मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ९

सूत्रस्थान - अन्नपानविधि ९

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


भक्ष्य वर्ग

आता रसवीर्य व विषाकासह ‘‘भक्ष्य ’’ पदार्थांचे गुण सांगतो .

दुधाचे केलेले भक्ष्य पदार्थ बलवर्धक , वृष्य (कामवर्धक ), हृद्य (आवडणारे ), सुगंधी , जळजळ किंवा दाह न करणारे , पौष्टिक व पित्तनाशक असतात . (दुधाचे भक्ष्य पदार्थ म्हणजे पेढे वगैरे .)

दुधात केलेले धृतपूर (घारगे ) हे प्राणशक्ति वाढविणारे , हृद्य कफकारक , वातपित्तनाशक , वृष्य व रक्त आणि मांस ह्यांची वृद्धि करणारे आहेत . (गव्हाचा रवा व नारळाचा खीस दुधात मळून त्याचे घारगे करून तुपात तळून काढतात त्याला ‘‘धृतपूर ’’ किंवा धीवर म्हणतात .)

गुळाचे पुरण (सारण ) घालून केलेेले गौडिक भक्ष्य पदार्थ (करंज्या वगैरे ) हे पौष्टिक , जड , वातनाशक , दाह (जळजळ ) न करणारे , पित्तनाशक , शुक्रवृद्धि करणारे व कफनाशक आहेत . मधुमस्तक (खाजा ) संयाव (हे दोन्ही करंजाचेच प्रकार आहेत . परंतु गव्हाचा रवा , दूध , व तूप मिश्र करून मळून ते तुपात तळून साखरेत घोळून ठेवावे .

ठेवावे . ह्याला संयाव म्हणतात . असे संयावाचे लक्षण आहे . ह्यावरून संयाव म्हणजे ‘‘चिरोटे ’’ समजावे .)

व पूप (आनरसे ) हे पदार्थ विशेषतः जड व पौष्टिक आहेत . आणि लाडू हे पचनाला फारच कठीण असे आहेत .

सट्टक हा श्रीखंडासारखाच एक पदार्थ दह्यापासून करितात . ह्याचे पुष्कळच प्रकार आहेत . सुंठ , मिरे , पिंपळी , लवंगा , साखर व कापुर ह्यांचे योग्य मिश्रण केलेले घट्ट दही वस्त्रगाळ केले म्हणजे त्याला सट्टक म्हणतात . हा रुचिकारक , अग्निदीपक , स्वर चांगला करणारा , पित्तनाशक , वातनाशक , जड , अतिशय गोड व प्राणशक्ति वाढविणारा आहे .

गव्हाची कच्ची पिठी , तूप , दूध गूळ ह्यांचे फार दाट नाही , फार पातळ नाही असे जे मिश्रण त्याला ‘‘विष्यंद ’’ म्हणतात . तो हृद्य , मधुर , सुगंधी , स्निग्ध , कफकारक , जड , वातनाशक , तृप्तिकारक व शक्तिवर्धक आहे .

गव्हाच्या रव्याचे केलेले सर्व प्रकारचे भक्ष्य पदार्थ पौष्टिक , वातपित्तनाशक व शक्तिवर्धक आहेत .

फेण्या किंवा तारफेण्या (पापड्या किंवा करुवड्या ) वगैरे पक्वान्नेही हृद्य , पथ्यकारक व पचनाला हलकी आहेत .

मुग वगैरे डाळींचे पुरण घालून केलेले गव्हाच्या कणिकेचे (कडबू वगैरे ) पदार्थ हे मलावरोधकारक असतात . आणि मांसमय वेसवार (मागे सांगितला आहे ) घालून (त्याचे पुरण घालून ) केलेले कणिकेचे पदार्थ जड व पौष्टिक असतात .

॥३९२ -४००॥

पालल (तीळ व सूळ यांचे सारण भरून गव्हाच्या रव्याचे करितात ते व शष्कुली (करंज्या ) ह्यापैकी पालल हे कफकारक आहेत . आणि शष्कुली ही कफपित्तकारक आहे . कोणी शष्कुली म्हणजे चिरोटे व संयाव म्हणजे करंज्या असेही म्हणतात .)

ही सर्व पिष्ट्यमय भक्ष्य पक्वान्ने उष्णवीर्य , कफपित्तकारक घशाशी जळजळ करणारी , फारशी शक्ति न वाढविणारी आणि विशेषतः जड आहेत . डाळीचे भक्ष्य पदार्थ हलके , तुरट अधोवायुची प्रवृत्ती करणारे , मलावष्टभक पित्ताला न वाढविणारे , कफनाशक व मलभेदक आहेत . परंतु उडदाच्या डाळीचे पदार्थ मात्र शक्तिवर्धक , वृष्य व जड आहेत .

दूध नासवून ते घट्ट करितात त्याला कुर्चिका म्हणतात . ह्या कूर्चिकेचे केलेले सर्व पदार्थ जड व फारसे पित्त न वाढविणारे आहेत .

मोड आलेल्या धान्याचे केलेले (उसळी ) वगैरे पदार्थ जड , वातपित्तकारक , विदाही , मळमळ उत्पन्न करणारे , रुक्ष व डोळ्यांना अपथ्यकारक आहेत .

तुपांत तळलेले पदार्थ हृद्य , सुवासिक व हलके असतात . शिवाय वातपित्तनाशक , शक्तिवर्धक आणि अंगाचा वर्ण व दृष्टी स्वच्छ करणारे आहे . आणि तेलात तळलेले पदार्थ घशाशी जळजळ उत्पन्न करणारे , जड , तिखट विपाकी , उष्ण , वातनाशक , दृष्टीला अपायकारक पित्तकारक व दूषित करणारे आहेत . फळे मांस व गूळ वगैरे उसाचे पदार्थ काही विशेष प्रमाणात एकत्र करून त्यात तीळ व उडदाचे पीठ घालून केलेले पदार्थ शक्तिवर्धक जड पौष्टिक व मनाला प्रिय असे म्हणतात .

चुलीवर खापर ठेऊन त्याजवर भाजून काढलेले मांडे वगैरे पदार्थ किंवा केवळ निखार्‍यावर भाजून काढलेले पापड वगैरे पदार्थ हलके असून वात वाढविणारे असतात . जे पदार्थ अतिशय पातळ (जाड नव्हे असे ) सालपापड्या वगैरेसारखे असतात ते जर निखार्‍यावर खरपूस भाजलेले असले तर ते फारच हलके चांगले होतात .

दुधाचा खरवस , खवा व दह्याचा श्रीखंडाकरिता केलेला चक्का ह्यांचे केलेले पदार्थ जड असून कफवर्धक असतात .

कुमलाष (गहू , सातु व मुग वगैरे धान्य उकडून त्यांची उसळ करितात ती किंवा सातूच्या किंवा उडदादिकांच्या पिठाच्या ‘‘शेंगोळ्य़ा ’’ म्हणून पक्वान्न करितात ते ) हे वातकारक , रूक्ष , जड व मळ पातळ करणारे आहेत सातु भाजून त्याच्या पिठाचा ‘‘वाट्य ’’ नावाचा एक भक्ष्य पदार्थ करितात तो खोकला , पीनस व प्रेमह ह्यांचा नाशक आहे .

धाना म्हणजे फुटाणे वगैरे भाजलेली धान्ये व लुंबा म्हणजे गोंधळ शाळू वगैरे धान्याचा हुरडा व जून झालेला हरबरा आगटीवर भाजून करितात तो हवळा अथवा त्याचप्रमाणे भाजलेल्या गव्हाच्या लोंब्या हे पदार्थ पचनाला हलके असून कफ व मेद ह्यांचा नाश करणारे आहेत .

सातु भाजून त्याचे केलेले पीठ हे पौष्टिक , कामवर्धक आणि तहान , पित्त न कफनाशक आहे , ते पाण्याशी मिसळून पिण्यासारखे फारच पातळ करून प्याले असता तात्काळ शक्ति आणणारे (हुशारी आणणारे ), मलभेदक व वातनाशक आहे . सातूच्या पिठाचा अत्यंत कठीण असा लाडू पचनाला जड असून तोच जर मऊ असेल तर पचनाला हलका आहे . सातूचे पीठ पाण्यात कालवून चाटण्यासारखे दाट करून चाटले असता ते मृदु असल्यामुळे लवकर पचन होते .

साळीच्या वगैरे लाह्या ह्या वांती व अतिसार ह्यांचा नाश करणार्‍या , अग्निदीपक , कफनाशक , शक्तिवर्धक , किंचित् तुरट व मधुर असून हलक्या आणि तहानशामक , मळ कमी करणार्‍या आहेत . साळीच्या लाह्याचे पीठ हे तहान , वांती , दाह व उन्हातून आल्याने होणारे श्रम , ह्यांचा नाश करणारे असून रक्तपित्त , दाह व ज्वर ह्यांचा नाश करणारे आहे . पोहे हे जड , स्निग्ध पौष्टिक व कफनाशक , असून ते दुधात भिजवून खाल्ले असता शक्तिवर्धक , वातनाशक व मलभेदक ओहत .

तांदूळ न भाजता त्याचे केलेले पीठ मोडेलेल्या हाडाला सांधणारे असून कृमी व प्रमेहनाशक आहे .

नवे तांदूळ (एक वर्षाच्या आतील ) हे पचनाला फारच त्रासदायक असून रुचीला गोड व पौष्टिक आहेत आणि एक वर्षापेक्षा अधिक जुना तांदूळ मोडलेल्या हाडाचे संधान करणारा असून प्रमेहनाशक आहे .

जेवणातील निरनिराळी पक्वान्ने व अनेकअनेक प्रकारची तोंडीलावणी ही निरनिराळ्या अनेक द्रव्यांच्या मिश्रणाने तयार केलेली असतात . तसेच त्यांचे लाडू , करंज्या वगैरे पक्वानाचे अनेक प्रकारही करितात आणि तेलात , तुपात तळणे वगैरे अनेक संस्कारही त्यावर केलेले असतात . ह्यासाठी वैद्याने त्यापैकी ज्यांची जशी आवश्यता वाटेत त्याप्रमाणे किंवा खाणाराच्या आवडीप्रमाणे शास्त्राला अनुसरून योग्य ती योजना करावी ॥४०१ -४१७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP