मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
कर्णव्यधबंध

सूत्रस्थान - कर्णव्यधबंध

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय १६ वा

आता " कर्णव्यधबंध " नांवाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१॥२॥

भूतादिकांची बाधा होऊ नये म्हणून व दागिनेही या हेतूने लहान मुलांचे दोन्हीही कान टोचतात . ते भाद्रपद महिना आरंभ धरुन सहाव्या किंवा सातव्या महिन्यात म्हणजे माघ किंवा फाल्गुन महिन्यात शुक्लपक्षात , प्रशस्त ( शुभ ) तिथि , करण , मुहुर्त , नक्षत्र वगैरे पाहून पुण्याहवाचनादि संस्कार करुन , दाईच्या अगर त्याला नित्य घेणार्‍या पुरुषाच्या मांडीवर त्याला मुलाला बसवून , त्याच्यापुढे बैल , राघु वगैरे खेळणी ( नवीन चालतील ) देऊन त्यात त्याचे मन गुंतवून , त्याला शांत करावे . नंतर वैद्याने डाव्या हाताने कान धरुन , त्या कानाची पाळी उन्हांत धरुन स्वाभाविकपणे असलेले च्छिद्र पाहून त्यात हळूच उजव्या हाताने अतिशय बारीक सुई घेऊन तिने सरळ कान टोचावा . मोठा किंवा कठीण कान असेल तर " आर " नामक शस्त्राने टोचावा . मुलग्याचा प्रथम उजवा कान टोचावा ; आणि मुलीचा डावा टोचावा . कान टोचल्यावर त्यात कापसाची वात ( अगर अगदी मऊ असा दोरा ) घालावी .

कान टोचल्यावर जर त्या छिद्रातून बरेच रक्त आले व कान दुखला तर वर सांगितलेली जागा चुकली व भलतीकडेच कान टोचला गेला असे समजावे . आणि काही पीडा झाली नाही तर नेमका त्या योग्य जागीच कान टोचला असे समजावे .

जर एखाद्या अडाणी मनुष्याने वाटेल तसा कान टोचला व त्यामुळे कालिका ( अशुद्ध रक्तवाहिनी ) मर्मरिका ( " मर्मरिका " वाहिनी निश्चितपणे ठरली नाही . ) व लोहितिका ( शुद्ध रक्तवाहिनी ) ह्या शिरांपैकी कोणत्याही एका शिरेचा वेध झाला असता ज्वर , दाह , सूज व वेदना हे चार विकार होतात . " मर्करिका " शिरेचा वेध झाला असता वेदना , ज्वर व वेधांच्या ठिकाणे हे विकार होतात . आणि " लोहितिका " म्हणजे शुद्ध रक्तवाहिनी वेधली गेली तर मान , ताठते , अपतानक नांवाचा वात रोग होतो , मस्तक दुखते कानाला ठणका लागतो . ह्यापैकी जे जे विकार होतील त्याजवर त्या त्या रोगावरील औषधोपचार करावे . ( यासाठी तज्ज्ञ वैद्याने " कालिका " व " लोहितिका " या दोन शिरा त्यांच्या रंगावरुन ओळखून त्या चुकवाव्या आणि " मर्मरिका " शिरेचा रंग सांगितला नाही , तथापि दैवकृत छिद्र पाहून कान टोचताना ती शिर चुकवावी . )

जाड , वांकडी किंव बेढब अशा सुईने कान टोचला असता , किंवा कानाच्या छिद्रांत अतिशय जाड दोरा घातला असता , दोषांचा प्रकोप होऊन त्यामुळे , किंवा दैवीछिद्राव्यतिरिक्त अन्यत्र अव्यवस्थित टोचण्यामुळे कानाला सूज येते किंवा ठणका लागतो . असे झाले असता दोरा चटकन काढून घ्यावा आणि ज्येष्ठमध , एरंडमूळ , मंजिष्ठ , सातु व तीळ यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन , त्यात तूप व मध मिश्र करुन त्या मलमाचा लेप करावा व टोचल्याचा व्रण नाहीसा होईपर्यंत हा उपचार करावा . आणि तो कान चांगला बरा झाल्यावर पुनः वर सांगितलेल्या पद्धतीने टोचावा .

ह्याप्रमाणे कान चांगला टोचल्यावर त्याजवर ऊन न केलेले ( थंड ) तेल सोडावे . आणि तीन तीन दिवसांनी ( छिद्र वाढविणेकरिता ) दुसरी मोठी वात घालावी व वरीलप्रमाणे तेल सोडावे .

कान टोचल्यामुळे झालेली पीडा व इतर उपद्रव नाहीसे झाल्यावर कानाचे छिद्र पुनः वाढविण्याकरिता , लघुवर्धनक्रिया करावी . ती अशी आघाडा , निंब किंवा कापशीचे झाड याच्या काड्या आणून त्यांना धोतर्‍याच्या फुलाप्रमाणे मुळाकडे निमूळता व शेंड्याकडे पसरट असा आकार आणून त्या काड्या कानात घालीत जावे ; किंवा तशा आकाराच्या शिशाच्या , काड्या करुन घालाव्या .

( ह्यालाच अनुसरुन लवंगांनी कान वाढविण्याची पद्धत आहे . )

ह्याप्रमाणे वाढविलेला कान दोन कारणानी फाटतो . एक वातादिदोषांनी काही व्याधी होऊन , किंवा पडल्यामुळे किंवा आघात होऊन फाटतो . तो साधण्याचा विधि आता मी सांगतो तो ऐक ॥३॥९॥

कर्णबंधाच्या प्रमुख अशा पंधरा आकृति आहेत त्या अशाः - १ नेमीसंधानक , २ उत्पलभेद्यक , ३ वल्लूरक , ४ आसंगीम , ५ गंडकर्ण , ६ आहार्य , ७ निर्वेधीम , ८ व्यायोजीम , ९ कपाटसंधिक , १० अर्धकपाटसंधिक , ११ संक्षिप्त , १२ हीनकर्ण , १३ वल्लिकर्ण , १४ यष्टिकर्ण आणि १५ काकौष्टक .

कानाच्या दोन्ही पाळी ( पाळी फाटलेले दोन्ही भाग ) विस्तीर्ण , लांब , रुंद व समान असल्या म्हणजे त्यांच्या ठिकाणी चाकाच्या धावेप्रमाणे जो बंध बांधावयाचा तो " नेमीसंधानक " कानाच्या दोनी पाळी ( पाळीचे पाटलेले दोन्ही भाग ) वर्तुळ लांब रुंद व सारख्या असणे व त्या फाटक्या कमळाच्या पानासारख्या पुनः सांधून बांधणे तो उत्पलमेद्यक . कानाच्या पाळीचे फाटलेले दोन्ही भाग आखूड वाटोळे व सारखे असून त्यांना बंड बांधणे तो वल्लूरक , शुष्क मांसाप्रमाणे अनेक वेळा कापून बांधावा लागतो म्हणून हा वल्लूरक , आतील भागी ( गालाकडील भागी ) लांब अशी एक पाळी शिल्लक राहिली असून ती लांब असली तर तिचा तुकडा घेऊन तो बाहेरच्या पाळीच्या मुळाशी सांधून बंध बांधणे तो आसंगीम . बाहेरील पाळीचा गालापासून दूर असलेला भाग शिल्लक राहून , तो लांब असल्यास त्यांतील लागणारा भाग तुटलेल्या ठिकाणी जोडून जो बंध बांधितात तो गंडकर्णबंध म्हणतात . हे दोन्ही बंध एक पालीक आहेत . कानाच्या पाळीचे तुटलेले दोन्ही भाग बरेचसे तुटून थोडेथोडे शिल्लक राहिले असता गालाच्या त्वचेसह यास काढून त्याला पाळीचा आकार देऊन ते तुटलेल्या जागी सांधणे ह्या बंधाला आहार्य म्हणतात . कानाच्या पाळीचे दोन्ही भाग अजिबात तुटले तर त्यांना मीठोपम म्हणतात . वरीलप्रमाणेच त्यांच्या तुटलेल्या कानाच्या पुत्रिकांच्या ( पाळीच्या वरचे उंच भाग - Tragus आणि Antitragus ) आश्रयाने ( त्यांच्याशी टाके घेऊन ) बांधतात त्याला निर्वेधम असे म्हणतात . फाटलेल्या पाळीपैकी एक भाग मोठा व दुसरा अगदी बारीक असून एक साधारण सारखी असते व दुसरी विषम म्हणजे वाकडी तिकडी असते , अशा वेळी त्या दोनीही छाटून हरप्रयत्नाने सारख्या करुन सांधणे ह्याला व्यायोजीम असे म्हणतात . पाळीचा आतील ( गाला जवळील ) भाग लांब व दुसरा आखूड असा असला म्हणजे बाहेरील भागाशी सांधून बंद बांधणे हा कपाटा सारखा बंध असतो म्हणून ह्याला कपाटसांधिक असे म्हणतात . बाहेरील ( गालापासून दूरचा ) पाळीचा भाग लांब असून दुसरा आखूड असला तर आतील बाजूला जो बंध बांधावयाचा तो अधकपाट संधिकबंध असे म्हणतात .

हे दहा कर्ण बंधनाचे प्रकार साध्य आहेत , त्याच्या नावावरुन कळण्यासारख्या आहेत ह्या पुढील संक्षिप्तादि पाच बंध असाध्य आहेत .

फाटलेल्या पाळीचा गालापासून दूरचा भाग मुळाशी सुकून गेला व गालाकडील भाग अतिशय लहान असला , तर अशा प्रकारचा कान सांधून बांधणे त्याला संक्षिप्तबंध असे म्हणतात .

फाटलेल्या पाळीच्या दोनीही भागाची मूळ जागा सुकली व गालपासून मांद काढण्यासारखे नाही अशा स्थितीत कान साधून बांधणे ह्याला हीनकर्ण म्हणतात . फाटलेल्या पाळीचे दोन्ही भाग पातळ असून दोन्ही सारखे नसले व ते फार लहान असले तर त्या ठिकाणी सांधून वेलीसारखा बंध बांधतात त्याला वल्लिकर्णबंध असे म्हणतात . फाटलेल्या पाळीच्या जखमेचे मांस गाठाळले असून शिरा ताठल्या व कानास ताण बसला असला व फाटलेले भाग अतिशय लहान तर कान सांधून काठीप्रमाणे बंध बांधावा लागतो . ह्याला यष्टिकर्ण असे म्हणतात .

पाळीचे दोनीही भाग मांसरहित व अल्प रक्तयुक्त असून दोन्ही भागांचे अग्रभाग आकसलेले असतात , अशावेळी कान सांधून जो बंध बांधतात तो " ककोष्टकबंध " असे म्हणतात .

कान बांधल्यावर देखील कानाला सूज , दाह , लाली , पक्वपणा , पुटकुळ्या व स्त्राव हे विकार होतील तर तेही कान बरे होत नाहीत ॥१०॥

ज्याच्या कानाच्या पाळीचे फाटलेले दोनही भाग अजिबात तुटले तर पुत्रिकेच्या वरच्या कर्णपीठ नावाच्या जागी मधोमध वेध घेऊन त्याचे बंधन करावे .

पाळीचा बाहेरील भाग ( गालापासून दूरचा भाग ) जर लांब असेल तर आतल्या भागी ( गालाजवळच्या आखूड भागाशी ) सांधा येतो . म्हणजे त्या त्या ठिकाणी सांधावे ; असे सांगितले आहे .

फाटलेल्या पाळीपैकी एकच भाग असून , तो जर जाड , विस्तृत व स्थिर ( घट्ट ) असेल तर , त्याचे कापून दोन भाग करुन एक काढून दुसर्‍याच्या ठिकाणी सांधून घ्यावा .

कानाला अजिबात पाळ राहिला नाही तर गालाच्या कातड्याचा मांस व रक्तासह तुकडा गालाशी संबंध न सोडतां तेथल्या तेथे काढून त्याला पाळीचा आकार देऊन पाळी बसविण्याचे जागी शस्त्राने थोडे तासून त्या ठिकाणी सांधावा ॥११॥१४॥

ह्यांपैकी एखादा बंध बांधण्याची ज्याची इच्छा असेल त्याने मागे " अग्रोपहरणीय " नावाच्या पांचव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्व संभार ( सामग्री ) तयार करुन , शिवाय विशेषतः मद्यावरील निवळी , दूध , पाणी , कांजी नव्या मातीच्या भांड्याच्या काठाच्या तुकड्याचे चूर्ण हे सर्व जिन्नस तयार ठेवावे . नंतर ज्याचा कान बांधावयाचा , ती ललना असो अथवा पुरुष असो , त्याचे केस बांधावे . त्याला थोडे खाऊ घालावे . आप्ताकडून त्याला चांगला धरावा व अमुक प्रकारचाच बंध या ठिकाणी बांधला पाहिजे असा निश्चय ठरवून , छेद्य , भेद्य , लेख्य व व्यधन ह्यांपैकी अवश्य ती क्रिया करुन कानाचे रक्त तपासावे . ते दुषित आहे की निर्दोष आहे , दुषित असल्यास जर वाताने दुषित असेल तर कांजी व ऊन पाणी घेऊन कान धुवावा . पित्ताने दुष्ट असेल तर थंड पाणी व दुधाने कान धुवावा . आणि कफाने दुषित असेल तर मद्याची निवळी व ऊन पाणी याने कान धुवावा . नंतर पुन्हा तासून उंच किंवा सखल नाही , वाकडातिकडा नाही अशा बेताने फाटल्या ठिकाणचा सांधा जुळवून रक्त थांबवून तो सांधावा . ( शिवावा . ) नंतर त्याजवर मध व तूप लावून कापूस किंवा फडले यापैकी एकाने तरी गुंडाळून त्याजवर दोर्‍याने फार आवळ नाही व फार सैल नाही अशा रीतीने बांधून त्यावर पूर्वी तयार करुन ठेवलेले खापरखुंटीचे ( रांजणाच्या काठाचे ) चूर्ण टाकून त्या रोग्याला नीट पथ्याने कसे रहावे हे सर्व सांगावे . यापुढील उपचार चिकित्सास्थानातील , द्विव्रणीय अध्यायात सांगितल्याप्रमाणे करावे ॥१५॥

बंध हालविणे , दिवसा झोप घेणे , व्यायाम , अति भोजन , मैथुन , विस्तवाचा शेक व फार बोलणे या गोष्टी वर्ज्य कराव्या .

ऊन न केलेले ( अपक्व ) तेल तीन दिवसपर्यंत बंधावर सोडावे . त्यानंतर तेलाने बंध चांगला भिजला म्हणजे तीन दिवसांनी ते फडके अगर कापूस सोडावा ॥१६॥

ज्याच्या कानाच्या जखमेतील रक्त अशुद्ध आहे . तसेच जखमेतून रक्त फार गेले आहे किंवा जखमेतील रक्त नाहीसे झाले आहे , अशा कानास सांधु नये . कारण रक्त जर वाताने दुष्ट झाले असेल , तर बरा झालेला कान पुनः फाटतो . पित्ताने रक्त दूषित असेल तर दाह , पिकणे , लाली व वेदना हे विकार होतात . कफाने दूषित असेल तर कान तावतो व खाज ( कंडू ) सुटते . अति रक्त गेल्याने काळसर सूज येते ( वातप्रकोपामुळे ) आणि ज्याच्या कानांच्या जखमेतून रक्त फार थोडे व मांसही थोडे तो लवकर भरुन येत नाही .

कान बांधल्यावर तीन दिवस आमतेलाने ( अपक्व तेलाने ) तो शिंपावा .

तीन दिवसांनी कापूस अगर फडके सोडून दुसरे बांधावे . तो जेव्हा चांगला भरुन येईल , त्याचे सर्व विकार नाहीसे होतील व त्याची त्वचा आसपासच्या त्वचेप्रमाणे होईल , तेव्हा तो हळूहळू वाढवावा . ह्याच्या आधी घाई केली तर सूज , दाह , पुरळ , लाली व वेदना हे विकार होतात किंवा पुनः कान फाटतो ॥१७॥१८॥

कान साफ बरा झाला व त्यात काही दोष राहिला नाही असे झाल्यावर तो वाढविण्यासाठी त्याला लावावयाचे तेल सांगतो . ते असे - घोरपड , प्रतुद ( पारवा , चिमणी वगैरे , ) विष्किर ( मोर , कोंबडा वगैरे ), आनूप ( रेडा , रानडुक्कर वगैरे ), औदक ( हंस , बदक , बगळा वगैर ) ह्या प्राण्यांच्या वसा ( चरबी ) व मज्जा , दूध , तूप , पांढर्‍या शिरसाचे तेल , ह्यापैकी जेवढे मिळतील तितके पदार्थ घ्यावे . तसेच रुई , मंदार , चिकणा , पेटारी , उपळसरी , आघाडा , अश्वगंधा , साळवण , भुईकोहाळा , शेवाळ , जलशूक ( पाण्यात संचार करणारा एक काळा किड म्हणजे पाननिवळ्या ), क्षीरकाकोली वगैरे मधुरवर्गातील औषधे व दुधी ह्या औषधांच्या मुळ्यांचा कल्क वरील सर्व स्नेहात टाकावा आणि दूध स्नेहाच्या चौपट घालावे आणि तेल सिद्ध करावे . वरील प्रकारचे वसादि स्नेह न मिळाल्यास नुसते तिळाचे तेल वरील पद्धतीने पचन करावे व गुप्तस्थानी कोणाच्या हाती लागणार नाही अशा बेताने ठेवावे ॥१९॥

कानाला वाफारा देऊन व मर्दन ( मालीश ) करुन नंतर त्याला हे तेल लावावे म्हणजे कानासंबंधी बारीक सारीक सर्व उपद्रव दूर होऊन बळकट होतो व वाढतो .

सातु , अश्वगंधा , जेष्ठमध व तीळ ह्या औषधांचा कल्क ( चटणी ) करुन त्याचा लेप लावावा .

शतावरी , अश्वगंधा , अर्कपुष्पि ( सूर्यफुलाचे झाड ) व जीवनीय गणातील औषधे ह्यांचा कल्क तेलाच्या चतुर्थांश व दूध तेलाच्या चौपट घालून तिळाचे तेल पचन करावे .( शिजवावे ). ते कानास लावले असता ते कानाच्या पाळीची वाढ करिते .

जे कान स्नेहस्वेदादिकांनी वाढत नाहीत त्यांच्या अपांगभागी ( कर्णपुत्रिकेच्या खाली किंचित तिरके जागी ) किंचित छेद करावा . कानांच्या बाहेरच्या पाळीचा मात्र केव्हाही छेद करु नये . कारण तिचा छेद केला असता पाळी तुटणे वगैरे कांही तरी इजा झाल्याशिवाय राहणार नाही .

कान बांधल्याबरोबर म्हणजे बरा होत आला आहे इतक्यांतच जर तो वाढविण्याची घाई केली , तर तो चांगला भरुन आला नसल्यामुळे पुन्हा फाटतो .

कानावर पूर्ववत केस आले आहेतच , कानांचे छिद्रही मोकळे झाले आहे , सांधा बरा झाला आहे , उंचसखलपणा नाहीसा झाला आहे , कान बळकट झाला आहे , व त्यांत आता कोणत्याही प्रकारची पीडा राहिली नाही म्हणजे तो चांगला भरुन आला असे समजून मग त्याचे हळूहळू वर्धन करावे .

कुशल वैद्याने वर सांगितले एवढेच कर्णबंध आहेत असे समजू नये , तर ते असंख्य आहेत असे समजावे व ज्या ठिकाणी जो बंध इष्ट वाटेल तो त्या ठिकाणी योजावा .

हे सुश्रुत , आता पुनः कानाच्या पाळीचे रोग सांगतो ते ऐक .

कानाच्या पाळीच्या ठिकाणी प्रकुपित झालेले वात , पित्त , कफ हे तीन दोष पृथक , दोन मिश्र किंवा तीनही एकदम प्रकुपीत होऊन नानाप्रकारचे रोग उत्पन्न करितात . वातदोषांने कानाच्या पाळीवर फोड येतात , कान ताठतो व सुजतो . पित्तदोषाने दाह , फोड उत्पन्न होणे , सूज व कान पिकणे हे विकार होतात . कफदोषाने कंडु , सूज , कान ताठणे व जडत्व ही लक्षणे होतात .

त्याजवर दोषानुरुप शोधन करुन मग उपचार करावे . उपचार करावयाचे ते स्वेदन ( वाफारा देणे ), तेल लावणे , तेल वगैरे शिंपणे , लेप करणे , रक्त काढणे हे करावे . हे उपाय व्याधीला अनुसरुन योग्य व सौम्य असे करावे . तसेच बृंहण ( पौष्टिक ) अन्नपान वगैरे पदार्थ दोषानुरुप उपचार ज्याला करिता येतात तोच वद्य उपचार करण्यास योग्य समजावा .

आता ह्यापुढे नाव लक्षणे ह्यासह कानाच्या पाळीचे उपद्रव सांगतो . ( इतर त्रास ).

१ उत्पादक , २ उत्पुटक , २ श्याव , ४ भृशं कंडुयत , ५ अवमंथ , ६ सकंडूक , ७ ग्रंथिक , ८ जंबूल , ९ स्त्रावी , १० दाहवान असे दहा उपद्रव आहेत . आता ह्यांची क्रमाने चिकित्सा ऐक . ( ह्यांची लक्षणे पुढे चिकित्सास्थानांत " मिश्रकाध्यायात " पहावीः अ . २५ )

उत्पाटकावर :- आघाडा , राळ , पाडळ , कागदी लिंबाच्या झाडाची साल ह्या औषधांचा लेप करावा ह्याच औषधांच्या कल्काने विधियुक्त तेल शिजवून ते लावावे .

उत्पृटकावर :- बाहव्याचे मूळ , शेवगा , घाणेराकरंजा , घोरपडीचे मांदे व चर्बी , रानडुकर , बेल व हरीण त्यांचे पित्त व तूप ह्या सर्वांचा लेप करावा व ह्याच द्रव्यांनी विधियुक्त तयार केलेले तेल लावावे .

श्याव रोगावर :- हळद , गहुला , काळी उपळसरी , तांदुळजा ह्यांचा लेप करावा . किंवा ह्याच द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल लावावे .

सकंडुक रोगावर :- पहाडमूळ , रसांजन , मध व ऊन कांजी ह्यांचा लेप द्यावा व ह्याच औषधांनी सिद्ध केलेले तेल लावावे . सकंडुक रोगात जर व्रण झाले तर जेष्ठमध , क्षीरकाकोली , व जीवक , वृषभक , मेदा , महामेदा , काकोली , क्षीरकाकोली , ऋद्धि व वृद्धि ह्या औषधांचा कल्क घालून तेल शिजवावे व ते तेल लावावे आणि त्याला पौष्टिक उपचार करुन घोरपड , रानडुकर व साप यांची चरबी लावावी .

अवमंथकावर :- रक्त काढून नंतर पुंडरिक वृक्षाची साल , जेष्ठमध , मंजिष्ठ , धावडा ह्या औषधांचा लेप करावा ह्याच औषधांनी सिद्ध केलेले तेल लावावे .

कंडुमान रोगावर :- सहदेवी ( थोर चिकणा किंवा भांबुरडी ), विश्वदेवा ( नागबला - गांगेरुकी ), शेळीचे दूध व सैंधव ह्यांचा लेप करावा किंवा ह्यांच औषधानी सिद्ध केलेले तेल लावावे .

ग्रंथिकाच्या गाठी चिरुन रक्त काढावे . नंतर लोध्राच्या चूर्णाने घासून , दुधाने धुवून , तो चांगला स्वच्छ झाला म्हणजे त्याजवर व्रण भरुन आणणारे उपाय करावे .

स्त्रावी रोगावर :- शिवण , जेष्ठमध , मोहाचे झाड ह्यांच्या सालीच्या चूर्णाचा मधातून लेप करावा व ह्याच औषधांनी सिद्ध केलेले तेल लावावे .

दह्यमान रोगावर :- वड , उंबर , पिंपळ , पळस व पिंपरणी ह्यांच्या साली व जेष्ठमध ह्यांचे चूर्ण तुपात कालवून त्याचा लेप करावा किंवा जीवक , ऋषभक , ऋद्धि , वृद्धि , मेदा , महामेदा , काकोली , क्षीरकाकोली ह्या अष्टवर्गाच्या चूर्णाचा तुपातून लेप करावा ॥२०॥२७॥

आता तुटलेले नाक कसे सांधावे त्याचा विधि सांगतो . नाक तुटून जेवढा तुकडा निघाला असेल त्या तुकड्याच्या बरोबर मापाचा झाडाच्या पानाचा तुकडा घेऊन तो नाकाच्या तुटलेल्या भागाजवळील गालाच्या भागावर ठेवून , तेवढाच गालाच्या मांसाचा तुकडा , त्याचा गालाशी संबंध न सोडता खालून वर कापीत नेऊन घ्यावा व तुटलेल्या नाकाच्या जागी आधी थोडे खरवडून , त्या ठिकाणी नीट रीतीने सांधेल असा बसवावा . वैद्याने फार सावधगिरीने तो नीट व बळकट बसला असे पाहून , एरंडाच्या पानाच्या किंवा देवनळ्या अगर कमळाच्या देठाच्या दोन लहानशा नळ्या त्यात बसवून , आपणास जेवढे पाहिजे तेवढे उंच करुन बांधावे . नंतर पतंग , जेष्ठमध , रसांजन ह्यांचे अगदी सूक्ष्म केलेले चूर्ण त्याजवर पसरुन त्यावर कापसाची अगर पांढर्‍या फडक्याची घडी बसवावी ; आणि त्या घडीवर ऊन न करिता तसेच थंड असलेले तिळाचे तेल वरचेवर शिंपावे . नंतर त्याचा कोठा स्निग्ध होण्याकरिता त्याला तूप पाजावे , त्याचे खाल्लेले अन्न जिरल्यावर कोठा स्निग्ध झाल्यावर त्याला रेचक द्यावे . सांधा जुळून आल्यावर जखम बरी होत आली ( भरली ), म्हणजे नाक सांधविलेल्या ठिकाणी नाक सांधलेल्या भागाचा गालाशी असलेला संबंध तोडून टाकावा . आणि नाकाचा भाग लहान झाला असला , तर तो वाढवून मोठा करावा व अतिशय मोठा असेल तर तो सारखा करण्याचा प्रयत्न करावा .

वर नाकाचा सांधा जुळविण्याविषयी जो विधि सांगितला त्याचे विधिने ओठही सांधावा . फक्त ह्या कामाला नळ्यांची जरुरी नाही . ह्याप्रमाणे हे शल्यतंत्र विधियुक्त ज्याला समजते ( तो जाणतो ) तो राजाचीही शस्त्रक्रिया करावयास योग्य होतो .

१ ) डल्लण म्हणतो , " नाडी योगं " हा श्लोक पूर्वीच्या वैद्यांनी अनार्षिकृत म्हटला आहे . परंतु जेजट व गयदास ह्यांनी त्याच्यावर व्याख्यान केले आहे ॥२८॥३१॥

अध्याय सोळावा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP