मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
द्रव्यरसगुण

सूत्रस्थान - द्रव्यरसगुण

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय चाळीसावा

आता ‘‘द्रव्यरसगुणवीर्यविपाकविज्ञानीन ’’ नावाचा अध्याय सांगतो , जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

काही आचार्य म्हणतात -द्रव्य हेच मुख्य कार्य करणारे आहे . का म्हणाल तर त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे ; कारण ह्याठिकाणी द्रव्यच साकारत्वाने पुढे दिसते . तसे रसगुणादि प्रत्यक्ष साकारत्वाने दुश्यमान नाहीत . जसे अपक्व फळांत जे रस अनुभवास येतात तेच पक्व फळांत येत नाहीत . शिवाय दुसरे कारण द्रव्य काही कालपर्यंत का होईना नित्य (साकारयुक्त ) आहे , म्हणजे द्रव्य काही दिवस टिकते तसे रसादिक टिकत नाहीत . जसे द्रव्याचे बनविलेले कल्कादि प्रकार हे केव्हा रसगंधादिकांनी चांगले असतील व केव्हा रसगंधादिकांचा त्यात बिघाड अनुभवास येईल , पण त्यांच्या अस्तित्वाला बाध येत नाही . ह्यावरून रसादिकांना अनित्यत्व आहे व द्रव्याला नित्यत्व आहे . तिसरे कारण म्हणजे द्रव्य हे आपली पार्थिवादि जात सोडीत नाही . म्हणजे जे पार्थिवद्रव्य आहे ते केव्हाही तेजस किंवा वायवीय होत नाही . ह्याचप्रमाणे बाकीच्या द्रव्यांबद्दल समजावे . चौथे कारण म्हणजे द्रव्य हे पाचही ज्ञानेंद्रियांना ग्रहण करिता (जाणता ) येते , तसे रसादिगुण पाच ही इंद्रियांना ग्रहण करिता येत नाहीत . पाचवे कारण म्हणजे द्रव्य हे आश्रयस्थान आहे . कारण रसादिगुण हे द्रव्याच्याच आश्रयाने असतात . सहावे कारण म्हणजे आरंभ -सामर्थ्य द्रव्याचे ठिकाणी आहे , रसादिकांच्या ठिकाणी नाही . जसे विदारिगंधादि (साळवण वगैरे ) गणांतील औषधे आणून कुटून शिजवावी . ह्याठिकाणी कोणी त्यातील रसवीर्यादीगुण आणावे असे म्हणत नाही म्हणजे कार्याचा आरंभ द्रव्यापाशी आहे . रसादिकांचे ठिकाणी नाही . सातवे कारण म्हणजे शास्त्राचे प्रमाण . कारण शास्त्रात औषधीप्रयोग सांगताना द्रव्यच मुख्यतः सांगतात . जसे महाळुंग , टाकळी , इत्यादि ह्याठिकाणी कोणी रसादिकांचा निर्देश करीत नाहीत . आठवे कारण म्हणजे रसादिक द्रव्याच्या क्रमाप्रमाणे असतात . जसे द्रव्य जून असेल तर त्यांतील

रसादिकही जून असतात . द्रव्य संपूर्ण (पक्व ) अवस्थेत असले म्हणजे तेही पक्व अवस्थेत असते नववे कारण म्हणजे द्रव्याच्या अंगी एक देश (भाग ) साध्यत्व आहे . जसे एकाद्या द्रव्याच्या एकाद्या भागानेही रोग बरा होतो . उदाहरण -त्रिधारी निवडुंगाच्या (किंवा शेंडाच्या ) चिकानेच काही रोग बरे होतात . म्हणून द्रव्यच रसादिकापेक्षा श्रेष्ठ आहे .

द्रव्याचे लक्षण असे आहे की क्रिया व गुणयुक्त जे , ते द्रव्य म्हणजे क्रिया व गुण ह्यांच्या संबंधाचे कारण जे , ते द्रव्य होय ॥३॥

दुसरे काही आचार्य म्हणतात की , द्रव्य हे श्रेष्ठ नाही रस हेच श्रेष्ठ आहेत . का म्हणाल तर आगमामध्ये (वेदामध्ये ) सांगितले आहे म्हणून -आगम -(वेद ) म्हणजे ‘‘आयुर्वेद .’’ ह्यालाच शास्त्र म्हणतात . ह्या शास्त्रात म्हणजे वैद्यशास्त्रात रसच मुख्य गणले आहेत . जसे -आहार हा रसावरच अवलंबून आहे आणि त्या आहारावर प्राण अवलंबून आहे . दुसरे कारण शास्त्राचा उपदेशही असाच आहे की , रस हेच मुख्य आहेत . जसे मधुर , नाच श्रेष्ठत्व येते . कारण रसाच्या (रुचीच्या ) सहाय्यानेच हे द्रव्य अमुक आहे असे अनुमान करितात . जसे मधुरपणावरून तेच हे द्रव्य आहे असे ओळखणे . चौथे कारण ऋषिवचनांवरून . ऋषिवचन म्हणजे वेद . जसे यज्ञाकरिता किंचित् ‘‘मधुर ’’ (गोड पदार्थ ) आणावा . ह्याठिकाणी मधुर शब्दाने रसच दर्शविला आहे . म्हणूनच रसच श्रेष्ठ आहेत . आणि रसाचे श्रेष्ठत्व सिद्ध झाल्यावर गुणाचे निराळे ठरविणेचे कारण नाही . कारण रसादिकांनाच गुण अशी संज्ञा आहे . आता रसाचे रक्षण दुसरीकडे ‘‘रस विशेषविज्ञानीय ’’ अध्यायत सांगू ॥४॥

रस श्रेष्ठ आहेत हे म्हणणे बरोबर नाही . वीर्यप्रधान आहे . कारण औषधचे कार्य वीर्याच्या सहाय्यानेच घडून येते .

औषधांची कर्मे म्हणजे वमन (ऊर्ध्व संशोधन ), विरेचन , (अधःसंशोधन ). उभय भाग संशोधन (एकाच औषधाने वमन व विरेचन ही कार्ये होणे ) संशमन (रोग शांत होणे ), संग्राहक (मळ घट्ट करणारे ). जठराग्नि प्रदीप्त करणे , व्रणाचे पीडन करणे , लेखन (खरवडून काढणे ), बृंहण (पौष्टिक ). रसायन (सर्व शरीरातील धातूंना सम प्रमाणात आणणे ), वाजीकरण (कामवासना वृद्धिंगत करणे ). सूज आणणे व नाहीशी करणे . अग्निकर्म (डाग देणे ), व्रणाची सूज फोडणे . मद उत्पन्न करणे व प्राणनाशक अशा विषांचे शमन करणे ही कर्मे औषधीच्या वीर्याच्या श्रेष्ठत्वाने होतात . ते वीर्य शीत व उष्ण असे दोन प्रकारचे आहे . कारण जगच मुळी अग्नि (उष्ण ) व सोम (ह्या ) दोन वीर्यांनी युक्त आहे म्हणून . कित्येक आचार्य वीर्याचे आठ प्रकार मानतात . जसे -शीत , उष्ण , स्निग्ध , रुक्ष , विशद (स्वच्छ ), बुळबुळित , मृदु व तीक्ष्ण . असे वीर्याचे आठ प्रकार आहेत . ती ही आठ वीर्ये आपल्या सामर्थ्याने व गुणाच्या उत्कर्षाने रसाला मागे सारून आपले कार्य करितात . जसे मोठे पंचमूळ हे तुरट व किंचित् कडू असूनही उष्णवीर्य असल्यामुळे वाताचा नाश करते , त्याचप्रमाणे हुलगे तुरट असून व कांदा तिखट असून दोनीही स्निग्धपणामुळे वाताचा नाश करितात . तसेच उसाचा रस गोड असूनही शीतपणामुळे वात वाढवितो . पिंपळी ही तिखट असून मृदु व शीतवीर्य असल्यामुळे पित्ताला शमविते . तसेच आवळा आंबट असून व सैंधव खारट असून मृदु व शीत वीर्यत्वामुळे पित्ताचे शमन करितात . काकमाची (कांगोणी ) ही कडु असूनही उष्णवीर्याने पित्त वाढविते . तसेच मासे हे मधुर असून उष्णवीर्यत्वामुळे पित्त वाढवितात . जूनमुळा तिखट असून स्निग्धपणामुळे कफाला वाढवितो . कवट हे आंबट असून रूक्षपणामुळे कफाला शमविते . त्याचप्रमाणे मध हा मधुर असून रूक्षपणामुळे कफाचे शमन

करितो . ह्या प्रमाणे वीर्य हे रसाच्या मागे सारून आपले कार्य कसे करिते हे केवळ दिग्दर्शनापुरते सांगितले ॥५॥

जे रस वातशामक आहेत , म्हणजे मधुर , आंबट व खारट हे वातशामक आहेत , पण त्या रसाबरोबर त्या द्रव्याची रूक्षपणा , लघुत्व व हलकेपणा ही वीर्य असतील तर ते मधुरादि रस वाताचे शमन करू शकत नाहीत . तसेच जे (मधुर , कडु व तुरट ) रस पित्त शामक आहेत , ते रस ज्या द्रव्यात आहेत , त्या द्रव्यात जर तीक्ष्णपणा , उष्णता , व लघुत्व (हलकेपणा ) ही पित्त वाढविणारी वीर्य असतील तर ते रस पित्ताचे शमन करू शकत नाहीत . त्याचप्रमाणे जे (तिखट , कडु व तुरट ) रस कफशामक आहेत , ते रस ज्या द्रव्यात जर स्निग्धपणा , जडत्व व थंडत्व व थंडपणा ही वीर्य असतील तर ते रस कफाचे शमन करू शकत नाहीत . म्हणून ‘वीर्य ’ हेच श्रेष्ठ आहे ॥६ -९॥

दुसर्‍या काही आचार्याचे मत असे आहे की , वीर्य प्रधान आहे हे म्हणणे ठीक नाही . द्रव्याचा विपाक हा श्रेष्ठ आहे कारण पदार्थ भक्षण केल्यावर त्याचा योग्य व अयोग्य विपाक होतो . म्हणून सर्व भक्षण केलेले पदार्थ जर यथायोग्य पचन झाले तर गुण करितात . आणि अयोग्य रीतीने पचन झाले तर दोष (अवगुण ) करितात . (हे जे पदार्थाचा पचनासंबंधाने म्हटले आहे ते वामक द्रव्ये वर्ज करून समजावे .) दुसरे काही आचार्य म्हणतात -प्रत्येक रसाचा विपाक (जितके रस तितके विपाक ) काही आचार्य तीनच प्रकारचा विपाक मानतात . त्यांच्या मताने मधुर , आंबट व तिखट असे तीनच विपाकाचे प्रकार आहेत , पण तेही म्हणणे योग्य नाही असेही काहीचे मत आहे . पंचमहाभूतांच्या गुणांवरून व शास्त्रतः पाहिले तर दुसरा आम्लविपाकच संभवत नाही ; कारण अग्निमांद्य झाले असता पचनक्रिया बरोबर होत नसल्याने पित्त हे बिघडून त्याला आंबटपणा येतो . आणि हा आंबटपणाच जर विपाक मानला तर खारट रसालाही दुसरा ‘लवणविपाक ’ म्हणून मानावा लागेल . कारण वरील कारणानेच कफ बिघडला असता त्यालाही खारटपणा येतो . (म्हणून आम्ल व लवण हे विपाक होऊ शकत नाहीत .) मधुररसाचा विपाक मधुर , आम्हरसाचा आम्ल ह्याप्रमाणे निरनिराळ्या सहा रसांचे सहा विपाक आहेत असे कित्येकाचे मत आहे . त्यासाठी ते उदाहरण देतात की , भांड्यात दूध घालून ते पुष्कळ तापविले व फार तापल्यामुळे ते उतू येऊन भांड्याच्या काठापर्यंत वर आले तरी देखील त्याचा मधुरपणा कायमच राहतो . त्याचप्रमाणे काठापर्यंत वर आले तरी देखील त्याचा मधुरपणा कायमच राहतो . त्याचप्रमाणे साळी , सातु , मुग वगैरे धान्ये शिजविल्यानंतरही आपली गोडी किंवा रुची सोडीत नाहीत . त्याचप्रमाणे काही असे म्हणतात की , कमी दर्जाचा रस अधिक दर्जाच्या रसाशी एकत्व पावतो (मिसळून जातो ). ह्याप्रमाणे अनेकांच्या अनेक मताने निश्चित असा काहीच सिद्धांत ठरत नाही . आता आयुर्वेदशास्त्राप्रमाणे पाहिले तर त्या शास्त्रात मधुर व तिखट असे दोनच विपाक सांगितले आहेत . त्यापैकी मधुर विपाक जड आहे व तिखट विपाक हलका आहे . पृथ्वी , आप , तेज , वायु व आकाश ह्यांच्या मध्येही गुरुत्व व लघुत्व गुणांच्या साधर्म्याने दोन भाग होतात . त्यापैकी पृथ्वी व उदक ही तत्त्वे जड आहेत आणि बाकीची तेज , वायु व आकाश ही हलके आहेत . म्हणून मधुर व तिखट असा दोनच प्रकारचा विपाक आहे हा सिद्धांत ठरला ॥१०॥

ह्याचा तात्पर्यार्थ असा , भक्षण केलेले पदार्थ जठराग्नीच्या संयोगाने पचन होत असता किंवा पचन झाल्यावर , त्याच्यापासून उत्पन्न होणार्‍या द्रवरूप पदार्थामध्ये जर भूमी व उदक तत्त्वाचे गुण अधिक येतील , तर त्यांचा विपाक ‘‘मधुर ’’ आहे असे समजावे . आणि जी द्रव्ये पचन झाल्यावर त्याच्यापासून उत्पन्न होणार्‍या द्रवरूप पदार्थांत जर तेज , वायु , व आकाश ह्यांचे गुण अधिक उत्पन्न झाले तर त्यांचा विपाक ‘‘तिखट ’’ आहे असे समजावे .

द्रव्य , रस , वीर्य , विपाक ह्यासंबंधाने वेगवेगळेपणा दर्शविणारा त्या त्या मतवादी आचार्याचा वादसंग्रह (अभिप्राय ) ती सांगितला आहेच ; पण तज्ज्ञ जे आहेत ते एकालाच प्राधान्य न देता चारही द्रव्यांचे समुदायानेच ग्रहण करितात .

कारण भक्षण केलेले द्रव्य हे आपल्या पांचभौतिक गुणांच्या योगाने दोषाचा किंचित नाश करिते किंवा दोष उत्पन्न करिते द्रव्य काही दोष वीर्याच्या जोरावर नाहीसे करिते किंवा उत्पन्न करिते , त्याचप्रमाणे रस व विपाक ह्यांच्या योगानेही काही दोष रोग देखील नाहीसे करिते किंवा उत्पन्न करिते .

शिवाय दुसरे असे आहे की , द्रव्याच्या वीर्यावाचून विपाक असत नाही . आणि वीर्य हे रसाच्या आश्रयावाचून असू शकत नाही . तसेच रस हा द्रव्याच्या आश्रयावाचून राहू शकत नाही . म्हणून द्रव्य हेच सर्वात अत्यंत श्रेष्ठ आहे .

ज्याप्रमाणे देह व आत्मा ह्यांचा जन्म होणे हे परस्परांच्या अपेक्षेवर अवलंबून आहे , त्याप्रमाणे द्रव्य आणि रस ह्यांची उत्पत्तीही त्या दोघांच्या अपेक्षेनेच होत असते .

ज्यांना वीर्य अशी संज्ञा आहे असे शीतउष्णादि जे द्रव्याचे आठ गुण तेही द्रव्याच्याच आश्रयाने असणारे आहेत . ते रसाचा आश्रय करून राहात नाहीत . कारण रस हाही गुणच आहे . तेव्हा गुणाच्या ठिकाणी गुणाचे अस्तित्व संभवत नाही . तसे मानले तर गुणांना निर्गुणत्व येईल .

पंचभूतात्मक देहरूप द्रव्यातच भक्षण केलेल्या द्रव्यांचा विपाक होतो . मधुरादि सहा रसांचा होत नाही . म्हणून द्रव्य हेच श्रेष्ठ असून बाकीचे गुणादिक भाव हे तदंगभूत असणारे आहेत .

ज्यांचे गुण अचिंत्वा असून तर्कानेही सिद्ध करता येण्यासारखे नाहीत पण ते त्याचे गुण प्रसिद्ध भाव आहेत , (जसे -खैर , तिवस , रसांजन , हळद ही द्रव्ये कुष्ठनाशक आहेत .) अशी जी औषधे ती चाणाक्ष वैद्याने शास्त्रानुरोधानेच उपयोगात आणावी .

ज्यांचे गुण स्वभावतःच प्रसिद्ध आहेत व प्रत्यक्ष अनुभवालाही येत आहेत अशा औषधाची परीक्षा शहाण्या वैद्याने आपल्याच कल्पनेने करू नये . कारण हजारो गोष्टींनी ‘‘अंवष्ठादिगण ’’ हा विरेचन करणारा आहे असे कोणी तर्कशास्त्राच्या जोरावर सिद्ध केले तरी त्या गणातील औषधापासून केव्हाही रेच होणार नाहीत . कारण ती अतिसारनाशक (अर्थात संग्राहक ) आहेत हे प्रसिद्धच आहे . म्हणून चतुर वैद्याने शास्त्राला धरूनच क्रिया करावी . स्वतःच्या कल्पनेने करू नये ॥११ -२१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP