मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
युक्तसेनीय

सूत्रस्थान - युक्तसेनीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय चौतिसावा

आता ‘युक्तसेनीय ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

शत्रूला जिंकण्याच्या हेतूने आपले चतुरंग सैन्य सज्ज करून स्वारीवर निघणार्‍या राजाचे वैद्याने कसकसे संरक्षण करावे ते सांगतो .

आपले मंत्रिमंडळ व सैन्य यांच्यासह शत्रूला जिंकण्याकरिता राजा स्वारीवर निघाला असता वैद्याने मोठ्या प्रयत्नाने विशेषतः स्थावर जंगम व कृत्रिम विषापासून या राजाचे रक्षण करावे .

शत्रूकडील लोक मार्गात तीव्र विषारी पदार्थांचे चूर्ण वगैरे टाकून मार्ग विषारी करितात . त्या मार्गाच्या धुळीने देखील विषाचा परिणाम होतो . तसेच जलाशयात विष टाकतात , वृक्षावर विषारी पदार्थ टाकून छाया विषारी करतात , (बिब्ब्याच्या झाडाच्या नुसत्या छायेने अंग सुजते .) अन्नात विष घालतात . हत्ती घोड्य़ाच्या वैरणीत , दाण्यात (चरिंद्यात वगैरे ) विष घालतात . आणि पेटवणार्‍या लाकडात वगैरे विष घालतात . ह्यासाठी त्याचा तपास लावून प्रत्येक जिन्नसाची नीट परीक्षा करून विषारी असतील त्याचा प्रतिकार करावा . त्या विषांची लक्षणे व चिकित्सा पुढे कल्पस्थानात सांगितली आहे .

अथर्ववेदवेत्ते एकशे एक मृत्यु आहेत म्हणून सांगतात . त्यापैकी एकच कालमृत्यु (नियतकाली येणार ) असून बाकीचे सर्व अगांतुक म्हणजे अकालिक मृत्यु आहेत म्हणून समजावे .

रसायनादि जाणता वैद्य व ऋग्यजुसामाथर्वांदि मंत्र विधियुक्त जाणता पुरोहित ह्या उभयतांनी मोठ्या प्रयत्नाने (दक्षतेने ) वातादिदोषाजन्यय व विष व अपघात ह्यामुळे येणारे आगंतुक अशा दोनही प्रकारच्या मृत्युपासून राजाचे नित्य रक्षण करीत असावे .

अष्टांग आयुर्वेद हा वेदाचे अंग (अथर्ववेदांचा उपदेव ) असून तो ब्रह्मदेवाने सांगितला आहे . म्हणून जितेंद्रिय अशा वैद्याने पुरोहिताच्या मताला अनुसरून असावे . पुरोहिताला सर्व वेद अवगत असतो .

राजा संकटात पडला असता दुसरा शास्ता कोणी नसल्यामुळे ब्राह्मणादि सर्व वर्णांचा संकर (एकत्रपणा ) होतो . धार्मिक कृत्यांचा (वर्णाश्रमविहित आचारांचा ) लोप होतो .

आणि कृषि (शेतकरी ) व्यापार व राजसेवा (शिपाइगिरी वगैरे ) व्यवस्थित न चालल्यामुळे प्रजेचाही नाश होतो .

राजा व इतर सामान्य जन ह्यांचे केवळ शारीरिक दृष्ट्य़ा (आकारसादृश्यात ) तेवढे साम्य आहे . परंतु उल्लंघन करता येणारी आज्ञा (हुकूम ) दातृत्व , क्षमा , धैर्य , व विलक्षण पराक्रम ह्या गोष्टी राजाच्या अमानुष तऱ्हेच्या असतात . म्हणून कल्याण करून घेण्याची इच्छा करणार्‍या बुद्धिमान वैद्याने शुभकारक अशा वाणीने , मनाने व कृतीने निरंतर राजाविषयी देवाप्रमाणे भावना ठेवून असावे ॥३ -११॥

सैन्याचा मोठा थोरला तळ पडला असेल अशा ठिकाणी व राजाच्या राहण्याच्या वाड्याच्या अगदी सन्निध वैद्याने आपल्या सर्व सामग्रीसह (यंत्रे , शस्त्रे , औषधे सांसह ) नित्य रहावे . अशा ठिकाणी राहिल्यामुळे , उभारलेला झेंडा ज्याप्रमाणे आसमंतात सर्वांना ज्ञात होतो . त्याप्रमाणे वैद्य आपल्या यशाच्या प्रख्यातीमुळे सर्वांना माहिती होतो , त्याप्रमाणे वैद्य आपल्या यशाच्या प्रख्यातीमुळे सर्वांना माहिती होतो . त्यामुळे विषबाधा झालेले , अंगात शल्य शिरलेले व इतर प्रकारचे

त्या सन्यातील रोगी वगैरे सर्व लोक निःशंकपणे त्या वैद्याकडे येतात . आपल्या वैद्यशास्त्रात कुशल असलेला व दुसरी शास्त्रे तात्पुरती जाणणारा असा वैद्य एकाद्या ध्वजाप्रमाणे शोभिवंत दिसतो . आणि राजे व इतर वैद्य देखील त्याला

मान देतात ॥१२ -१४॥

पादचतुष्ट्य

वैद्य , रोगी , औषधे व परिचारक (रोग्याचे औषध पाण्याची वगैरे सर्व व्यवस्था पाहणारा ) हे औषधोपचाराचे (चिकित्सेचे ) चार पाद (भाग ) आहेत . हे आपआपल्या कर्मात व गुणांत निपुण असलेले म्हणजे औषधोपचारांचे फळ जे आरोग्य ते प्राप्त होण्यास कारणीभूत होतात .

रोगी , औषध व परिचारक हे चांगले गुणवान असून वैद्यही चांगला गुणवान असला म्हणजे मोठा जबरदस्त रोग असला , तरी तो थोड्या दिवसांतच वैद्य बरा करू शकतो .

वैद्य जर कुशल नसेल तर बाकीचे तिघेही गुणवान् असून देखील काही एक फायदा होत नाही . ज्याप्रमाणे यज्ञकर्मात उग्दाता , (सामवेदज्ञ -गायन करणारा ) होता (ऋग्वेदज्ञ हवन करणारा ) व ब्रह्मा ऋग्यजुः (सामजाणता ) हे तिघेही अध्वर्यू (यजुर्वेदज्ञ ) ह्यांच्याकडे उपाध्यायाचे काम असते पण हा नसेल तर यज्ञामध्ये बाकीच्या तिघांचेही कर्म राहते . त्याप्रमाणे वैद्य चांगला नसेल तर बाकीचे तीन पाद निष्फळ होतात .

छिद्रातून वगैरे नावेत शिरणारे पाणी काढून टाकणारे (प्रतितर ) नसले तरी ज्याप्रमाणे सुकाणु धरणारा नावाडी एकटाच नाव तीराला लावू शकतो , त्याप्रमाणे एक वैद्य जर चांगला कुशल असेल तर तो एकटा केव्हांही रोग्यांना वाचवू शकतो .

वैद्यशास्त्राचे तत्त्व समजावून घेऊन अध्ययन केलेला , वैद्यक्रियेची सर्व कामे पुष्कळशी पाहिलेला , स्वतः शस्त्रक्रियेची वगैरे कामे स्वबुद्धीने व स्वतंत्रपणाने केलेला , शस्त्रक्रियेच्या कामी चलाख हाताचा , पवित्र आचरणाचा व पवित्र अंतःकरणाचा , शूर (न डगमगणारा ), ज्याच्या जवळ यंत्रे , शस्त्रे , औषधे वगैरे सर्व सामग्री तयार आहे असा , ज्याला प्रसंगावधान उत्तम आहे असा , युक्तायुक्त विचार करणारा , विकट प्रसंगी देखील उपचार करण्यास समर्थ असा , स्वकर्मात निपुण , सत्यवादी व धर्माचरणी असा वैद्य असला म्हणजे तो चिकित्सेचा भिषक्पाद (भाग ) समजावा .

दीर्घायु , सत्त्ववान (कष्ट सोसणारा ), साध्य (बरा होण्यासारखा ), धनवान , मन ताब्यात ठेवणारा , देव ब्राह्मणांदिकांवर श्रद्धा ठेवणारा (आस्तिक ) आणि वैद्याच्या वचनाप्रमाणे वागणारा असा रोगी असला म्हणजे तो चिकित्सेचा ‘‘व्याधितपाद ’’ असे म्हणतात .

यथायोग्य प्रदेशात उत्पन्न झालेले , मनाला आवडणारे , वास , रंग व रुचिही ज्याची असावीत तशी आहेत असे दोषनाशक , ग्लानी न आणणारे घेण्यात कमीजास्त असावीत तशी आहेत असे दोषनाशक , ग्लानी न आणणारे घेण्यात कमीजास्त झाले अगर थोडा बदल झाला असता विकार न करणारे देश , काल , वयादिकांचा विचार करून योग्य वेळी दिलेले जे औषध त्याला ‘‘भेषजपाद ’’ असे म्हणतात .

मायाळू , कोणाची निंदा न करणारा , सर्व प्रकारचे कष्ट सोसण्यास तत्पर (बलवान् ), रोग्याचे रक्षण करण्याच्या कामी (शुश्रुषा करण्याच्या कामी ) तत्पर , वैद्य सांगेल त्याप्रमाणे करणारा , कधीही न थुंकणारा (विश्रांति न घेणारा ), असा जो सेवक त्याला चिकित्सेचा ‘‘परिचारकपाद ’’ असे म्हणतात ॥१५ -२४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP