मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अवारणीय

सूत्रस्थान - अवारणीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय तेहेतिसावा

आता ‘अवारणीय ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

आधी एक रोग उत्पन्न झाल्यावर पुढे काही दिवसांनी तो रोग बरा न होता त्यातच दुसरे एक किंवा अनेक रोग उद्भवतात त्या मागून उद्भवणार्‍या रोगाला ‘‘उपद्रव ’’ असे म्हणतात . अशा अनेक उपद्रवांनी युक्त जे रोग रसायन औषधावाचून दुसर्‍या औषधोपचारांनी बरे होणे अशक्य होते , त्यांना ‘‘अवारण ’’ म्हणजे अचिकित्स्य (उपचार करण्याचा उपयोग नाही असे ) रोग असे म्हणतात . ते रोग कोणते ते तू एकाग्र मनाने ऐक .

१ वातव्याधि , २ प्रमेह , ३ कुष्ठ , ४ मूळव्याध , ५ भगंदर , ६ मूतखडा , ७ मूढगर्भ (आडवा येणारा ) व ८ उदररोग ह्या आठ रोगांना ‘‘महारोग ’’ असे म्हटले आहे . हे झाले असता ते स्वाभाविकच उपचार करण्यास फार कष्टप्रद आहेत .

त्यातून हे रोग ज्यांना झाले आहेत त्यांचा मनाचा उत्साहितपणा (प्राण ) नाहीसा झाला असेल आणि मांसक्षय झाल्यामुळे जे कृश झाले असतील , शिवाय श्वास , तहान , क्षय , वांती , ज्वर , मूर्च्छा , अतिसार व उचकी हे उपद्रव झाले असतील तर यशप्राप्तीची इच्छा करणार्‍या वैद्याने त्यांना विशेष उपचार करण्याच्या भरीस पडू नये .

सूज , त्वचा बधीर होणे (स्पर्श न कळणे ,) वाताने एकादा अगर अनेक अवयव लटके पडणे , अंग कापणे , पोट फुगणे , आणि अंतर्गत वेदनांनी व्यापणे ही लक्षणे कोणत्याही वातरोगामध्ये झाली असती तो वातरोग त्या मनुष्याचा नाश करितो .

प्रमेहरोगाचे जे उपद्रव सांगितले आहेत (निदानस्थान अध्याय सहावा पहा .) ते बहुधा सर्व उपद्रव ज्या प्रमेहाच्या रोग्याला आहेत , अथवा ज्याला लघवी अतिशय होत आहे (बहुमूत्र ), तसेच प्रेमहजन्य पुळ्यांनी जो फार पीडला आहे अशा मनुष्याचा प्रमेहरोगाने नाश होतो .

ज्या कुष्टी मनुष्याच्या अंगाची त्वचा फुटली आहे तसेच अंगातून (भेगा पाडलेल्या त्वचेतून ) रक्ताचा वगैरे स्राव होत आहे , डोळे लाल झाले आहेत , आवाज बसला आहे , व पंचकर्माचा (संशोधन , संशमन , अभ्यंग , गुग्गुळप्रयोग व शिलाजित प्रयोग ह्यांचा ) ज्याला उपयोग होत नाही असा कुष्ठरोग त्या कुष्टी मनुष्याचा नाश करितो .

तहान , अरुचि व शूल ह्यांची अतिशय पीडा असून ज्याला रक्त फार पडत आहे , तसेच सूज आणि अतिसार हेही उपद्रव आहेत असा मूळव्याधीचा रोग त्या रोग्याचा नाश करितो .

ज्या भगंदराच्या व्रणातून वायु , मूत्र , मळ व कृमी हे बाहेर येऊ लागले आहेत ते भगंदर असाध्य म्हणून सोडावे .

ज्या मूतखड्याच्या रोग्याच्या बेंबीला व वृषणाला सूज आली आहे . मूत्राचा अवरोध झाल्यामुळे वेदना फार होत आहेत , व लघवीतून वाळूप्रमाणे रेव जात आहे त्याचा त्या मुतखड्याच्या रोगाने त्वरित नाश होतो .

मूढगर्भाच्या योगाने गर्भाशयाच्या द्वाराचा पराकाष्ठेचा अवरोध होणे मक्कलशूल होणे , योनिद्वाराचा संकोच होणे ही लक्षणे व पुढे निदानस्थानात आठव्या अध्यायात सांगितलेले मूढगर्भासंबंधी अन्य उपद्रव होणे अशा प्रकारचा मूढगर्भ त्या स्त्रीचा नाश करितो . दोन्ही कुशीत अतिशय वेदना , अन्नाचा द्वेष , सूज व अतिसार ह्या उपद्रवांनी युक्त अशा उदराच्या रोग्याला रेच झाल्यावर जर त्याचे पोट फुगत असेल तर त्या मनुष्याला असाध्य समजून औषध देऊ नये ॥३-१४॥

ज्याला वरचेवर मूर्च्छा येते , माणूस वगैरे ओळखत नाही , निजून राहतो किंवा बेशुद्ध होऊन पडतो , बाहेरून थंडी वाजल्याने पीडित होतो व आतून दाह होत असतो असा ज्वराचा रोगी मरण पावतो .

उचकी , श्वास तहान ह्यांनी पीडित , ज्याचे ज्ञान नष्ट झाले आहे असा , डोळ भ्रांतिकटासारखे करणारा , सारखा श्वासोच्छवास टाकणारा व क्षीण झालेला असा ज्वराचा रोगी मरणार म्हणून समजावे .

ज्याचे डोळे पाण्याने डबडबले आहेत , जो अति मूर्च्छित झाला आहे . ज्याला रात्रंदिवस सारखी झोप आहे , ज्याच्या अंगातील रक्त व मांस क्षीण , झाले आहे , अशा तापाच्या रोग्याला त्या तापाने मृत्यू येणार म्हणून समजावे .

श्वास , शूळ (पोटात दुखणे ) व तहान ह्यांनी बेजार झालेला , क्षीण झालेला , ज्वराने पीडित असा अतिसाराचा रोगी जर वृद्ध असेल तर तो जगत नाही .

ज्याचे डोळे पांढरे दिसत आहेत , अन्नाचा द्वेष आहे , वर श्वास लागला आहे आणि कष्टाने पण पुष्कळ लघवी होत आहे मनुष्याचा क्षयरोगाने नाश होतो .

श्वास , पोटात दुखणे , तहान , अन्नद्वेष , गुल्माची गाठ हातात न लागणे आणि अशक्तपणा ही लक्षणे ज्या गुल्माच्या रोग्याला होतात तो मरणार म्हणून समजावे .

ज्याचे पोट फुगले आहे , करटातील पुवाच्या रोध झाला आहे , ओकारी , उचकी , तहान , ठणका व श्वास हे विकार झाले आहेत , अशा विद्रधीच्या (अंतरविद्रधीच्या ) रोग्याचा नाश होतो .

ज्याचे दात (हिरड्यासुद्धा ) पांढरे झाले आहेत , तसेच नखे व डोळेही पांढरे झाले आहेत , ज्याला सर्व पदार्थ दिसत आहेत असा पांडुरोगी नाश पावतो .

ज्याला वरचेवर रक्ताच्या वांत्या होत आहेत , डोळे रक्ताप्रमाणे लाल झाले आहेत आणि सर्व दिशा (आकाश वगैरे ) व पदार्थही तांबडे दिसत आहेत असा रक्तपित्ताचा रोगी नाश पावतो .

जो उन्मादाचा रोगी खाली तोंड करून बसतो , किंवा वर तोंड करून बसतो , ज्याचे मास व बल ही क्षीण झाली आहेत , आणि जो सर्व काळ जागाच असतो , तो निःसंशय मरणार म्हणून समजवावे .

ज्याला अपस्माराचे (फेफर्‍याचे ) झटके वरचेवर येत आहेत , जो फार क्षीण झाला आहे , भुंवया चढवीत आहे व डोळे फिरवीत आहे , असा फेफर्‍याचा रोगी नाश पावतो , (ज्वरोपद्रवापासून अपस्मारापर्यंत सांगितलेले कार्य चिकित्सेसंबंधी रोगाचे उपद्रव हे सर्व असाध्य समजावे ॥१५-२६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP