मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
संशोधन संशमनीय

सूत्रस्थान - संशोधन संशमनीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय एकोणचाळिसावा

आता ‘‘संशोधन -संशमनीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

गेळफळ , कुडा , देवडांगरी (काटे इंद्रावण ), कडु भोपळा , कडु घोसाळे , कडु दोडका , पांढरे शिरस , वावडिंग , पिंपळी , करंज , टाकळा (तरोटा ).

कोविदार (कांचन ), भोकर , कडुनिंब , अश्वगंध , वेत , दुपारीचे झाड , पांढरे वेखंड , खुळखुळा (शणपुष्पी लहान ताग ), कडु तोंडली , तांबडे वेखंड , कडु इंद्रावण , व कंडळ किंवा थोर इंद्रावण ही औषधे वरील मार्गाने वमन प्रयोगाने दोष काढून टाकणारी आहेत . त्यापैकी कोविदार किंवा कांचन ह्याच्या आधीची औषधे (टाकळ्य़ापर्यंतची ) ह्या औषधांची फळे उपयोगात आणावी . आणि कोविदारापासून पुढची औषधे कंडळापर्यंत ह्यांच्या मुळ्यांचा उपयोग करावा ॥३॥

तांबडे निशोत्तर , काळे निशोत्तर , दांती , द्रवंति (थोर दांतीमोगली एरंड ), शिकेकाई , सांखवेल , मेढशिंगी , थोर इंद्रावण , बोकडी (बोकड पुंगळी ) किंवा वरधारा , त्रिधारी निवडुंग , काटे धोतरा , (किंवा ककुष्ठचित्रक ), किणिही , कुश व काश जातीचे दर्भ , लोध्र , कपिला , निबारा , पाडळ , सुपारी , हिरडा , बेहडा , आवळा , निळीचे झाड , बाहवा , एरंड , घाणेरा करंज , महावृक्ष (शेंड ), सातवीण , रुई , मालकागोणी ही औषधे अधोमार्गाने दोष काढून टाकणारी म्हणजे विरेचक आहेत . त्यापैकी लोध्रापासून पाडळपर्यंतच्या औषधांचा झाडाच्या साली उपयोगात घ्याव्या . कपिलाच्या झाडाच्या फळातील पूड उपयोगात घ्यावी . सुपारीपासून एरंडापर्यंतच्या औषधांच्या झाडाची फळे उपयोगत घ्यावी . घाणेरा करंज व बाहवा यांची पाने उपयोगात आणावी . बाकी राहिलेली त्रिधारी निवडुंग व शेंड यांचा चीक उपयोगात आणावा ॥४॥

वमन व विरेचकारक द्रव्ये .

कडु घोसाळी किंवा कडु दोडकी , शिकेकाई , सांखवेल , देवडांगरी , कारली , ही औषधे वमन व विरेचन अशा दोनही मार्गानी दोष काढून टाकणारी आहेत . ह्याच्या पानांचा ‘स्वरस ’ उपयोगात आणावा ॥५॥

शिरोविरेचक द्रव्य

पिंपळी , वावडिंग , आघाडा , शेवगा , शिरस , शिरीषवृक्ष (शिरसाचे झाड ), मिरे करवीर , तोंडली , गोकर्णी , किणीळी , वेखंड , मालकांगोणी , करंज रुई , मांदार , लसूण ,

अतिविष , सुंठ , तालीसपत्र , तमालपत्र , तुळस , अजबला (रानतुळस ), हिंगणबेट , मेढशिंगी , (ह्याचे झाड पुत्रवंतीच्या झाडासारखे असते व पानेही तशीच असतात .) महाळुंग (रानमहाळुंग ), सुरंगी (हिला तांबडी फुले येतात व हिच्या मुळ्य़ांपासून तांबडा रंग करितात .), पीलू , जाई , सागवान , ताड , मोहाचे झाड , लाख , हिंग , सैंधव , मद्य , गाईच्या शेणाचा रस व गोमूत्र ही औषधे शिरोविरेचक आहेत .

त्यापैकी कणेरीच्या पूर्वीची जी औषधे त्यांच्या फळांचा उपयोग करावा . कणेरीपासून रुईपर्यंतच्या औषधांची मुळे उपयोगात आणावी . तालीसपत्राच्या आधीची जी औषधे त्यांचे कंद (गड्डे ) उपयोगात आणावे ; आणि तालीसपत्रापासून रानतुळशीपर्यंतची जी औषधे त्यांची पाने उपयोगात आणावी . हिंगणबेट व मेढशिंगी ह्यांच्या सालीचा उपयोग करावा , महाळुंग (रान महाळुंग ), सुरंगी , पीलू , जाई ह्यांची फुले उपयोगात आणावी सागवान , ताड व मोहाचे झाड ह्यांच्या खोडांचा उपयोग करावा . हिंग व लाख ह्या झाडांचा डिंग घ्यावा . सैंधव वगैरे पंचलवणे ही बहुधा खनिज तेवढी घ्यावी . तद्ये तयार झाल्यावर तशीच उपयोगात आणावी . गाईच्या शेणाचा रस ,य व गोमूत्र ही तशीच घ्यावी ॥६॥

संशमनद्रव्य (वातसंशमनगण .)

आता शमन करणारी द्रव्ये सांगतो . ती अशी -देवदार , कोष्ट , हळद बायवरणा , मेढशिंगी , लहान , थोर चिकणा , आर्तगल (निळी कोरांटी किंवा अर्जुनसादडा ), कापुर ,

काचरी किंवा कुहिली , साळई , कुबेराक्षी (सागरगोटा -गजगा ), वेल्लंतर (वेलतूर ), कोरांटी , अग्निमंथ (तेजोवृक्ष -अभावी काळी टाकळी ), गुळवेल , एरंड , पाषाणभेद , मांदार , रुई , दिवसमावळी , पुनर्नवा (अभावी वसु ), वसुक (वकू ळ ), वशीर (सूर्यफूल किंवा आघाडा ), घोतरा , भारंगी , कापशी (देवकापशी ). विंचूचे झाड . पत्तूर (पतंग ). बोर , सातु , लहान बोरे , हुलगे वगैरे औषधे विदारिगंधादि गणांतील औषधे व पहिली दोन पंचमूळे म्हणजे दशमूळे ही औषधे वातदोषाचे शमन करणारी आहेत ॥७॥

पित्तसंशमनगण .

पांढरा व तांबडा चंदन , वाळा , काळा वाळा , मंजिष्ठ , क्षीरकाकोली , भुई कोहाळा , शतावरी , नागरमोथे , शेवाळ , कल्हार (तांबडे कमळ ), कुमुद (चंद्रविकासी पांढरे कमळ ,) निळे कमळ , केळ किंवा कंदली म्हणजे आळंबे , दूर्वा , मोरवेल वगैरे औषधे , काकोल्यादि गणातील औषधे , सारिवादि गणातील औषधे , अंजनादि गणातील औषधे ,

उत्पलादि गणातील औषधे , न्यग्रोधादि गणातील औषधे , उत्पलादि गणातील औषधे , अंजनादि गणातील औषधे , न्यग्रोधादि गणातील औषधे आणि तृणपंचमूळे हा संक्षेपाने पित्ताचे शमन करणारा वर्ग सांगितला ॥८॥

कफसंशमनगण

पिवळा सुगंधी चंदन , कृष्णागर , रक्तचंदन किंवा तिळवण , कोष्ठ , हळद , कापूर , बाळंतशेप , निशोत्तर , रसना , लहान व मोठे करंज , हिंगणबेट , जाई , जटामांसी ,

कळलावी , हस्तिकर्ण (हा एक पळसाचा भेद आहे . ह्याला एक पानी पळस म्हणतात .) मुंजातक (लहान सुरण किंवा मोळ ) व काळा वाळा ही औषधे वल्लि पंचमूळ , कंटक पंचमूळ , पिप्पल्यादि गणातील औषधे बृहत्यादि गणातील औषधे , मुष्ककादि गणातील औषधे , क्वचादि गणातील औषधे , सुरसादि गणातील औषधे व आरग्वधादि गणातील औषधे हा संक्षेपतः कफाचे शमन करणारा वर्ग सांगितला ॥९॥

ही सर्व संशोधनीय व संशमनीय औषधे रोगाचा जोर , जठराग्नीचे सामर्थ्य व रोग्याचे बळ ह्या सर्वांचा विचार करून द्यावी . कारण रोग्याच्या मानाने जर औषधे अधिक झाले तर ते त्या रोगाचा नाश करून दुसरा रोग उत्पन्न करिते . जठराग्नीच्या मानाने जर औषधे अधिक झाले तर ते लवकर न पचता तसेच पोटात शिल्लक राहिल्यामुळे अवरोध , शूळ वगैरे विकार उत्पन्न करिते व फार उशीराने पचन होते . रोग्याच्या शक्तीच्या मानाने जर औषध अधिक झाले तर ते ग्लानी , मूर्च्छा किंवा मद उत्पन्न करिते . हे संशमन (शामक ) औषधाच्या आधिक्याविषयी समजावे . ह्याचप्रमाणे संशोधन औषधे अधिक झाले असता संशमन औषधाच्या परिणामासारखे तेच विकार पण त्याहून अधिकप्रमाणात उत्पन्न करिते ॥१०॥

संशोधन औषधाने साध्य असा रोग असून रोगी जर दोषादिकांच्या पीडेने फार अशक्त झाला असेल तर त्याला चतुर वैद्याने दोष काढून टाकणारे असे मृदु विरेचन द्यावे .

रोग्याचा कोठा मृदु असून दोष स्थान सोडून संचार करीत आहेत , असा रोगी रोगाने अशक्त नसून स्वाभाविकच प्रकृतीने अशक्त असला , तरी त्याला त्याच्या बलाविषयी विशेष विचार न करता योग्य त्या प्रमाणात शोधन (वमन किंवा विरेचन ) औषध द्यावे . कारण दोष आपोआपच स्थानभ्रष्ट झाले असल्यामुळे व रोग्यांचा कोठा मृदु असल्यामुळे अशक्त मनुष्य असूनही त्याला शोधन दिले असता ते रोगाचा नाश करिते .

रोगाचा जोर , जठराग्नीची शक्ति व रोगाचे बळ ह्यांच्या मध्यम मानाने रोग्याला काढा द्यावयाचा तो सोळा तोळेपर्यंत द्यावा . चूर्ण द्यावयाचे ते , कल्क द्यावयाचा तो ह्या दोहोंचेही प्रत्येकी प्रमाण एक एक तोळा असावे . कल्प म्हणजे औषधे ओली असल्यास तशीच वाटून चटणीप्रमाणे करितात त्याला कल्क म्हणतात . आणि औषधे शुष्क असल्यास ती ठेचून पाण्यात भिजत घालून गंधाप्रमाणे बारीक वाटून घेतात त्यालाही कल्कच म्हणतात . एक तोळा =१० ग्रॅम अंदाजे ॥११ -१४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP