मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
शिष्योपनयन

सूत्रस्थान - शिष्योपनयन

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय दुसरा

आता आम्ही " शिष्योपनयन " नांवाचा अध्याय सांगतो . असे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे .

ब्राह्मण , क्षत्रीय आणि वैश्य या तीन वर्णापैकी कोणत्याही वर्णातील विद्यार्थी , जो कूळ , वय , शील , वीरवृत्ति , शुचिर्भूतपणा , शुद्धाचरण , नम्रपणा , कर्तृत्व ( शक्ति ), सामर्थ्य ( बळ ), धारणाशक्ति , धारिष्ट , स्मरणशक्ति , बुद्धि , चातुर्य इत्यादि गोष्टीने युक्त आहे , त्याचप्रमाणे ज्याची शरीराची ठेवण , जीभ , ओठ , दातांचा अग्रभाग ही सरळ व्यवस्थित आहेत , तोंड , डोळे नाक ही सरळ आहेत , ज्याचे मन प्रसन्न आहे , तसेच बोलणे व अंगव्यवसाय ( चेष्टा ) हे समाधानकारक आहेत आणि जो कष्ट सोसणारा इत्यादि सर्व बाजूनी योग्य आहे असे पाहून अशा विद्यार्थ्यास पसंत करुन वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी त्याचे उपनयन करावे .

ह्याच्या उलट ज्याचे गुण आहेत असा शिष्य वैद्यकशास्त्र शिकण्यास घेऊ नये व त्याचे उपनयनही करु नये ॥१॥३॥

ज्याचे उपनयन करावयाचे त्याने शुभ तिथि , करण , नक्षत्र व मुहुर्त पाहून शुभ दिशेस पवित्र व प्रशस्त अशा स्थळी चार हात लांबरूंद असे चौरस स्थंडिल करुन ते गाईच्या शेणाने सारवून त्याजवर दर्भ पसरावे . नंतर फुले , भाताच्या लाह्या , रत्ने इत्यादिकांनी इष्ट देवतांचे पूजन करुन ब्राह्मण व वैद्य यांचेहि पूजन करावे . नंतर स्थंडिलावर समिधेने रेषा काढून पाण्याने प्रोक्षण करावे ( पाणी शिंपडावे ) आणि त्या स्थंडिलाच्या दक्षिण दिशेस ब्रह्माची स्थापना करावी . नंतर स्थंडिलावर अग्निची स्थापना करुन खैर , पळस , देवदार , बेल यांच्या किंवा वड , उंबर , पिंपळ , मोहाचे झाड , या चार क्षीरवृक्षांच्या समिधा घेऊन त्यांना दही , मध , तूप लावून दार्वी हौमिक ( अष्टप्रात्री प्रयोगाने ) विधिने स्त्रव्याने ( लांकडाच्या पळीने आज्याहुतिचे ( तुपाचे ) हवन करावे . नंतर प्रणवव्याहृतिकपूर्वक प्रत्येक देवतेप्रत व ऋषींना स्वाहाकारयुक्त आहुति द्यावा . शिष्याकडूनही याच रीतीने होम करवावा . ब्राह्मणाने ब्राह्मण इत्यादि तीन वर्णाचे , क्षत्रियाने क्षत्रीय व वैश्य या दोन वर्णाचे व वैश्याने केवळ वैश्याचे उपनयन करावे . शूद्र देखील कुलशीलादिकांनी संपन्न असा पाहून मंत्र वर्ज करुन त्याला देखील या शास्त्राचे शिक्षण द्यावे असेही कांही ऋषींचे मत आहे . ( आज याचा उपयोग होईल असे दिसत नाही ॥४॥५॥

होम झाल्यानंतर अग्नीला तीन प्रदक्षिणा करुन अग्नीला साक्षी ठेवून शिष्याला असे सांगावे की , काम , क्रोध , लोभ , मोह , मान , अहंकार ( गर्व ), मत्सर , दुष्टपणा , खोटेपणा ( असत्य भाषण ), आळस व ज्या कृत्यांत यशप्राप्ती नाही अशी कृत्ये या सर्वांचा त्याग कर ; नखे व केस यांची फार वाढ होऊ देऊ नको . आणि भगवे वस्त्र परिधान करुन , सत्य भाषणाचे व्रत धारण करुन , ब्रह्मचर्याने रहा व नेहमी आपल्याहून श्रेष्ठ असतील त्यांना नमस्कार करण्याविषयी तत्पर रहा . कोठे जाणे , निजणे , बसणे , जेवणे या गोष्टी मला विचारुन कराव्या . अभ्यास करण्यात नेहमी तत्पर असावे . मला प्रिय व हितकारक असे वर्तन ठेवावे . याच्या उलट जर तू वर्तन करशील तर ते अधर्माचरण होईल आणि शिकलेली विद्या निष्फळ होऊन तिचे तेज पडणार नाही . ( फारसा उपयोग होणार नाही ).

आता तू योग्य तर्‍हेने वागलास आणि मी तुला जर चांगली विद्या शिकविली नाही तर मी पापी होईन व माझी विद्या विफल होईल .

ब्राह्मण , गुरु , द्रव्यहीन लोक , ( दरिद्री ) त्याचप्रमाणे आपला मित्र , संन्याशी , शरण आलेला , साधु , अनाथ मनुष्य व अतिथी इत्यादिकाना आपल्या बांधवाप्रमाणे औषधोपचार काळजीपूर्वक करावे , म्हणजो त्यायोगाने आपले कल्याण होते .

पारधी , शाकुनिक ( पक्ष्यांची शिकार करणारा - फासे पारधी ), पतित ( बहिष्कार घातलेला ) व पापकर्मी यांच्या रोगाचा प्रतिकार करु नये . ( त्यांना औषध देऊ नये . ) ( हेतू चांगला आहे . पण असे करणे प्रचलित कायद्याने योग्य ठरणार नाही ).

अशा प्रकारे वागले असता आपल्या विद्येचा प्रकाश पडतो , कीर्ती वाढते , मित्र जोडतात . यश , धर्म , द्रव्य व अभिष्ट ( मनोरथ ) यांची प्राप्ती होते ॥६॥८॥

ह्या दोन श्लोकांत अनध्यायाचे दिवस सांगितले आहेत ते असे - कृष्णाष्टमी , चतुर्दशी व अमावस्या , तसेच शुक्लपक्षाची अष्टमी , चतुर्दशी व पौर्णिमा , दिवसाचे दोनी संधीकाळ . ( संधिकाळ म्हणजे प्रातःकाळ व सायंकाळ याअर्थी सूर्योदयास्ताच्या वेळा एवढाच घ्यावयाचा . कारण " रात्रैः प्रथम यामे चरम यामेंच वेदाध्ययनम " असे वचन आहे . तेव्हा वरील वेळा वर्ज करुन रात्री व पहाटे अध्ययनउक्त आहे . अकाली ( हवेत बिघाड असणे , आभाळ येणे वगैरे दुर्दिन , ) मेघगर्जना , विजा चमकणे , स्वतंत्र राष्ट्राचा अधिपति अगर सार्वभौम राजा यांना काही विशेष व्यथा झाली असता , मोठा उत्सव ( यात्रा वगैरे ) चालू असता , उल्कापात , धरणीकंप अशासारखे दुसरे उत्पात होत असता , तसेच ब्राह्मण ज्या दिवशी वेदपठण करीत नाहीत ते अध्यायाचे दिवस म्हणजे चंद्रसूर्याचे ग्रहणकाल , सूर्यसंक्रांती , शुद्ध व वद्य प्रतिपदा व प्रदोषकाल ( चतुर्थी , सप्तमी व त्रयोदशी या दिवशी ) [ सायंकाळनंतरच्या सहा घटका यांना प्रदोषकाळ म्हणतात . ] ( हे अनध्यायाचे काल वर्ज्य करुन अध्ययन करावे . तसेच अशुचिर्भूत असता अध्ययन करु नये . हे अनध्यायाचे काल अन्य युगांतील आहेत . हल्ली या कलियुगात अल्पमति मनुष्याकडून अशा अनघ्यायाने अभ्यास होणार नाही . त्याबद्दल असा शास्त्रार्थ आहे . " अनध्यायस्तु नागेषुनेतिहास पुराणयोः॥ न धर्मशास्त्रेष्यन्येषु पर्वण्येतानि वर्जयेत " या वचनाप्रमाणे फक्त पौर्णिमा अमावस्या व संक्रांती यासारखी पर्वे अध्ययनास वर्ज करावी म्हणजे झाले ॥९॥१०॥

अध्याय दुसरा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP