मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
व्रणितोपासनीय

सूत्रस्थान - व्रणितोपासनीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय १९ वा

आता " व्रणितोपासनीय " नावाचा अध्याय सांगतो , जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१॥२॥

व्रणांच्या रोग्याला प्रथमतः राहाण्याला उत्तम घर पहावे . घर करावयाचे ते सर्व प्रकारे उत्तम जगा पाहून त्या ठिकाणी करावे .

प्रशस्त अशा जागेत ( रमणीय जागेत ) घर असून ते स्वच्छ असावे . त्या घरात ऊन व वारा ह्यांचा उपद्रव नसावा . म्हणजे त्या ठिकाणी शारिरिक , आगंतुक व मानसिक रोग होत नाहीत .

अशा घरात उत्तम प्रकारचे अंथरुण घालावे . ते अंथरुण उंच सखल नसावे . त्यात ढेकूण वगैरे नसावे . ते मऊ व पाहणाराला मनोहर वाटावे . तसेच ते विस्तृत व पूर्वेकडे उभे घालावे . जवळच एकादे शस्त्र ( काठी वगैरे ) ठेवावे .

चांगल्या अंथरुणावर व्रणी मनुष्य निजला असत त्याला सुखाने हालचाल करिता येते . पूर्व दिशेला देवांचे वास्तव्य असते , तेव्हा त्यांना सहज नमस्कार घडावा या हेतूने पूर्वेकडे उसे ठेवावे . ( उशी )

त्या अंथरुणावर त्या व्रणी मनुष्याने इच्छेप्रमाणे निजावे अथवा बसावे . त्याला आवडेल असे प्रिय भाषण करणारे जे त्याचे मित्र असतील त्यांनी त्याची शुश्रूषा करावी .

त्याला आवडणारे व प्रिय बोलणारे असे त्याचे मित्र त्याच्या सेवेला असले म्हणजे ते त्याला पुष्कळसे आश्वासन देतात आणि करमणुकीच्या गोष्टी सांगून व्रणाच्या वेदानाचा त्याला विसर पाडतात .

व्रणी मनुष्याने दिवसा झोप घेऊ नये . दिवसा झोप घेतल्याने व्रणाला कंडु उत्पन्न होतो , अंग जड होते , व्रणाची सूज वाढते , ठणका लागतो , लाली येते आणि स्त्राव जास्त होतो .

उठणे , निजणे , कुशीवर वळणे , चालणे , मोठ्याने बोलणे , वगैरे स्वतःच्या ज्या हालचाली त्या फार सावधगिरीने कराव्या आणि अशा प्रकारे जखम वाढू न देण्याविषयी जपावे .

ताठ उभे राहणे , चालणे , दिवसा झोप घेणे , या गोष्टी अंगात सामर्थ्य असले तरी व्रणी मनुष्याने वर्ज्य कराव्या .

उठणे , बसणे , उभे राहणे , निजणे ह्या हालचाली व्रणी मनुष्याने फार बेताने कराव्या . त्या अतिशय केल्या असता वाताचा प्रकोप होऊन त्यामुळे अंगात वेदना होतात .

गम्य स्त्रियांचा स्पर्श , त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग व त्याचे दर्शन ह्या गोष्टी त्यांना लांब ठेऊन अजिबात वर्ज कराव्या .

अशा स्त्रियांच्या दर्शनादिकांनी देखील शुक्र स्थानापासून भ्रष्ट होऊन स्त्रवते , आणि ते स्त्रवले असता स्त्रियांचा संसर्ग नसूनही मैथुनजन्य अपथ्याने होणारा अपाय भोगावा लागतो ॥३॥१५॥

नवे धान्य , उडीद , तीळ , वाटाणे , हुलगे , पावटे ही धान्ये , अजबला , शेवगा , तुळस , पांढरा अजबला , मोहरी , गवती चहा , मुळे , चुका हा हारितक वर्ग , कोशिंबीरीचे पदार्थ , पालेभाज्या , आंबट पदार्थ , मीठ , तिखट , गूळ , पिष्टान्न ( थालीपीठ वगैरे ), शुष्कमांस , वाळलेल्या भाज्या , शेळी , मेंढी अनुपदेशातील पशुपक्षी व जलचर प्राणी ह्यांचे मांस , चर्बी , थंड पाणी , तीळ मसाला घातलेली खिचडी , खीर , दही , दूध व ताक वगैरे व्रणाच्या रोग्याला अपायकारक

आहेत . म्हणून ते वर्ज्य करावे .

नवीन धान्यापासून ताकापर्यंतचा अपथ्य पदार्थाचा वर्ग सांगितला तो व्रणासंबंधी दोषांना कोपविणारा व व्रणात पू वाढविणारा आहे असे समजावे .

मद्यपान करण्यासारखा मनुष्य असला तरी त्याला मेरेय , अरिष्ट , आसव शीधू व सुरा हे जे मद्यांचे भेद त्यापैकी त्याला कोणतेही देऊ नये . काही आचार्यांच्या मताने आम्ल मद्ये तेवढी वर्ज करावी , पण जी द्राक्षासवासारखी मधुर व रक्तपित्ताला हितकर म्हटलेली ती क्वचित दिली तरी चालतील .

मद्य हे सामान्यतः आंबट , रुक्ष , तीक्ष्ण , व उष्णवीर्य असे आहे . आणि ते आशुकारि ( त्वरित आपला गुण करणारे ) असल्याने ते प्याल्याने तत्काळ व्रणाला अपाय करिते .

तसेच वारा , ऊन , धूळ , धूर , दहिसर ह्यांचा उपद्रव मुळीच होऊ देऊ नये . त्याचप्रमाणे अति भोजन , अनिष्ट भोजन ( न आवडणारे ), अनिष्ट गोष्ट ऐकणे व पहाणे , ईर्ष्या ( दुसर्‍याचा उत्कर्ष सहन न होणे ), मत्सर , भय , क्रोध , शोक , काळजी , या गोष्टीही व्रणी मनुष्याने वर्ज कराव्या . याशिवाय आणखी रात्री जागरण करणे , भूक नसताना जेवणे , वाकडे तिकडे निजणे , उपास , फार बोलणे , व्यायाम , फार वेळ उभे राहणे , फार चालणे , थंडी , वारा यांचे अति सेवन , तीळ , दूध , मासे वगैरे विरुद्ध गुणाचे पदार्थ खाणे , अजीर्णावर जेवणे , अजीर्ण होईतोपर्यंत खाणे आणि माशा , डास यापासून व्रणाला पीडा या गोष्टी वर्ज कराव्या .

ज्यांचे मांस व रक्त क्षीण झाले आहे अशा व्रणाच्या रोग्याला वरील गोष्टींनी किंवा इतर काही कारणाने स्त्रास झाला असता खाल्लेले अन्न बरोबर पचन होत नाही . त्यामुळे अजीर्ण होते व त्या अजीर्णापासून वात वाढून त्यापासून भयंकर वातजन्य पीडा होते , आणि त्यामुळे व्रणाच्या ठिकाणी सूज ठणका , दाह , व व्रण पिकणे हे उपद्रव होतात .

व्रणी मनुष्याने नेहमी नखे व केस फार वाढू देऊ नयेत . शुचिर्भूत ( स्वच्छतेने ) रहावे . शुभ्रवस्त्रे वापरावी , शांतिकर्मे व मंगलकृत्ये ( धार्मिक पद्धतीने ) करावी . देवता , ब्राह्मण व गुरु यांच्या सेवेत रत असावे . असे करण्याचे कारण हिंसा करण्याकरिता हिंडणारे , महापराक्रमी राक्षस हे रुद्र , कुबेर व कार्तिकस्वामी यांचे " गण " आहेत . ते मांस व रक्ताच्या आशेने व्रणासंबंधी रक्ताच्या निमित्ताने व्रणी मनुष्यापाशी पूजा , बली वगैरे मिळावा या हेतूने किंवा कदाचित त्याचा घात करण्याच्या हेतूने येतात ॥१६॥२३॥

यासाठी वरीलप्रमाणे शांतिकर्मादि करुन त्या रुद्रादिकाच्या गणांचा सत्कार करण्याकरिता मनोभावाने झटावे . त्यांच्यासाठी धूप , बळी व इतर भक्ष्य पदार्थांचा नैवेद्य द्यावा .

याप्रमाणे त्यांना संतुष्ट केले असता ते आत्मवान ( जितेंद्रिय ) मनुष्याची हिंसा करीत नाहीत .

म्हणून व्रणी मनुष्याने नेहमी सावधपणाने आपल्याभोवती इष्टमित्रांचा परिवार राखावा . दिवा सतत ठेवावा . पाणी व शस्त्रे जवळ ठेवावी . डोक्यावर व गळ्यात फुलांच्या माळा घालाव्या . घरास फुलांची तोरणे लावावी व लाह्या व फुले पसरुन ते सुशोभित ठेवावे . आणि संपन्न ( सर्व ऐश्वर्ययुक्त ) व मनाला प्रिय अशा गोष्टी नित्य श्रवण करीत वेळ घालवावा .

ऐश्वर्यादिकांनी पूर्ण व आनंदपर्यवसायी अशा कथा ऐकून त्याचे मनाला उल्हास वाटतो व त्याला आपण या व्याधीतून लवकरच मोकळे होऊ अशी आशा ( उमेद ) वाटते व त्यामुळे त्याला त्वरित सुखप्राप्ति होते .

तसेच ऋग्वेद , यजु , साम व अथर्ववेद या चारी वेदांनी विहित अशा आशीर्वादयुक्त विधनाने व दुसर्‍याही तांत्रिक वगैरे पद्धतीने रोज सांजसकाळ उपाध्याय व वैद्य यांनी रक्षाविधान करावे .

अगरप्रविष्ट दिवसापासून दहा दिवसपर्यंत रोज सकाळ रोज सकाळ संध्याकाळ पांढरे शिरस , कडुनिंबाची पाने , तूप व मीठ यांचे मिश्रण करुन त्याचा धूप सर्व घरात पसरेल असा करावा . त्यांत हयगय करु नये . कारण या रक्षोघ्न धुपाने निर्विर्य झालेले राक्षसादिगण व्रणी मनुष्यासन्निध येऊ शकत नाहीत .

लहान व थोर द्रोणपुष्पी ( कुंभा ), कुहिली , जटांमासी , गोरखमुंडी , शमी ( अगर विष्णुक्रांता ), साळवण , पिठवण , वेखंड , अतिविष , शतावरी ( किंवा नील दुर्वा ), पांढर्‍या दूर्वा व पांढरे शिरस या औषधी मस्तकावर धारण कराव्या .

व्रणावर वनगाईच्या केसाच्या चवरीने अगर पंख्याने जरुर वाटाल्यास वारा घ्यावा . व्रणाची जागा घासू नये . त्याला धक्का लावून दुखवू नये . खाजवू नये आणि झोपेत त्याला धक्के वगैरे न लागेल म्हणून संभाळावे .

या सांगितलेल्या विधिप्रमाणे सर्व व्यवस्था ठेवली असता , सिंहाचा संचार ज्या अरण्यात आहे त अरण्य ज्याप्रमाणे इतर श्वापद सोडतात , त्याप्रमाणे त्या ठिकाणचा तो विधि पाहून राक्षस ते स्थान सोडतात ॥२४॥३१॥

जुन्या साळीचा ( मोकळा फडफडीत ) केलेला भात किंचित ऊन असा , तूप घालून स्निग्ध केलेला , जांगल प्राण्याचा मांसरसाबरोबर खाणार्‍या मनुष्याचा व्रण लवकर बरा होतो .( हा जो मांसाचा प्रयोग सांगितला आहे तो व्रण चांगला भरत आला म्हणजे करावा ; एरवी व्रणाला मांस वर्ज आहे . )

तांदुळजा , हरणदोडी , कुरडु , चंदनबटवा , कोवळा मुळा व कोवळे वांगे , पडवळ , कारले , ह्या भाज्या , आंबट डाळिंबाचे दाणे , आवळकांठी आंबटपणाकरता टाकून , तुपावर फोडणीस टाकून थोडे सैंधव घालून खाव्या . त्याचप्रमाणे अशाच रीतीने मुगाचे कट काढून त्याचे सार करुन ते घ्यावे . सातू भाजून त्याचे पीठ किंवा भाताच्या लाह्याचे पीठ ह्यांची जाडशी लापशी करुन खावी . कुल्माष ( सातूच्या पिठाचा उकडून केलेला पदार्थ असे डल्लण म्हणतो ) व आधण येऊन निवालेले पाणी हे पदार्थ खावे .

दिवसा झोप न घेणारा , निर्वात प्रदेशात राहणारा , आणि वैद्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारा व्रणाचा रोगी व्रणापासून लवकर मुक्त होतो .

अति श्रम केल्याने व्रणाच्या ठिकाणी सूज येते आणि रात्री जागरण केल्याने सूज , व लाली हे दोन विकार होतात . सूज , लाली व ठणका हे तीन विकार मैथुनामुळे होतात . ( हा श्लोक गयदास प्रभृतिना मान्य दिसत नाही ).

म्हणून वर व्रणी मनुष्याने कसे कसे वागावे याबद्दल जे जे सांगितले आहे त्याप्रमाणे आचरण ठेवणारा व्रणाचा रोगी सुखी होतो ; आणि त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते असे भगवान धन्वंतरीचे वचन आहे ॥३२॥३७॥

अध्याय एकोणिसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP