मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
आतुरोपक्रमणीय

सूत्रस्थान - आतुरोपक्रमणीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय पस्तिसावा

आता ‘‘आतुरोपक्रमणीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

रोग्याला औषधोपचार करून बरा करण्याची इच्छा करणार्‍या वैद्याने रोग्याच्या आयुष्याची प्रथम परीक्षा करावी . जर तो दीर्घायु असेल तर मग रोग ऋतु (काल ) रोग्याचा जठराग्नी वय , शरीरसामर्थ्य , सत्त्व (कष्टादि ) सोसण्याचे (सामर्थ्य ), सात्म्य , प्रकृति , औषध व देश ह्यांची बारकाईने परीक्षा (चौकशी ) करावी ॥३॥

हात , पाय , कुशी , पाठ स्तनांची अग्रे , दात , तोंड , खांदे व कपाळ हे अवयव विशाल असणे , बोटांची पेरे लांब असणे , श्वासोच्छ्वास दीर्घ असणे , नजर लांब असणे , बाहु लांब असणे , भुंवया विस्तीर्ण असणे , दोन्ही स्तनांमधील भाग रुंद असणे , छाती विशाल असणे , पिंढर्‍या , लिंग व मान आखूड असणे , मन गंभीर असणे , आवाज गंभीर असणे , नाभी खोल असणे , स्तन फार उचललेले नसून जागच्या जागी स्थिर असणे , कान मोठे पुष्ट असून केसयुक्त असणे , मस्तकाच्या मागील मानेकडील भागावर भोवरा असणे , स्नान करून गंध लेपन केल्यावर आधी मस्तकांचे गंध वाळल्यावर मग क्रमाने बाकीच्या अवयाचे शेवटी हृदयाचे गंध ज्याचे शुष्क होते असा , ही लक्षणे ज्या पुरुषाच्या ठिकाणी दिसून येतील तो दीघायु आहे असे समजावे . अशा मनुष्याला वैद्याने दृढनिश्चयाने (आपणास खात्रीने यश येणार ह्या भावनेने ) औषधोपचार करावे .

ह्या लक्षणांच्या उलट लक्षणे असली तर तो अल्पायु आहे असे समजावे . आणि मिश्र लक्षणे आढळली तर मध्यमायु आहे असे समजावे ॥४॥

ज्याचे सांधे , शिरा , स्नायु , वगैरे अंगाच्या मांसल भागांत मुजले असल्यामुळे दिसत नाहीत , अंग गुटगुटीत (पुष्ट ) आहे , इंद्रिये बळकट आहेत , पायापासून उत्तरोत्तर वरती मस्तकापर्यंत ज्याच्या शरीराची ठेवण फारच मनोहर आहे , तो मनुष्य दीर्घायु आहे असे समजावे . गर्भावस्थेत असल्यापासून जो निरोगी आणि क्रमाक्रमाने ज्याचे शरीर , ज्ञान (तत्त्वज्ञान ) व विज्ञान (व्यवहारिक चातुर्य ) ह्यांची वाढ होत आहे , थोडक्यात सांगावयाचे म्हणजे तोही दीर्घायु समजावा .

आता मध्यममायु पुरुष कसा ओळखावा तो मी सांगतो ते ऐक . ज्याच्या डोळ्याच्या खाली स्पष्ट दिसणार्‍या व लांबट अशा दोनतीन अगर अधिक रेषा आहेत , पाय व कान मांसल (पुष्ट ) आहेत , नाकाचा शेंडा वर उचलेला आहे , पाठीवर उभ्या रेषा आहेत , ही लक्षणे ज्या पुरुषाला दिसत आहेत त्याच्या आयुष्याची परमावधी सत्तर वर्षे समजावी .

आता अल्पायु , ओळखण्याची लक्षणे मी सांगतो ती ऐक . ज्याच्या हातापायांची व बोटांची पेरी आखूड आहेत व लिंग फार मोठे आहे , ज्याच्या छातीवर केसात भोवरे आहेत , ज्याची पाठ विस्तृत नाही , कान हे आपल्या स्थानापेक्षा उंच आहेत , नाकही बरेच वर आलेले आहे , हसताना किंवा बोलताना ज्याच्या दातांच्या वरच्या हिरड्या दिसतात , आणि जो भ्रांतिष्टतासारखे पहात असतो त्याचे आयुष्य पंचवीस वर्षेपर्यंत आहे म्हणून समजावे ॥५ -११॥

१२ ) आणखी पुनःआयुष्याचे ज्ञान होण्याकरिता सर्वांग व त्याचे अवयव ह्यांचे प्रमाण व सार (सत्ववादि पदार्थ ) ह्यांची माहिती सांगतो . शरीराचा गळ्यापासून कमरेपर्यंतचा भाग म्हणजे शरीराचा मध्यभाग (अंकराधि ) कमरेपासून पायांच्या बोटापर्यंतचा भाग (सक्थि ) बाहु (हात ) व शिर ह्यांना अंग अशी संज्ञा आहे . आणि त्यांचे जे अवयव त्यांना प्रत्यंगे म्हणतात .

त्यापैंकी पायाचा आंगठा व त्याच्या जवळचे बोट ही नखाच्या भाग सोडून स्वतःच्या अंगुळाने दोन अंगुळे लांब असावी . आंगठ्याजवळच्या बोटापासून करंगळीपर्यंतची बाकची तीन बोटे एकाहून एक उत्तरोत्तर त्याच्या त्यांच्या पाचव्या हिश्शाने लहान असावी . म्हणजे आंगठ्या जवळच्या बोटाहून त्याच्या शेजारचे पुढचे (मधले ) बोट पाचव्या हिश्शाने लहान ह्या रीतीने बाकीची असावी . पायाच्या अग्रभाग (चौडा ) चार अंगुळ लांब व पाच अंगुळे विस्ताराचा असावा . त्याचप्रमाणे पायाचा मध्यभाग (तळवा ) ही असावा . पायाची खोट (टाचेकडील भाग ) पाच अंगुळे रुंद असावी . एकंदर पायाची लांबी ज्याच्या त्याच्या बोटांनी चौदा बोटे असावी . पायाच्या मध्यभागाचा , घोट्याच्या भागाचा , पिंढरीचा व गुडघ्याचा घेर चौदा अंगुळे असावा . पिंढरीची लांबी अठरा अंगुळे लांब असावी . गुडघ्याच्या सांध्यापासून तो कमरेच्या सांध्यापर्यंतच्या भागाची (मांडीची ) लांबी बत्तीस अंगुळे , एकूण पायापासून कमरेपर्यंत पन्नास अंगुळे लांबी समजावी . पिंढरीच्या लांबी इतकीच म्हणजे अठरा अंगुळे मांडी असावी . वृषणाचा विस्तार दोन अंगुळे असावा . तसेच खालच्या ओठाच्या खालील हनुवटीचा भाग (चिबुक ), हिरड्यांसह दात , दोन्ही नाकपुड्यांचा प्रत्येकीचा बाह्यभाग , प्रत्येक कानाचा गड्डा आणि दोन्ही डोळ्यांमधील अंतर ह्या प्रत्येकाचा विस्तार दोन अंगुळे असावा . लिंगाची लांबी (उत्थानाशिवाय ) चार अंगुळे असावी . तोंड पसरले असता त्याच्यामधील पोकळीचा विस्तार चार अंगुळे असावा . नाकाची दांडी चार अंगुळे लांब असावी . कानाचा विस्तार व कपाळाची रुंदी चार अंगुळे असावी मानेची उंची चार अंगुळेच असावी . दोन्ही डोळ्यामधील बाहुलीचे अंतर चार अंगुळे असावे . योनीचा विस्तार बारा अंगुळे असावा . शिस्नापासून नाभीपर्यंत मधील अंतर बारा अंगुळे असावे . तसेच नाभीपासून हृदय व हृदयापासून गळा ह्या प्रत्येकामधील अंतर बारा अंगुळे असावे . दोन्ही स्तनांमधील अंतर बारा अंगुळे असावे . हनुतटीपासून कपाळापर्यंत एकंदर तोंडाची लांबी बारा अंगुळे असावी . मनगट व प्रकोष्ठ (मनगटाच्या वरचा स्थूलभाग ) ह्यांचा घेरा बारा अंगुळे असावा . इंद्रबस्ति पिंढरीचा मध्यभाग , खांदे व कोपर ह्यांमधील अंतर सोळा अंगुळे असावे . हातांचे प्रमाण चोविस अंगुळे , (वर पिंढरीचा मध्य चौदा अंगुळे सांगितला आहे तो घोट्याच्या वरचा भाग समजावा .) दंडाचा घेर बत्तीस अंगुळ असावा . (हे प्रमाण व वरील मनगट व प्रकोष्ठ ह्यांचे सांगितलेले प्रमाण यथोक्त दिसत नाही .) मांड्य़ांचा घेरही बत्तीस अंगुळे असावा मनगट व कोपर ह्यांतील अंतर सोळा अंगुळे असावे तळहात चार अंगुळे रुंद व सहा अंगुळे लांब असावे . आंगठ्याचे मूळ व प्रदेशिनी (आंगठ्या जवळचे बोट ) ह्यांमधील अंतर पाच अंगुळे असावे . कानाचे छिद्र व डोळ्याचा कोपरा ह्यामधील अंतर पाच अंगुळे असावे . मधले बोट पाच अंगुळे लांब असावे तर्जनी व अनामिका ह्यांची लांबी साडेचार अंगुळे असावी . आंगठा व करंगळी ह्यांची लांबी साडेतीन अंगुळे असते . तोंडाचा विस्तार व मानेचा घेर चोवीस अंगुळे असावा . एक पूर्णांक तीन चतुर्थांश अंघुळ विस्ताराची नाकपुडी (आतील भाग ) असते . डोळ्याच्या तीन भागाइतका (दोन यवाइतका ) घेर डोळ्यातील बाहुलीचा असतो . काळ्या बुबुळाच्या नवव्या हिश्शाने दृष्टिमंडळ असते . दोन्ही अंतरापासून मस्तकाच्या मध्यभागाच्या भोवर्‍यातील केसापर्यंत मस्तकाचे अंतर अकरा अंगुळे , असावे मस्तकाच्या मध्यापासून मागे मानेवरील केसाच्या शेवटपर्यंत अंतर दहा अंगुळे असावे . मानेकडील बाजूने दोन्ही कानाचे अंतर चौदा अंगुळे असते . पुरषाची छाती बारा अंगुळे लांब असावी व तेच प्रमाण स्त्रियांच्या श्रोणीचे (म्हणजे नाभीखालील भागाचे ) असावे . स्त्रियांच्या उराच्या लांबीचे प्रमाण अठरा अंगुळे असावे व तितकीच रुंद पुरुषाची कंबर असावी . एकंदर मनुष्याच्या शरीराच्या उंचीचे प्रमाण एकशेवीस अंगुळे असावे ॥१२॥

पुरुषाच्या वयाला पंचवीस वर्षे झाली म्हणजे त्याच्या रसादि धातु व सर्व शरीर पूर्ण अवस्थेला पोहोचते व शुक्रही पूर्ण अवस्थेला येते . त्याचप्रमाणे स्त्रीच्या वयाला सोळा वर्ष पूर्ण झाली म्हणजे तिच्याही शरीरातील सर्व रसादि धातु व शरीर पूर्ण अवस्थेस येते व शुक्रही पूर्णावस्थेप्रस्थेप्रत येते असे कुशल वैद्याने जाणावे . spaceप्रत्येक मनुष्याच्या स्वतःच्या अंगुळाने हे एकंदर देहाचे व त्याच्या अवयवांचे मान सांगितले आहे .

हे जे वर शरीराचे एकंदर प्रमाण सांगितले आहे , त्याप्रमाणेच जर पुरुष किंवा स्त्री ह्यांपैकी कोणाचीही शरीराची ठेवण असेल तर तो दीर्घायु असतो आणि त्याला संपत्तीही प्राप्त होते . ही लक्षणे जर मध्यम प्रमाणाने असतील तर तो मध्यमायु असतो व त्याला द्रव्यही मध्यम प्रमाणानेच मिळते तसेच ही लक्षणे जर कनिष्ठ दर्जाची असली तर तो अल्पायु व द्रव्यहीन असतो ॥१३ -१५॥

आता सार (सत्त्व विशेष ) ह्याविषयी सांगतो . (१ ) स्मरणशक्ती , देवब्राह्मणाविषयी आदरबुद्धि (भक्ति ), बुद्धि , शौर्य (पराक्रम , धाडस ) पवित्रपणा , आणि आपले कल्याण होण्याविषयी नेहमी यत्न ह्या गोष्टी ज्या मनुष्याच्या ठिकाणी दिसून येतात तो ‘सत्त्वसार ’ (सत्वगुणप्रधान ) समजावा .

( २ ) ज्याची हाडे , दांत व नखे ही स्निग्ध , बळकट व शुभ्र असतात आणि ज्याला कामवासना व संतति विपुल असते तो मनुष्य ‘ शुक्रसार ’ ( शुक्रप्रधान ) समजावा . ( ३ ) जो शरीराने पुष्ट , उत्तम बलवान् , ज्याचा आवाज गोड पण भारदस्त असतो , जो सौभाग्य ( एैश्वर्य ), युक्त असतो व ज्याचे डोळे विशाळ असतात तो मनुष्य ( मज्जाप्रधान ) समजावा . ( ४ ) ज्याचे मस्तक व खांदे मोठे असतात आणि दात , हनुवटी , हाडे व नखे बळकट असतात तो ‘ अस्थिसार ’ मनुष्य समजावा . ( ५ ) ज्याचे मूत्र व घाम हे स्निग्ध ( तेलकटासारखे ) असतात , आवाजही स्निग्ध ( गोड ) असतो , शरीर स्थूल असते व ज्याला श्रम सहन होतात तो मनुष्य ‘‘ मेदसार ’’ समजावा . ( ६ ) ज्याच्या अंगाला कोठेही छिद्र ( खळ्या ) नाही ( म्हणजे पुष्ट ), ज्याची हाडे , सांधे हे जर वर दिसत नाहीत व सर्व शरीर मांसल असते तो मनुष्य ‘‘ मांससार ’’ समजावा . ( ७ ) ज्याची नखे आरक्तवर्ण व स्निग्ध आहेत , तसेच डोळे , टाळा , जीभ , ओठ व हातापायाचे तळवे ही स्निग्ध असून रक्तवर्ण ( तांबुस ) आहेत तो मनुष्य ‘ रक्तसार ’ समजावा . ( ८ ) ज्याच्या शरीराची ठेवण सुप्रसन्न ( शोभायमान ) असते , त्याचप्रमाणे त्वचा व अंगावरील केसहि मऊ असून सुशोभित असतात . तो मनुष्य ‘‘ त्वक्सार ’’ समजावा . ह्या आठ सारप्रधान मनुष्यामध्ये पूर्वीपूर्वीचा ( म्हणजे त्वक्सारापेक्षा रक्तसार व रक्तसारापेक्षा मांससार श्रेष्ठ ह्याप्रमाणे पूर्वीपूर्वीचा ) सारप्रधान मनुष्य श्रेष्ठ समजावा . ह्यावरून सत्वसार मनुष्य सर्वात श्रेष्ठ आहे व त्याच मानाने आयुष्य व सौभाग्य ह्यानेही ते असेच पूर्वीपूर्वीचे एकाहून एक श्रेष्ठ आहेत .

विशेषतः वर सांगितलेले अंग व प्रत्यंग ह्यांचे प्रमाण व सार ह्यांच्या अनुरोधाने शहाण्या वैद्याने आयुष्याची परीक्षा करून औषधोपचार करावे म्हणजे त्याला आपल्या प्रयत्नात यश प्राप्त होते ॥१६ -१७॥

रोगासंबंधी विशेष माहिती मागे ‘‘व्याधिसमुद्देशीय ’’ नावाच्या चोविसाव्या अध्यायांत सांगितली आहेच . ते सर्व रोग साध्य , याप्य व असाध्य अशा तीन प्रकारचे आहेत . अशा प्रकारचे हे जे रोग त्यांची पुनः हा रोग औपसर्गिक आहे की प्राक्केब आहे की अन्यलक्षण आहे अशा प्रकारे पुनः परीक्षा करावी . त्यापैकी औपसर्गिक व्याधि म्हणजे प्रथम उत्पन्न झालेल्या रोगानंतर काही दिवसांनी जो दुसरा रोग तो पहिला रोग असतानाच उत्पन्न होतो त्याला ‘‘औपसर्गिक रोग ’’ म्हणतात . ह्याला तो आधी झालेला रोग मूलभूत असल्यामुळे हा मागून झालेल्या रोगाला त्या पहिल्या रोगाचा ‘‘उपद्रव ’’ असे म्हणतात .

जो रोग होण्यापूर्वी त्याचे पूर्वचिन्ह काही एक होत नाही व त्याचे उपद्रवसंज्ञक अन्य विकारही काही नसतात . त्यांना ‘‘प्राक्केवलव्याधि ’’ असे म्हणतात . असे व्याधि म्हणजे तिलकालक , न्यच्छ वगैरे .

अन्यलक्षणव्याधि म्हणजे रोग पुढे होणार्‍या रोगाचे पूर्वरूप ह्या नात्याने आधी उत्पन्न होतो त्याला ‘‘अन्यलक्षणव्याधि ’’ किंवा पुढे होणार्‍या व्याधीचे पूर्वरूप असे म्हणतात .

त्यापैकी उपद्रवयुक्त जो रोग त्याजवर उपचार करिताना एकमेकांना विरोध येणार नाही म्हणजे एकावर उपचार केला असता दुसरा वाढणार नाही अशा बेताने उपचार

करावा . किंवा त्यापैकी मूळच्या रोगाहून उपद्रवाचाच जोर जास्त असेल तर आधी त्याजवर उपचार करावे .

प्राक्कैवलव्याधि असल्यास त्याजवर योग्य वाटतील ते उपचार करावे .

अन्यलक्षणरोगावर उपचार करण्यापूर्वी , प्रथम पूर्वरूपसंज्ञक जो रोग उत्पन्न झाला असेल त्याचाच आधी प्रतिकार करावा ॥१८॥

वातादिदोषांचा संबंधाशिवाय रोगच होत नाही , म्हणून चतुर वैद्याने एकाद्या रोगाची चिकित्सा नसली सांगितली तरी वातादिदोषांच्या लक्षणाच्या अनुरोधाने त्या रोगावर उपचार करावे ॥१९॥

ऋतुसंबंधी माहिती मार्ग ‘ऋतुचर्या ’ नावाच्या सहाव्या अध्यायात सांगितली आहे .

हिवाळा किंवा पावसाळ्यासंबंधी गारठा असल्यास त्या थंडीचा किंवा गारठ्याचा प्रतिकार करावा . त्याचप्रमाणे उन्हाळा असल्यास उष्णतेचे निवारण करून रोगावर योग्यवेळी अवश्य ते उपाय करावे , पण उपचाराची योग्य वेळ केव्हाही दवडू नये .

उपचाराची योग्य वेळ येण्यापूर्वी जर आधीच उपचार करण्यास सुरुवात केली किंवा उपचार करण्याची वेळ असून त्यावेळी उपचार केले नाहीत तर रोग साध्य असून देखील बरा होत नाही , तसेच क्षुल्लक दोष असता त्याजवर अतिशय जोरदार औषध देणे किंवा दोष फार वाढला असताना त्याजवर अगदी अल्प प्रमाणात औषध देणे ह्या क्रियेनेही रोग साध्य असून देखील बरा होत नाही .

जी औषधोपचारक्रिया अतिशय वाढलेल्या रोगाला शांत करिते व दुसरे , रोग होऊ देत नाही त्याच उपचारपद्धतीला (क्रियेला ) क्रिया म्हणजे उत्तम प्रकारची चिकित्सा म्हणावे . परंतु जी उपचारपद्धति किंवा चिकित्सा एक रोग बरा करिते व त्याबरोबरच दुसरा उत्पन्न करिते तिला क्रिया (चिकित्सा ) असे केव्हाही म्हणूं नये ॥२० -२३॥

अन्नाचे पचन करणारा पाचक अग्नि मागे ‘‘व्रणप्रश्नीय ’’ नावाच्या एकविसाव्या अध्यायात सांगितलाच आहे तो चार प्रकारचा आहे . कारण एकच अग्नि खरा , पण तो वातादिंदोषांनी व्याप्त झाला असता त्याच्या मध्ये बिघाड होऊन तो वातदोषाने विषम , पित्तदोषाने तीक्ष्ण व कफदोषाने मंद असा तीन प्रकारचा होतो . आणि चौथा सर्व दोषांच्या साम्य अवस्थेमुळे सम असा चार प्रकारचा होतो . त्यापैकी जो वेळच्या वेळी योग्य त्या प्रमाणात खाल्लेले अन्न चांगले पचन करितो तो ‘‘समअग्नि ’’ समजावा . हा वातादि दोषांचे साम्य आहे तोपर्यंतच ‘‘सम ’’ असतो , जो अग्नि वायुचा संबंध नसता अन्नाचे चांगले पचन करितो आणि वाताच्या संबंधामुळे त्याचे विभाग होऊन कोठ्यांत इकडे तिकडे पसरले म्हणजे त्याची एकांतत्वशक्ति विभागल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होत नाही व ते होताना पोट फुगणे पोटांत दुखणे , ढेकर येणे , अतिसार , पोटाला जडत्व , आतड्यात गुडगुडणे व कुंथण्याच्या वेणा येणे हे उपद्रव होतात त्याला विषमाग्नि म्हणतात . हा वातप्रकोपाने होतो . पुष्कळ अन्न खाल्ले तरी ते सर्व पचन करून टाकतो त्याला ‘‘तीक्ष्णाग्नि ’’ असे म्हणतात . हाच तीक्ष्णाग्नि पित्तप्रकोपामुळे फारच वाढला असता त्याला ‘‘अत्याग्नि ’’ असे म्हणतात . (ह्याचे दुसरे नाव ‘‘भस्मक ’’ असे आहे .) तो वरचेवर पुष्कळ अन्न खाल्ले तरी फार जलद पचन करितो . आणि सर्व अन्न पचन झाले म्हणजे घसा , टाळा ह्यांना कोरडे पडते , ओठ वाळतात , अंगाचा दाह होतो व ज्वर किंवा अंग संतप्त होणे हे विकार उत्पन्न करितो अगदी थोडे अन्न खाल्ले तरी देखील ते पचन करिताना पोटाला जडत्व मस्तकाला जडत्व , खोकला , श्वास , मळमळणे , ओकारी , अंग गळाल्यासारखे होणे वगैरे विकार होतात व ते पचन होण्याला फारच काळ लागतो , त्याला ‘‘मंदाग्नि ’’ असे म्हणतात .

विषमाग्नि वातजन्य रोग उत्पन्न करितो , तीक्ष्णाग्नि पित्तजन्य रोगांना उत्पन्न करितो , तीक्ष्णाग्नि पित्तजन्य रोगाना उत्पन्न करितो , आणि मंदाग्नि कफजन्य रोगाना उत्पन्न करितो .

ह्या अग्नीच्या चार अवस्थांपैकी जो ‘‘समअग्नि ’’ तो तसाच समच राहील अशाविषयी यत्न करावा . विषमाग्नि असल्यास स्निग्ध आंबट व खारट अशा रसानी युक्त अशा औषधांची विशेषतः योजना करावी .

तीक्ष्णाग्नीवर गोड , स्निग्ध व थंड असे उपचार करावे व रेचकाचीही योजना करावी . हेच उपाय ‘‘अत्यग्नि ’’ वरही योजावे . त्यात विशेषतः अत्यग्नीवर म्हशीचे दूध , दही व तूप ह्यांची योजना असावी . मंदाग्नि असता तिखट , कडु व तुरट अशा औषधांची योजना करावी व वमनही करवावे .

प्रत्येक प्राणिमात्राच्या उदरांत वास करणारा हा भगवान् जठराग्नि साक्षात् ईश्वरच आहे . हाच अन्नाचे पचन करितो , व त्यातील मधुरादि रसांचे ग्रहण करितो . हा फार सूक्ष्म असल्यामुळे त्याचे स्वरूप मनुष्याला जाणता येत नाही . तथापि त्याच्या कार्यावरून अनुमानाने त्याचे अस्तित्व सिद्ध होते .

प्राणवायु , अपानवायु व समानवायु हे आपापल्या मार्गावर व्यवस्थित असले म्हणजे त्यापैकी प्राण व अपान हे दोन वायु जठरामध्ये सर्व बाजूंनी अग्नीला प्रज्वलित राहण्यास मदत करितात , म्हणजे त्याला प्रज्वलित करितात ; आणि समानवायु हा त्याचे रक्षण करितो ॥२४ -२८॥

बाल्यावस्था , मध्यमावस्था व वृद्धावस्था असे वयाने तीन प्रकार आहेत . मुलाचे वय पूर्ण पंधरा वर्षे होईपर्यंतचे वय ती बाल्यावस्था . ह्या बाल्यावस्थेत पुनः तीन भेद आहेत . एक केवळ आईच्या अगर दाईच्या अंगावरील दुधावर असणारे , दुसरे अंगावरील दूध पिऊन अन्न खाणारे , आणि तिसरे केवळ अन्न खाणारे . त्यापैकी जन्मापासून एक वर्ष पूर्ण वय होईपर्यंतची जी मुले ती केवळ अंगावरील दुधावरच असतात . दोन वर्षे वय पूर्ण होईपर्यंतची मुले अंगावरील दूध पिऊन अन्नही खातात . आणि त्यापुढील तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतची मुले केवळ अन्नाच्याच आहारावर असतात . सोळा वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतचे जे वय त्याला मध्यवय असे म्हणतात . त्या मध्यवयाचे वृद्धी , यौवन , सपूर्णता व हानि असे चार भेद आहेत . वयाच्या वीस वर्षांपर्यंत वृद्धि , तीस वर्षापर्यंत यौवन , चाळीस वर्षांपर्यंत संपूर्णता . (ह्या अवस्थेत शरीरातील धातू , इंद्रिये , व ळव वीर्य ह्यांना पूर्णावस्था येते .) त्यापुढील वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत ह्या इंद्रियादिकांना थोडा कमीपणा येतो . (म्हणून या वयाला हानि म्हटले आहे .) सत्तर वर्षाच्या पुढे प्रतिदिवशी रसादि धातु , इंद्रिये , बळ वीर्य व उत्साह जातो . अंगावरील त्वचेला सुरकुत्या पडतात , केस पांढरे होतात . डोकीला ह्यांचा ऱ्हास होत टक्कल पडते , (खालित्य ) खोकला , श्वास वगैरे वृद्धावस्थेतील उपद्रवानी मनुष्य बेजार होतो . त्याला कोणतेही काम करण्याची शक्ती नसते . आणि अखेर जीर्ण झालेले घर ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाने पडते त्याप्रमाणे ते जीर्ण शरीर पडते . ह्या सत्तर वर्षापुढील वयाला वृद्ध असे म्हणतात .

ह्या वयाच्या बालपणापासूनच अवस्था सांगितल्या , त्याना उत्तरोत्तर औषधचे प्रमाण वाढत्या प्रमाणात असते . ते वाढते प्रमाण चाळीस वर्षापर्यंत असते , पुढे सत्तर वर्षापर्यंत ते प्रमाण कायम असते व सत्तर वर्षानंतर सोळा वर्षाच्या आतील मुलाच्या मात्रेचे प्रमाण तारतम्याने ठेवावे . (ग्रंथांतरातील मात्रेचे प्रमाण जन्मातच पहिल्या महिन्यात औषध एक गुंज , दूध , तूप , साखर किंवा मधातून द्यावे पुढे प्रत्येक महिन्याला एक एक गुंज औषध अधिक द्यावे . ते एक वर्ष पूर्ण होईपर्यंत . त्यापुढे प्रत्येक वर्षाच्या मुलाला एक एक मासा वाढते प्रमाण पंधरा वर्षापर्यंत ठेवावे . सोळा वर्षापासून सत्तर वर्षांपर्यंत तेच प्रमाण राखावे . सत्तराच्यापुढे पुनः लहान वयाच्या औषधाचे प्रमाण ठेवावे .)  एक तोळा = ११ ग्रॅम
॥२९ - ३०॥

बालवयात (सोळा वर्षापर्यंत ) कफदोषाची वाढ असते , मध्यमवयात पित्त वाढत असते आणि वृद्धवयात वाताची वाढ असते . ह्याप्रमाणे वयाचा व दोषांचा विचार करून औषधयोजना करावी .

अग्निकर्म (डागणे ), क्षारप्रयोग , व ढाळक हे प्रयोग लहान मुले व वृद्ध माणसे ह्याजवर करू नयेत . करण्याची आवश्यकताच वाटली तर ते अगदी सौम्य प्रमाणात व हळु हळु करावे .

मनुष्याचे शरीर स्थूल , कृश , व मध्य असे तीन प्रकारचे असते , हे मागे ‘दोषधातुमलक्षयवृद्धीविज्ञानीय ’ नावाच्या पंधराव्या अध्यात सांगितले आहेच .

अतिस्थूल मनुष्याला ‘कर्षणचिकित्सा ’ करावी . कृश मनुष्याला बृहण (पौष्टिक ) चिकित्सा करावी . आणि ज्याचे शरीर मध्यम प्रमाणात आहे त्याचे ते तसेच कायम राहील अशा रीतीने त्याला सांभाळावे .

बल म्हणजे ओज ह्याचे गुण मागे ‘दोषधातुमलक्षयवृद्धिविज्ञानिय ’ नावाच्या पंधराव्या अध्यायात सांगितले आहेतच . दुर्बळपणा हा आईबापांच्या शुक्रशोणीत दोषामुळे असल्यास त्याला स्वाभाविक समजावे . दुसरा वातादिदोषांच्या न्यूनाधिक्याने व तिसरा वृद्धावस्थेने येणारा असा तीन प्रकारचा आहे , तेव्हा तो कशामुळे आहे ह्याची नीट परीक्षा करावी . कारण रोग्याला सामर्थ्य असले तरच सर्व प्रकारच्या उपचारांचा उपयोग होतो . तेव्हा चिकित्सेची अवांतर जी साधने त्यात रोग्याचे बळ हे मुख्य आहे .

काही माणसेस दिसण्यात कृश दिसतात पण ती बलवान् असतात व काही दिसण्यात पुष्ट दिसतात पण त्यांच्या अंगी सामर्थ्य फार कमी असते म्हणून शरीराचे दृढत्व व श्रम सोसण्याची ताकद ह्यावरून वैद्याने बलाबलाचा विचार करावा .

संकटसमयी किंवा भाग्योदय (उत्कर्ष ) अशा दोन्ही क्रियांच्या वेळी ज्याची मनोवृत्ति शोकाने किंवा हर्षाने विकार पावत नाही तो सत्वगुण समजावा .

सात्विकवृतीचा मनुष्य आपले मन ताब्यात ठेवून सुखदुःखाचे कसलेही प्रसंग आले तरी ते सहन करितो . रजोगुणवृत्तीचा मनुष्य दुसर्‍यांनी धीर दिला असता संकटे सहन करू शकतो , पण तमोगुणी मनुष्य मात्र दुःख किंवा संकट सोसू शकत नाही . (सवयीचे ) ॥३१ -३८॥

देश (जांगलादि ), काल (दिवस -रात्र ), जाती (मनुष्यादियोनी ) त्यापैकी मनुष्यजातीचे सात्म्य , म्हणजे साळी वगैरे धान्याचे अन्न (किंवा धान्ये ,) ऋतु (शीतादि -वसंतादि ), रोग (अजीर्णादि ), व्यायाम (निरनिराळ्या प्रकारचे श्रम ), पाणी , (शीत , उष्ण वगैरे ),दिवसा निजणे व मधुराधि रस इत्यादि गोष्टी प्रकृतिमानाला विरूद्ध असूनही ज्या शरीराला मानवतात व प्रकृतीला अनुकूल असूनही मानवतात . (बाधत नाहीत ) त्यांना सात्म्य (सुखकारक ) असे म्हणतात .

जो मधुरादि रस किंवा व्यायामादि इतर गोष्टी ह्यांची योजना उपयोगात आणिली असता ती त्याला सुखावह होते , तो रस व त्या गोष्टी ह्या त्याला सात्म्य म्हणजे (सुखावह ) आहेत असे सांगावे .

प्रकृति व औषध ह्यांच्याविषयी माहिती पुढे ह्याच स्थानात सांगू ॥३९ -४१॥

अनुप , जांगल व साधारण असा तीन प्रकारचा देश आहे . त्यापैकी ज्या प्रदेशात पाणी विपुल आहे , जो उंच सखल आहे , नद्या पुष्कळ असून ज्यात पाऊसही पुष्कळ

पडतो , मंद व थंड असा वारा असतो , मोठमोठे पर्वत व वृक्ष पुष्कळ असतात , त्या ठिकाणची माणसे बहुतकरून मृदु , नाजुक व पुष्ट अशा अंगाची असतात व त्या प्रदेशात बहुतकरून कफवातजन्यरोग पुष्कळ होतात . अशा प्रदेशाला ‘‘अनुपदेश ’’ म्हणतात .

जो प्रदेश वृक्षादि आवरण रहित व सपाट असल्यामुळे आकाशासारखा असून गुण (लघुत्वादि ) युक्त , तुरळ , तुरळक , असे थोडे कंटकवृक्ष (बाभळी हिंगणबेट वगैरे ) युक्त ज्या प्रदेशात जलाशय व नद्या फार थोड्या , पाऊस फार कमी व विहीर वगैरे जलाशयांनी पाणी फार कमी ज्याठिकाणी वारा ही उष्ण व जोराने वाहातो ,क्वचित् कुठेतरी एखादा लहानसा डोंगर असतो त्या प्रदेशातील लोक बळकट व सडपातळ अंगाचे असतात आणि त्या प्रदेशात वात व पित्तात्मकरोग अधिक होतात . अशा प्रदेशाला ‘‘जांगल ’’ देश म्हणतात . ह्यावरील दोन्हीही प्रदेशांची मिश्र लक्षणे ज्या प्रदेशात असतात त्याला ‘‘साधारण ’’ देश म्हणतात ॥४२॥

ज्याअर्थी साधारण देशामध्ये थंडी , उन्हाळा , पावसाळा व वारा ही मध्यम प्रमाणात असतात . व मनुष्यांच्या प्रकृतिमध्येही वातादिदोषांचे साम्यच असते , त्याअर्थी राहण्यास प्रशस्त असा साधारण देशच सर्वांना संमत आहे .

अनुपदेशांत स्वाभाविकपणे उत्पन्न होणारे श्लीपदादि रोग ज्यांना आहेत असे रोगी जर जांगल देशात गेले तर ते त्यांचे रोग जांगल देशात फारसा जोर करीत नाहीत , त्याचप्रमाणे जांगल देशात स्वाभाविक होणारे पित्तविकार ज्यांना आहेत असे लोक अनुपदेशांत नेले असता त्यांचेही ते रोग फार वाढत नाहीत .

आपल्या अनुकूल देशांत संचित झालेले दोष त्याच्या विरूद्ध गुणाच्या देशात गेल्यावर त्याठिकाणी ते प्रकुपित झाले , तरी आहार , झोप व इतर व्यवहार याबाबतीत तो रोगी दोषानुरूप योग्य असाच आचरण ठेवील , तर त्याला त्या देशात राहण्यापासून अपाय होईल असे भय बाळगण्याचे कारण नाही .

देशविपरित (जांगल देशांत कफरोग होणे .)

प्रकृतिविपरित (पित्त प्रकृतिच्या मनुष्याला कफ रोग .)

सात्म्यविपरित (तिखट आहार करणाराला कफरोग .)

सात्म्यविपरित (तिखट आहार करणाराला कफरोग .)

ह्याप्रमाणे देश , प्रकृति व सात्म्य ह्यांत विरूद्धपणा असणे , रोग अगदी थोड्या दिवसांतच झालेला असणे ,य बल , सत्व व आयुष्य ह्यांची अनुकूलता असणे उत्तम वैद्य व औषधादि सामुग्री भरपूर असणे , रोगामध्ये अन्न उपद्रव काही नसणे , शरीर मध्यम प्रमाणात असून जठराग्नि सम असणे , इतक्या गोष्टींनी युक्त असा रोग अत्यंत सुखासाध्य असतो . ह्याच्या उलट गोष्टी असतील तर तो असाध्य होतो . आणि काही न्यूनाधिक मिश्र लक्षणे असली तर तो कष्टसाध्य म्हणून समजावा .

एका उपचाराने गुण येईना तर दुसरी योजना करावी . परंतु पूर्वी दिलेल्या औषधाचा परिणाम शांत झाल्याशिवाय मात्र दुसरे औषध देऊ नये . किंवा लागोपाठ दोन औषधे देऊ नये . जर रोग कष्टसाध्य असेल तर त्यावर योजिलेल्या हितकारक अशा औषधाचा जरी तत्काळ गुण दिसला नाही तरी तोच औषधाचा क्रम आणखी काही दिवस चालू ठेवावा . (सात दिवस तरी चालू ठेवावा .)

जो बुद्धिवान् वैद्य कालानुरोधाने आम्ही सांगितलेल्या ह्या विधीप्रमाणे क्रिया करितो तो सर्व जगाचे रोगांच्या लाटाच्या रूपाने आलेले मृत्युचे पाश आपल्या औषधरूपी कुऱ्हाडीने तोडतो ॥४३ -५०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP