मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ६

सूत्रस्थान - अन्नपानविधि ६

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


शाकवर्ग

आता शाकांचे (भाज्यांचे ) गुणधर्म सांगतो . कोहाळा , भोपळा , कलंगडे वगैरे फळे भाज्यापैकी आहेत .

कोहाळा वगैरे ही भाजीची फळे सामान्यतः पित्तनाशक , वातकारक किंचित् कफकारक , मलमूत्र साफ करणारी आणि रुचीला व विपाकानंतर मधुर अशी आहेत .

त्यापैकी कोवळा कोहाळा पित्तनाशक , जून कफकारक आणि पिकलेला हलका , उष्ण , किंचित खारट , अग्निदीपक व वस्तीचे शोधन करणारा आहे . तसेच तो सर्वदोषनाशक , हृद्य , व अपस्मार -वगैरे मनोविकारांत खाण्यास पथ्यकारक आहे . कलंगडे हे दृष्टी व शुक्र ह्यांचा नाश करणारे व कफवातकारक आहे . अलाबू (दुध्या भोपळा ) मलभेदक , रूक्ष , जड , फार थंड व कडु भोपळा मनाला तिटकारा आणणारा , वामक (वांतिकारक ) आणि वातपित्तनाशक आहे ॥२११ -२१५॥

तवसे , काकडी , कर्कारू (खरबुज ) व शेंदाडे ही फळेही शाकवर्गातीलच आहेत .

तवसे वगैरे काकडीच्या जाती ह्या सामान्यतः गोड व कडु असून कफवातनाशक आहेत . शिवाय ती मलमूत्र साफ करणारी असून रक्तपित्तनाशक आहेत . त्यापैकी कोवळे , नीळे दिसणारे तवसे पित्तनाशक आहे . ते पांढरे झाले म्हणजे (जुने झाले म्हणजे ) कफकारक , आणि पक्व होऊन फार दिवस झाल्यावर ते आंबट व वातकफनाशक असते .

काकडी व खरबूज ही फळे पिकली म्हणजे कफवातकारक होतात . तथापि ती किंचित् खारट , मधुर . रुचिकारक अग्निदीपक असून फारशी पित्तकारक नाहीत . शेंदाड (शीर्णवूंत ) हे किंचित् खारट , मधुर , कफनाशक , मलभेदक , अग्निदीपक , हृद्य , आनाह व अष्ठीलानाशक व हलके आहे ॥२१६ -२२०॥

पिंपळी , मिर , सुंठ , आले , हिंग , जिरे , धने , जंबीर (एक प्रकारची शाक ), सुमुख (रानतुळस अथवा वैजयंति तुळस ), तुळस , अजबला , रोहीसगवत , सुगंधक , (गवती चहा ),

कासविंदा , काळीमाली , तुळस , काळा अजबला , नाकशिंकणी , मरवा , कडु शेवगा , गोड शेवगा , पांढरा मरवा , शिरस , मोहरी , गोरखमुंडी , अवगुत्थ (काकादनी -कांगोणी ) गंडीर , तिळवण , वसु , चित्रक , मुळा , लसूण , कांदा कलाय (वाटाणे किंवा वाल ) वगैरे पदार्थ शाकवर्गातीलच आहेत .

हे पिंपळी वगैरे सर्व जिन्नस तिखट , उष्ण , रुचिकारक , वातकफनाशक आहेत . हे जिन्नस स्वयंपाकात तयार केलेल्या चटण्या , कोशिंबिरी , कढी , सांबारे वगैरे पक्वान्नांत निरनिराळ्या तऱ्हेने उपयोगांत आणितात .

ओली मिरे मधुरविपाकी , जड व कफ थुंकीच्या रूपाने सोडणारी आहेत . तीच वाळलेली मिरे तिखट , उष्ण , हलकी , वृष्य व कफवातनाशक आहेत . पांढरी मिरे ही सामान्यतः वीर्याने अति उष्ण किंवा अति थंड नसून काळ्य़ा मिर्‍यापेक्षा गुणाने अधिक आहेत . आणि विशेषतः डोळ्य़ाला हितकारक आहेत .

सुंठ ही कफवातनाशक , मधुरविपाकी , तिखट , वृष्य , उष्ण , रुचिकारक , हृद्य (मनाला प्रिय ), स्निग्ध , हलकी व अग्निदीपक आहे . आले ही कफवातनाशक स्वरकारक , मलांचा व स्त्रोतसांचा अवरोधनाशक पोटात वात धरणे व शूळ ह्यांचा नाशक , तिखट , उष्ण , रुचिकारक , हृद्य व बुष्य (कामवर्धक ) आहे . हिंग हा हलका , उष्ण , पाचक , अग्निदीपक , कफवातनाशक , तिखट , स्निग्ध , सारक , तीक्ष्ण आणि शूळ , अजीर्ण व मलाचा अवरोध ह्यांचा नाश करणारा आहे .

पांढरे व काळे जिरे तीक्ष्ण उष्ण , तिखटविपाकी , रुचिकारक पित्तकारक , अग्निवर्धक , तिखट , कफ व वातनाशक व सुवासिक आहे , कारवी (बडीशेफ किंवा अजमोदा ), उपकुंचिका (मोठ्या जातीचे काळे जिरे कलौंजि ) आणि करवी (हिंगाच्या झाडाची पाने ) तिहीचेही गुण जिर्‍याप्रमाणेच आहेत .

ओली कोथिंबीर ही भाजी , उसळी , चटण्या , कोशिंबिरी इत्यादि जेवणाच्या पदार्थांत घातली असता ती त्या पदार्थांना रुचि आणिते व सुगंधितपणा आणिते . त्यामुळे ते पदार्थ मनाला फार प्रिय होतात . तीच वाळली कोथिंबीर मधुरविपाकी , स्निग्ध , तहान व दाहनाशक , दोषनाशक , तिखट , किंचित् कडू व स्त्रोतसांचे शोधन करणारी आहे .

जंबीर नावाची एक पालेभाजी (ही उत्तर हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे . हिचा पाला कोथिंबिरीसारखाच रुचीकरिता व सुवासाकरिता जेवणाच्या पदार्थातून तिकडे घालीत असतात .) ही पाचक , तीक्ष्ण , कृमी , वात व कफनाशक , सुगंधी , अग्निदीपक , रुचिकारक , व तोंड स्वच्छ करणारी आहे . पांढरी तुळस ही कफ , वात , विरोग , श्वास ,

खोकला , व दुर्गंधी ह्यांची नाशक , पित्तकारक व कुशीतील शूळांची नाशक आहे . सुमुख (वैजयंती तुळस ) ही तुळशीसारखीच गुणाने असून विशेषतः गर (जीर्णविष ) नाशक आहे . काळी तुळस , पांढरा अजबला व रोहिसगवत हे जिन्नस कफनाशक , हलके , रूक्ष , तीक्ष्ण , उष्ण , पित्तवर्धक , रसकाळी व पाकपाळी तिखट आहेत . कासविंदा हा मधुर ,

कफवातनाशक , पाचक , घसा मोकळा करणारा , विशेषतः पित्तकिंचित् मधुर बुळबुळित आहे . आणि मधुशिग्रु (गोड शेवगा ) सारक , किंचित् कडु , सुजेचा नाश करणारा , अग्निदीपक व तिखट आहे .

शिरसाची पालेभाजी ही मलमूत्रांचा अवरोध करणारी , रूक्ष , तीक्ष्ण उष्ण व त्रिदोषकारक आहे . गांडीर (ही पालेभाजी उत्तर हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे .) व कांगोणीची भाजी ह्यांचे गुणही शिरसाच्या भाजीसारखेच आहेत , चित्रकाची व तिळवणीची भाजी ह्या दोन्हीही कफ व सूजनाशक आहेत . व सूची भाजी कफवातनाशक असून सूज , उदर व मुळव्याध ह्या विकारात पथ्यकारक आहे .

कोवळा मुळा , किंचित् कडु तिखट , हृद्य , रुचिकारक , अग्निदीपक , सर्व दोषनाशक , हलका व कंठशोधक आहे . तोच जून मूळा जड , मलावष्टभकारक , तीक्ष्ण , आमदोषकार व त्रिदोषकारक आहे . तोच तुपात तळून खाल्ला असता पित्त व कफवात ह्यांचा नाशक आहे . वाळलेला मुळा त्रिदोषनाशक विषदोषनाशक व हलका आहे मुळ्य़ाशिवाय सर्व वाळविलेल्या भाज्या मलाचा अवरोध करणार्‍या व वातकारक आहेत . मुळ्य़ाची फुले , पाने व फळे (शेंगा ) ही उत्तरोत्तर जड आहेत . त्यांपैकी फुले कफपित्तनाशक असून मुळ्य़ाच्या शेंगा कफवातनाशक आहेत .

लसूण स्निग्ध , उष्ण , तीक्ष्ण , तिखट , पिच्छिल (चिकट ), जड , सारक , किंचित् मधुर , शक्तिवर्धक , वृष्य (कामवर्धक ), बुद्धिवर्धक , स्वर चांगला करणारा , डोळ्य़ांना

हितकारक व मोडलेल्या हाडाला सांधणारा आहे . त्याचप्रमाणे हृद्रोग , जीर्णज्वर , कुशीतील शूळ , मलमूत्रादिकांचा अवरोध , गुल्म , अरुचि खोकला , सूज , मुळव्याध , कुष्ठ ,

अग्निनमांद्य , जंतख् परत विकार , श्वास व कफरोग ह्यांच नाश करितो .

पांढरा कांदा अतिशय उष्णवीर्य नाही असा , वातनाशक , तिखट , तीक्ष्ण , जड , फारसा कफ न वाढविणारा , शक्तिवर्धक , किंचित् पित्तकारक , व अग्निवर्धक , आहे . त्याचप्रमाणे तो स्निग्ध , रुचिकारक , शुक्र धातुला बळकटी आणणारा , बलवर्धक बुद्धीवर्धक , कफकारक पौष्टिक , मधुर , जड , रक्तपित्ताच्या विकारांत पथ्यकारक व बुळबुळित असा आहे .

वाटाण्याची किंवा वालाच्या वेलाची भाजी पित्तनाशक , कफनाशक वातकारक जड , किंचित् तुरट व मधुर विपाकी आहे ॥२२१ -२४८॥

चिचूची भाजी , जुई , शेवंती , जीवंती (हरणदोडी ), तोंडली चीपाने , नदीभल्लतक (पाण बिब्बा ) छगलांत्री (वरधारा ), बांडगूळफांजशाक , काटे शेवरीची पाने , भोकरीची पाने , उंबर वगैरे झाडांची कोवळी पाने , तागाची पाने , गोदणीची पाने व कांचनाची पाने इत्यादी भाजा शाकवर्गातीलच आहेत .

चिचूची भाजी वगैरे वरील सर्व भाज्या सामान्यतः तुरट , मधुर , कडु , रक्तपितनाशक , कफनाशक , वातकारक संग्राहक व हलक्या आहेत त्यापैकी चिचूची भाजी पचनाला हलकी , कृमिनाशक , बुळबुळित , व्रणाच्या रोग्याला हितकारक , तुरट , मधुर , मलबंधक व त्रिदोषनाशक आहे . हरण , दोडीची डोळ्य़ाला पथ्यकारक असून सर्व दोषनाशक आहे . बांडगुळाची भाजी वातनाशक आहे . फांजीची भाजी कमी बलवर्धक आहे . उंबर वगैरे क्षीरवृक्ष व निळ्य़ा कमळिणीची वगैरे पानेंही तुरट असून थंड , संग्राहक आणि रक्ततिसार व रक्तपित्त ह्या विकारांच्या रोग्यांना हितकारक आहेत ॥२४९ -२५३॥

पुनर्नवा (घेटुळी ), वायवरणा , टाकळी , पांढरा एरंड , तानीचा वेल , वेलाची पाने ह्याही भाज्याच आहेत .

पुनर्नवा वगैरे ह्या सर्व भाज्या मधुर , कडवट व वातनाशक आहेत . त्यापैकी घेटुळीची भाजी ही विशेषतः सुजेचा नाश करणारी आहे ॥२५४ -२५५॥

तांदुळजा , मयाळ (मायाळू ), अश्वबला (ही एक मेथीची जात असून हिची पाने मेथीपेक्षा मोठी असतात . ही तुर्कदेशातील आहे . ही बहुधा घोड्यास खावयास घालितात .

इकडे मुंबई वगैरे भागात ह्या भाजीला विलायती गवत किंवा हिस्पित्थ म्हणतात .), चिलघोळ , पालंकी शाक , वास्तूक (चंदनबटवा ) ह्याही पालेभाज्या आहेत .

ह्या तांदुळजा वगैरे भाज्या मलमूत्र साफ करणार्‍या , किंचित् खारट व मधुर , किंचित् वातकफकारक आणि रक्तपित्तनाशक आहेत , त्यापैकी तांदळीची भाजी रुचीला व विपाकाला मधुर असून रक्तपित्त , मदात्यय व रोगनाशक आहे . शिवाय ती फार थंड असून रूक्ष व विषनाशक आहे . मावाळीची भाजी रुचीला व विषकाला मधुर , वृष्य , दातपित्त व मदात्ययरोगनाशक , सारक , स्निग्ध , बलवर्धक , कफकारक व थंड आहे . चंदनबटवा तिखटविपाकी , कृमिनाशक , बुद्धी , जठराग्नी व बल वाढविणारी , किंचित् खारट , सर्व दोषनाशक , रुचिकारक व सारक आहे . चिलघोळ ही चंदनबटव्यासारखीच गुणाने आहे . आणि पालंकशाक तांदळीसारखी गुणाने असून वातकारक , मलमूत्राचा अवरोध करणारी , रूक्ष , कफ व पित्त ह्या दोषाना पथ्यकारक , अशी आहे . अश्वबला (थोर मेथी ) ही रूक्ष व मलमूत्रांचा अवरोध करणारी आहे ॥२५६ -२६१॥

ब्राह्मी , शिकेकाई , कुर्डु , सुवर्चला (सूर्यफूल -काहींच्या मते पोकळा ), पिंपळी , गुळवेल , पाली , कांगोणी , टाकळा (तरोटा ), बावची , विष्णुक्रांता , डोरली , रिंगणी , पडवळ , वांगी , कारली , रानकासविंदा , केवूक , (कोबी ), एरंड , पित्तपापडा , कीराततिक्तक , (भूनिंब ), कर्टोली , कडुनिंब (किंवा कडिनिंब ), दोडकी , वेताचे कोंब , आडुळसा ,

अर्कपुष्णी (रुईच्या पानासारखी पाने असणारी एक वेल म्हणजे कदाचित् हिरव्या पानाची मयाळ असावी ) ह्याही भाज्याच्या उपयोगी पडणार्‍या वनस्पती आहेत .

ब्राह्मी वगैरे ह्या भाज्या सामान्यतः रक्तपित्तनाशक , हृद्य (मनाला प्रिय ), पचनाला फार हलक्या , कुष्ठ , प्रमेह , ज्वर , श्वास , खोकला , अरुचि ह्यांचा नाश करणार्‍या आहेत .

ब्राह्मी ही तुरट , पित्तविकारात हितकारक , रसकाळी व पाककाळी मधुर , थंड व हलकी आहे . पाथरीची भाजीही गुणाने ब्राह्मीसारखीच आहे . कुर्डुची भाजी जळजळ न करणारी , त्रिदोषनाशक व संग्राहक आहे . बावचीच्या पानांची भाजी तिखटविपाकी , कडु व कफपित्तनाशक आहे . विष्णुक्रांतीची भाजी किंचित कडु , त्रिदोषनाशक , व तिखट अशी आहे . काकमाची (कांगोणी ) ही विष्णुक्रांताप्रमाणेच गुणाने असून अतिशय उष्ण किंवा थंड नाही व कुष्ठनाशक आहे . डोरलीची फळे (डोरली वांगी ) ही कडु , कुष्ठ व कृमिनाशक , कफवातनाशक , कडु , तिखट व हलकी आहेत . पडवळ हे कफपित्तनाशक , व्रणाला पथ्यकारक , उष्ण , कडु , वात न वाढविणारे , तिखटविपाकी , वृष्य , रुचिकारक , तिखट , हलके , अग्निदीपक आहे . तेच पिकले म्हणजे किंचित खारट व पित्तकारक आहे . कर्टोलाची फळे व कारली ह्यांचे गुणही वांग्याच्या गुणासारखेच आहेत .

अडुळसा , वेताचे कोंब , गुळवेल , कडुनिंबाचा पाला , पित्तपापडा व भूनिंब ह्या भाज्या कडु असून पित्त व कफनाशक आहेत . टाकळ्य़ाच्या पाल्याची व वायवरणाच्या पाल्याची भाजी कफनाशक , रूक्ष , हलकी , थंड व वातपित्तांना वाढविणारी आहे . कालशाक (ही बंगाल्यात प्रसिद्ध आहे .) ही अग्निदीपक , गरदोष - (कृत्रिम विषदोष ) नाशक व तिखट आहे . नाडीशाक (कोकणात नाळ म्हणतात ) ही वातकारक , पित्तनाशक व मधुर आहे . चांगेरी (चुका ) ही संग्रहणी व मुळव्याधनाशक , आंबट , वात मधुर आहे . चांगेरी (चुका ) ही संग्रहणी व मूळव्याधनाशक , आंबट , वात व कफ दोषांत हितकर , उष्ण , किंचित् तुरट व मधुर आणि अग्निदीपक आहे ॥२६२ -२७३॥

मोठी घोळ (लोणिका ), पांढरी साळवण , त्रिपर्णिखा (दुधी ), पत्तूर (जळपिंपळी ), जीवक , सुरर्चला (ब्राह्मीचा भेद वांब ), डुक्कर (दोडी ), कुतुंबक (द्रोणपुष्पी ), कुटिंजर (रानचाकवत किंवा पोकळा ), कुंतुलिका (चिरपोटाणी किंवा रानतीळ ) व कोरांटी (हिला हिरवी फुले येतात ) ह्या वनस्पती भाजीच्या वर्गात येतात .

मोठो घोळ वगैरे भाज्या रुचीला व विपाककाळी मधुर , थंड , कफ नाशक , अतिपित्त न करणार्‍या , किंचित खारट व रूक्ष असून ह्या क्षारयुक्त म्हणजे मीठ खाल्ल्या असता वातकारक व सारक आहेत .

कुंतलिका (चरपोटाणी ) व कुरंटिका ह्या भाज्या मधुर , कडु व तुरट अशा आहेत . राजक्षवक (काळी मोहरी ) व कचोरा (कापुरकाचरी ) ह्या भाज्या संग्राहक , थंड , हलक्या व दोषनाशक आहेत . हरभर्‍याची भाजी रसकाळी व विपाककाळी मधुर व वचनाला जड आहे . वाटाण्याच्या वेलाची किंवा बालाच्या वेलाची भाजी मलभेदक , मधुर , रूक्ष व अतिशय वातकारक आहे . घाणेच्या करंजाची पाने मलमूत्र साफ करणारी तिखट , हलकी , वातकफनाशक , सूजनाशक व उष्णवीर्य आहेत . तांबुलपत्र (नागवेलोची पाने ) कफनाशक , सूजनाशक व उष्णवीर्य आहेत . तांबुलपत्र (नागवेलाची पाने ) तीक्ष्ण , उष्ण , तिखट , पित्ताचा प्रकोप करणारी , सुगंधी , तोंड स्वच्छ करणारी , कडू , स्वर चांगला करणारी , वातकफनाशक , सारक , तिखटविपाकी , तुरट , अग्निदीपक , तोंडातील कडु , मळ , बुळबुळितपणा व दुर्गंधी ह्याचे शोधन करणारी आहेत ॥२७४ -२८०॥

कांचन , ताग , व काटे शेवरी ह्यांची फुले रुचीला व विपाकाला मधुर व रक्तपित्तनाशक आहेत . अडुळसा व हादगा ह्यांची फुले कडु तिखटविपाकी आणि क्षय व खोकला ह्यांचा नाश करणारी आहेत , त्यापैकी हादग्याची फुले ही अतिशय थंड किंवा उष्ण नसून ज्यांना रातांधळे रोग आहे त्यांना पथ्यकारक आहेत .

नेपती व गोडाशेवगा ह्यांची फुले तिखटविपाकी , वातनाशक व मलमूत्र साफ करणारी आहेत .

रक्तचंदन , कडुनिंब , मोखा , रुई , असाणा ह्यांची फुले कफपित्तनाशक व कुष्टनाशक आहेत व कुड्याच्या फुलांचेही गुण असेच आहेत .

पद्मपुष्प (सूर्यविकासी कमळ ) हे किंचित् कडू , मधुर , थंड व कफपित्तनाशक आहे . कुमुद (चंद्रविकासी कमळ ) हे मधुर , पिच्छिल (आमकारक ), स्निग्ध , आनंदकारक व थंड आहे . कुवलयजातीचे कमळ व उत्पल कमळ ही कुमुदजातीच्या कमळापेक्षा थोडी कमी गुणाची आहेत .

निर्गुडीचे फूल थंड व पित्तनाशक आहे . जाईची व मोगर्‍याची फुले कडू असून केवळ वासानेच पित्ताचा नाश करणारी आहेत , बकुळाची फुले व गुलाबाची फुले सुगंधी , स्वच्छ व मनाला प्रिय अशी आहेत . नागकेसराची फुले व केशराची फुले कफ , पित्त व विषनाशक आहेत . चाफ्याचे फूल रक्तपित्तनाशक , थंड , किंचित् उष्ण व कफनाशक आहे . पळसाचे फूल कफ पित्तनाशक आहे . आणि कोरांटीचेही फूल कफपित्तनाशक आहे . साधारणतः ज्या झाडाची फुले असतील त्या झाडाच्या गुणदोषाप्रमाणेच त्यांच्या फुलांचे गुणदोष समजावे .

गोडा शेवगा व नेपती ह्यांची फुले तिखट व कफनाशक आहेत . (कोणी करीर म्हणजे गोड्या शेवग्याचे कोवळे कोंब जे त्यांचे हे गुण मानितात .)

क्षवक (आळंबे ) कुलेचर (आळंब्याची दुसरी जात ) व कळकाचे अंकूर हे कफनाशक व मलमूत्रसारक आहेत . त्यापैकी आळंबे (छत्रीसारखे पावसाळ्यात उगवते ते ) हे कृमिकारक , मधुरविपाकी , पिच्छिल (आमकारक ), विष्यंदी (स्त्रावकारक ), वातकारक व अति पित्त व कफ न करणारे आहेत . वेळूचे कोंब कफकारक , रुचीला व विपाकाला मधुर , विदाहकारक , वातकारक , किंचित् तुरट व रूक्ष आहेत ॥२८१ -२९२॥

आळंबे हे कडबा ठेवलेली जागा , ऊसाची जमीन , शेणाटाकण्याची जागा , कळकाच्या बेटांची जागा व सामान्य कोणाचीही जमीन इतक्या ठिकाणी उत्पन्न होते .य त्यापैकी

कडब्याच्या जाग्यांत होणारे ओळंबे रुचीला व विपाकाला मधूर , रूक्ष व दोषनाशक आहे . ऊसाच्या जमिनीतील मधुर किंचित् तुरट , किंचित् तिखट , व थंड असते . शेणाच्या जागेत होणारे त्याचप्रमाणे गुणकारक आहे ; तथापि ते ऊष्ण , तुरट व वातकारक आहे . वेळूपासून होणारे तुरट व वातकारक असते . आणि जमिनीत होणारे जड , फारसा वात न वाढविणारे असून जमिनीच्या मानाने त्यात रसाची चव असते .

तिळाची पेंड , तिळकलक (तेल न काढता केलेले तिळकूट ), स्थूणिका (अनेक वाळलेल्या भाज्या व पीठ एकत्र मिसळून केलेले मिसळीचे वडे व वाळलेल्या भाज्या ) हे सर्व पदार्थ वातादिकांना वाढविणारे आहेत .

कोणाच्याही धान्याचे केलेले वडे वातकारक आहेत . (कारण ह्या वड्यांत मुळे व कोहाळा वगैरे भाज्यांचे तुकडे घातलेले असतात .) सिंडाकी म्हणजे मूळे भाज्या थोड्या उकडून चांगल्या वाटून त्यात मसाला घालून घट्ट करून बड्या केल्या तर त्याला कोरडी सिंडाकी (गोळा भाजी ) म्हणतात . व ती वाटून पिठल्याप्रमाणे दाट केली तर तिला ओली सिंडाकी (पळीवाढी भाजी ) म्हणतात . ती ओली सिंडाकी वातकारक , रुचिकर व अग्निदीपक असते .

सर्वप्रकारच्या गोड भाज्या ह्या सामान्यतः मलभेदक , जड , रूक्ष बहुतेक अवष्टभकारक , पचण्यास फार त्रासदायक व किंचित् तुरट असतात . भाज्यांची सर्व प्रकारची फुले , पाने , फळे , नळ व कंद हे उत्तरोत्तर एकाहून एक जड आहेत .

कर्कश (चांगली न दिसणारी खरखरीत अशी ), पिकलेली , किडलेली , घाणेरड्या जमिनीच्या भागातील आणि हंगाम सोडून भलत्याच वेळी आलेली अशी पानांची भाजी (पत्रशाक -पालेभाजी ) खाण्यास घेऊ नये ॥२९३ -२९७॥

आता , कंदाचे गूणदोष सांगतो . भुई कोहळा , शतावरी (दिवसमावळी ), बिस , (कमळाचे मूळ ), मृणाल (कमळाचे कोंब ), शिंगाडे , कशेरु (कचरा किंवा कोकणात फुरडे म्हणात ते ), पांढरे रताळे , मध्वालु (गोडे आळु ), रक्तालु (राजाळुची एक जात किंवा तांबडे रताळे ), निळ्या व तांबड्या कमळाचे गट्टे इत्यादि वनस्पती कंदवर्गातील आहेत .

भूई कोहाळा वगैरे कंद सामान्यतः रक्तपित्तनाशक , थंड , मधुर , जड शुक्रवर्धक व स्त्रियांच्या दुधाची वाढ करणारे आहेत . भुई कोहाळा हा मधुर , पौष्टिक , वृष्य (कामवर्धक ), थंड , स्वर चांगला करणारा , अतिशय मूत्रकारक , शक्तिवर्धक व वातपित्तनाशक आहे . शतावरी (दिवसमावळी ) वातपित्तनाशक , गोड , किंचित् कडु व वृष्य आहे . मोठी शतावरी हृद्य असून बुद्धि , जठराग्नी व शक्ती वाढविणारी आहे . शिवाय ती संग्रहणी व मुळव्याध ह्यांचा नाश करणारी असून वृष्य थंड व रसायन (शरीरस्थ सप्तवातूंना नाविन्य आणणे ) आहे . शतावरीचे कोवळे अंकुर , कडु व कफपित्तनाशक आहेत .

कमळाच्या मुळ्य़ा जळजळ न करणार्‍या रक्तपित्तासंबंधी दोषनाशक , मलावरोधकारक , पचण्यास कठीण , रूक्ष , बेचव , वातकारक आहेत . शिंगाडे व कचरा किंवा नागरमोथे जड , मलावरोधक व थंड आहेत . पांढरे रताळे कफकारक , जड व वातकारक आहेत . सुराणाचा कंद कफनाशक , तिखटविपाकी व पित्तकारक आहे , वेळूचे कोंब जड व कफवातकारक आहेत .

मोठा सुरण व मानकंद वगैरे कंद किंचित् तुरट , कडू , रूक्ष , मलावष्टंभक , जड , कफवातकारक व पित्तनाशक आहेत .

कुमुद (चंद्रविकासी ) कमळ व निळे कमळ वगैरे कमळांचे कंद वातकारक , तुरट , पित्तशामक , मधुरविपाकी व थंड आहेत . वाराहकंद , (डुकरकंद ) कफनाशक , रुचीला व विपाकाला तिखट , प्रमेह , कुष्ट व कृमिनाशक , बलवर्धक , कामवर्धक व रसायन (सप्त धातूंना नाविन्य आणणारा ) आहे .

ताड , नारळ , खजूर इत्यादि वृक्षांच्या शेंड्यातील मगज हे रुचीला व विपाकाला मधुर , रक्तपित्तनाशक , शुक्रवर्धक , वाताचा नाश न करणारा व कफवर्धक आहे .

कोणचाही कंद अति कोवळा , हंगामाला सोडुन आलेला , जुनाट , (एक वर्षानंतरचा ) रोगट , किडलेला व जो चांगल्या जोमात वाढलेला नाही असा असल्यास तो खाण्यास घेऊ नये ॥२९८ -३१२॥

सैंवध , समुद्राचे मीठ , बिडलोण , संचळ (पादेलोण ), रोमक (सोरमीठ ), औभ्दिद (खार्‍या पाण्यापासून काढलेले ) मीठ इत्यादि मिठे ही उत्तरोत्तर उष्ण , वातनाशक ,

कफपित्तकारक आहेत आणि पूर्वी पूर्वीची स्निग्ध , मधुर व मलमूत्रसारक आहेत (ह्यापैकी विडलोण हे चांदवेल व भक्तलवण ह्याच्या मिश्रणाची भट्टी लावून काढितात आणि रोमक हे शाकबरीदेशातील रुमा सरोवरापासून निघते )

सैंधव हे हृद्य , रुचिकारक , हलके , अग्निदीपक , स्निग्ध , किंचित् गोड , कामवर्धक , थंड व वातादि सर्व दोषनाशक आहे . मीठ विषाकाला मधुर , फार उष्ण नाही असे , विदाह न करणारे , मलभेदक किंचित् स्निग्ध , शूलनाशक व फारसे पित्त न करणारे आहे . बिडलोण हे क्षारयुक्त , अग्निदीपक , सूक्ष्म (अत्यंत सूक्ष्म अशा स्त्रोतसांतून संचार करणारे ) शूल व हृद्रोगनाशक , रोचक (रुचि आणणारे ), तीक्ष्ण , उष्ण व वाताचे अनुलोमन करणारे आहे , संचक (ह्याचे काळे व तांबडे असे दोन प्रकार आहेत , त्यापैकी काळे हे निर्गंध असते ) हे पचनाला हलके , उष्णवीर्य , स्वच्छताकारक किंचित् तिखट , गुल्म , शूळ व मलावरोध ह्यांचा नाश करणारे , मनाला आवडणारे , सुगंधी व रुचिकारक आहे . रोमक (सोरमीठ ) हे तीक्ष्ण , अतिशय उष्ण , व्यावायी (पचनापूर्वीच देह व्यापणारे ), तिखटविपाकी , वातनाशक , हलके , ओलसरपणा आणणारे , सूक्ष्म स्रोतसातून संचार करणारे , मलभेद व मूत्रकारक असे आहे . औभ्दिदलवण हलके , तीष्ण , उष्ण , कफाला पातळ करणारे , (सूक्ष्म ), वाताला मार्गावर आणणारे , किंचित् तिखट व क्षारयुक्त असे आहे . गुटिकालवण , (वृक्षलवण ) हे कफ , वात व कृमी ह्यांचा नाश करणारे लेखन , पित्त वाढविणारे , अग्निदीपक , पाचक व मलभेदक असे आहे . खार्‍या मातीपासून

काढलेले मीठ ते उपरमीठ , वाळुमिश्रित (रेताड ) जमिनीतील मातीपासून काढलेले मीठ , असे हे तीन प्रकारचे मीठ तिखट व कफाला तोडून काढणारे आहे . ह्या मिठांना ‘‘कटुलवण ’’ असे म्हणतात ॥३१३ -३२१॥

जवखार , सजिखार , उपक्षार (खार्‍या मातीपासून वगैरे काढलेला क्षार ) पाकीम (क्षारपाकविधीने लेपनादिकांसाठी तयार केलेला क्षार ) व टाकणक्षार इत्यादि क्षार आहेत .

सर्व प्रकारचे क्षार हे सामान्यतः गुल्म , मुळव्याध , संग्रहणी व पडसे ह्यांचा नाश करणारे , पाचक रक्तपित्तकारक व सारक आहेत . सज्जिखार व जवखार हे अग्निसारखे उष्ण आणि शुक्र , कफ , मळाचा विबंध (खडा बनणे ) मुळव्याध , गुल्म व पांथरीनाशक आहेत , उषक्षार (उखर मातीचा क्षार ) उष्ण , वातनाशक , ओलसरपणा आणणारा व बलनाशक आहे . पाकीम क्षार मेदनाशक व बस्तिचे शोधन करणारा आहे . आणि टाकणखार हा रूक्ष ,य वातकारक , कफनाशक पित्त दूषित करणारा , अग्निदीप व तीक्ष्ण आहे ॥३२२ -३२५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP