मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
प्रभाषणीय

सूत्रस्थान - प्रभाषणीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय ४ था -

आता आम्ही " प्रभाषणीय " नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरानी सांगितले आहे ॥१॥२॥

शास्त्राचे अध्ययन जरी चांगले अवगत असले ( पाठ केले असले ) तरी त्याचे अर्थपूर्वक व्याख्यान , प्रवचन किंवा चर्चा करिता आली नाही तर ते अध्ययन गर्दभाने चंदनाच्या लाकडांचे ओझे वाहिल्यासारखे केवळ परिश्रमाला मात्र कारणीभूत होते . कारण , त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे त्याचा उपयोग करता येत नाही .

ह्यासंबंधाने असे म्हटले आहे - चंदनाच्या - लाकडांचे ओझे वाहणारा गाढव जसा केवळ ते ओझे किती आहे हे जाणतो , म्हणजे त्याला केवळ ओझ्याचेच ज्ञान असते , त्या चंदनाच्या वासाचे महत्त्व किंवा ज्ञान त्याला होत नाही , त्याप्रमाणे पुष्कळ शास्त्रांचे पठण करुन त्यांच्या अर्थाचे जर ज्ञान नसेल म्हणजे अर्थासंबंधाने जे मूढ ते त्या गाढवाप्रमाणेच केवळ शास्त्राचे भारवाहक होत ॥३॥४॥

ह्यासाठी हे एकशेवीस अध्याय त्यांतील श्लोकाचे प्रत्येक पद , प्रत्येक चरण , प्रत्येक श्लोकार्ध संपूर्ण श्लोक गुरुने वरचेवर व्याख्यानपूर्वक सांगावा व विद्यार्थ्याने नीट लक्षपूर्वक ऐकावा .

कारण द्रव्य , रस , गुण , वीर्य व विपाक ह्यांची कार्ये व शरीरावर घडणारे परिणाम फार सूक्ष्म आहेत . तसेच दोष , धातु व मल ह्यांची कार्ये व शरीरावर घडणारे परिणाम फार सूक्ष्म आहेत . त्याचप्रमाणे आमाशयादि उदरस्थ भाग , मर्मे , शिरा , स्नायु , संधी , हाडे , गर्भोत्पत्ति ह्यांचे ज्ञान अत्यंत सूक्ष्मत्वाने करुन घ्यावे लागते . तसेच द्रव्यादिकांचे समुदाय व त्यांचे निरनिराळे विभाग हेही सूक्ष्म रीतीने कळावे लागतात . तसेच शरीरांत घुसून दिसेनासे झालेले शल्य बाहेर काढणे , व्रणाची परीक्षा , मोडलेल्या हाडासंबंधी हे कसे मोडले अगर पिचले असावे ह्यासंबंधी कल्पना ह्या गोष्टी फार सूक्ष्म विचाराने आणाव्या लागतात . तसेच व्याधि साध्य आहे की याप्य आहे . ( औषधाने आटोक्यांत राहणारा आहे अथवा असाध्य आहे ) इत्यादि व्याधिसंबंधाने दुसर्‍या विशेष अशा हजारो गोष्टी आहेत की ज्यांचा विचार केला असता शुद्ध व कुशाग्र लोकोत्तर बुद्धीच्या वैद्याच्या बुद्धीलाही आव्हान देतील ( भ्रम पाडतील ), मग अल्पबुध्दी वैद्याच्या मनाची काय स्थिति होईल हे सांगावयाची जरुरी नाही .

ह्यासाठी श्लोकाचे प्रत्येक पद , चरण , श्लोकार्ध व श्लोक गुरुने पुनः पुनः व्याख्यापूर्वक सांगावा व विद्यार्थ्यानेही लक्षपूर्वक ऐकावा ॥५॥

अन्य शास्त्रांतील विषयासंबंधी काही विषय ह्या शास्त्रांत काही निमित्ताने आले असता ते चांगले समजण्याकरितां त्या दुसर्‍या शास्त्राचे जे ज्ञाते त्यांच्या पासून त्या विषयासंबंधी व्याख्याने वरचेवर ऐकावी . कारण एकाच शास्त्रावरील ग्रंथांत सर्व शास्त्रांचे सिद्धांत विशद रितीने मांडता येतील , किंवा एकत्र थोडक्यांत सांगता येतील हे शक्य नाही . आणि एकाच शास्त्रात प्राविण्य मिळवूनही काही उपयोग नाही . कारण ॥६॥

एकच शास्त्राचे अध्ययन करणाराला शास्त्राचे निश्चित ( संशयरहित असे ) ज्ञान होत नाही . म्हणून वैद्याने अनेक शास्त्राचे नित्य श्रवण करावे , म्हणजेच आपण अध्ययन करतो त्या शास्त्रासंबंधी सांगोपांग ज्ञान प्राप्त होते .

गुरुमुखांतून निघालेले शास्त्र सेवन करुन त्याचा नित्य अभ्यास करुन जो वैद्य चिकित्सा ( उपचार ) करितो , त्यालाच वैद्य म्हणावे . दुसरे शस्त्राध्ययनावांचून धंदा करणारे जे वैद्य असतात ते चोर आहेत ( रोग्याचे द्रव्य हरण करणारे ) असे समजावे .

औषधेनव , औरभ्र , सौश्रूत व पौष्कलावत हे जे शल्यशास्त्राचे चार आद्यग्रंथ हेच बाकीच्या शल्यशास्त्रावरील ( शस्त्रचिकित्सेच्या ) ग्रंथाचे मूळ आहेत ॥७॥९॥

अध्याय चवथा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP