मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
विरेचनद्रव्य

सूत्रस्थान - विरेचनद्रव्य

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय चव्वेचाळीसावा

आता ‘‘विरेचनद्रव्यविकल्पविज्ञानीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . असे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

ज्या औषधींच्या मुळांच्या प्रयोगाने रेच होतात अशा औषधात तांबड्या निशोत्तराचे मूळ श्रेष्ठ आहे . सालीच्या द्रव्यात धाकटा लोध्र श्रेष्ठ आहे . फळांच्या द्रव्यात हिरडा श्रेष्ठ आहे . तेलांच्या द्रव्यात एरंडतेल श्रेष्ठ आहे . स्वरसांच्या द्रव्यात कारलीचा रस श्रेष्ठ आहे . क्षीर द्रव्यात (चिकांच्या द्रव्यात ) त्रिधारी निवडुंगाचा चीक श्रेष्ठ आहे . ह्याप्रमाणे ही विरेचनाची निवडक अशी श्रेष्ठ द्रव्ये सांगितली . आता ह्यांच्या प्रयोगाचा विधि अनुक्रमानेच सांगतो. वापरण्याची रीत ॥३ -४॥

मोठ्या तांबड्या निशोत्तराचे निर्दोष (किडके वगैरे नाही असे ) मूळ आणून त्याला विरेचनगणातील द्रव्यांच्या काढ्याच्या पुष्कळशा भावना द्याव्या . नंतर त्याचे चूर्ण सैंधव व सुंठ ह्यांच्या समभाग चूर्णाशी समभाग मिश्र करून , ते मिश्रचूर्ण कागदी लिंबाचा रस , चिंचेचे सरबत किंवा कांजी ह्यासारख्या आंबट पेयपदार्थाशी मिश्र करून , जो वातरोगाने पिंडला आहे त्याने कोठा साफ होण्यासाठी (रेच होण्याकरिता ) प्यावे .

तेच निशोत्तराचे चूर्ण पित्तविकारात उसाच्या रसाचे पदार्थ , साखर खडीसाखर मिश्रित पाणी , द्राक्षादिकांचे मधुर रस व दूध ह्यातून प्यावे . (टीकाकाराने उसाच्या रसाच्या पदार्थात गूळ , काकवी व उसाचा रस ही दोषकारक आहेत म्हणून घेऊ नयेत असे म्हटले आहे , तथापि जुन्या गुळाचे पाणी किंवा उसाचा रस घेण्यात फारसा दोष होणार नाही .)

कफविकारात हेच निशोत्तरांचे चूर्ण गुळवेल , कडुनिंबाची साल व त्रिफळा ह्यांचा काढा करून , त्या काढ्यात गोमूत्र व सूत्र व सुंठ , मिरे , पिंपळी ह्यांचे समभाग चूर्ण मिश्र करून त्यातून प्यावे .

दालचिनी , तमालपत्र , वेलची दाणे , सुंठ , मिरे व पिंपळी ह्यांचे समभाग वस्त्रगाळ चूर्ण करून , ते चूर्ण एक भाग , जुना गूळ एक भाग व वरील प्रमाणे तयार केलेले तांबड्या निशोत्तराचे चूर्ण त्यात मिसळून त्याची मोळी करून रेच होण्याकरिता खावी .

चौसष्ट तोळे तांबड्या निशोत्तराच्या मुळांच्या रसांत (अभावी काढ्यात ) त्याच निशोत्तराच्या मुळ्य़ांचा कल्क सोळा तोळे घालून सौंधव व सुंठ ह्यांचे चूर्ण एक एक तोळा घालावे आणि शिजवून कल्काप्रमाणे (लेहप्रमाणे घट्ट करावा , व तो कल्क एक भाग (दोन तोळे ), सुंठ एक भाग (दोन तोळे ), सैंधव एकतोळा हे सर्व एकत्र करून गोमूत्रातून प्यावे . हा प्रयोग वातकफात्मक रोगांत योजावा . वातपित्तविकारांत देणे असल्यास गोमूत्राच्या ऐवजी तूप चार तोळे घालावे .) (१ )

तांबड्या निशोत्तराचे मूळ , सुंठ व हिरडेदळ ही तीन औषधे समभाग घेऊन चूर्ण करावे . नंतर निशोत्तराच्या मुळ्य़ाच्या मानाने अर्धा भाग सुपारीचे चूर्ण , अर्धा भाग वावडिंगातील बियांचे चूर्ण , अर्धा भाग मिरे , अर्धा भाग देवदार व अर्धा भाग सेंधेलोण ह्या सर्वांचे चूर्ण त्यावरील चूर्णात मिसळून ते रेच होण्याकरिता गोमूत्रातून प्यावे .

विरेचन द्रव्यांपैकी जेवढी मिळतील तेवढी घेऊन त्यांचे चूर्ण करावे . आणि त्याच विरेचन द्रव्यांच्या रसाची त्या चूर्णाला एक भावना द्यावी (म्हणजे चूर्ण भिजेपर्यंत रस घालून तो वाळविणे ). नंतर त्याच विरेचन द्रव्यांचा कल्प तुपाच्या चतुर्थांश व त्यांचाच काढा तुपाच्या चौपट घालून ते तूप सिद्ध करावे . मग त्या तुपात ते चूर्ण कालवून त्याच्या गोळ्य़ा कराव्या व रेच होण्याकरिता त्यातील गोळी तुपातून खावी .

तसेच जुन्या गुळाच्या गोळी वठण्यासारखा पाक करून , त्या पाकात वरीलप्रमाणे भावना देऊन तयार केलेले विरेचन द्रव्यांचे चूर्ण घालून , थोडे पचन करून चुलीवरून खाली उतरावे . थंड झाल्यावर त्यांत वासाकरिता योग्य त्या प्रमाणात दालचिनि , तमालपत्र व वेलची ह्यांचे चूर्ण मिसळून योग्य प्रमाणात गोळ्य़ा बांधून ठेवाव्या . गुळाचे प्रमाण चूर्णाच्या दुप्पट असावे .

विरेचन द्रव्यापैकी जेवढी मिळतील तितक्यांचे समभाग केलेले चूर्ण एक भाग आणि त्याच द्रव्यांचा अष्टमांश केलेला काढा चार भाग घेऊन तो काढा त्या चूर्णात घालून शिजवून आटवावा . नंतर त्या चूर्णाइतकाच गव्हाचा रवा घेऊन तो वरीलप्रमाणे केलेल्या काढ्याच्या वाफेवर ओला होईपर्यंत ठेवावा . नंतर त्याच द्रव्यांच्या काढ्यात त्यांचाच कल्क घालून तयार केलेले तूप घेऊन त्यात तो रवा मळावा . नंतर काकवीसारखा दाट जुन्या गुळाचा पाक करून , त्यात ते काढ्याची भावना दिलेले चूर्ण व तितकाच तो गव्हाचा रवा मिसळून , थोडा वेळ पचन करून चुलीवरून खाली उतरावे ; व वासाकरिता दालचिनी , तमालपत्र व वेलचीदाणे ह्यांचे चूर्ण योग्य त्या प्रमाणात घालून त्याचे लहान लाडू करून ठेवावे . आणि त्यांचा विरेचन कर्मात योग्य त्या रीतीने उपयोग करावा .

विरेचन द्रव्यांच्या रसाच्या (अथवा काढ्याच्या ) मुगाला बर्‍याचशा भावना देऊन त्या मुगाचे सार (कट ) काढावे व त्यात सैंधव व तूप घालून ते रेच होण्याकरिता घ्यावे . ह्याचप्रमाणे इतरही मसुरा वगैरे द्विदल धान्याचे कट काढून तेही रेच होण्याकरिता द्यावे .

उसाच्या कांड्याच्या दोन फाकी करून त्या फाकींना आतून निशोत्तराच्या चूर्णाच्या कल्काचा लेप करावा . नंतर त्या फाकी पूर्ववत् जुळवून दोरीने बांधून त्याजवर एरंडाची पाने गुंडाळून गवताने बांधावे . आणि त्याजवर चिखल लिंपून निर्धूम अशा कोळशाच्या अंगर शेणीच्या निखार्‍यातून पुटपाकविधिने उकडून काढावे . नंतर ते उसाचे कांडे थंड झाल्यावर पित्तविकाराच्या रोग्याने रेच होण्याकरिता खावे ॥५ -१५॥

विरेचन लेह

खडीसाखर , अजमोदा , विरेचनलेह , भुई कोहाळा व तांबडे निशो तर ह्यांचे समभाग चूर्ण करून ते तहान , दाह व ज्वर शांत होण्याकरिता तूप व मधाबरोबर चाटावे .

निशोत्तर चूर्ण तीन भाग व दालचिनी , तमालपत्र व मिरे ह्यांचे समभाग चूर्ण एक भाग एकत्र करून ते मध व साखरेशी मिसळून करून नाजूक प्रकृतिच्या मनुष्यास रेच होण्याकरिता द्यावे .

चार तोळे खडीसाखर व सोळा तोळे मध ह्यांचा लेहाप्रमाणे पाक करून त्यात तांबड्या निशोत्तराचे चूर्ण पाच तोळे घालून पचन करून लेह तयार करून ठेवावा . हा थंड झाल्यावर पित्तनाश होण्याकरिता विरेचनार्थ द्यावा .

तांबडे निशोत्तर , वरधारेच्या मुळ्य़ा , जखवार , सुंठ व पिवळी ह्यांचे समभाग चूर्ण करून ते मधाशी चाटावे . ते सर्व कफरोगात रेचककर्माविषयी फार चांगले आहे .

हिरडे , शिवणीची फळे , आंवळकाठी , डाळिंब (आंबट डाळिंब ) व बोरे ही फळे बियांसकट पाडाला आलेली अशी आणून त्याचा रस काढून अगर काढा करून तो रस किंवा काढा एरंडतेल तेलात फोडणीस टाकावा (तेल पुरेल असे अजमासाने घ्यावे ). नंतर त्यात महाळूंगातील केसर , चिंच , आमसुले असले आम्ल पदार्थ रुची येण्यापुरते टाकून तो रस आटवून लेहाप्रमाणे दाट करावा . नंतर त्यात वासापुरते दालचिनी , तमालपत्र व वेलचीदाणे ह्याचे चूर्ण घालावे . तसेच त्या लेहाच्या चतुर्थांश त्यात मध व तांबड्या निशोत्तराचे चूर्णही तितकेच घालून तो ठेवावा . मग ज्याला कफरोग असेल अशा नाजूक मनुष्याला हा लेह रेच होण्याकरिता चाटवावा . निळीच्या फळांचे अथवा बियांचे चूर्ण करून त्या चूर्णाच्या बरोबरीने त्यात दालचिनी व वेलची दाणे ह्याचे चूर्ण मिळवावे . मग त्या मिश्र चूर्णाइतकेच त्यात तांबड्या निशोत्तराचे चूर्ण व तितकेच खडीसाखरेचे चूर्ण मिसळून ठेवावे . हे चूर्ण संतर्पण (शक्ती कायम राखणारे ) असून ते महाळुंगाचा अगर कागदी लिंबाचा रस व मध ह्यातून दिले असता सौम्य रेच होऊन सान्निपाताचा नाश होतो .

निशोत्तर (तेड ), वरधारेच्या मुळ्य़ा , पिंपळी व त्रिफळा ही औषधे समभाग घेऊन त्याचे चूर्ण करून त्या चूर्णाच्या दुप्पट खडीसाखर व तितकाच मध ह्याचा पाक करून , त्यात ते चूर्ण घालून थोडावेळ पचन करून , त्याचे लहान लहान लाडू बांधावे . ह्या विरेचनाने सन्निपात , ऊर्ध्वगामि रक्तपित्त , व ज्वर ह्यांचा नाश होतो .

निशोत्तर (तेड ) तीन भाग , त्रिफळा तीन भाग , जवखार एक भाग , पिंपळी एकभाग व वावडिंगातील बी एक भाग ह्या सर्वांचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते तूप व मधाशी चाटावे किंवा चूर्णाच्या दुप्पट गूळ घालून गोळ्य़ा करून खाव्या . हे विरेचन अपायकारक नाही . हे कफवातजन्य गुल्म , पांथरी , उदर व हलीमक ह्या रोगाचा व इतर रोगांचाही नाश करिते .

वरधारेचे मूळ , निशोत्तर , निळीचे बी (काळा दाणा ), कुटकी , नागरमोथा , धमासा , चवक , इंद्रजव व त्रिफळा ह्याचे समभाग चूर्ण करून ते ज्याचा कोठा रुक्ष आहे त्याला मासरस व तूप ह्यातून रेच होण्याकरिता द्यावे . व स्निग्ध कोठ्याच्या मनुष्याला पाण्यातून द्यावे . व हे विरेचन रुक्ष कोठ्याच्या मनुष्याला प्रशस्त आहे .

त्रिधारी निवडुंग व शेर वगैरे तीव्र रेचक द्रव्ये वगळून बाकाची मिळतील तेवढी घेऊन त्याचा काढा करावा अथवा एकट्या निशोत्तराचाच काढा करावा . तो थंड झालेला काढा तीन भाग व काकवी दोन भाग एकत्र करून पुनः विस्तवावर ठेवून अर्धावशेष काढा करावा . नंतर तुपाने राबलेल्या मातीच्या घागरीत अथवा चिनी मातीच्या बरणीत आतून मध व पिंपळीचे चूर्ण एकत्र कालवून त्याचा लेप करावा व अगरुची (किंवा ) चंदनाची धुरी द्यावी व त्या घागरीत अगर बरणीत तो काढा थंड बांधून ती शतीऋतु असल्यास धान्याच्या राशीत एक महिनाभर पुरून ठेवावी आणि उन्हाळा असल्यास पंधरा दिवस ठेवावी आणि उन्हाळा असल्यास पंधरा दिवस ठेवावी . विशेषतः एक महिना झाल्यानंतर काढावी . म्हणजे आतील औषधास मधुर वास येतो . व त्याचे उत्तम आसव तयार होते . ते रेच होण्याकरिता प्यावे . आसव करण्याचा हा विधि पुढे चिकित्सास्थानात जी क्षारमूत्रादिकांची आसवे सांगितली आहेत त्यानीही करावा ॥१६ -३०॥

निशोत्तर (नळीचे तेड ) वगैरे विरेचन द्रव्याची मुळे आणून त्यांचा यथाविधि काढा करून त्या काढ्याच्या उडदाच्या डाळीला बर्‍याच भावना द्याव्या , (ती डाळ काढ्यात भिजवून वाळविणे ह्याला भावना म्हणतात .) त्याचप्रमाणे साळीचे तांदूळ त्या काढ्य़ाने स्वच्छ धुवून घ्यावे . नंतर ती डाळी व तांदूळ एकत्र कुटून त्याचे गोळे करून ते वाळवून पुनः त्यांची पूड करून घ्यावी . (ते किण्व म्हणजे सुराबीज ). मग तांदुळाच्या पिठाला वरील निशोत्तरादी मुळ्य़ांच्या काढ्याची वाफ देऊन ते त्या वाफेने चांगले ओले झाले म्हणजे , ते पीठ तीन भाग व वरील किण्व एक भाग मिसळावे . आणि सुरेचा मंड (द्रव भाग ) तयार होण्याकरिता त्यात वरील विरेचन द्रव्यांचा काढा योग्य त्या प्रमाणात (पिठाच्या आठपट ) घालून वरील आसवाच्या कृतीत सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या मातीत घागरीत अगर बरणीत ते भरावे आणि धान्याच्या राशीत पुरून ठेवावे . काही दिवसांनी त्यात सुरेप्रमाणे (दारुप्रमाणे ) आंबटपणा आला म्हणजे ती रेच होण्याकरिता घ्यावी . ह्याच पद्धतीने गेळफळादिकांचे वमनाचे प्रयोग सुरेच्या रूपाने तयार करावे . मागे एकुणचाळिसाव्या अध्यायात सांगितलेल्या त्रिवृतादिगणातील तांबडे निशोत्तर वगैरे द्रव्याच्या मुळ्य़ा , अडतिसाव्या अध्यायातील विदारिगंधादि पहिल्याच गणातील सर्व औषधे , मोठ्या पंचमूळादिगणातील औषधे (एरण , शिवण , टेंटू , पाडळ व वेल ह्यांची मुळे ), मोरवेल , गणग्याच्या वेलाच्या मुळ्य़ा , त्रिधारि निवडुंग , सुवर्णाक्षिरि (काटे धोतर्‍याच्या मुळ्य़ा ) त्रिफळा , अतिविष व वेखंड ही सर्व औषधे जमवून त्याचे दोन भाग करावे आणि एका भागाचा काढा करून दुसर्‍या भागाचे चूर्ण करावे . नंतर काढून कोंडा काढलेले सातु घेऊन त्यांना त्या काढ्याच्या बर्‍याचशा भावना द्याव्या . (सातु त्या काढ्यात भिजवून वाळविणे म्हणजे भावना होते ). नंतर ते भावना दिलेले सातु भाजून त्याचे पीठ करावे . ते पीठ तीन भाग व वरील निम्म्या औषधाचे करून ठेवलेले चूर्ण एक भाग एकत्र करून आसवाच्या कृतीप्रमाणे तयार केलेल्या मातीच्या घागरीत ते पिठाचे व चूर्णाचे मिश्रण भरावे व त्यात वरील विरेचन द्रव्यांचा केलेला काढा थंडगार करून बराचसा घालावा व काही दिवस (पंधरा दिवस ) धान्याच्या राशीत पुरून ठेवावे . ते आंबट झाले म्हणजे त्याला ‘‘सोवीरक ’’ असे म्हणतात . ते विरेचनार्थ योजावे .

वरील सौवीरकाच्या पाठात सांगितलेली सर्व औषधे आणून त्यांचे दोन भाग करावे . त्यातील एक व तितकेच कोंड्यासकट सातु एकत्र करून एका भांड्यात घालून त्यात त्यांच्या आठपट मेंढशिंगीचा काढा करून घालावा व चांगले शिजवावे . त्यातील सातु चांगले शिजले म्हणजे ते खाली उतरून त्यातील सातु व औषधे वेचून वेगळी करावी . (सातु वेगळे निघण्याकरिता त्यांची फडक्यात पुरचुंडी करून घातली तरी चालेल ). नंतर ते सातु चांगले बारीक वाटावे . वर निम्या औषधाचे केलेले चूर्ण त्यात मिसळून , त्यात ते सातु व औषधे शिजवून काढलेला मेढशिंगीचा काढा (त्या काढ्यात सातु शिजल्यामुळे झालेला सातूचा यूष ) घालावा . आणि सर्व मिश्रण वरीलप्रमाणे मातीच्या घागरीत भरून धान्याच्या राशीत पुरून ठेवावे . सहासात दिवसांनी ते चांगले आंबले म्हणजे काढून ठेवावे . ह्याला तुषोदक म्हणतात . सौवीरक ही ह्याच विधिने सहा सात दिवस धान्याच्या राशीत पुरून ठेवून उपयोगात आणावे .

वर निशोत्तराचे जे निरनिराळे कल्प सांगितले आहेत त्याच पद्धतीने इतरही सर्व विरेचन द्रव्यांचे (काळे निशोत्तर , दांतीमूळ वगैरे द्रव्यांचे ) कल्प तयार करून त्यांचीही योजना करावी . सुरासौविरादि योगही असेच तयार करावे ॥३१ -४५॥

दांती व थोर दांती (मोगली एरंड ) ह्यांच्या मुळ्य़ा आणून त्या मुळ्य़ांवर पिंपळीचे चूर्ण मधात कालवून त्या कल्काचा लेप करावा . नंतर त्याजवर दर्भाच्या (अगर गवताच्या ) काड्यांचे वेष्टण गुंडाळून , त्याजवर चिखल लिंपून , निर्धूम (धूर नसणार्‍या ) अशा शेणीच्या अग्निमधून पुटपाकाच्या पद्धतीने उकडून काढाव्या , आणि वाळवाव्या , नंतर त्यांचा निशोत्तराप्रमाणे निरनिराळ्या प्रयोगाने कफपित्तविकारात रेचनार्थ उपयोग करावा .

दांती व थोर दांती ह्यांच्या मुळ्य़ांचा काढा तेलाच्या चौपट व त्यांच्याच मुळ्य़ाचा कल्क तेलाच्या चतुर्थांश घालून पाण्यातून काढलेले तिळाचे तेल विधियुक्त तयार करावे . अथवा ह्याच रीतीने काढा व कल्क घालून , तूप तयार करावे . ते तूप विसर्प , कक्षा (काखमांजरी ), दाह व आलजी नावाची पुळी ह्यांच्या लेपाने नाश करिते व पोटात घेतले असता रेचही करिते . तसेच सिद्ध केलेले तेल प्रमेह , गुल्मवातविकार , कफ व त्यासंबंधी मलमूत्रादिकांचा होणारा अवरोध ह्यांचा नाश करिते आणि तेल , तूप , वसा व मज्जा हे चार स्नेह एकत्र करून वरीलप्रमाणे काढा व कल्प ह्यांनी सिद्ध करावे . ते मळाचा अवरोध , शुक्राचा अवरोध व वाताचा अवरोध ह्यापासून होणार्‍या रोगांचा नाश करितात .

दांतीमूळ , थोर दांतीमूळ , मिरे , कंकुष्ठ (मुरदाडशिंग ) किंवा नाकेशर , धमासा , सुंठ , मनुका , व चित्रकमूळ ह्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्याला सात दिवसपर्यंत गोमूत्राच्या सात भावना द्याव्या . नंतर ते चूर्ण विरेचनार्थ तुपातून द्यावे . ते जिरल्यावर त्याजवर भाताच्या लाह्यांचे पीठ व मध एकत्र कालवून त्यात थोड थंड पाणी मिश्र करून ते (संतर्पण ) पेय प्यावयास द्यावे . हा रेचकाचा प्रयोग पित्त व कफजन्य रोगाचा नाश करितो . आणि अजीर्ण , कुशीतील शूळ , पांडुरोग , पांथरी व उदर ह्यांचा नाश करितो .

जुना गूळ बत्तीस तोळे , चांगले उत्तम हिरडे मोजून वीस , दांतीमुळे चार तोळे , चित्रमूळ चार तोळे , पिंपळी एक तोळा व निशोत्तर एक तोळा ह्या सर्वांचे चूर्ण करून ते गुळांत मळून त्याचे दहा लाडू बांधावे . आणि त्यांतील एक एक लाडू प्रत्येक दहा दिवसाच्या अंतराने खावा . व त्यावर ऊनपाणी प्यावे . ह्या प्रयोगाला पथ्याचे बंधन नाही . हे लाडू दोषनाशक असून संग्रहणी , पांडुरोग , मूळव्याध व कुष्ठ ह्यांचा नाश करणारे आहेत ॥४६ -५३॥

सुंठ , मिरे , पिंपळी , दालचिनी , तमालपत्र , वेलचीदाणे , नागरमोथे , वावडिंगातील बी , आवळाकाठी , ही नऊ औषधे समभाग (एक एक भाग ), निशोत्तर आठ भाग व दांतीमूळ दोन भाग ह्या सर्वांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे . (प्रत्येक औषधाचे चूर्ण वेगवेगळे करून मग एकत्र मिसळावे ). नंतर त्या चूर्णात सहा भाग साखर , पाव तोळा सैंधव व पावतोळा मध मिसळून , (१ तोळा = ११ ग्रॅम ) मळून त्याच्या गोळ्य़ा बांधाव्या व रेच होण्याकरिता एका गोळी शक्तिमानाप्रमाणे खाण्यास देऊन त्याजवर थंड पाणी प्यावयास द्यावे . हे रेचक बस्तीमधील पीडा तहान , ज्वर , ओकारी , शोष (क्षय ), पांडुरोग व भ्रष्ट (घेरी ) ह्यांचा नाश करिते . ह्याला पथ्याचा वगैरे प्रतिबंध नाही . हा योग विशेषतः विषनाशक आहे . हा ‘‘त्रिवृदष्टक ’’ नावाचा योग पित्तविकाराच्या रोग्याला फार प्रशस्त आहे . पित्त -कफ -जन्य विकारात हा योग वाटल्यास दुधाच्या अनुपानाशी घ्यावा . (म्हणजे गोळी खाऊन वर दूध घ्यावे .) हे लाडू दिसण्यात व खाण्याला सारखेच गोड असल्यामुळे श्रीमंत लोकांना देण्याच्या उपयोगाचे आहेत ॥५४ -५९॥

लोध्राच्या झाडाची बाहेरील साल , अंतरसाल टाकून घ्यावी त्या सालीचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्याचे तीन भाग करावे . पैकी दोन भागाला त्या लोध्राच्या सालीच्या काढ्यात टाकून तो भाग गाळून घ्यावा . (ह्याप्रमाणे त्याच काढ्यात ते चूर्णाचे दोन भाग वरचेवर एकवीस वेळ गाळून तो काढा घ्यावा .) व त्या काढ्याची त्या राहिलेल्या चूर्णाच्या तिसर्‍या भागाला भावना देऊन ते वाळल्यावर , त्याला पुनः दशमुळांच्या काढ्याची एक भावना देऊन , नंतर त्या चूर्णाचा निशोत्तराप्रमाणे निरनिराळ्य़ा कल्पाने उपयोग करावा . ह्याप्रमाणे हे लोध्राच्या सालीचे विधान सांगितले .

आता हिरड्याच्या फळांचा विधि सांगतो . हिरड्याची निर्दोष (किड्याने वगैरे न खाल्लेली ) चांगली पाडाला आलेली फळे आणून त्यातील बिया काढून टाकून वरील टरफलांचे चूर्ण मागे निशोत्तराचे जे कल्प सांगितले आहेत त्याच पद्धतीने कल्प करून उपयोगात आणावे . ते सर्व रोगांचा नाश करितात . ह्या हिरड्यांचा प्रयोग रसायनाप्रमाणे गुण करणारा म्हणजे रसायनच आहे , तसाच बुद्धिवर्धक आहे व दुष्ट अशा नाडीव्रणाचे शोधन करणारा आहे .

हिरडेदळ , वावडिंगाचे बी , सैंधव , सुंठ , निशोत्तर (तेड ) व मिरे ह्यांचे वस्रगाळ चूर्ण करून ते गोमूत्रातून पाजावे म्हणजे रेच होतात . हिरडेदळ , देवदार , कोष्ठ , सुपारी , सैंधव व सुंठ ह्यांचे समभाग चूर्ण करावे व ते रेच होण्याकरिता गोमूत्रातून पाजावे .

निळीच्या फळाचे (काळ्य़ा दाण्यांचे ) चूर्ण , सुंठीचे चूर्ण व हिरडेदळाचे चूर्ण समभाग एकत्र करून ते एक तोळा चूर्ण गाळाशी खावे व त्यावर ऊन पाणी प्यावे . ह्या प्रयोगाने रेच होतात .

पिप्पल्यादि गणातील औषधांचा काढा करून त्या काढ्यात हिरडेदळाचे चूर्ण एक तोळा व सैंधव पावतोळा घालून पाजावे , म्हणजे त्याने तात्काळ रेच होतात .

हिरडेदळाचे चूर्ण करून ते समभाग सुंठीच्या चूर्णाशी , समभाग गुळाशी किंवा पाव भाग सैंधवाशी नेहमी घेण्याचा क्रम ठेविला असता जठराग्नीचे दीपन करिते . तसेच हा हिरड्याचा प्रयोग वाताचे अनुलोमन करितो . हा वृश्य (शुक्राची वृद्धि करणारा ) आहे . सर्व इंद्रियांना उत्साह उत्पन्न करितो . हिरडेदळाचा प्रयोग बहुतके संतर्पणाने (पौष्टिक औषधांच्या अतिसेवनाने ) होणार्‍या (अग्निमांद्यादि ) विकारांचा नाश करितो .

आवळा हा थंड , रूक्ष , पित्तशामक , मेदशामक व कफशामक आहे . बेहडा हा उष्ण नसून कफ व पित्त ह्यांचा नाशक आहे . तीनही फळे (हिरडा , बेहडा व आवळा ) ही आंबट , तुरट , किंचित् कडु व मधुर आहेत .

हिरडेदळ ,य बेहडेदळ व आवळ्याचे दळ वाळवून पृथक वस्त्रगाळ चूर्ण करून समभाग एकत्र मिसळावे . ह्या चूर्णाला ‘‘त्रिफळा ’’ (त्रिफळ्य़ाचे चूर्ण ) म्हणतात . हे त्रिफळ्य़ाचे चूर्ण एक भाग व तीन भाग तूप एकत्र करून सतत भक्षण करण्याचा क्रम ठेविला असता हा त्रिफळा सर्व रोगांचा नाश करितो . व वय स्थिर राखतो म्हणजे म्हातारपण येऊ देत नाही .

ह्या हिरड्याच्या फळाच्याच विधिने विरेचनकारक जी जी फळे आहेत त्यांचेही प्रयोग करावे .

त्यात विशेषतः बाहव्याच्या शेगांचा प्रयोग कसा करावा ते सांगतो . बाहव्याच्या शेंगा चांगल्या पिकण्याच्या बेतास आलेल्या काढून आणून त्या सात दिवसपर्यंत वाळूत पुरून ठेवाव्या . नंतर काढून त्या उन्हात वाळवाव्या . मग त्यातील बिया काढून घेऊन त्या बियांचे कुटून चूर्ण करून पाण्यात घालून शिजवून (एरंड्याच्या आरडीप्रमाणे आरड घेऊन ) तेल काढावे अथवा तिळाप्रमाणे घाण्यात घालून तेल काढून घ्यावे . ह्या तेलाचा उपयोग बारा वर्षेपर्यंतच्या लहान मुलास रेच होण्याकरिता करावा . कोष्ठ , सुंठ , मिरे व पिंपळी ह्यांचे चूर्ण टाकून एरंड तेल प्यावे व त्यावर ऊन पाणी प्यावे . ह्या योगाने चांगले रेच होतात .

एरंडेल तेल त्या तेलाच्या तिप्पट त्रिफळ्य़ाचा काढा करून घेऊन त्यातून घ्यावे . अथवा दूध व मांस रस वरीलप्रमाणेच तेलाच्या तिप्पट घेऊन त्यातून ते तेल पाजावे . ह्या प्रयोगानेही रेच चांगले होतात . हा तेलाचा प्रयोग लहान मुले , वृद्ध माणसे व उरःक्षताने किंवा व्रणाने क्षीण झालेले रोगी ह्यांना देण्याच्या उपयोगाचा आहे .

हे सुश्रुता , ह्याप्रमाणे हा विरेचन द्रव्यांचा फलांचा विधि तुला सांगितला . आता विरेचन द्रव्यांच्या दुधांचा (चिकांचा ) विधि सांगतो तो ऐक ॥६० -७७॥

तीक्ष्ण विरेचनांमध्ये त्रिधारी निवडुंगाचा चीक श्रेष्ठ आहे ; पण ज्याला चिकित्सेची (उपचार करण्याची ) पुरी माहिती नाही , अशा वैद्याने त्याचा विरेचनार्थ भलताच प्रयोग केला तर तो विषाप्रमाणे प्राणाचा नाश करितो . आणि तोच यथायोग्य प्रयोग सूज्ञ वैद्याने विचारपूर्वक केला असता , अत्यंत वाढलेला असा दोषसंचय विरेचनाने त्वरित काढून टाकून , कष्टसाध्य अशा दुस्तर रोगाचाही नाश करितो . टाकळी , शिवण , टेंटू , पाडळ , बेल , रिंगणी व डोरली ह्या प्रत्येक वनस्पतीच्या मुळ्य़ांचा वेगवेगळा काढा असे सात काढे करावे . नंतर ते सर्व काढे समभाग घेऊन एकत्र करावे आणि त्यात एका काढ्याइतका त्रिधारी निवडुंगाच्या लाकडाच्या निखार्‍यावर ते मिश्रण ठेवून आटवावे काढा आटून घट्ट झालेला चिक राहील तो काढून ठेवावा व त्यातून अर्धा तोळा औषध कांजी , दह्यावरील पाणी (निशोत्तराच्या प्रयोगाप्रमाणे ) द्यावा .

त्रिधारी निवडुंगाच्या चिकाच्या तांदुळाला (पाच सात ) भावना देऊन त्या तांदुळाची कणेरी करून रेच होण्याकरिता प्यावी . म्हणजे त्वरित रेच होतात .

गव्हाला वरीलप्रमाणेच त्रिधारी निवडुंगाच्या चिकाच्या भावना देऊन त्या गव्हांच्या पिठाची दूध , तूप व गूळ घालून लापशी करून पाजावी . अथवा दूध , तूप व साखर ह्यांत त्रिधारी निवडुंगाचा चीक घालून तो चाटावयास द्यावा . ह्या प्रयोगानेही रेच होतात .

पिंपळ्य़ांना त्रिधारी निवडुंगाच्या चिकाच्या भावना देऊन त्या पिंपळ्य़ाचे चूर्ण सैंधव करून द्यावे . तसेच कपिलेच्या चूर्णाला त्रिधारी निवडूंगाच्या चिकाच्या भावना देऊन त्या चूर्णाच्या गोळ्य़ा करून ठेवाव्या व त्यातून एक एक गोळी रेच होण्याकरिता द्यावी . ह्या दोन्हीही प्रयोगांनी चांगले रेच होतात .

शिकेकाई , सांखवेल , दांतीमूळ , निशोत्तर , बाहव्याच्या शेंगातील बी ह्यांच्या चूर्णाला गोमूत्राच्या सात दिवस पर्यंत सात भावना द्याव्या . नंतर त्या चूर्णाला त्रिधारी निवडुंगाच्या चिकाच्या सात दिवस सात भावना द्याव्या . नंतर ज्याचा कोठा अगदी मृदु आहे अशा सुकुमार रोग्याला ते चूर्ण वासाच्या फुलावर टाकून वास घेण्यास द्यावे . अथवा ते चूर्ण वस्त्राला फासून ते वस्त्र कमरेभोवती गुंडळावे म्हणजे ह्या दोन्हीही प्रयोगांनी रेच होतात .

क्षीर (चीक ), साल , फळे व मुळे अशा प्रकारांनी विरेचन द्रव्याचे हे निरनिराळे प्रयोग विधिपूर्वक सांगितले आहेत . ते रोग , रोग्याची शक्ति व कालमान वगैरे नीट पाहून व विचार करून योग्य रीतीने उपयोगात आणावे .

निशोत्तर नऊ मासे , निरडेदळ व आवळाकाठी प्रत्येकी तीन तीन मासे , व जवखार तीन मासे (एकमासा = दीडग्रॅम ) ह्या सर्वांचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण तूप व मधाशी एक तीळभर चाटावे किंवा चूर्णाच्या दुप्पट जुना गूळ घालून त्याचे लहान (आवळ्य़ाएवढे ) लाडू बांधून एक एक लाडू रेच होण्याकरिता खावा . ह्या दोनीही प्रयोगाने रेच चांगले होतात . ह्या विरेचन प्रयोगाला पथ्याचा प्रतिबंध नाही . हे फार चांगले आहे . हे विरेचन सर्व प्रकारचे गुल्म , पांथरी , उदर , खोकला , हलीमक , अरुचि आणि कफवात दोषजन्य इतर रोग ह्या सर्वांचा नाश करिते ॥७८ -८९॥

तूप , तेल , दूध , मध , गोमूत्र , तसाच मांसरस अन्नादि भक्ष्य पदार्थ (लाडू वगैरे ) किंवा इतर लेह पदार्थ (मुरंबे वगैरे ) ह्यातून जसे योग्य दिसेल त्या रीतीने सूज्ञ वैद्याने रेचनाने औषध द्यावे .

उंबर , पिंपळ वगैरे झाडाचा चीक , वनस्पतीच्या साली किंवा पाने वाटून पिळून काढलेला रस (स्वरस ), ओली वनस्पती वाटून ओला गोळा बनतो तो कल्क शुष्क औषध चेचून पाणी घालून अष्टमांश राखलेले पाणी , तो कषाय (काढा ), औषधी द्रव्यात पाणी घालून ती औषधे चांगली भिजल्यावर त्याच पाण्यात कुसकरून ते पाणी गाळून घेणे , हा शीतकषाय (काढा ) व फांट (औषधी द्रव्य रात्री आधणाच्या पाण्यात भिजत टाकून सकाळी ते पाणी गाळून घेणे ; किंवा आधणाच्या पाण्यात भिजत टाकून सकाळी ते पाणी गाळून घेणे ; किंवा आधणाच्या पाण्यात औषधी द्रव्याचे चूर्ण टाकून थोडा वेळ ठेऊन लागलेच गाळून घेणे . ह्या क्रियेला फांट किंवा चहा म्हणतात .) हे औषधी द्रव्याचे निरनिराळे सहा कल्क आहेत . हे उत्तरोत्तर म्हणजे चिकापेक्षा स्वरस व स्वरसापेक्षा शृतकषाय (शिजवून तयार केलेला काढा ) ह्या क्रमाने एकाहून एक हलके आहेत ॥९० -९१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP