मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि १

सूत्रस्थान - अन्नपानविधि १

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय सेहेचाळीसावा

आता ‘‘अन्नपानविधि ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

भगवान् धन्वंतरींना नमस्कार करून सुश्रुत म्हणाले हे भगवान् , आपण पूर्वी सांगितलेच आहे की , प्राणिमात्रांच्या जीवनाला व शरीरसामर्थ्याला , अंगकांतीला आणि ओजाला पोषक असा मूळ आहारच आहे . तो षड्रसात्मक आहे . रस हे द्रव्याच्या आश्रयाने असणारे आहेत . द्रव्याच्या रस , गुण , वीर्य व विपाक ह्या गोष्टीवर वातादिदोषांची क्षय , वृद्धि व साम्य अवलंबून आहे . मृत्युलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांच्या उत्पत्ति , स्थिति व नाशक ह्या गोष्टींना आहारच निमित्त आहे . शरीराची वाढ आहारापासून होते . शरीरसामर्थ्य , आरोग्य , शरीरकांति व इंद्रियांची प्रसन्नता ह्या सर्व गोष्टी आहारावरच अवलंबून आहेत . तसेच आहारामध्ये वैषम्य (विरुद्धपणा ) झाले असता (कमीजास्तपणा झाला असता ) तत्काळ आरोग्य नष्ट होते व अस्वस्थता येते . त्या आहाराचे अशित (चाऊन खाणे ), पीत (पिणे ), लीढ (चाटून खाणे ) व स्वादित (पक्वान्न वगैरे रुची घेत खाणे ) असे चार प्रकार आहेत . आहार हा अनेक द्रव्यात्मक असून त्याचे पक्वान्नाच्या रूपाने अनेक प्रकार आहेत ; व त्याप्रमाणे त्याचे प्रभावही अनेक आहेत . तेव्हा अशा प्रकारच्या आहाराची निरनिराळी द्रव्ये , त्यांचे रस , गुण , वीर्य , विपाक , प्रभाव व कार्ये ही आपल्यापासून समजून घेण्याची मी इच्छा करितो . आहार द्रव्यांचे गुणदोषादि स्वरूप ज्यांना अवगत (ज्ञात ) नाही असे वैद्य निरोगी मनुष्याचे आरोग्य राखण्यास व रोग्याच्या रोगाचा निग्रह (नाश ) करण्यास समर्थ नाहीत . सर्व प्राणी आहारावर अवलंबून आहत . असे ज्याअर्थी हे आहे , त्याअर्थी भगवन् , अन्नपानाचा विधी मला सांगा . त्याजवर भगवान् धन्वंतरी म्हणाले , बाळा सुश्रुता , तू प्रश्न केल्याप्रमाणे सर्व मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक ॥३॥

साळी

तामसाळ , लोहितशाली (तामसाळ ), कलमशाली (ह्या अंतर्वेदीमध्ये उत्पन्न होतात ), कर्दमशाली (ह्या दलदलीच्या म्हणजे चिखलाच्या प्रदेशात होणार्‍या ) पांडुकशाली (पांढरे भात ), पुंडरीक (कमळाप्रमाणे नाजुक ), सुगंधक (सुगंधी आंबे मोहोर ), शकुनाहृत (गरूडसाळ -ही गरूडाने परदेशातून आणिली अशी आख्यायिका आहे ), पुष्पांडक (हेही एक सुगंधी जातीचेच भात आहे ), पुंडरीक (कमळसाळ ), महाशाली (महासड भात ), शीतभीरुक (थंडीने न येणार्‍या ), रोध्रपुष्पक (ज्याचे गोंड लोध्राच्या फुलासारखे असेते त्या ), दीर्घशूक (ज्यांची टोपणे लांब आहेत ती ), कांचनक (सुवर्णशाली ), महीष (रेडेमुसळी ), महाशूक (जाड कुसाची ), हायनक , दूषक व मदादूषक इत्यादि अनेक प्रकारच्या साळी आहेत .

कोणत्याही साळी मधुर , शीतवीर्य , पचनाला हलक्या , बलवर्धक , पित्तनाशक , किंचित वातकारक स्निग्ध , मळ घट्ट व थोडा करणार्‍या अशा आहेत .

सर्व साळीत तामसाळ ही श्रेष्ठ असून त्रिदोषनाशक आहे . तशीच ती शुक्रवर्धक , मूत्रल , डोळ्यांना हितकारक , अंगकांती व शक्ति वाढविणारी , आवाज चांगला करणारी , मनाला प्रिय , तुषानाशक , व्रणरोगात , पथ्यकर , ज्वरनाशक आणि सर्व रोग व विषबाधानाशक आहे .

वर ज्या साळी सांगितल्या आहेत त्या ह्या तामसाळीपेक्षा क्रमाने उत्तरोत्तर थोड्या अंतराने कमी गुणाच्या व कनिष्ठ अशा आहेत ॥४ -७॥

षष्ठिक , कांगुक , मुकुंदक , पीतक , प्रमोदक , काकलक , आसनपुष्पक , महाषष्टिक , चूर्णक , कुरबक , व केदार इत्यादि साठेसाळीच्या जाती आहेत .

सर्व प्रकारच्या साठेसाळी रसाने (रूचीला ) व विपाकाने मधुर आहेत . वातपित्तांचे शमन करणार्‍या आहेत . ह्या गुणाने साळीसारख्याच आहेत . शिवाय पौष्टिक , कफकारक व शुक्रल आहेत .

सर्व साठेसाळीमध्ये (षष्ठिक साठेसाळ ) शाली श्रेष्ठ असून किंचित् तुरट , पचनाला हलक्या , मृदु , स्निग्ध , त्रिदोषनाशक , शरीराला बळकटी आणणार्‍या , शक्तिवर्धक

विपाककाळी मधुर , ग्राहक , आणि तामसाळीच्या बरोबरीच्या आहेत .

बाकीच्या साठेसाळी वरील क्रमाने उत्तरोत्तर थोड्या अंतराने कमी गुणाच्या आहेत . ह्यांना वर जरी साठेसाळी म्हटले आहे तरी पौष्टिक (साठेसाळी ) हे व्रीहीच्या वर्गातील आहेत वर्षाऋतूत होणार्‍या त्या साळी व हेमंतऋतूत होणार्‍या त्या व्रीही असा शाली व व्रीही ह्यांचा फरक होतो ॥८ -१२॥

कृष्णव्रीही (काळे भात ), शालामुख (काळसर पांढरे भात ), जतमुख (लाखतोंडे भात ), नंदीमुख लावाक्षक , त्वरितक (साठेसाळीप्रमाणे जलद तयार होणारे ), कुक्कुटांडक , पारावतक आणि पाटल इत्यादि व्रीहीच्या जाती आहेत .

सर्व व्रीही जातीचे (हेमंतऋतूत येणारे ) भात किंचित् तुरट , गोड , तिखटविपाकी (काही आचार्यांच्या मनाने आम्लविपाकी ) उष्णवीर्य , किंचित् अभिष्यंदी गुणाने साठेसाळीसारखे आणि मलबद्धक आहे .

( व्रीहीभात हे साठेसाळीसारखे आहे असे म्हटले आहे त्याचा अर्थ हे भात हारीक वगैरे तृणधान्यापेक्षा गुणाने अधिक एवढाच घ्यावयाचा . कारण ह्या जातीपैकी पाटल ( पटणी ) भात त्रिदोषकारक आहे . व ‘‘ पाटल ’’ हा शब्द सर्व व्रीही जातीच्या भाताला सामान्येकरून व विशेषेकरूनही योजितात ; त्याअर्थी सर्व व्रीहीभाते दोषकारकच ठरतात .)

भाजलेल्या जमिनीत होणार्‍या साळी पचनाला हलक्या , किंचित् तुरट , मलमूत्र कमी करणार्‍या , रुक्ष , कफनाशक आहेत .

साध्या जमिनीत होणार्‍या साळी कफपित्तनाशक , तुरट , किंचित् तिखट , किंचित् कडू व गोड आणि व वात जठराग्नि ह्यांना वाढविणार्‍या आहेत .

अनुपदेशात पाटाच्या पाण्याने पिकणाच्या साळी मधुर , वृष्य , बलवर्धक , पित्तनाशक , किंचित् तुरट व किंचित् आंबट , पचनाला जड , कफकारक व शुक्रवर्धक आहेत .

रोप्या (रोप तयार करून पुनः लावतात त्या ) व अतिरोप्या (रोप तयार करून पुनः पुनः त्याच रोपांची दोनतीन ठिकाणी लागण करितात त्या ) ह्या साळी पचनाला हलक्या लवकर शिजणार्‍या , गुणांनी श्रेष्ठ , विदाह न करणार्‍या , सर्व दोषनाशक , शक्तिवर्धक , आणि मूत्र अधिक करणार्‍या आहेत . छिन्नरूढाखाली (पेरल्यावर एकदा कापून घेऊन पुनः त्यालाच फूट फुटून येतात त्या ) रूक्ष , मलबद्धक , किंचित् कडु , तिखट , पित्तनाशक , पचनाला हलक्या आणि

कफनाशक आहेत . साळींपैकी कोणकोणत्या साळी कोणकोणत्या रोगाला हितकारक व अहितकारक हे ह्या ठिकाणी सविस्तर सांगितले . आता त्याचप्रमाणे हारीक वगैरे तृण धान्ये , मुग उडीद वगैरे शिंबीधान्ये (शेंगाची धान्ये ) ह्यांचेही गुणदोष ह्या पुढे सांगतो ॥१३ -२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP