मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
शल्यायनयनीय

सूत्रस्थान - शल्यायनयनीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय सत्ताविसावा

आता ‘‘शल्यायनयनीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

शरीरात घुसून राहिलेल्या शल्याच्या दोन तऱ्हा आहेत . एक घट्ट आवळून बसलेले व दुसरे ढिले (सैल ) असलेले . दुसरे कित्येक आचार्य अस्थ्यादिकांच्या ठिकाणी असलेले ते ‘अवबद्ध ’ (घट्ट बसलेले ) व इतरत्र असणारे ते ‘अनवबद्ध ’ (सैल -ढिले ) असे म्हणतात .

त्यांपैकी प्रथमतः ‘‘अनवबद्ध ’’ म्हणजे घट्ट न बसलेले जे शल्य ते काढण्यासाठी पंधरा उपाय आहेत ते थोडक्यात सांगतो . ते असे -१ स्वभाव (निघण्याची स्वाभाविक

स्थिति ), २ पाचन (औषधादिकांनी पक्व करून काढणे ), ३ भेदन (वृद्धिपत्रादि शास्त्रांनी काढणे ), ४ दारण (करंजाची साल वगैरे मिश्रक अध्यायांतील औषधांच्या लेपाने फोडणे ), ५ पीडन (बुळबुळीत द्रव्यांच्या कल्काने हळूहळू दाबून काढणे ), ६ प्रमाजर (केसांचा कुंचला किंवा वस्त्र वगैरेने झाडून काढणे ), ७ निर्ध्यापन (पिंपळी वगैरे तीक्ष्ण औषधाचे चूर्ण नळीतून नाकात फुंकणे ), ८ वमन ओकारी , ९ विरेचन १० प्रक्षालन (पिचकारीने वगैरे धुऊन काढणे ), ११ प्रतिमर्श (बोटांनी घासून काढणे ) १२ प्रवाहण (जोराने कुंथणे ), १३ आचूषण (तुमडी वगैरे लावून चोखून काढणे ), १४ अयस्कांत (लोहचुंबकाच्या दगडाने आकर्षण करून घेणे ), १५ हर्ष (मोठा आनंद उत्पन्न करणे ) असे हे शल्य काढण्याचे पंधरा प्रकार आहेत ॥३ -४॥

डोळ्यातून पाणी येणे , शिंका , ढेकर , खोकला , मूत्र , मल व अधोवायु ह्यांचे वेग येऊन त्यांची प्रवृत्ति झाल्याने स्वभावतःच डोळे , घसा वगैरे ठिकाणी असलेले बारीकसारीक कण बाहेर पडतात . मांसांतरगतशल्य असलेली जागा आपोआप जर पिकत नसेल तर औषधादिकांच्या पोटीसानी पिकवावी म्हणजे पू व रक्त ह्यांच्या वेगाबरोबर शल्य बाहेर पडते . पक्व झाल्यावर देखील तो व्रण फुटत नसल्यास शस्त्राने फोडावा किंवा विदारण करणार्‍या औषधी लेपाने फोडावा . ह्याप्रमाणे फोडूनही शल्य बाहेर आले नाही तर पीडनीय म्हणजे बुळबुळित औषधी कल्कांच्या लेपाने व हाताने दाबून काढावे डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी असलेली बारीकसारीक शल्ये डोळ्यावर पाण्याची धार धरून , तोंडाने फुंकून केसाच्या मृदु कुंचल्याने , वस्त्राच्या पदराने वगैरे झाडून काढावी . घशांतील नाकाच्या छिद्रांतून जेवताना शिते जाऊन अडकली किंवा कफ दाटून बसला तर , तसेच काही निघालेल्या शल्याचे बारीकसारीक कण आत राहिले असल्यास , श्वासोच्छवास करणे , खोकणे व नाकात नळीने तीक्ष्ण औषणे फुंकून शिंका आणविणे या उपायाने काढावे . घशात अगर छातीत अन्न बसले असल्यास घशात बोटे घालून अगर वांती करवून काढावे . पक्वाशयात जर काही लहानसहान शल्ये असली तर ती रेचकाने काढावी . व्रणातील पू वगैरे प्रक्षालनाने (धुण्याने ) काढावा . तसेच त्यात बारीक सारीक धुळीचे कण वगैरे सूक्ष्म शल्ये असल्यास तीही धुवून काढावी . अधोवायु , लघवी , मल व गर्भ ह्यांचा अवरोध असल्यास तीही धुवून काढावी . अधोवायु , लघवी , मल व गर्भ ह्यांचा अवरोध असल्यास त्यावर प्रवाहण (विरेचन ) करवावे , वायु , पाणी , विषारी रक्त (दंशस्थानाचे ), दूषिक दूध (स्त्रियांचे ) ही तोंडाने किंवा तुमडीने वगैरे शोषून घ्यावी . रोमरंध्राच्या मार्गाने सरळ असलेली , सैल असलेली , ज्वाला आत अडकून राहण्यासारखे फाटे नाहीत अशी सरळ आणि विस्तृत मुखाच्या व्रणात असलेली (लोहमय ) शल्ये लोहचुंबकाच्या सहाय्याने काढावी . आणि हृदयात त्रास करणारी अनेक कारणांनी उत्पन्न झालेली शोकशल्ये (मनाची अस्वस्थता ) मनाला आनंद उत्पन्न करून काढावी .

शल्य मोठे असो किंवा लहान असो ते बाहेर काढण्याचे मार्ग दोन आहेत . एक प्रतिलोम म्हणजे शल्य ज्या बाजूने आत शिरले त्याच बाजूने मागे उपसून काढणे आणि दुसरा अनुलोम म्हणजे शल्य ज्या गतीने आत शिरले , ती त्याची गति थांबली नसती तर ते ज्या बाजूने भोक पाडून बाहेर पडेल असते त्या बाजूने काढणे . ह्या मार्गाला अनुलोम मार्ग म्हणतात .

जे शल्य शरीराच्या त्या भागाच्या पूर्वभागातच (जिकडून शिरले त्या निम्या भागातच ) असेल त्याला ‘‘अर्वाचीन ’’ (अलिकडच्या भागातील ) शल्य म्हणतात . ते काढताना प्रतिलोम (ज्या बाजूने गेले त्याच बाजूने ) परत ओढून काढावे . आणि जे शल्य शरीराच्या त्या भागाच्या पुढच्या अर्ध्या भागात (उत्तरार्धात ) गेले असेल ते ‘‘पराचीन ’’ शल्य म्हणतात . ते अनुलोम मार्गाने (ज्या बाजूने आत शिरले त्याच्या विरूद्ध बाजूने ) काढावे .

एकादे शल्य जोराने आत शिरून शरीराच्या त्या भागाच्या पुढच्या प्रदेशात (उत्तरार्धात ) जाऊन वेग कमी झाल्यामुळे आत शिरल्याच्या विरूद्ध बाजूला तोंड पाडून किंचित् येऊन अडकून राहते .. असे शल्य काढताना त्याचा तो किंचित् बाहेर आलेला जो भाग तो किंचित् उंच होतो . तो उंच झालेला भाग कापून शल्याचे टोक मुग्द्राने किंवा अन्य साधनाने हलवून अनुलोममार्गाने म्हणजे कापून तोंड पाडलेल्या बाजूनेच काढून घ्यावे . ‘‘पराचीन ’’ शल्याचा अनुलोम हरणविधि सांगितला .

कुशी , छाती , कांख , वंक्षण (जांगड -वळाची जागा ) बरगड्या ह्या ठिकाणी शिरलेली शल्ये , पार पुढील भागात जाऊन उलट दिशेला किंचित् बाहेर आल्यामुळे तो भाग उंच होऊन कापण्यासारखा झाला तरी , त्या बाजूने -प्रतिलोममार्गानेच -हाताने हलवून काढता येण्यासारखे असल्यास हाताने हालवूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा .

ह्यावरून असे ठरते की , वरील भागातील शल्ये पराचीन असून ती अनुलोममार्गाने काढावी असे आहे . तथापि वरील भागांची मात्र प्रतिलोममार्गानेच काढावी . ती अनुलोममार्गाने काढली तर फार मोठी जखम होईल .

जे शल्य हाताने निघण्यासारखे नाही ते शस्त्राने च्छेद करून यंत्राने उपसून घ्यावे ॥५ -१०॥

शल्य काढताना जर रोग्याला मूर्च्छा आली तर त्याच्या अंगावर थंड पाणी शिंपावे . त्याच्या मर्मस्थानाला धक्का न लागेल अशी खबरदारी घ्यावी (मर्माचे रक्षण करावे .) आणि त्याला दूध वगैरे पाजून सावध करावा .

शल्य बाहेर काढल्यावर व्रणातील सर्व रक्त काढून टाकावे . आणि तो व्रण स्वेद करण्यास योग्य असल्यास विस्तवाने , ऊन केलेल्या तुपाने वगैरे त्याचे स्वेदन करावे .

डागण्यासारखा असल्यास डागावा . आणि जो स्वेदन करण्यासारखा नसून ज्यातून रक्त फार गेले त्याला तूप व मधाचा लेप करावा . बाकीच्या व्रणांनाही तूप -मधाचा लेप

करून बांधून रोग्याला पथ्यकारक आचरण कसे ठेवावे ते सांगावे .

शिरा व स्नायु ह्यांत शिरलेले शल्य सळईने हलवून मोकळे करून काढावे त्याचे मागील अंग जर सुजेत गुंतले असेल तर सूज दाबून ते काढावे , मागील अंग बारीक असल्यास दर्भाच्या वगैरे दोरीने बांधून ओढून काढावे .

हृदयाच्या सन्निध असलेले शल्य रोगी घाबरा होऊ नये म्हणून त्याच्या अंगावर थंड पाणी शिंपणे वगैरे उपचार करून प्रतिलोममार्गाने जिकडून आत शिरले आहे त्याच बाजूने काढावे तसे काढणे फार अवघड होत असेल व दुसरीकडे मर्माला वगैरे बाधा करीत असेल , तर त्याचा आसपासचा भाग अवश्य तेवढा फाडून ते काढावे .

हाडाच्या पोकळीत शिरलेले किंवा हाडात शिरून घट्ट बसलेले शल्य , शल्य असलेला भाग दोन्ही पायांनी दाबून धरून यंत्राने ओढून काढावे . या रीतीने शल्य निघणे अशक्य झाले तर रोग्याला बलवान माणसाकडून बळकट धरावे ; आणि शल्याचा बाहेरील भाग यंत्राने वाकवून त्या ठिकाणी धनुष्याच्या दोरीचे एक टोक बांधावे आणि जवळच बांधून ठेविलेल्या घोड्याच्या तोंडातील लगामाला ‘‘पंचागो ’’ बंधाने (ह्या बंधाचे स्वरूप मागे अठराव्या अध्यायात दिले आहे ) बांधावे नंतर त्या घोड्याला असा एक चाबूक मारावा की त्याच्या आघातासरशी तो घोडा मान वर करील व त्या हिसक्याने शल्य निघेल . हा उपाय जमण्यासारखा नसल्यास झाडाची बळकटशी फांदी वाकवून वरीलप्रमाणेच धनुष्याच्या दोरीने बांधून , ती फांदी सोडावी म्हणजे तिच्यावर जाण्याच्या जोराने शल्य बाहेर येईल .

कुशी वगैरे न छेदन करण्यासारख्या भागात शल्य शिरून , न कापण्यासारख्या भागी किंचित् बाहेर आले असता (किंवा एकाद्या हाडांतून बाहेर आले असता ) गुळगुळीत धोंडा अगर मुग्दर (मोगली ) ह्यांच्या सहाय्याने ते हालवून , प्रतिलोममार्गानेच (ज्या बाजूने आत शिरले त्याच बाजूने ) यंत्राच्या साहाय्याने बाहेर काढावे .

कर्णयुक्त (‘‘कान ’’ म्हणजे धरण्याकरिता केलेला आकडा वगैरे ) शल्य असल्यास , ते जर फारशी पीडा होण्यासारखी नाही अशा निमर्मजागी उत्तुडित (बाहेर टोक आलेले ) झाडे असेल , तर त्याचा तो कान दाबून आकुंचित करून ते शल्य अनुलोम मार्गाने यंत्राने घ्यावे .

लाखेच्या तुकड्यानी खेळत असता , मुलाच्या वगैरे तोंडात तो लाखेचा जाऊन घशात अडकला , तर घशात एक पोकळ नळी घालून , अग्निमध्ये लाल केलेली सळई त्या नळीतून आत घालावी , आणि तिला तो तुकडा चिकटला म्हणजे तिजवर थंड पाणी शिंपावे . त्या पाण्याने थंड होऊन तो तुकडा त्या सळईस चिकटला म्हणजे बाहेर काढावा .

लाखेच्या व्यतिरिक्त दुसरं शल्य असल्यास वरीलप्रमाणे घशात नळी घालून तापलेल्या सळईच्या टोकाला लाख अथवा मेण लावून , ती आत घालावी म्हणजे सळईच्या उष्णतेने पातळ (चिकट ) झालेल्या लाखेला अगर मेणाला ते शल्य चिकटेल . मग त्याजवर थंड पाणी शिंपावे , म्हणजे ती लाख किंवा मेण घट्ट होईल व मग त्यांना चिकटलेले शल्य काढून घ्यावे लसे काहींचे मत आहे .

एखादा हाडाचा तुकडा अगर दुसरे काही शल्य घशात आडवे अडकून राहिले , तर केसाचा एक चेंडूसारखा गोळा करून , त्याला बळकट दोरा बांधून तो गोळा तांदुळाच्या पातळ कण्हेरीतून त्या रोग्याला पाजावा व त्या गोळ्याच्या दोर्‍याचे दुसरे टोक आपल्या हातात धरावे . कण्हेरी पाजावयाची ती अगदी घशाशी येईपर्यंत पोटभर पाजावी . नंतर त्याला ओकताना त्या शल्याचे एखादे टोक , त्या केसात अडकले आहे असे कळताच , हातातील दोरा ओढावा म्हणजे केसाच्या गोळ्याला लागून ते शल्य बाहेर येईल . किंवा एखादी मऊ अशी दात घासण्याची करंजाची वगैरे काडी घेऊन , तिचा शेंडा चेचून , त्याच्या साहाय्याने ते काढावे . तसेही करून ते जर बाहेर निघेना तर त्याला आत सरळ रितीने ढकलावे . घशात काही खरवडून इजा झाली असल्यास त्याला तूप मध , एकत्र करून चाटावयास द्यावा . किंवा त्रिफळ्याचे (हिरडा , बेहडा , आवळकांठीचे ) समभाग चूर्ण मध व साखरेशी चाटावयास द्यावे .

पाण्यात पडल्यामुळे पोटात पाणी भरले असल्यास , त्याला खाली डोके करून उलटा करावा व पोट बेंबीकडून छातीकडे दाबीत चोळावे किंवा हालवावे किंवा ओकवावे ; अथवा राखेच्या ढिगांत तोंडापर्यंत पुरावे . (ह्या प्रयोगाचा उद्देश समजत नाही ).

घशात अन्नाचा घास अडकला तर त्या मनुष्याला नकळत , आपण स्वतः न भिता त्या मनुष्याच्या मानेवर बुक्की मारावी . अथवा त्याला तेल तूप (पातळ ) मद्य किंवा पाणी पाजावे .

हाताने दोरी वेलीने किंवा एखाद्या फासाने गळा जोराने दाबला गेला तर त्या योगाने त्या ठिकाणी वायु प्रकुपित होऊन कफाला कोपवितो व स्रोतसे बंद करितो . त्यामुळे तोंडातून लाळ गळते . तोंडाला फेस येतो व रोगी बेशुद्ध होतो . त्याला अंगाला तेल मर्दन करावे , वाफारा (स्वेदन ) द्यावा . आणि अतिशय तीक्ष्ण असे शिरोविरेचन द्यावे .

आणि त्याला पिण्याला वातनाशक असा मांस रस द्यावा ॥११ -२२॥

ज्ञात्या वैद्याने शल्याचा आकार कसा आहे , ते नेमके कोणच्या ठिकाणी आहे , ते काढण्याकरिता कोणते यंत्र घ्यावे ह्या गोष्टींचा विचार करून मग शल्य काढावे .

ज्याना कान वगैरे (खोंवारे ) आहेत अशी शल्ये , त्याचप्रमाणे काढण्याला फार कष्टप्रद अशी शल्ये , वैद्याने फार सावधपणाने व युक्तीने काढावी .

ह्या वर सांगितलेल्या उपायांनी जर शल्य बाहेर निघाले नाही , तर बुद्धिवान् वैद्याने यंत्राच्या साहाय्याने ते काढावे .

जर शल्य बाहेर काढले नाही तर ते सूज , व्रण पिकवणे (पाक ) अत्यंत वेदना हे विकार करते . शिवाय त्या अवयवाला निर्बळपणा येतो . कदाचित् मृत्यु येण्याचाही संभव असतो . ह्यासाठी अनेक प्रयत्नाने ते शल्य काढून टाकावे ॥२६ -२७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP