मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
हिताहितीय

सूत्रस्थान - हिताहितीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय विसावा

आता ‘हिताहितीय ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ ते २॥

जे द्रव्य वायुला पथ्यकर असते ते पित्ताला अपथ्यकारक होते . ह्यावरून पाहता कोणतेही एक द्रव्य केवळ हितकर किंवा केवळ अहितकर असते असे निश्चयाने सांगता येत नाही , असे कित्येक आचार्याचे मत आहे ; पण ते योग्य नाही . कारण आमच्या या तंत्राच्या सिद्धांताप्रमाणे ज्याअर्थी स्वभावतः (स्वतंत्र -स्वप्रकृतीने ) किंवा संयोगतः (इतर द्रव्याच्या मिश्रणाने ) केवळ हितकारक (पथ्यकारक ). केवळ अहितकारक (अपथ्यकारक ) व हिताहितकर (पथ्यापथ्यकारक ) असे द्रव्यांचे प्रकार होतात , त्या अर्थी वरील आचार्याचे मत योग्य नव्हे हेच खरे पाणी , तूप , दूध व अन्न हे पदार्थ मनुष्य देहाला जन्मापासूनच मानवणारे असतात . म्हणून ही एकांतहित (केवळ हितकारक ) द्रव्ये आहेत . भाजणे , पचविणे व मारणे या

क्रिया करणारे अग्नि , क्षार व विष ही द्रव्ये परस्पर संयोगाने (विषतुल्य ) होतात , आणि जे वाताला पथ्यकारक ते पित्ताला अपथ्यकारक (म्हणजे एक दोषाला जे पथ्य असते ते दुसर्‍या दोषाला अपथ्य असते ) ही हिताहित द्रव्ये आहेत .

आता सर्व मनुष्यमात्रांना नित्य खाण्यास योग्य अशा पदार्थांचा एक वर्गच सांगतात , तो असाः -

तांबसाळ , साठेसाळ , कंगुक (पांढरे व काळसर साठे तांदुळ ),

मकुंदक (किंचित काळे साठे तांदुळ ) पांडुक , (पांढर्‍या टरफलाच्या ) साळी , पीतक (पिवळ्या साली ), प्रमोदकाळी , कालक -आसन , पुष्पक , कर्दमक , शकुनाहत्त सुगंधक , कलम (कळंबी साळ ) या साळी ; नीवार (देवभात ), हारीक , रानहारीक , सावे वगैरे तृण धान्य ; गहु कळकाचे बी तसेच काळा हरीण , तांबडा हरीण , कुरंग (एक हरणाची जात ), मृगमातृका (कस्तुरी मृगाची एक जात ), श्वदंष्ट्र (चार दातांचा हरीण ), कराल (कस्तुरी मृग ), करढोक पक्षी , पारवा , लावा , तित्तिरपक्षी , कर्पिजल (पांढरा तित्तिर ), रानचिमणी , वर्तिक (रानचिमण्यातील एक भेद ) या जंगल पशुपक्ष्यांचे मांस , मुग , रानमुग मटक्या वाटाणे , मसुरा , हरभरे , हिरवे वाटाणे , तुरी , सतीन (वाटाण्याची एक जात ) ही डाळीची धान्ये ; लहान घोळ , चंदन बटवा , कुरडू हरणदोडी , तांदुळजा , ब्राह्मी या भाज्या ; गाईचे तुप , सैंधव , डाळींब आवळे हे पदार्थ सर्व प्राणीमात्रांना सामान्यतः हितकारक आहेत .

तसेच ब्रह्माचर्य , वारा नाही अशा स्थळी निजणे , ऊन पाण्याचे स्नान , रात्री निद्रा (अर्थात दिवसा न निजणे ) आणि व्यायाम या गोष्टी नित्य वागण्यात केवळ हितकारकच आहेत .

पाणी वगैरे केवळ हितकारक आणि अग्नि वगैरे केवळ अहितकारक हे वर (मागे ) सांगितले आहेत ; आणि हिताहितकारक म्हणजे जे वाताला हितकारक ते पित्ताला अहितकारक हेही सांगितले आहेच .

आता जी दुसरी द्रव्ये संयोगाने विषासारखी अपायकारक होतात ती अशीः -

कोहाळा वगैरे (कित्येक घेवड्याच्या वगैरे वेलाला लागणार्‍या शेंगा असे म्हणतात ) वेलाची फळे , आळंबे , कळकाचे कोंब , बोरे , चिंचा वगैरे आंबट फळे , मीठ , हुलगे , तिळाचे कूट (पेंड ), दही , तेल , मोड आलेली धान्ये पिष्टमयपदार्थ , वाळलेल्या भाज्या , बोकड , मेंढा यांचे मांस , मद्य , जांभळे , बारीक मासे यांच्या अंगावर तांबड्या रेषा असतात .), घोरपड व डुक्कर यांचे मास हे सर्व किंवा प्रत्येक पदार्थ परस्पर मिश्र करून अगर निरनिराळे असे दुधाबरोबर खाऊ नयेत .

असे आहे तथापि वैद्याने रोग , सात्म्य , (रोग्याच्या नित्य खाण्याच्या सवयीचे ), देश काल (ऋतु वगैरे ), देह (रोग्याची शक्ति वगैरे ) आणि जठाराग्नीची स्थिति वगैरे बरीकसारीक गोष्टींचा विचार करून , व रोग्याची त्या त्या पदार्थाविषयी प्रवृत्ति कशी आहे हे पाहुन केवळ अपथ्यकारक जरी एकादा पदार्थ असला तरी तो रोग्यास खाण्यास द्यावा .

रोगादिकांची (सात्म्य देशकालादिकांची ) स्थित्यंतरे पुष्कळच होत असल्याकारणाने (रोग्याच्या बाबतीत ) द्रव्याची व्यवस्था (म्हणजे हे द्रव्य हितकारक वर्गातील आहे का अहितकारक वर्गातील आहे याची वाटाघाट ) कशी आहे हे वैद्य पाहात बसत नाहीत ; पण केवळ आरोग्य रक्षणार्थ मात्र हिताहित द्रव्य कोणचे याचा विचार करितात . उदाहरणार्थ निरोगी मनुष्याने वैद्यास विचारले की , हे विष व हे दूध असे दोन पदार्थ आहेत , यांतील मी कोणता घ्यावा ? तर अशा वेळेला वैद्य सांगतील की , बाबा , दूध हेच सर्वथैव हितकारक आहे ते घे . विष हे सर्वथैव अहितकारक (अपायकारक ) आहे ते घेऊ नको .

म्हणून बाळा सुश्रुता , याप्रमाणे पाणी , तूप वगैरे केवळ हितकारक द्रव्ये आपआपल्या रुचीने (रसाने ) योग्य अशी असली म्हणजे ती निरोगी मनुष्याला मात्र हितकारक आहेत . म्हणून ती रोग्याला हितकारक आहेत असे मात्र नव्हे हे लक्षात ठेव ॥३-१२॥

आता संयोगामुळे अहितकारक असे दुसरे पदार्थ सांगतो .

नवे मोड काढलेले धान्य , चर्बी , मध , दूध , गूळ व उडीद या पदार्थाशी ग्राम्य (मेंढा , बकरा वगैरे ), आनुप (रानडुक्कर , रेडे वगैरे ), औदक (जल -चर -मासे वगैरे या प्राण्यांचे मांस खाऊ नये . कुटकीच्या पानाची भाजी व हिंग ) किंवा हिंगुपत्रशाक हे पदार्थ दूध व मधाशी खावू नये . बगळ्याचे मांस , मद्य व उडदाची , हरभर्‍याची वगैरे उसळ यांशी खाऊ नये . कांगोणीच्या पाल्याची भाजी पिंपळी व मिरे यांजबरोबर खाऊ नये . नाडीपत्रशाक (कोकणात ‘‘नाळ ’’ असे म्हणतात ), कोंबड्याचे मांस व दही हे कोणतेही दोन अगर तीनही खाऊ नये . मध ऊन पाण्याशी पिऊ नये किंवा मधावर ऊन पाणी पिऊ नये . कोणच्याही पित्ताशी कच्चे मांस खाऊ नये , मद्य , खिचडी व खीर . हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत . सौवीरक (काजीचा एक प्रकार ) व तिळमिश्रित सारण घातलेल्या करंज्या एकत्र मिसळून खाऊ नयेत . मासे व ऊसाचे पदार्थ (साखर , गूळ , काकवी वगैरे ) एकत्र खाऊ नयेत . गुळाशी कांगोणी , व मधाशी मुळे , मध व गुळाशी डुकराचे मांस , दुधाशी मुळे , आंबे व जांभळे साळई किंवा ससा , डुकराचे मांस , घोरपडीचे मांस , सर्व प्रकारचे मासे व विशेषतः चिलिचिमि (बारके मासे ) हे पदार्थ प्रत्येक देखील दुधाशी खाऊ नये . (यामध्ये आला आहे तो हिरवा आंबा समजावा ) केळीचे फळ हे ताडाच्या फळाशी अगर दूध , दही किंवा ताकाशी खाऊ नये . ओटीचे फळ दूध , दही किंवा उडदाचे वरण याच्याशी खाऊ नये . तसेच दुधाच्या पूर्वी अगर दूध प्याल्यावर त्याजवरही खाऊ नये .

आता काही विशेष संस्काराने अहितकारक होणारे पदार्थ सांगतो . शिरसाच्या तेलात तळलेले पारव्याचे मांस खाऊ नये . पांढरा तित्तिर , मोर , लावापक्षी , तित्तीर पक्षी (काळा ) व घोरपड यांचे मांस , एरंडाचे व दारु हळदीचे लाकडाचे अग्निवर पचन करून अगर भाजून किंवा एरंडेलात तळून खाऊ नये . दहा दिवसपर्यंत काशाच्या भांड्यात ठेवलेले तूप खाऊ नये मध हा उष्ण पदार्थाशी अगर ऊन करून किंवा उष्ण काळात उन्हाळ्य़ात व शरदऋृतूत खाऊ नये . आले (आल्याची भाजी ), शिजविलेल्या अगर मासे शिजविलेल्या भांड्यात कांगोणीची भाजी शिजवून खाऊ नये . तिळगूळ घालून केलेली मयाळीची (मयाळूची ) भाजी खाऊ नये , डुकराच्या चर्बीने बगळ्य़ाचे मांस तळून खोबरे घालून किंवा खोबरेल तेलात तळूनही खाऊ नये . मांस पक्ष्याचे (गिधाडातील एक जात ) मांस लोखंडाच्या सळईवर किंवा कशाच्याही काडीवर टोचून ते निखार्‍यावर भाजून खाऊ नये .

आता परिमाणाने अहितकारक होणारी द्रव्ये सांगतो . मध व पाणी अथवा मध व तूप समभाग मिश्र करून खाऊ नये . धूत , तेल वसा व मज्जा हे चार स्नेहाचे प्रकार आहेत . त्यापैंकी कोणतेही दोन स्नेह मिश्र करून खाऊ नये . या चार स्नेहापैकी कोणताही स्नेह पदार्थ मिश्र करून ते दोन्ही खाऊन त्याजवर पावसाचे पाणी पिऊ नये .

आता जे दोन रस रसाने , वीर्याने व विपाकाने विरुद्ध आहेत अशी द्रव्ये सांगतो .स त्यापैकी मधुर व आंबट हे रस रसाने व वीर्याने विरुद्ध आहेत . मधुर व खारट , मधुर तिखट हे रस , रसवीर्य व विपाक या तिहीनीही विरुद्ध आहेत . मधुर व तिक्त (कडू ) हे रस विपाकाने विरुद्ध आहेत . तसेच मधुर व तुरट हे रस रसविपाकाने विरुद्ध आहेत , आंबट व खारट हे रस रसाने विरुद्ध आहेत . आंबट व तिखट रस व विपाकाने विरुद्ध आहेत . आंबट व कडू आणि आंबट व तुरट हे रस वीर्य व विपाकाने विरुद्ध आहेत . खारट व तिखट हे रस व विपाकाने विरुद्ध आहेत . खारट व कडु आणि खारट व तुरट हे रस , वीर्यविपाकाने विरुद्ध आहेत , तिखट व कडू हे रसाने व वीर्याने विरुद्ध आहेत .

तिखट व तुरट हेही रस वीर्याने विरुद्ध आहेत . कडू व तुरट हे रस रसाने विरुद्ध आहेत .

आता जे पदार्थ हितकर म्हणून सांगितले आहे ते देखील त्या वर्गातील इतर पदार्थांपेक्षा फारच सत्वशील किंवा एखाद्या गुणाने फारच अधिक असतील तर ते देखील अति सेवन करू नयेत . जसे अतिरुक्ष पदार्थ , अति स्निग्ध पदार्थ (म्हशीचे दूध वगैरे ), अति उष्ण पदार्थ व अति थंड पदार्थ असे जे पदार्थ असतील ते वर्ज्य करावे (म्हणजे तारतम्याने , बेताने खावे ॥१३-१७॥

ह्याप्रमाणे जे कोणचे पदार्थ वीर्यतः म्हणजे स्वभावतः आणि स्वभावतः म्हणजे रस , वीर्य व विपीक ह्यांनी परस्परविरुद्ध आहेत ते केवळ अहितकारक म्हणून समजावे ; आणि ह्याखेरीज बाकीचे राहिले ते हिताहित म्हणजे ज्या ठिकाणी जो हितकर म्हटला तो त्यापुरता हितकर व जो अहितकर म्हटला तो अहितकर असे समजावे .

जो मनोसोक्त वागणारा अविचारी मनुष्य रसवीर्यादिकांनी विरुद्ध पदार्थ नेहमी सेवन करतो , त्याला व्याधी जडतात त्याच्या इंद्रियांचे सामर्थ्य नष्ट होते व अखेर मृत्युही येतो .

जे एकादे द्रव्य खाण्यात आले असता दोषांचा प्रकोप करिते पण त्यांना (गेळफळ किंवा निशोत्तर ह्यांच्यासारखे वमन किंवा विरेचनाने ) बाहेर काढून टाकीत नाही , किंवा रसादि धातूंना दूषित करिते ते द्रव्य व्याधी (रोग ) उत्पन्न करते असे जाणावे .

विरुद्ध पदार्थांच्या सेवनाने जे रोग होतात , त्यांना दूर करण्यासारखे उपयुक्त विरेचन घेतल्याने ते नाहीसे होतात . किंवा तशाच प्रकारच्या वातीच्या प्रयोगानेही कोठा शुद्ध झाला असता ते नाहीसे होतात . आता ज्यांना वमन किंवा विरेचन घेण्याइतके सामर्थ्य नाही , त्यांना रोगाचे शमन करणारे सौम्य औषध दिल्यानेही ते बरे होतात . अथवा विरूद्ध पदार्थ खाणेच असेल तर त्याच्या आधी त्याविरूद्ध पदार्थाचा प्रभाव हाणून पाडणारी अशी सुवर्ण -लोहादि -भस्मे किंवा अभ्रक -पारदादि -भस्मे योग्य रीतीने सेवन केली असता त्या विरुद्ध पदार्थाच्या खाण्यापासून अपाय होत नाही . (कारण ‘‘न सज्जते हेमपात्रे विष पद्मदलेऽम्बुवत् ’’ म्हणजे सुवर्णपात्रात ठेवलेल्या पदार्थाला विष हे स्पर्शत नाही , जसे कमळाच्या पानाला पाणी स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे .)

विरुद्ध पदार्थाचे खाणे अपायकारक आहे . तथापि त्याची नित्य सवय झाल्याने ते अपाय करीत नाहीत . तसेच ज्याचा जठराग्नि चांगला प्रदीप्त आहे व जे तरुण आहेत त्यांनी ते अल्प प्रमाणात खाल्ले असता त्यांना त्यापासून काही उपद्रव होत नाही . तसेच स्निग्ध पदार्थांचे सेवन करून व्यायाम करणारे व त्याकारणाने जे सामर्थ्यवान असतात , त्यांनी हे पदार्थ खाल्ले असता त्यांनाही त्यापासून काही उपद्रव नाहीत ॥१८ -२२॥

पूर्वेकडील वारा , मधुर , स्निग्ध व लवणरसयुक्त (खारा ) असतो . जड , विदाहकारक , रक्तपित्ताची वाढ करणारा , उरःक्षत , विषबाधा व्रण व कफदोष हे रोग ज्यांना आहेत त्यांच्या रोगाची वाढ करणारा , वातरोगी , श्रम करून थकलेले व क्षयाचे रोगी यांना प्रशस्त आहे . पण त्यांना जर व्रण असेल तर त्या व्रणात ओलावा वाढविणारा आहे .

दक्षिणेकडील वारा मधुर , विदाह न करणारा किंचित् तुरट व हलका असा आहे . तसाच हा फार चांगला (श्रेष्ठ ) असून डोळ्यांना हितकारक व बलवर्धक आहे . हा रक्तपित्ताचे शमन करणारा असून वाताचा प्रकोप करीत नाही .

पश्चिमेकडील वारा स्वच्छ , रूक्ष , परुष , अंगाला झोंबणारा , अंगातील स्नेह व बल कमी करणारा , तीक्ष्ण , कफ व मेद ह्यांचे शोषण करणारा , व तात्काळ प्राणनाश करणारा आहे . (ओज क्षीण करणारा आहे .)

उत्तरेकडचा वारा स्निग्ध , मृदु व मधुर असा आहे . हा किंचित तुरट असून थंड व दोषांना न वाढविणारा आहे . म्हणून जे निरोगी आहेत त्यांच्या शरीरात ओलसरपणा आणून बळ वाढविणारा आहे . हा विशेषतः अशक्त माणसे , क्षयरोगी व विषबाधा झालेले ह्यांना फार हितकारक आहे . ह्याप्रमाणे एकंदरीत दक्षिण व उत्तर दिशेचे वारे हितकारक व पूर्व पश्चिम दिशेचे वारे अहितकारक आहेत , हे कळण्यासाठी ह्यांचे गुणदोष ह्या अध्यायात सांगितले आहेत ॥२३ -३०॥

अध्याय विसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP