मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
आमपक्वैषणीय

सूत्रस्थान - आमपक्वैषणीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय सतरावा

आता " आमपक्वैषणीय " नावाचा अध्याय सांगतो जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१॥२॥

गाठ , करट , अलजी वगैरे अनेक व्याधि बहुधा शोथजन्यच ( सूज ) असतात असे म्हटले आहे . पण त्यांच्याहून भिन्नलक्षणांचा विस्तृत गाठाळलेला , सारखा किंवा विषम ( वाकडातिकडा ), त्वचा व मांस ह्यांच्या आश्रयाने असणारा , वातादि पृथक किंवा दोन अगर सर्व दोषांच्या प्रकोपाने युक्त , आणि शरीराच्या एखाद्या मार्गाचा होणारा अस जो शोफ ( सूज ), त्याला " व्रणशोफ " अथवा " रोगट सूज " असे म्हणतात .

तो वात , पित्त , कफ , शोणित , किंवा सन्निपात ( त्रिदोष ) आणि आगंतुक अशा निमित्तांनी सहा प्रकारचा आहे .

त्याच्या दोषानुरुप आकृती व लक्षणे सांगतो .

त्यापैकी वातजन्य सूज तांबूस किंवा काळी , खरखरीत , मृदु , एकच जागा धरुन नसणारी व ठणका वगैरे इतर वातविकारांनी युक्त असते हिजमध्ये वेदना विशेष असतात .

पित्तजन्य सूज , पिवळी किंवा तांबूस , मऊ , त्वरित पसरणारी असून तिच्यामध्ये दाह वगैरे लक्षणे विशेष होतात . कफजन्य सूज पिवळसरपांढरी किंवा पांढरी , कठीण , थंड , स्निग्ध , सावकाश पसरणारी असून तिच्यामध्ये कंडू , जडत्व व स्पर्शहीनत्व वगैरे उपद्रव असतात , आणि वेदना जास्त होतात . त्रिदोषज सुजेमध्ये सर्व दोषांचे रंग , लक्षणे व वेदना असतात . रक्तजन्य सूज अतिशय काळी असते . आगंतुक सुजेत पित्तदोष व रक्तदोष ह्यांची लक्षणे असून लाली असते .

अशा प्रकारे उत्पन्न झालेला हा व्रणशोफ ( सूज ) शांत होण्याकरिता ( बरा होण्याकरिता ) लेपादि बाहेरील उपाय व काढे , वगैरे पोटात घेण्याचे उपाय विशेष प्रकारे योजून जर प्रयत्न केला नाही , किंवा ह्या ज्या लेपादि क्रिया ह्यात ( अपथ्य वगैरे ) विपर्यास झाला तर , किंवा दोष फारच वाढले असले तर , ती सूज पिकू लागते . तेव्हा ही सूज अपक्व असताना , ती पिकू लागली असताना , किंव पक्व झाली असताना , तिची जी जी लक्षणे असतात ती ती सांगतो .

सूज अपक्व असता ती फार ऊन लागत नाही . सुजेचा रंग इतर त्वचेसारखाच असतो . कदाचित सूज गारही लागते . सूज इकडे तिकडे हालत नाही . सुजेत वेदना मंद असतात , व सूज अल्प प्रमाणात असते . ही अपक्व सुजेची लक्षणे आहेत .

सूज पिकू लागली असता तिची लक्षणे - सुजेत सुयांनी टोचल्यासारखी टोचणी लागते , आत मुंग्या चालल्याप्रमाणे वाटते , तोडल्याप्रमाणे , हत्यारांनी फोडल्यासारखे व काठीने ताडण केल्यासारखे वाटते , हाताने दडपल्यासारखे वाटते , बोटांनी हालविल्याप्रमाणे वाटते , विस्तवाने भाजावे किंवा क्षारादिकांचा चटका बसावा अशी पीडा होते . मध्येच कुठे तरी दाह होतो , ओढ लागते , ज्याप्रमाणे एक ठिकाणी बसून किंवा निजून चैन पडत नाही , त्याप्रमाणे कोठेही चैन पडत नाही , वारा भरलेल्या वस्तीप्रमाणे ती सूज फुगते व दडस लागते . त्वचेचा रंग बदलतो , सूज अधिक वाढते , ताप येतो अंगाचा दाह होतो , तहान लागते , अन्नाची चव लागत नाही . ही लक्षणे व्रणाची सूज पिक लागली म्हणजे होतात .

सूज पिकल्याचे लक्षण ... वेदना कमी होतात , त्वचेला पांढरा रंग येतो सुजेचा जोर कमी होतो , सूजेवर सुरकुत्या येतात , त्वचेला तोंड पडू लागते , ( सूज फुटू लागते ), सूज बोटांनी दाबली तर तिला खळगा पडतो व बोट काढताच भरुन येतो . पाण्याने भरलेली बस्ती ( कातड्याची पिशवी ) ज्याप्रमाणे एका बाजूकडे दाबली तर दुसरीकडे पाणी सरते त्याप्रमाणे सुजेत पू भरल्यामुळे ती एका बाजूकडे दाबली तर पू दुसरीकडे जातो . वरचेवर आत टोचल्याप्रमाणे वाताने वेदना होतात , कफ दोषांमुळे कंडु सुटते , सूज उंच होते , बाकीचे उपद्रव कमी होतात .

कफजन्य व्रणांची सूज आत फार खोल असते व तिची पक्वता सावकाश चालते . त्यामुळे , व अभिघाताने ( मारामुळे ) आलेली सूज आत शल्य ( बाहेरचा पदार्थ ) वगैरे असण्याचा संभव असल्यामुळे , किंवा तसे नसतानाही त्यांच्या ठिकाणी पक्व सुजेची लक्षणे दिसून येत नाहीत . त्या कारणाने सूज पिकली आहे की नाही ह्याबद्दल वैद्य घोटाळ्यात पडतो . परंतु त्वचेचा रंग बदलत नाही व सूजही वरुन थंड लागते , सुजेला स्थूलपणा ( जाड ) आहे पण ठणका कमी आहे , असे असून जर सूज दगडाप्रमाणे घट्ट असली तर , वैद्याने घोटाळ्यात पडण्याचे कारण नाही ; ती पक्वच समजावी ॥३॥६॥

व्रणाची सूज अपक्व आहे , पिकत आहे , किंवा चांगली पिकली आहे , हे जो वैद्य चांगले जाणतो , त्यालाच वैद्य म्हणावे . हे ज्ञान नसून वैद्य म्हणून लोकांच्या प्राणाची हानि करुन द्रव्याचा जो अपहार करुन पोट भरणारे ते चोरच होत .

व्रणाच्या सुजेत वातप्रकोपासून ठणका नसतो . पित्तप्रकोपावाचून ती पिकत नाही आणि कफदोष वाढल्यावाचून ती पिकत नाही आणि कफदोष वाढल्यावाचून तिजमध्ये पू होत नाही . म्हणून व्रणाची सूज पिकण्याचे वेळी तीनही दोष तिला पिकवतात .

व्रणाची सूज पक्व होतेवेळी पित्त वाढते व ते वातकफाचा जोर कमी करुन , आपल्या सामर्थ्याने त्यांना ताब्यात घेऊन , रक्ताचेच पचन करिते ( पक्व करिते ) म्हणजे सुजेला पक्व करायला तीन दोषांची जरुरी नाही ; एक पित्तच सुजेला पक्व करिते असे काही विद्वान वैद्यांचे दुसरे मत आहे ॥७॥९॥

अपक्व व्रणाची सूज कापली असता मांस , स्नायु अस्थि , संधि ह्यांच्या ठिकाणी फार दुखापत होते , रक्त फार जाते , ठणका उत्पन्न होतो , जखम अधिक वाढते आणि ज्वरादि अनेक उपद्रव होतात ; कदाचित क्षतविद्रधिही होतो .

परंतु व्रणाची सूज पिकलेली असून , वैद्याने भीतीने अगर न समजल्यामुळे कापण्याची उपेक्षा केली तर पुवाला बाहेर पडण्याला वाट न मिळाल्यामुळे तो आत खालपर्यंत जातो . तसेच आपल्या स्थानाचे भेदन करुन पुष्कळ जागा व्यापतो , व नाडीव्रण उत्पन्न करितो , आणि त्या कारणाने कष्टसाध्य किंवा असाध्य होतो ॥१०॥

जो वैद्य अज्ञानाने अपक्व व्रणाचे छेदन करितो व जो पक्व व्रणाची उपेक्षा करितो , ते दोघेही व्रणाची परीक्षा न करणारे वैद्य चांडाळाप्रमाणे नीच समजावे .

शस्त्रकर्म करण्यापूर्वी रोग्याला पथ्यकारक असे किंवा त्याला आवडेल तसे जेऊ घालावे . ज्याला वेदना सहन करवत नाहीत तो मद्य पिणारा असल्यास त्याला तीक्ष्ण मद्य पाजावे . कारण जेऊ घातल्याने पोटात अन्नाची भर असल्याकारणाने शस्त्रक्रिया करिताना त्याला मूर्च्छा येत नाही ; आणि मद्य पाजल्याने त्या मद्याच्या कैफामुळे त्याला शस्त्रांच्या वेदनांची जाणीव होत नाही . म्हणून शस्त्रकर्म करण्यापूर्वी ज्या रोग्याला जेऊ घालावे म्हणून सांगितले आहे त्याना जेऊ घालून व आवश्यकता असल्यास मद्यपान करणाराला मद्य पाजून मग शस्त्रक्रिया करावी . मनुष्याच्या अंतर्यामी असणारा प्राण ( जीवनशक्ति ) हा बाह्य प्राणाच्या ( पंचभौतिक आहारजन्य जीवनशक्तीच्या ) गुणासारखाच आहे , म्हणून ह्या बाह्य पदार्थाच्या गुणाशी विरोध न करिता , म्हणजे त्याच्या गुणाला घेऊन , या पंचभूतात्मक शरीराचे धारण करितो .

व्रणाची सूज लहान असो किंवा मोठी असो , तिच्यावर जर मुळीच उपाय केले नाहीत , तर ती तशीच वाढून आपोआप पिकते . आणि फार दिवस कुचमल्यामुळे तिची मुळे फार खोल आतमध्ये जातात . ती कमीजास्त प्रमाणात पिकते , त्यामुळे तिजमधील पू आत लांबपर्यंत जाऊन ती कष्टसाध्य होते .

लेप करणे , रक्त काढणे , शोधन करणे हे उपाय योग्य तसे करुन जरी सूज बरी झाली नाही तरी तिचं मूळ खोल जात नाही व ती समप्रमाणात सारखी लवकर पिकते . ( तिचा जोर कमी असल्यामुळे ). ती तेथल्यातेथेच गोळा होऊन वर उंच वाढते . ( तिचा दोष आत शिरत नाही . )

गवत वाढलेल्या प्रदेशात पडलेला विस्तव , वायुचे ( वार्‍याचे ) सहाय्य मिळताच , वृद्धिंगत होऊन ( वाढून ) आपल्या सामर्थ्याने त्या प्रदेशातील सर्व गवत दग्ध करितो , ( जाळतो . ) त्याप्रमाणे व्रणातील सर्व पू जर काढला नाही , तर तो आत जास्त वाढून , आतील मांस , रस - रक्तवाहिन्या व स्नायु ह्यांना खाऊन टाकतो . ( म्हणजे त्यांना कुजवून त्यांचाही पू करितो ॥११॥१७॥

सुजेवर आरंभी करावयाचे उपाय

व्रणासंबंधी सूज दिसू लागताच प्रथम तिला " विम्लापन " प्रयोग करावा . ( विम्लापन म्हणजे सुजेवर बोटाने चोळून ती शिथिल किंवा मऊ करणे . ) सूज मऊ झाल्यावर दुसरा उपाय " अवसेचन " करावे . ( अवसेचन म्हणजे जळवा वगैरे लावून रक्त काढणे .) ह्या नंतर तिसरा उपाय " उपनाहन " करावे . ( म्हणजे पोटीस बांधावे . ) पोटीसाने ती सूज पक्व झाली म्हणजे मग चौथा उपाय " पाटन - क्रिया " ( सूज फाडणे ) करुन आतील सर्व पू काढल्यावर त्याचे पाचवे कर्म " शोधन " करावे . ( शोधन द्रव्यांच्या दामट्या करुन बसवाव्या . ) शोधन झाल्यावर ती जखम भरुन येण्याकरिता रोपण ) जखम भरुन आणणार्‍या मलमपट्ट्या वगैरे ) करावे . ह्या सहाक्रिया व्रण बरा होईपर्यंत कराव्या . आणि व्रण चांगला बरा झाल्यावर सातवा उपाय " सवर्णकरण व रोमसंजनन " ( म्हणजे नवीन आलेल्या त्वचेला पूर्ववत रंग आणणे व त्वचेवर लव येण्याकरिता लेप करणे ) करावा ॥१८॥१९॥

अध्याय सतरावा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP