मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
व्रणप्रश्न

सूत्रस्थान - व्रणप्रश्न

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय एकविसावा

आता ‘‘व्रणप्रश्न ’’ नावाचा अध्याय जसा भगवान् धन्वंतरीनी सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो .

३ ) वात , पित्त व कफ हेच देहाच्या धारणेला मूळ कारण आहेत . ते सुस्थितीत आपआपल्या स्थानी म्हणजे खाली वस्तीचे ठिकाणी वायु ; मध्ये पित्ताशयांत पित्त ; आणि ऊर्ध्वभागी आमाशयात कफ ह्याप्रमाणे असले म्हणजे खांबांनी जसे घर उभे असते , त्याप्रमाणे या तिघांकडून हे शरीर धारण केले जाते . म्हणून या देहाला कित्येक ‘‘त्रिस्थूण ’’ असेही नाव देतात वात , पित्त व कफ हे विकृत झाले असता (त्यांना दोष म्हणतात ) ते देहाच्या नाशाला कारण होतात . म्हणून देहाची उत्पत्ति , स्थिति व नाश ह्या तीनही अवस्थांमध्ये हे शरीर (वात , पित्त व कफ असे तीन ) आणि चौथे रक्त ह्या चौघांच्या समुच्चयाने व्यवस्थित राहते .

४ ) देह हा कफावाचून असू शकत नाही ; तसाच तो पित्तावाचून अथवा वातावाचून किंवा रक्तावाचूनही असू शकत नाही . ह्या चौघाकडून हा देह नित्य धारण केला जातो ॥१ -२॥

वा हा धातु गति व गंध क्रियावाचक आहे . तप हा धातु संतापार्थी (उष्णतावाचक ) आहे ; आणि श्लिष हा आलिंगन म्हणजे चिकटणे , घट्ट होणे ह्या अर्थी आहे . या तीनही धातूंची कृदंत प्रत्ययांच्या योगाने वात , पित्त व श्लेष्मा अशी रूपे झाली आहेत .

आता दोषांची स्थाने सांगतो -म्हणजे त्यासंबंधाने थोडक्यात सांगावयाचे म्हणजे त्यापैकी वात हा (आन्त्रगत असतो तेव्हा ) कंबर व गुद ह्या ठिकाणी आश्रय करून असतो . त्याच्या वर नाभीच्या खाली पक्वाशय आहे ; आणि पक्वाशय व आमाशय पित्ताचे स्थान आहे . आणि आमाशय हे कफाचे स्थान आहे .

आता ह्यांची दुसर्‍या तऱ्हेने निरनिराळी पाच पाच स्थाने विभागली आहेत . त्यापैकी वाताची पाच स्थाने वातव्याधिप्रकणात सांगू . पित्ताची पाच स्थाने १ यकृत्प्लीहा ,

२ हृदय , ३ दृष्टी , ४ त्वचा व वर सांगितलेले ५ वे पक्वाशयावरील स्थान . कफाची स्थाने १ छाती , २ मस्तक , ३ कंठ , ४ सांधे व ५ आमाशय . ह्याप्रमाणे हे दोष आपल्या सुस्थितीत असले म्हणजे त्यांची ही स्थाने आहेत .

ज्याप्रमाणे चंद्र , सूर्य व वायु हे तिघे या बाह्य़ सृष्टीमध्ये क्रमाने प्राणिमात्रांना बल देणे , बी आकर्षण करणे , वृष्टि करणे , उदकाचे आकर्षण करणे , थंडी व उष्णता ह्यांची अनेक प्रकारे प्रेरणा करणे ह्या क्रियांनी जगताचे धारण करितात , त्याप्रमाणे कफ , पित्त व वात हे त्याच वर सांगितलेल्या क्रियांच्या योगाने देहाचे धारण करितात .

आता ह्यामध्ये अशी शंका उत्पन्न होते की पित्तावाचून जठराग्नि भिन्न आहे किंवा पित्त हाच जठराग्नि आहे ! तर ह्यावर असे सांगितले की , पित्ताव्यतिरिक्त दुसरा अग्नि नाही . पित्त हे अग्नि तत्त्वात्मक असल्याकारणाने व त्याच्या ठिकाणी दाहक व पाचक गुण असल्यामुळे त्यालाही अग्नीप्रमाणेच उपचार करावे लागतात . तेव्हा पित्त हेच जठराग्नि आहे . अग्नीचे जे गुण उष्ण , तीक्ष्णता ते पित्त क्षीण झाले असता क्षीण होतात व त्या गुणांच्या द्रव्यांचे सेवन केले असता त्याची (पित्ताची ) वाढ होते , आणि ते अति वाढले असता त्याजवर शीत उपचारांचा उपयोग होतो . ह्या प्रत्यक्ष अनुभवावरून व शास्त्र दृष्ट्या पाहता असेच दिसते की , पित्तावाचून दुसरा अग्नि नाही .

ते पित्त अज्ञात अशा काही विशेष कारणाने पक्वाशय व आमाशय ह्यांच्यामध्ये भक्ष्य भोज्यादि चार प्रकारच्या अन्नाचे व पेयांचे पचन करिते ; व त्यातून रसधातु निराळा करून मलमूत्र बाहेर फेकून देते आणि त्या स्थानात राहूनच ते आपल्या सामर्थ्याने बाकीची जी चार पित्ताची स्थाने ती व शरीर ह्याजवर आपल्या अग्निकर्माने (पचनादिक्रियांनी ) अनुग्रह करिते . म्हणजे त्यांची कार्ये व्यवस्थितपणे चालविते . अशा पित्ताला ‘‘पाचक -अग्नि ’’ (पाचक -पित्त ) असे म्हणतात . तसेच जे पित्त यकृत् व पांथरी ह्या ठिकाणी असते त्याला रंजक -अग्नि (रंजक -पित्त ) असे म्हणतात . ते पाचक -पित्ताने तयार झालेल्या रसाला तांबडा रंग आणिते (म्हणजे त्याचे रक्त बनविते .)

ते जे पित्त हृदयाचे ठिकाणी रहाते ते साधकअग्नि (त्याला साधक -पित्त म्हणतात ) ते इच्छित मनोरथाच्या साधनामध्ये आपला प्रभाव प्रकट करिते . जे पित्त दृष्टीच्या ठिकाणी असते त्याला अलोचकाग्नि (अलोचन -पित्त ) असे म्हणतात . ते पहाण्याचे काम करिते . जे पित्त त्वचेच्या ठिकाणी रहाते त्याला भ्राजक -अग्नि म्हणतात . तेच भ्राजक -पित्त अंगास लावलेले तेल , अंगावर शिंपलेले द्रवपदार्थ , औषधीच्या काढ्यात बसणे (अवगाहन करणे ) व अंगाला लेप लावणे , इत्यादि केलेल्या उपचाराचे ते कार्य घडवून आणते व त्वचेची कांती तेजस्वी ठेवते .

पित्त हे तीक्ष्ण , पातळ , दुर्गंधी , निळ्या व पिवळ्या रंगाचे , उष्ण , तिखट , विदाहकारक व आंबट असे आहे .

कफाचे स्थान

आता कफाची स्थाने सांगतो . त्या स्थानांपैकी आमाशय हे मुख्य स्थान असून ते पित्ताशयाच्या वर आहे . कारण तेजोरूप जे पित्त त्याच्या ऊर्ध्व गतीमुळे (ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजाचा चन्द्राला जसा उपयोग त्याप्रमाणे ) त्या पित्ताच्या उलट गुणांच्या कफाचे स्थान -आमाशय हा पित्ताशयाच्या वर आहे (त्यामुळे पक्वाशय हा सूर्यरूप व आमाशय हा सोमरूप म्हणण्यास हरकत नाही , (हा आमाशय चारी प्रकारच्या ) भक्ष्य भोज्यादि अन्नाचा आधार आहे . त्या ठिकाणी तो आहार आमाशयातील द्रव पदार्थ व स्निग्ध पदार्थ ह्यांनी ओला होतो व त्यांतील घनभाग (डिखळे वगैरे ) चुरडून जाऊन तो सहज पचेल असा मृदु होतो .

आमाशयामध्ये मधुरपणा , बुळबुळीतपणा , ओलसरपणा हे गुण असल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न होणारा स्राव मधुर व थंड असतो . तो आमाशयातील स्राव त्या ठिकाणी राहूनच आपल्या प्रभावाने बाकी राहिलेल्या कफस्थानाचे व शरीराचे द्रव पदार्थाने पोषण करितो .

हृदयातील कफ हा स्वशक्तिने त्रिक (शिर व बाहु ह्यांच्या सन्धिना धारण करितो .) आणि अन्नरसाच्या सहाय्याने हृदयाच्या क्रियेला मदत करितो . कंठ व जिभेचे मूळ ह्यांचे ठिकाणी असणारा कफ जिव्हाही फार असल्यामुळे त्या जिव्हेला उत्तम प्रकारचे रसज्ञान करून देतो मस्तकातील कफ स्नेहाभ्यांगादिकसंतर्पणाच्या सहाय्याने व स्वसामर्थ्याने इंद्रियांना कार्यक्षम करतो . संधीच्या ठिकाणी असणारा श्लेष्मा (कफ ) सर्व संधीना चिकटून असल्याने सांघ्यांचे परस्परावर घर्षण होऊ देत नाही .

कफ हा श्वेतवर्ण , जड , स्निग्ध , बुळबुळीत , थंड , विदाही स्थितीत नसला तर मधुर व विदाही स्थितीत असला तर खारट असा आहे .

रक्ताचे स्थान यकृत व पांथरी आहे हे मार्ग सांगितलेच आहे . त्या ठिकाणाहून ते रक्तशयाला व रक्तवाहिन्यांना कार्यव्यापृत करिते .

रक्त हे उष्ण नाही . अगर थंडहि नाही म्हणजे समशीतोष्ण आहे . तसेच ते मधुर , स्निग्ध , रंगाने आरक्तवर्ण , जड , मांसगंधि असून ह्याचा विदाह (बिघाड ) पित्ताप्रमाणे होतो . ज्या ज्या कारणांनी पित्त विदाह पावते त्या त्या कारणांनी रक्त हे विदाह पावते .

ज्या ज्या ठिकाणी दोषांचा संचय होतो ती ही दोषांची स्थाने आहेत . दोषांच्या संचयाची कारण मागे ‘‘ऋतुचर्या अध्यायात ’’ सांगितली आहेतच . दोष आपापल्या स्थानात जादा साठले असता पुढे सांगितल्याप्रमाणे लक्षणे होतात . त्यात सामान्यतः वाताचा जास्त संचय झाला असता कोठा ताठतो , व फुगल्यासारखा वाटतो . पित्ताच्या संचयाने पिवळट दिसणे व अंग किंचित् ऊन होणे आणि कफाच्या संचयाने अंगाला जडपणा व आळस येणे , ही लक्षणे होऊन शिवाय प्रत्येक दोषाच्या संचयाला जी जी कारणे लागतात त्यांचा तिटकारा येणे ही लक्षणे होतात . ही लक्षणे म्हणजे त्या त्या दोषांचा झालेला फाजील साठा काढून टाकण्यासाठी उपचार करण्याचा पहिला काल समजावा . (१२ -१८ ).

दोषाच्या प्रकोपाची कारणे .

आता ह्यापुढे दोषांचा प्रकोपाची कारण सांगतो -दोषाचा प्रकोप झाला म्हणजे दोषांचे दुष्परिणाम तीव्रतेने जाणवू लागतात .

आपल्यापेक्षा बलवान मनुष्याशी झोंबी खेळणे , अतिशय व्यायाम करणे , अति मैथुन , मोठ्या आवाजाने घोकून अभ्यास करणे , उंचावरून पडणे , अतिशय धावणे , अंग अतिशय दाबून घेणे कशाचा तरी मोठा धक्का लागणे , (काठी वगैरे लागणे ), एखादा खळगा किंवा खंदक उडी मारून ओलांडणे , उड्या मारीत चालणे , नदी वगैरे पोहून जाणे , रात्री जागरण करणे , अति ओझे वाहणे , हत्ती , घोडे , रथ ह्यांच्या सहाय्याने अगर पायांनी अति प्रवास करणे , तसेच तिखट , तुरट , कडू , रुक्ष , हलके , थंड , पदार्थ फार खाणे , वाळलेल्या भाज्या , शुष्क मांस , वर्‍याचे तांदुळ , रान हरीक , हरीक , सावे , देवभात , मूग , मसुरा , तुरी , हिरवे वाटाणे , गोल वाटाणे व पावटे हे पदार्थ फार खाणे लंघन करणे , अनियमित भोजन करणे , अजीर्ण असतां किंवा एकदा जेवल्यावर पुनः लागलेच जेवणे , अधोवायु , मलमूत्र व शुक्र ह्यांचा वेग जबरदस्तीने आवरून धरणे , तसेच ओकारी , शिंक , ढेकर , डोळ्यांतील पाणी ह्यांच्या वेगाला प्रतिबंध करणे अशा विशेष कारणांनी वायू हा प्रकुपित होतो .

त्याचप्रमाणे हवेत गारठा असता , सोसाट्याचा वारा चालू असता , विशेषतः पावसाळ्यात पहाटे , तिसर्‍या प्रहरी , (दिवसा ) आणि खाल्लेले अन्न जिरल्यावर वाताचा प्रकोप होतो म्हणजे हे काळ त्याच्या प्रकोपाचे आहेत .

अति राग येणे , शोक , भय , आयास , उपवास , अन्नाचा (विदाह , विदाही अन्नाचे सेवन ) मैथुन , अति चालणे , तिखट , आंबट , खारट , तीक्ष्ण , मोहरी वगैरे , उष्ण , हलके , विदाहकारक (आम्लविपाकी ) पदार्थ खाणे , तीळ , तेल , तिळकूट , हुलगे , शिरस , जवस , (अजबला , शेवगा , तुळस , गवतीचहा वगैरे पदार्थ ह्यांना हरीतक असे म्हणतात .) हे पदार्थ , घोरपड , मासे , शेळी व मेंढी ह्यांचे मास , दही , ताक , ताकाची कढी , दह्यावरील पाणी , सौवीर (कांजीचा प्रकार ) मद्याचे निरनिराळे प्रकार , आंबट फळे , दह्याचा आंबट मठ्ठा ह्या पदार्थांचा अतिसेवनाने पित्त प्रकृपित होते .

तसेच ते उन्हाळ्यात उन्हाच्या तापाने व शरद्ऋतूत विशेषतः वाढते आणि दिवसाच्या मध्यभागी , मध्यरात्री व अन्नाच्या पचनाची क्रिया चालू असता ते प्रकुपित होते . म्हणजे हे त्याच्या प्रकोपाचे स्वाभाविकच काळ आहेत .

दिवसा निजणे , व्यायाम न करणे , आळस , मधुर , आंबट , खारट , थंड स्निग्ध , जड , बुळबुळीत , स्राव उत्पन्न करणारे पदार्थ , हायनक (एक साळीच्या तांदुळाची जात ), यवक (सातुचा एक प्रकार ), नैपध (हे एक धान्य आहे , त्याला कोरक हे दुसरे नाव आहे ), बोरूचे बी , उडीद , मोठे उडीद , गहू , तीळ , पिष्टमयपदार्थ (बेसन वगैरे ), दही , दूध , खिचडी , खीर , उसाचे पदार्थ (गूळ , काकवी वगैरे ), आनुप प्रदेशातील प्राण्याचे व जलचर प्राण्यांचे मांस , चरबी , कमळाच्या मुळ्या , मृणल (मुळ्याला आलेले मोड ), कचरा (लव्हाळ्याची जात ), शिंगाडे , केळीची व ताडाची फळे , कलिंगडे वगैरे खाणे , एकदा जेवल्यावर पुनः त्याजवर जेवणे इत्यादि कारणांनी कफाचा प्रकोप होतो .

तसेच तो शीतकाळी अति थंड खाल्ल्याने व विशेषतः वसंतऋतूत आणि प्रातःकाळी व प्रदोषकाळी व जेवल्याबरोबर प्रकुपित होतो . म्हणजे हा त्याचा स्वाभाविक प्रकोपाचा काळ आहे .

पित्ताचा प्रकोप करणारे पदार्थ आणि पातळ , स्निग्ध व जड अशा पदार्थांचे वारंवार सेवन करणे , तसेच दिवसा निजणे , राग , विस्तवाचा शेक ऊन घेणे , अतिश्रम , काहीतरी आघात होणे , मागे ‘‘हितहितीय अध्यायात ’’ सांगितलेले परस्परविरुद्ध गुणाचे पदार्थ खाणे , एकदा जेवल्यावर त्याजवर पुनः जेवणे (अध्यशन ) ह्या विशेष कारणांनी रक्ताचा क्षोभ होतो .

ज्याअर्थी रक्त हे दोषांच्या सहाय्यावाचून केव्हाही प्रकुपित होत नाही , त्याअर्थी त्याच्या प्रकोपाचा काल ते ज्या दोषाने प्रकुपित झाले असेल त्या (वातादि ) दोषानुरूप आहे असे समजावे .

ह्या दोषांचा प्रकोप झाला असता -कोठ्यात टोचल्यासारखे वाटणे , पोटात वायुच्या संचाराने गुडगुडणे , हे विकार वातप्रकोपामुळे होतात . आंबट ढेकर येणे , तहान व अंगाचा दाह ही लक्षणे पित्तप्रकोपामुळे होतात . आणि अन्नद्वेष व मळमळल्यासारखे वाटणे ही लक्षण कफप्रकोपामुळे होतात . ही औषधोपचाराची दुसरी वेळ समजावी ॥१९ -२७॥

आता ह्याचे प्रसर सांगतो . ह्याप्रमाणे वर सांगितलेल्या विशिष्ट उपद्रवांनी प्रकुपित झालेले वात , पित्त व कफ हे दोष योग्य काळी त्यांच्या उपशमाचा प्रयत्न न केल्यामुळे अतिशय वाढतात ; आणि ज्याप्रमाणे किण्वक (मद्यबीज ) तांदुळाचे पीठ व पाणी एकत्र करून काही दिवसपर्यंत आंबविले असता ते जसे फसफसून वर येऊन भांड्यांतून बाहेर पडते त्याप्रमाणे हे अतिशय वाढलेले दोष वेळीच उपशम न झाल्याने आपआपल्या स्थानापासून बाहेर पडतात त्या क्रियेला ‘‘प्रसर ’’ असे म्हणतात .

आता ह्या तीन दोषांपैकी वायु हा रजोगुणप्रधान व गतियुक्त आहे . आणि सर्व पदार्थांना प्रवर्तक असा रजोगुणच आहे . त्यामुळे वायु हाच सर्व दोषांच्या प्रसाराला कारणीभूत होतो . ह्याला दृष्टांत -मोठा जलसंचय असलेला एखादा तलाव अतिशय जलसंचय झाल्यामुळे फुटतो व त्यातील पाणी शेजारी आसपास संचित असलेल्या पाण्याशी मिळून सर्वत्र वाट सापडेल तिकडे धावते , त्याप्रमाणे अतिशय वाढलेले दोष (वातगतीने ) एक एक , दोन दोन किंवा तीनही मिळून शिवाया कदाचित् -रक्तालाही घेऊन नाना

प्रकारांनी शरीरात पसरतात . ते असे -१ वात , २ पित्त , ३ कफ , ४ रक्त , ५ वातपित्त , ६ वातकफ , ७ पित्तकफ , ८ वातरक्त , ९ पित्तरक्त , १० कफरक्त , ११वातपित्तरक्त , १२ वातकफरक्त , १३ पित्तकफरक्त , १४ वातपित्तकफ , १५ वातपित्तकफरक्त , ह्याप्रमाणे ते पंधरा प्रकारांनी पसरतात .

सर्व शरीरात अर्धभागात किंवा एकाद्या अवयवात , ज्या ठिकाणी दोषाचा अत्यंत प्रकोप होईल , त्या ठिकाणी मेघ ज्याप्रमाणे आकाशातून जलवर्षाव करितो त्याप्रमाणे तो विकार उत्पन्न करितो .

जर एकादा दोष अतिशय प्रकुपित झाला नसला तर तो मार्गातच लीन होऊन (दबा धरून ) असतो . अशा वेळी देखील जर त्याचा प्रतिकार केला नाही तर ते थोडेसे निमित्त (कारण ) मिळताच वाढतो ॥२८ -३०॥

त्यापैकी वायु हा प्रकुपित होऊन पित्ताच्या स्थानात गेला तर त्याजवर पित्तदोषानुरूप उपचार करावा . पित्त कफस्थानी गेले असता कफदोषानुरूप उपचार करावे आणि कफ जर वातस्थानी गेला तर वातदोषानुरूप उपचार करावे . हा चिकित्सेचा भेद सांगितला .

ह्याप्रमाणे प्रकुपित होऊन प्रसार पावलेल्या दोषापासून होणारे विकार म्हणजे वायुच्या प्रसारामुळे तो आपला माग्र सोडून भलतीकडे जाणे आणि त्यामुळे पोटात दुखणे व गुडगुडणे हे विकार होतात . पित्तप्रसारामुळे एकाद्या ठिकाणी दाह होतो अगर सर्वांगाचा दाह होतो , अंगाला ओढ लागल्याप्रमाणे पीडा होते आणि नाकातोंडातून वगैरे वाफा अगर धूर निघाल्यासारखा वाटतो . अरुचि , अपचन , अंगग्लानी आणि वांती हे विकार कफाच्या प्रसरामुळे होतात . ही दोषांच्या अवस्था म्हणजे चिकित्सेचा तिसरा काळ समजावा ॥२८ -३०॥

प्रसरण पावलेल्या दोषांचा स्थानसंश्रय सांगतो .

आता प्रसृत झालेल्या दोषांचा स्थानाश्रय सागतो . ह्या प्रमाणे प्रकुपित झालेले दोष स्त्रोतोमार्गाने जाता जात जेथे कुंठित होतात , त्या त्या शरीराच्या भागी ते ते रोग उत्पन्न करितात . ते ज्यावेळी उदरात प्रवेश करितात त्यावेळी गुल्म , विद्रधि , उदर , अग्निमांद्य , आनाह (पोट फुगून ताण बसणे ) विषूचिका , अतिसार वगैरे विकार उत्पन्न करितात . ते बस्तीत (मूत्राशयांत ) शिरले असता प्रमेह अश्मरी , मूत्राघात व लघवीचे विकार हे रोग उत्पन्न करितात . वृषणात शिरले असता वृषण वृद्धि विकार उत्पन्न करितात शिस्नात शिरले असता निरुद्ध प्रकाश , उपदंश व व शुक्रदोष वगैरे विकार उत्पन्न करितात . गुदामध्ये गेले असता भगंदर , मुळव्याध वगैरे रोग उत्पन्न करितात . मानेच्याबर (जत्रूच्यावर ) गेले असता ऊर्ध्वजत्रुगत सर्व रोग उत्पन्न करितात . त्यांना त्वचा , मांस व रक्त ह्यांचा आश्रय केला असता क्षुद्ररोग , कुष्ठ व विसर्प वगैरे रोग उत्पन्न करितात . मेदाचा आश्रय केला असता ग्रंथी . अपची , अर्बुद (आवाळू ), गालगुंड व आलजी वगैरे विकार उत्पन्न करितात , अस्थिगत झाले असतां विद्रधि व अनुशयी नावाची पुळी हे रोग उत्पन्न करितात . पायाच्या ठिकाणी गेले असता श्लीपद , वातरक्त व वातकंटक हे रोग उत्पन्न करितात , आणि सर्वांगव्यापी झाले असता ज्वर व सर्वांगाचे रोग ह्यांना उत्पन्न करितात .

ह्याप्रमाणे हे प्रसर पावलेले दोष त्या त्या स्थानी शिरून जे जे रोग उत्पन्न करितात म्हणून सांगितले , त्यांची पूर्वरूपे त्या त्या रोगाच्या निदानप्रकरणात सांगू . आता रोगाच्या पूर्वरूपापर्यंतची ही त्यांची स्थिति म्हणजे चिकित्सा करण्याचा चौथा काळ समजावा .

आता ह्यापुढे रोगाचे प्रत्यक्ष स्वरूप सांगतो . सूज , (व्रणशोथ ), आवाळु , गाठी , विद्रधि व विसर्प ह्यांचे स्पष्ट चिन्ह दिसणे व त्याचप्रमाणे ज्वर , अतिसार ह्यांचेही स्पष्ट लक्षण दिसणे , हेच प्रत्यक्ष दर्शन समजावे . आणि हे जे रोगाचे उघडस्वरूप हा चिकित्सा करण्याचा पाचवा काळ समजावा .

ह्यापुढे ती व्रणाची सूज , आवाळु , गाठी फुटल्या असता त्यांना व्रणाचे स्वरूप येते . हा त्यांची चिकित्सा करण्याचा सहावा काळ समजावा . आणि ज्वर , अतिसार वगैरे रोग दीर्घकालपर्यंत राहणारे असतात , त्यामुळे त्यांच्या स्वरूपदर्शनाबरोबरच म्हणजे चिकित्सेच्याय निदान पाचव्या काळालाच उपचार केले पाहिजेत . नाहीतर बरेच दिवस लोटल्यावर त्यांना प्रतिक्रिया म्हणजे उपचार योग्य वेळी न मिळाल्याकारणाने ते असाध्य होतात ॥३३ -३५॥

दोषांचा संचय , प्रकोप , प्रसर (व्याप्ति ), व्याप्ति नंतरचे आश्रयस्थान , व्यक्ती (रोगाचे प्रत्यक्ष स्वरूप ) आणि त्या दोषांचे भेद हे सहा प्रकार ज्याला चांगले समजतात तोच वैद्य म्हणावा .

दोषांचा संचय होताच जर संशोधनादिकांनी ते काढून टाकिले तर त्यांना प्रतिकार मिळाला नाही आणि तसा जर त्यांना प्रतिकार मिळाला नाही तर ते उत्तरांत्तर पुढील अवस्थेमध्ये बलाढ्य होतात . (ह्यासाठी दोष फारच संचित झाला असेल तर संशोधनाचे काढून टाकावा . मध्यम प्रमाणात संचित असेल तर लंघनपाचनादि प्रयोग करावे , आणि अल्प संचय असेल तर संशय प्रयोग करावे .)

दोन दोष प्रकुपित झाले असता त्यांना संसर्ग म्हणतात . त्या संसर्गामध्ये जो दोष रूक्षोष्णस्रिग्ध वगैरे भावांपैकी सर्व भावांनी अगर तीन , दोन किंवा एक भावाने कुपित झालेला असतो तो सर्व भावांनी कुपित झालेल्या दोषालाच अनुसरून असतो .

म्हणून दोन दोषांच्या संसर्गामध्ये जो अधिक बलवान् असेल त्यावरच आधी चिकित्सा करावी लागते . सन्निपातामध्ये देखील असेच करावे लागते . फक्त सावधगिरी एवढी ठेवावयाची असते की , एका दोषावर उपचार करिताना दुसर्‍या दोषाला विरोध येऊ नये , म्हणजे दुसरा न वाढेल अशी खबरदारी घ्यावी .

व्रण शब्दाची निरूक्ति

बरा झाला असताही जो आपल्या अव्यक्तपणाने देहाचा तो भाग देह आहे तोपर्यंत आच्छादन करितो किंवा देह आहे तोपर्यंत त्याची खूण (व्रण -चिन्ह ) नष्ट होत नाही म्हणून त्याला व्रण असे म्हणतात .

अध्याय एकविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP