मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
द्रव्यविशेषविज्ञानीय

सूत्रस्थान - द्रव्यविशेषविज्ञानीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय एकेचाळीसावा

आता ‘‘द्रव्यविशेषविज्ञानीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश , ह्या पाच महाभूतांच्या संयोगाने द्रव्यांची उत्पत्ति झालेली आहे . त्यापैकी जे तत्त्व ज्या द्रव्यात जास्त (अधिक्ये करून ) असते त्यावरून ते अमुक तत्त्वात्मक आहे असे सांगतात . जसे -हे पार्थिव द्रव्य आहे , हे औदकीय आहे , हे तैजस आहे , हे वायवीय आहे , हे नाभसतत्त्वात्मक आहे इत्यादि ॥३॥

( १ ) जे द्रव्य स्थूलसत्त्वात्मक ( ज्याचे परमाणु मोठे आहेत ते ), घट्ट , मंद स्थिर ( अचल ), जड , कठीण , वासयुक्त , किंचित् तुरट व बहुधा मधुर असते , ते द्रव्य ‘‘ पार्थिव ’’ असे समजावे . ते स्थीरपणा , सामर्थ्य , जडपणा , कठिणपणा व पुष्टता हे गुण करिते . हे विशेषतः अधोगति स्वभावाचे आहे ॥४॥

( २ ) थंड , ओलसर , स्निग्ध , मंद , जड , चलन पावणारे , घट्ट ( ज्याचे परिमाणु अगदी जवळ जवळ आहेत . असे ), मऊ , बुळबुळीत , पुष्कळ रसयुक्त , किंचित तुरट , आंबट , खारट व मधुर व रस परिपूर्ण असे असते ते ‘‘ आप्य ’’ द्रव्य समजावे , ते स्निग्ध , आनंदकारक , ओलसरपणा आणणारे , बंधनकारक , ( संग्राहक ) व स्त्रावकारक ( विष्यंदकर ) असते .

( ३ ) उष्ण , तीक्ष्ण , सूक्ष्म , रुक्ष , खरखरीत , हलके , स्वच्छ , रुपगुणविशिष्ट ( दर्शनशक्तिप्रचूर ) किंचित आंबट , खारट असे तिखटसंयुक्त व विशेषतः ऊर्ध्वगति स्वभावाचे असे जे द्रव्य ते तैजस द्रव्य समजावे . ते दीपन , पाचक , व्रणाचे विदारण करणारे , उष्णता उत्पन्न करणारे , प्रकाशन , कांतीदायक , तेज व रंग उत्पन्न करणारे असे आहे .

सूक्ष्म , रुक्ष , खरखरीत , थंड , हलके , स्वच्छ , स्पर्शगुणयुक्त , किंचित कडू , व विशेषतः तुरट असे जे द्रव्य ते ‘‘वायवीय ’’ समजावे , ते स्वच्छपणा , हलकेपणा , शिथिलपणा , रुक्षता व मनात नाना प्रकारच्या कल्पना उत्पन्न करणारे आहे ॥४॥

गुळगुळीत , सूक्ष्म , मृदु , (कोमल ) व्यवायी (पचनापूर्वीच सर्व देह व्यापणारे भांग वगैरेसारखे ), स्वच्छ , पृथकपणाने असणारे . (विविक्त ) ज्याच्यामध्ये कोणताच रस प्रकट होत नाही असे . व नादप्रचुर असे जे द्रव्य ते आकाशतत्त्वात्मक समजावे . ते मऊपणा , पोकळपणा , (छिद्रयुक्त ) व हलकेपणा उत्पन्न करणारे आहे .

हे जे वर द्रव्यांचे वर्णन केले आहे त्यावरून असे ठरते की , ह्या जगात औषध नाही असे एकही द्रव्य नाही . असे समजून ते कोणाच्या रोगावर योजावयाचे व कशाप्रकारे योजावयाचे वगैरे गोष्टींचा विचार करून योजिले असता , ते एक औषध किंवा अनेक औषधे वीर्याप्रमाणे व गुणाप्रमाणे ते ते कार्य करण्यास समर्थ अशी होतात .

अशा रीतीने योजना केलेली औषधे ज्यावेळी आपले कार्य करितात तोच त्यांचा कार्य करण्याचा काल समजावा . आणि जे दोषशमनादि कार्य करितात ते कर्म . ज्याच्या सहाय्याने त्याच्याकडून ते कर्म केले जाते ते वीर्य , ती ज्या ठिकाणी (शरिराच्या ठिकाणी ) कार्य करितात ते अधिकरण . ज्या कषायादिक प्रयोगाने ती कार्य करितात तो उपाय आणि त्याच्यापासून जो (आरोग्य वगैरे ) गुण येतो ते फळ समजावे ॥५ -६॥

भूमि , तेज , आप (जल ) तत्वात्मक द्रव्यांच्या योगाने वाताचे शमन होते . भूमि , जल , व वायु तत्त्वात्मक द्रव्याने त्वरित शमन होते , आकाश तेज व वायुतत्त्वात्मक द्रव्यांच्या योगाने कफ शांत होतो .

आकाश व वायु तत्त्वात्मक द्रव्याने वात वाढतो . जे द्रव्य केवळ अग्नि (तेज ) तत्त्व प्रधान आहे त्याने पित्त वाढते . आणि भूमि व जलतत्वात्मक द्रव्याने कफाची वाढ होते .

ह्याप्रमाणे ह्या पंचभूताच्या गुणाधिक्याचे मान प्रत्येक द्रव्याचे ठिकाणी असतेच हे निश्चित आहे . म्हणून दोषांच्या कमीजास्त मानाने एक , दोन अगर अनेक द्रव्याची योजना विचार करून करावी ॥७ -१०॥

थंड , उष्ण , स्निग्ध , रुक्ष , मृदु , तीक्ष्ण , पिच्छिल व विषद हे जे वीर्यसंज्ञक आठ गुण मागील अध्यायात सांगितले आहेत त्यापैकी तीक्ष्ण व उष्ण गुण अग्नि तत्त्वप्रधान आहेत . थंड , पिच्छिल (बुळबुळित ) हे गुण जलतत्त्वप्रधान आहे . मृदु हा गुण जल व आकाशतत्त्वप्रधान आहे . रूक्ष हा गुण वायुतत्त्वप्रधान आहे . गुरू व लघु ह्या विपाकाचे गुण मागील अध्यायात सांगितले आहेतच .

त्यापैकी उष्ण व स्निग्ध हे गुण वातनाशक आहेत . थंड , मृदु व पिच्छिल हे गुण पित्तनाशक आहेत . तीक्ष्ण , रुक्ष व विषद हे गुण कफनाशक आहेत . गुरूविपाक हा वात व पित्तनाशक आहे . लघुविपाक हा कफनाशक आहे .

ह्याच गुणापैकी मृदु , शीत व उष्ण हे गुण स्पर्शाने समजणारे आहेतच . पिच्छल व विशद हे गुण डोळ्यांनी पाहून व स्पर्शाने समजणारे आहेत . स्निग्ध व रुक्ष हे गुण डोळ्यांनी पाहून समजणारे आहेत . तीक्ष्ण (तिखट ) हा गुण पदार्थ तोंडात घातल्यावर जिभेला झटका लागल्याने समजणारा आहे . गुरूविपाक हा मलमूत्र साफ होण्यावरून किंवा अधिक होण्यावरून व कफ ह्यावाढणे वरून समजावा . आणि लघुविपाक हा मलमूत्रांचा अवरोध मळाचा खडा बनणे व वाताचा प्रकोप ह्या गोष्टीवरून समजावा .

ज्या द्रव्यात दोन महाभूतांचे गुण समान आहेत अशी द्रव्ये , त्या द्रव्यातील रसाच्या वैशिष्ट्यावरून (फरकावरून ) कोणाच्या तत्त्वाची आहेत हे जाणावे . जसे -मधुर रस व गुण ज्या द्रव्यात आहेत ते जलतत्त्वात्मक असे समजावे ॥११॥

द्रव्यामध्ये जे गुण आहेत म्हणून सांगितले आहे , तेच गुण प्राण्यांच्या देहामध्येही आहेतच . म्हणून मनुष्याच्या शरीराचे र्स्थेर्य , क्षय किंवा बुद्धि ही ह्या द्रव्यावरच (आहारावरच ) अवलंबून आहेत ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP