतूही सौम्य झाला ॥२३॥
यांच्या राज्यांत रोग नसती । चोरांचीही नसे भीती । ऐसें अभय्त प्रजेप्रती । देऊनि करतो जगीं राज्य ॥२४॥
ज्याची पूजा सर्वत्र । जन मानिती अति पवित्र । यज्ञादी सर्वही भोगी सुपात्र । ऐसा महात्मा हा मत्सर ॥२५॥
काळ यासी घाबरतो । त्याची आज्ञा सदा पाळितो । वैदिक कर्मांचे खंडन करतो । असुर हा मदोन्मत्त सदा ॥२६॥
हा राज्य करी जगतांत । तेथ स्वधा स्वाहा वषट्‌कारादी नसत । वेदाध्ययन धर्माचार लोपत । स्नानसंध्या सारें गेलें ॥२७॥
नाहीं राहिला स्वधर्म । तैसाचि वर्णाश्रमधर्म । देव श्वापदांसम परम । वनांत दडले याच्या भयें ॥२८॥
या दैत्येंद्रानें देवांस । अन्नवस्त्रादींच्या लाभास । असंभव केलें अहर्निश । मुनी झाले तपोहीन ॥२९॥
शापसामर्थ्य त्यांचें संपलें । देवांगनांनी याचे दास्य घेतलें । ज्यानें नानाविध भोग भोगले । तो हा येऊन ठेपला ॥३०॥
मानवांच्या तैशा देवांच्या । मुनींच्या तैशा यक्षकिन्नराच्या । कन्या झाल्या अधीन याच्या । असामान्य बल यांचे ॥३१॥
आठ आवरणांनी युक्त कोणी । यासी मारु न शकेल प्राणी । ऐसा हा दैत्य समरांगणीं । आला असे गणाधिपा ॥३२॥
वक्रतुंड हें ऐकत । देवांसी आश्वासन देत । भिऊं नका मी सामर्थ्ययुत । करीन शासन असुरासी ॥३३॥
सिंहारुढ होऊन त्वरित । महाबाहू तो एकदांत  । पाशांकुश घेऊन करांत । संग्राममंडळी झणीं गेला ॥३४॥
प्रमोद आमोदादी गणसंवृत्त । युद्धलालस जो असत । त्या वक्रतुंडा पाहून करित । निर्भत्सना मत्सरासुर ॥३५॥
अरे वक्रकुंडा रणांत । कशास आलास माझ्या पुढ्यांत । आजचि संहारीन तुज क्षणांत । तोंड लपवी अन्यथा ॥३६॥
तूं मूढ मज वाटत । म्हणोनि संग्रामार्थ उद्यत । मला मृत्यूचें भय नसत । अष्टावरण युक्तांकडून ॥३७॥
शंभुविष्णु मुख्य देवांनी । तुज दिली असे चिथावणी । विसरलासी स्वसामर्थ्य म्हणोनी । मोहग्रस्त तूं दिससी ॥३८॥
म्हणोनि मत्सरासुरासह युद्ध करीन । ऐशी आशा बाळगून । आलासी येथ गर्वे उन्मन । मारीन एका बाणानें ॥३९॥
सैन्यासहित तुज वधीन । माझ्या पादाघातें भूमि विशीर्ण । तळव्यानें मी करी चूर्ण । पर्वतांचेंही क्षणांत ॥४०॥
ऐश्या माझ्यासमोर । कैसे आलास तूं अधीर । काळानें प्रेरिला जीवितीं उदार । म्हणोनि कां झालास ॥४१॥
माझ्या गर्जनारवमात्रें होत । चराचर सारें कंपित । माझ्यापुढें संग्रांमांत । काय करशील वक्रतुंडा तूं? ॥४२॥
जेव्हां मीं सकल ब्रह्मांड जिंकलें । माझ्या प्रभावानें तें लुटलें । तेव्हां भयभीता कोठें केलें । वसतिस्थान तुझें सांग ॥४३॥
बहुधा भयभीत लपून । त्या वेळीं बैसला होतास उन्मन । परी मूढा आज येऊन । समरांगणीं उपस्थित तूं ॥४४॥
हें फार बरें झालें । माझें परम भाग्य उदेलें । आता तुज मी चांगलें । दाखवतो रत्न चौदावें ॥४५॥
आतां फुकट तूं मरशील । यासी विलंब न लागेल । परी मला शरण येशील । वांचशील तरी तूं ॥४६॥
जीविताची इच्छा असत । तरी शरण ये अजून मजप्रत । राहून माझ्या आज्ञेंत । वनांत रहा तूं सुखानें ॥४७॥
मूढ भावानें तूं आलास । ऐसा विचारं करुनि खास । मी तुज निर्बलास । मारणार नाहीं दयेनें ॥४८॥
परी तुला प्रेरणा देत । त्या मुनि, देवांसी निश्चित । मी ठार करीन क्षणांत । एकटा तूम सुखें रहा ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरसमागमो नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP