मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
ऋतुचर्या

सूत्रस्थान - ऋतुचर्या

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय सहावा

आता " ऋतुचर्या " अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे , त्याप्रमाणे सांगतो आहोत ॥१॥२॥

ज्याला काळ असे म्हणतात तो भगवान ( सर्वश्रेष्ठ ) स्वयंभू ( स्वतःच निर्माण झालेला ) व ज्याला आदि , मध्य व अंत नाही अशा प्रकारचा आहे . द्रव्य वगैरेंच्या ठिकाणची रसाची क्षय ( कमी होणे ) व वृद्धी ( वाढणे ) आणि मनुष्याचे जीवन आणि मरण ही कालाच्या आधीन आहेत . तो आपल्या अगदी सूक्ष्म अशा कलेने देखील कधी कमी होत नाही म्हणून त्याला " काल " असे म्हणतात . काल सर्व प्राणीमात्रांचे संकलन ( प्रलयकारी एकीकरण ) करतो किंवा सर्व प्राणीमात्रांचा संहार करतो म्हणून ह्याला काल असे म्हणतात .

त्या संवत्सरस्वरुप अशा कालाचे , भगवान सूर्यनारायण , आपल्या गतिमुळे निमेष ( डोळ्याचे पाते लवण्याचा काळ ), काष्ठा , कला , मुहूर्त , अहोरात्र , पक्ष , मास , ऋतु , अयन , संवत्सर व युग ह्याप्रमाणे भाग पाडतो .

त्यात एक लघु अक्षर उच्चारण्याला जो काळ लागतो त्याला " निमेष " असे म्हणतात . पंधरा अक्षिनिमेषे म्हणजे एक कला , वीस पूर्णांक एक दशांश कला म्हणजे एक मुहूर्त , ( दोन घटका ) तीस मुहूर्त म्हणजे एक अहोरात्र , पंधरा अहोरात्री म्हणजे एक पक्ष . ( त्याचे दोन प्रकार , एक शुक्ल व एक कृष्ण ). असे दोन पक्ष म्हणजे एक महिना ( असे महिने माघादि बारा आहेत . ) ऋतु सहा , त्यांची नावे - शिशिर , वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरद व हेमंत . त्यापैकी माघ - फाल्गुन शिशिर - ऋतु , चैत्र - वैशाख वसंतऋतु , ज्येष्ठ - आषाढ ग्रीष्मऋतु , श्रावण - भाद्रपद वर्षाऋतु , आश्विन - कार्तिक शरदऋतु , मार्गशीर्ष - पौष हेमंतऋतु .

हे सहा ऋतु शीत ( थंडी ), उष्ण ( उन्हाळा ) व वर्षा ( पावसाळा ) अशा तीन लक्षणांचे असतात .

चंद्र व सूर्य ह्यांच्या योगाने कालाचे विभाग होत असल्याने दक्षिण व उत्तर अशी दोन अयने एका वर्षामध्ये होतात त्यात दक्षिणायनात वर्षा , शरद व हेमंत ऋतु येतात . ह्या तीन ऋतूत चंद्र बलवान असतो . आणि आम्ल , लवण व मधुर हे रस बलवान असतात व या तीन ऋतूंत सर्व प्राणिमात्रांचे बळ उत्ररोत्तर वाढत असते .

उत्तरायण हे शिशिर , वसंत व ग्रीष्म ह्या तीन ऋतूंत असते . ह्या तीन ऋतूंत सूर्य बलवान असतो . त्यामुळे कडु , तुरट व तिखट हे रस बलवान असतात . ह्या तीन ऋतूंत सर्व प्राणिमात्रांच्या बळाला उत्तरोत्तर कमीपणा येतो ॥३॥७॥

चंद्र हा पृथ्वीला आर्द्र करितो ( भिजवितो . ) आणि सूर्य तिच्यामधील रसांचे शोषण करितो ( तिला कोरडी करितो . ) ह्या उभयतांचा आश्रय करुन वायु हा लोकांचे रक्षण करितो ॥८॥

दोन अयने एकामागून एक याप्रमाणे पुरी झाली म्हणजे एक संवत्सर ( वर्ष ) पूर्ण होतो . असे पांच संवत्सर झाले म्हणजे त्या कालखंडाला युग म्हणतात . ( हे युग कृतत्रेतादिकांपैकी नव्हे ). ह्याप्रमाणे निमेषापासून पंचवर्षात्मक युगापर्यंतचा काल हा चक्रगतिप्रमाणे पुनःपुनः फिरुन येतो , म्हणून याला कित्येकजण कालचक्र म्हणतात ॥९॥

दोषांचे संचय , प्रकोप व शमन ह्या करणपद्धतीच्या दृष्टीने पहाता आपल्या देशात प्रस्तुतकाली वर्षा , शरद , हेमंत , वसंत , ग्रीष्म व प्रावृट , असे सहा ऋतु होतात . ते भाद्रपदादि दोन दोन महिन्याने होतात . ते असेः - भाद्रपद - आश्विन हा वर्षाऋतु , कार्तिक - मार्गशीर्ष हा शरदऋतु , पौष - माघ हेमंतऋतु , फाल्गुन - चैत्र हा वसंतऋतु , वैशाख - जेष्ठ हा ग्रीष्मऋतु आणि आषाढ - श्रावण हा प्रावृटऋतु . ह्या विभागात संशोधनाच्या सोईसाठी शिशिरऋतु कमी करुन वर्षाचे ( पावसाळ्याचे ) दोन विभाग केले आहेत . प्रावृट ( अति पावसाळा ) व वर्षा .

वर्षाऋतत औषधी ( भाजीपाला वगैरे ) तरुण ( रसभरीत ) म्हणजे नवीन असल्यामुळे अल्पवीर्य ( कमी शक्तीची ) असतात , पाणी गढूळ असते व त्यात जमिनीवरील गदळ मिसळलेले असते , अशा औषधी व असले पाणी उपयोगात आणले जाते व ह्या काळात आकाश मेघांनी व्याप्त असते , जमीन ओली असते व मनुष्याच्या शरीरातही जलांश जास्त असतो . ह्या कारणामुळे गारठा व वात ह्यांच्या आधिक्याने जठराग्नि मंद होतो व त्यामुळे खाण्यात व पिण्यात येणार्‍या पदार्थाचा दुष्परिणाम झाल्यामुळे आम्लरस अधिक उत्पन्न होऊन ह्या ऋतूंत पित्ताचा संचय होतो .

पुढे हा पित्ताचा संचय शरदऋतूंत ज्यावेळी आकाशात अभ्रे फारशी येत नाहीत , व सूर्याच्या प्रखर किरणांनी चिखल वाळतो त्यावेळी पित्तजन्य व्याधी उत्पन्न करितो .

पुढे हेमंतऋतूत पावसाळा संपून गेल्यामुळे औषधी वीर्यवान ( पूर्ण सत्वांशयुक्त ) व बलयुक्त होतात . पाणी स्वच्छ होते , तसेच ते स्निग्ध व अतिशय जड होते . त्यांचा उपयोग केल्यामुळे पित्तदोष कमी होत जातो ; पण ह्या ऋतूत सूर्याचे किरण मंद असते . वारा जलकण युक्त असल्याने ( जलाशय पूर्ण असतात त्यामुळे ) त्याच्या ठिकाणी शीतपणा असतो . अशा प्रकारच्या हवापाण्यामुळे व अन्नामुळे जे देहाचे पोषण होते , त्यात अविदग्धतेमुळे ( चांगले पचन न झाल्यामुळे ) स्निग्धता शैत्य , जडत्व व उपलेप ( आमदोष आतड्यांस चिकटून राहणे ) ह्या कारणांनी ह्या ऋतूत कफ संचित होतो .

पुढे वसंतऋतूत सूर्याच्या वाढत्या उष्णतेने पातळ झाल्यामुळे प्रकुपित झालेला कफ स्थूल व व्यायाम न करणार्‍या माणसाला कफजन्य रोग उत्पन्न करितो .

पुढे ग्रीष्मऋतूत त्या औषधी निःसत्व , अतिशय रुक्ष व हलक्या होतात . पाणीही त्याचप्रमाणे हलके परंतु रुक्ष असते . अशा अन्नपाण्याचा उपयोग केला व सूर्याच्या प्रखर उष्णतेने देहालाही शुष्कपणा ( कोरडेपणा ) येतो ( जलांश कमी होतो ), त्यामुळे शरीरात रुक्षता , हलकेपणा व विशदपणा ( ढिलेपणा ) वाढून वायूचा संचय करितात .

तो संचय प्रावृषकालात ( आषाढ व श्रावण मासात ) जमीन अतिशय भिजून दलदलित झाल्यामुळे ज्याच्या शरीरात जलांश जास्त आहे अशा मनुष्याच्या शरीरात गारठा , वारा व पाऊस ह्यांच्या योगाने प्रकुपित झालेला वायु वातरोग उत्पन्न करितो .

ह्याप्रमाणे हा वातादि दोषांचा संचय व प्रकोप ह्या ह्यांचा हेतू ( कारण ) सांगितला ॥१०॥

त्यात वर्षाऋतु व ग्रीष्मऋतु ह्या तीत ऋतूत क्रमाने संचित होणारे पित्त , कफ व वात हे दोष क्रमानेच शरदऋतूत , वसंत व प्रावृष ह्या ऋतूत प्रकुपित होतात , म्हणून त्या त्या वेळेस ( विरेचन पित्तासाठी , वमन कफासाठी व बस्ति वातासाठी हे शोधनप्रयोग योजून ) त्या दोषाचे शमन करावे . त्यात पित्ताकरिता मार्गशीर्षात रेचक घ्यावे . कफाकरितां चैत्रात वमन व वातासाठी बस्ति हे प्रयोग करावे ॥११॥१३॥

पित्तप्रकोपाने होणारे व्याधि हेमंतऋतूंत , कफ प्रकोपाने होणारे ग्रीष्मऋतूंत आणि वातप्रकोपामुळे होणारे व्याधि शरदऋतूंत स्वभावतःच ( आपोआप ) त्यांचा त्या ( दोघांचा ) जोर कमी असल्यामुळे शांत होतात ॥१४॥

ह्याप्रमाणे हे संचय , प्रकोप व उपशम हे सांगितले .

आता दिवसांमध्ये ऋतूंचे विभाग असे ते पूर्वाण्ही ( प्रातःकाळी ) वसंतऋतुसारखे हवेचे लक्षण असते . मध्य दिवस ग्रीष्माचे लक्षण असते . अपहराण्हकाळी प्रावृषकाळाचे लक्षण असते . प्रदोषकाळी ( सायंकाळी दिवस मावळल्यावर ) वर्षाऋतुंचे , मध्यरात्री शरदऋतूंचे आणि पहाटे हेमंतऋतूंचे लक्षण असते असे जाणावे . ह्याप्रमाणे अहोरात्रीमध्ये हिवाळा , उन्हाळा व पावसाळा हेही काळ असतात . व त्यांना अनुसरुनच एका वर्षातील कालप्रमाणे एका दिवसाचे चय , प्रकोप व प्रशम ( शांति ) हे असतात ॥१५॥

जर ऋतुप्रमाणे योग्य ते हवामान असले तर त्या त्या ऋतुंत होणार्‍या औषधी ( खाण्यापिण्याचे पदार्थ ) त्याही विकाररहित चांगल्या असतात व पाणीही आरोग्यकारकच असते . त्यामुळे त्यांचे सेवन केले असता प्राण , आयुष्य , शक्ति , वीर्य व ओज ह्यांची वाढच करितात .

परंतु अनेक दुप्पट ( न दिसणार्‍या ) कारणांमुळे ऋतुमध्ये विपरीतपणा उत्पन्न झाला असता त्या बिघाडामुळे औषधी ( धान्ये , भाज्या वगैरे ) व पाणीही बिघडते . अशा अन्नपाण्याचा खाण्यापिण्यात उपयोग केला असता नानाप्रकारचे रोग उद्भवतात . किंवा प्राणहारक अशा भयंकर रोगाच्या सांथी उत्पन्न होतात ॥१६॥१९॥

अशा वेळी त्या बिघडलेल्या हवेचा परिणाम ज्यावर झालेला नाही अशी धान्ये वगैरे पूर्वी संचित ( साठवलेली ) करुन ठेवलेली ( जुनी ) सेवन करावी व पाणीही त्या हवेचा परिणाम झालेले ( बिघडलेले ) घेऊं नये , आरोग्यकारक असेल ते घ्यावे .

ऋतुमानाप्रमाणे हवापाणी , औषधी वगैरे योग्य आरोग्यकारक असूनही ( राक्षसी ) कृत्यांनी किंवा दुष्प्रवृत्ती किंवा गुरु , सत्पुरुषांचे शोषण , राक्षसादिकांचे क्रोध किंवा देशांतील अधर्म इत्यादि कारणांनी उत्पन्न होणार्‍या अरिष्टाने देशच्या देध उध्वस्त होतात .

तसेच विषारी वनस्पतीच्या फुलावरुन येणारा वास त्या फुलांचा वाज घेऊन ज्या ज्या देशांत ( भागांत ) जाईल त्या त्या ठिकाणी तेथील लोकांच्या प्रकृति व दोष ह्यांच्या विरुद्ध गुणामुळे खोकला , श्वास , ओकारी , पडसे , मस्तकपीडा व ज्वर ह्या विकारांनी लोक पीडित होतात , अथवा ग्रहनकक्षत्रांच्या वक्रगतीनेही देशात आजार उत्पन्न होतात ॥२०॥

किंवा गृह ( वसतिस्थान ) चांगले नसल्याने , स्त्री , शयनस्थान , बसण्याची जागा , गाडी वगैरे प्रवासाची साधने , घोडे वगैरे वाहने ( यांनी दळणवळण जास्त वाढल्याने ) मणी , रत्ने वगैरे दुसरेही अन्य पदार्थ हे योग्य त्या शुभलक्षणाचे नसून अशुभ लक्षणाचे असल्यास ( हे सर्व नसून ह्यांतील प्रमुख असा एकादा जरी अशुभ असला तरी ) ते आरोग्य बिघडवितात म्हणजे त्यानेही रोग उत्पन्न होतात .

अशा वरील कारणांनी ( साथीचे ) रोग झाले असता प्रथमतः ते स्थान सोडावे . रोग हटविण्याचे प्रयोग करावे . शांतिकर्म ( होमहवनादि कर्म , ) अधर्मादि आचरणार्थ प्रायश्चित्त , मंगलकर्म ( रत्नादिधारण , ) जप , होम , बळी , यज्ञ , देवास शरण जाणे , नमस्कार करणे , तपश्चर्या , नियमधर्म , दया , दान देणे , देवाच्या उपासनेची दीक्षा घेणे किंवा गुरुमंत्र घेणे , गुरुची आज्ञा पाळणे , देव , ब्राह्मण व गुरु ह्यांच्या सेवेविषयी तत्पर राहणे अशा प्रकारे वागले असता कुशल प्राप्त होते ॥२१॥

आता ह्यापुढे अव्यापन्न म्हणजे निर्दोष व आरोग्यकारक अशा ऋतुंची लक्षणे सांगतो ॥२२॥

हेमंतऋतु लक्षण

हेमंतऋतूत उत्तरेकडून थंडगार वारा वाहतो . धूळ व धुके ह्यांनी दिशा व्याप्त असतात . ( सकाळी धुके असते व दोन प्रहरी वारा सुटतो तेव्हा धूळ असते . ) तुषारांनी ( धुक्यानं ) सूर्य आच्छादित असतो आणि जलाशयावर पाणी गोठून त्याची साय धरते त्यामुळे ते बर्फयुक्त होतात . ह्या ऋतूत कावळे , गेंडे , रेडे , मेंढरे व हत्ती हे प्राणी पुष्ट मत्त होतात . आणि लोध्र , गहुला , पुन्नाग ह्यांना फुलांचा भार येतो . ( हेमंताचे हे लक्षण हिमालयाजवळील भागातले आहे ॥२३॥२४॥

शिशिरऋतु लक्षण

शिशिरऋतुत थंडी फार असते . वारा व पाऊस मधून मधून पडत असतो . बाकी हवामान हेमंतऋतूसारखे असते ॥२५॥

वसंतऋतु लक्षण

वसंतऋतूत सिद्ध , विद्याधरादिकांच्या स्त्रियांच्या पायाच्या आलक्तकाने ( आळित्याने ) आरक्तवर्ण पावलांची चिन्हे उमटली आहेत . अशा मलयपर्वतावरील चंदनाच्या झाडावरुन येणारा वारा त्या चंदनाच्या वासाने सुगंधित असा वाहतो . तो तरुण कामी जनांना आनंददायक व कामप्रदीपक होतो . त्यामुळे तरुण दांपत्य आपला मानीपणा सोडतात . ह्या ऋतूत वारा दक्षिणेकडून वाहतो . ह्या ऋतूत दिशा निर्मळ असतात . आणि पळस , कमलिनी , बकुळवृक्ष , आम्रवृक्ष व अशोक ह्यांना फुलांचा भार आल्यामुळे त्यांच्या योगाने वने शोभायमान दिसतात , कोकीळ व भुंगे ह्यांच्या मंजुळ शब्दांनी गात असल्यासारखे ते वृक्ष मनोहर दिसतात . तसेच दक्षिणेच्या वार्‍याने युक्त व नवीन पालवीने सुशोभित झालेले ते वृक्ष सुप्रसन्न दिसतात ॥२६॥२९॥

ग्रीष्मऋतु लक्षण

ग्रीष्मऋतूत सूर्याचे तेज ( ऊन ) फार प्रखर असते . वारा नैऋत्य दिशेकडून वाहात असतो , तो सुखकारक होत नाही . कडक उन्हाने धगधगीत असतो . जलाशय निर्जल झाल्याने चक्रवाक पक्ष्यांची जोडपी भांबावल्यासारखी होतात . हरणे वगैरे तहान लागल्यामुळे पाण्यासाठी व्याकूळ होतात . गवते व वेली वाळून कोळ होतात व वृक्षांची पाने गळतात ॥३०॥३१॥

प्रावृषणकाल लक्षण

प्रावृष कालात पश्चिमेचा वारा सुटतो , त्यामुळे विजेच्या कडकडाटाने व पावसाने युक्त अशा मेघांनी आकाश व्याप्त असते . कोवळे गवताचे अंकूर व इंद्रगोपकीटक ( मखमली किडे ) ह्यांनी जमीन व्याप्त असते . कळंब , धुलीकळंब , कुडा , राळेचे वृक्ष व केवडा ह्यांना फुलांचे भार येतात , त्यामुळे एक प्रकारची शोभा दिसते ॥३२॥३३॥

वर्षाऋतु लक्षण

वर्षाऋतूत नद्या पाण्याने भरुन जोराने वाहतात व त्यामुळे त्यांच्या काठचे वृक्ष उमळून पडतात , तळी पाण्याने भरल्यामुळे त्यातील तांबडी व निळी कमळे प्रफुल्लित होतात , त्यामुळे त्यांना शोभा येते , जमिनीवर पुष्कळ धान्य उगवते , त्यामुळे सपाट जमीन व खळगा ह्यांचा बोध होत नाही , मेघ फारशी गर्जना न करता पाऊस पाडत असतो व सूर्य आभ्राच्छादित असतो ॥३४॥३५॥

शरदऋतु लक्षण

शरदऋतूत सूर्याचे तेज फार उष्ण असते व तो पिवळट असतो . आकाश हे निर्मळ असते , मधून मधून पांढरे ढग येतात , तसेच सरोवरेही कमळे व हंसपक्षी ह्यांच्या योगाने सुशोभित दिसतात . जमीन समान असेल तेथे झाडांनी व्याप्त असते . आम्रवृक्ष , सातवीण , सुपारीची झाडे , दर्भ , आसाणा वगैरे वृक्षांनी जमीन सुशोभित दिसते ॥३६॥३७॥

ऋतुसंबंधी रोगांची कारणे व उपाय

कोणत्याही ऋतूतील हवामान त्याच्या नित्याच्या लक्षणापेक्षा अतिशय वाढले असता तसेच नित्यापेक्षा विपरीत म्हणजे हीन ( कमी ) झाले असता किंवा विषम म्हणजे ऋतूला सोडून भलतेच - जसे थंडीचे दिवसात पाऊस व उन्हाळ्यात थंडी अशा विषम प्रकारचे - झाले तर ह्या तीनही कारणांनी मनुष्यप्रकृतीत दोषांचा प्रकोप होतो .

म्हणून त्या प्रकोपाने विकार होण्यापूर्वीच वसंतऋतूत वमनाने ( उलटीवाटे ) कफदोष काढून टाकावा . शरदऋतूत विरेचनाने ( जुलाबावाटे ) पित्त नाहीसे करावे व वर्षाऋतूत बस्तिप्रयोगाने ( एनिमा ) वाताचे शमन करावे ॥३८॥३९॥

अध्याय सहावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP