मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
व्रणस्रावविज्ञानीय

सूत्रस्थान - व्रणस्रावविज्ञानीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय बाविसावा

आता ‘‘व्रणस्रावविज्ञानीय ’’ नावाचा अध्याय जसा भगवान धन्वंतरीनी सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१ -२॥

त्वचा , मांस , शिरा , स्नायु , संधि , कोठा व मर्मस्थाने ही आठ स्थाने व्रण होण्याच्या जागा आहेत . ह्या आठ स्थानीच सर्व व्रण होत असतात . त्यापैकी केवळ त्वचेचा आश्रय करून होणारा व्रण त्वचेचेच भेदन करणारा असल्यामुळे उपचार करण्यास फार सोपा असतो , बाकीचे मासादिकांच्या आश्रयाने झालेले व आपोआप पिकून फुटलेले हे उपचार करण्यास फार कठीण आहेत . (कष्टाने साध्य होणारे आहेत .) त्यापैकी लांबट आकाराचा , चौकोनी , वाटोळा व त्रिकोणाकृति , ह्या व्रणाच्या मुख्य आकृति आहेत . (ह्या आकाराचे व्रण बरे होण्यास सोपे असतात .) बाकीचे वाकड्या तिकड्या आकाराचे व्रण उपचार करण्यास फार अवघड असतात .

इंद्रियानिग्रह करणार्‍या लोकांचे सर्व प्रकारचे व्रण चांगल्या अनुभविक वैद्याकडून उपचार चालू असले म्हणजे त्वरित भरून येतात . आणि मनास वाटेल तसे वागणारे जे लोकत्याचे कसलेही व्रण असले तरी , त्यांच्यावर अडाणी वैद्याकडून उपचार केले जात असतील , तर दोषांच्या अत्यंत प्रकोपामुळे जास्तच दूषित होतात .

दुष्ट व्रणाची लक्षण

७ ) त्या व्रणापैकी जो व्रण अतिशय बारीक छिद्राचा , तसाच अतिशय पसरट , अतिशय कठीण , अतिशय मऊ , (बिलबिलित ), फार उंच असलेला , फार खोल असलेला ,

अतिशय थंड लागणारा , अतिशय उष्ण , काळा , तांबडा , पिवळा , पांढरा ह्यापैकी कोणत्याही एका रंगाचा , दिसण्यात भेसूर , दुर्गंधयुक्त पू , मांस , शिरा , स्नायु वगैरे ह्यांनी व्यापलेला , ज्यामधून घाणेरडा पू वहातो असा , ज्याची अतील गति सरळ नाही . असा , वर गती असलेला दिसण्यात चांगला न दिसणारा , ज्याला फार घाण येते असा ,

अतिशय वेदनायुक्त ज्याला अतिशय लाली आहे , कडू फार आहे , सूज फार आहे व त्याच्या आसपास बारीक पुटकुळ्य़ाही पुष्कळ आहेत , दूषित रक्तस्राव होत आहे असा व फार दिवस झालेला ही दूषित व्रणाची लक्षणे आहेत . अशा व्रणाचे त्या त्या दोषांचे प्रकोपानुसार वातज , पित्तज , कफज , रक्तज , सन्निपातज व अंगतुक असे सहा प्रकार करून त्या त्या दोषानुरूप चिकित्सा करावी .

सर्व स्त्रावांची माहिती

८ )आता सर्व प्रकारच्या स्रावाची माहिती सांगतो , त्वचेवर खरडल्याने किंवा त्वचा फाटल्यामुळे अगर त्वचेवरील बारीक फोड फुटले किंवा फोडले तर त्यापासून पाण्याप्रमाणे पातळ , किंचित् दुर्गंधयुक्त व पिवळट रंगाचा असा स्राव होतो . मांसगत व्रणातून तुपाप्रमाणे दिसणारा , घट्ट , पांढरा व बुळबुळीत असा स्राव होतो . शीर म्हणजे रक्तवाहिनी नुकतीच तुटली असेल तर तिजमधून रक्तच फार वाहते आणि व्रणामुळे ती शरी पक्व झाली असली तर , पाणी येणार्‍या नळीतून जसे पाणी येते , त्याप्रमाणे यातून पातळसा पू येतो . ह्या शिरेतून होणारा स्त्राव पातळ , अडखळत अडखळत , बुळबुळीत , तारेप्रमाणे लोंबणारा , काळसर व दवाप्रमाणे असतो स्नायुगत व्रण असला तर स्निग्ध , दाट , रक्त व घट्ट पू मिश्र व तांबुस असा असतो . अस्थिगत व्रण असला तर हाडावर जोराचा आघात झाल्याने , हाड फुटल्याने , त्याला भोक पडल्याने , दोषांनी ते कुजवून ते पोकळ केल्यामुळे किंवा पिचल्यामुळे हाडाच्या ठिकाणी व्रण होऊन हाड निःसत्त्व व धुतलेल्या शिंपल्याप्रमाणे पांढरे दिसते आणि त्या व्रणांतून स्राव होतो तो मज्जा व रक्तमिश्र असून स्निग्ध असतो . संधीच्या ठिकाणी झालेल्या व्रण दाबला असता त्यातून स्राव वगरे होत नाही , पण हात , पाय वगैरे आखडताना किंवा पसरताना , खाली वर करताना , धावताना , खोकताना व कथताना त्यातून स्राव होतो .

ह्यातून होणारा स्राव बुळबुळित तार येणारा , फेस , पू ., आणि रक्त ह्यांनी युक्त असतो . कोठ्यात व्रण झाला असता तर त्यातून रक्त , मूत्र , मल , पू व पाणी ह्यांचा स्राव होतो . मर्मगत व्रणासंबंधी लक्षणे वर त्वचेच्या वगैरे व्रणातून सांगितलेल्या स्त्रावाप्रमाणेच असल्याकारणाने येथे निराळी सांगितली नाहीत .

त्वचादिगत व्रणातील स्राव दोषादि क्रमाने सांगतो . कठोरपणा , काळसरपणा , दंव , दह्यावरील पाणी , क्षाराचे पाणी , मांस धुतलेले पाणी , तांदुळाचे धुवण , ह्यासारखा स्त्राव वातदोषामुळे होतो . पित्तदोषापासून गोमेदाप्रमाणे (पिवळट ), गोमूत्र , भस्म , शंख , ह्यांच्या वर्णाचा , काढ्याच्या पाण्याप्रमाणे , मद्याप्रमाणे किंवा तेलाप्रमाणे होतो . पित्ताप्रमाणेच रक्तदोषामुळे होतो पण त्यात किंचित् दुर्गंधी असते . कफदोषाने लोणी , हिराकस , मज्जा ,पीठ , तीळ , नारळाचे पाणी व डुकराची चर्बी ह्यासारखा स्राव होतो . सन्निपातामुळे (त्रिदोषामुळे ) नारळाचे पाणी , वाळकातील रस , कांजीच्या वरची निवळ , भोपळ्यातील अगर कलिंगडातील पाणी , गहुला , यकृत व मृगाचे कढण ह्यासारखा दिसतो .

पक्वाशयातील व्रणामधून जर तांदुळाच्या धुवणासारखा स्त्राव होऊ लागला तर तो व्रण असाध्य समजावा .

रक्ताशयातील व त्रिकसंधी (माकडहाडाचा सांधा ) वरील व्रणातून वाटाणे शिजवून काढलेल्या पाण्यासारखा स्त्राव होऊ लागला तर तेही व्रण असाध्य समजावे .

ह्याप्रमाणे आधी व्रणातील स्त्रावांची परीक्षा करून नंतर मग उपचाराला सुरवात करावी ॥९ -१०॥

व्रणवेदना

११ ) आता सर्व व्रणांच्या वेदनांची माहिती सांगतो -टोचणे , फोडणे , मारणे , तोडणे , ओढणे , घुसळणे , फेकणे , चुणचुणणे , भाजल्यासारखे वाटणे , चुरणे किंवा कुटणे , फोडणे ओरखडणे , उपडणे , कापणे (हालणे ), अनेक प्रकारच्या वेदना , निखळल्याप्रमाणे वाटणे , विसकटणे , भरणे , जखडणे , व्रणाची जागा बधिर (स्पर्श कळत नाही अशी ) होणे , आकसणे , अंकुशाने आघात केल्याप्रमाणे वगैरे नाना प्रकारच्या वेदना कारणावाचून ज्यामध्ये वरचेवर होतात त्या सर्व वातजन्य समजाव्या . दाह होणे , ओढ लागणे , आसमंतातभागी दाह होणे , धूर निघाल्याप्रमाणे वाटणे , व्रणाच्या भागावर निखारे ठेवल्यासारखे वाटणे व उष्णतेने उकडल्यासारखे वाटणे , व्रणावर क्षार घातल्याप्रमाणे विशेष वेदना होणे ह्याप्रमाणे होणार्‍या वेदना पित्तदोषामुळे होतात . रक्तदोषाच्या वेदना पित्ताप्रमाणेच समजाव्या . कडू , जडत्व , स्पर्श न कळणे , व्रणावर काही जाडसा लेप

केल्यासारखे वाटणे , वेदना कमी असणे , व्रण ताठणे , थंडपणा (थंड लागणे ) ह्याप्रमाणे वेदना असल्या म्हणजे त्या कफदोषजन्य आहेत असे जाणावे . ज्या व्रणामध्ये ह्या सर्व दोषांच्या वेदान कमीजास्त प्रमाणात असतात तो सन्निपातिक व्रण समजावा .

१२ ) आता व्रणाचे रंग सांगतो -वातजन्य व्रण भस्म , पारवा किंवा अस्थि ह्यांच्या रंगासारखा असतो . तसाच तो कठोर , तांबुस व काळा असा असतो .

निळा , पिवळा , हिरवा , काळसर , काळा , तांबडा , तांबुस काळा व पिंगट हे रंग पित्तजन्य व रक्तजन्य व्रणांत असतात .

पांढरा , स्निग्ध व पिवळट पांढरा हे रंग कफदोषजन्य व्रणांत असतात . आणि सन्निपातिक व्रणांत सर्व दोषांचे मिश्रवर्ण असतात .

१३ ) वर वेदनांचे व व्रणाच्या रंगाचे वर्णन केले आहे ते केवळ व्रणापुरतेच आहे असे समजू नये . व्रणाप्रमाणेच गाठी , आवाळु , करट वगैरे व्रणशोथासारखे जेवढे विकार आहेत त्या सर्व विकारात या वेदना , रंग वगैरे लक्षपूर्वक अवलोकन करावेत .

अध्याय बाविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP