मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
स्वप्नादिनि दर्शनीय

सूत्रस्थान - स्वप्नादिनि दर्शनीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय एकोणतिसावा

आता ‘‘विपरीता विपरीत -(दूत )-स्वप्नादिनि दर्शनीय ’’ नावाचा अध्याय सांगतो जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

वैद्याला बोलावण्याकरिता किंवा रोग्याची हकीकत सांगून औषध नेण्याकरिता , रोग्याकडून येणारा जो मनुष्य त्याला दूत असे म्हणतात . त्या दूताचे दर्शन , त्याचे भाषण , त्याचा पोषाख त्याची हालचाल , त्यावेळचे नक्षत्र , वेळ (लग्न ) तिथि , निमित्त (त्या वेही दिसणारे पशुपक्षी किंवा ऐकू येणारे त्यांचे शब्द ), शकून (रोग्याच्या घरी जाताना समोरून येणारे पशुपक्ष्यादि ), वार्‍याचे वाहणे , वैद्याची बसलेली जागा , त्याचे भाषण , मनाचे व शारीरिक व्यापार ह्या सर्व गोष्टी जशा शुभाशुभ असतील त्याप्रमाणे त्या रोग्याच्या शुभाशुभ फळाची माहिती सांगतात .

पाखंडी लोक . (कापालीक मताचे वगैरे ) ब्रह्मचारी वगैरे चारी आश्रमाचे लोक , ब्राह्मणादि चारी वर्णाचे लोक , ह्यांपैकी कोणत्याहि पक्षाचा रोगी असून त्याचा जातिवर्णाश्रमाचा जर दूत असेल तर तो कार्यसिद्धि सूचक (रोगी बरा होण्याचे सूचक ) समजावा . आणि ह्या विरूद्ध (म्हणजे गृहस्थाकरिता संन्याशी किंवा ब्राह्मणाकरिता पाखंडी ) असा दूत कार्यनाश करणारा (रोग्याचे असाध्यत्व सुचविणारा ) समजावा .

नपुंसक स्त्री , अनेक माणसे , अनेक कामे करीत येणारा , भांडत येणारे गाढवाच्या (खेचरांच्या ) किंवा उंटाच्या गाडीतून येणारे , एकामागून एक असे सारखे अनेक येणारे , असे दूत जर वैद्याकडे आले तर ते निंद्य (कार्य विघातक ) समजावे .

हातात फास , काठी किंवा शस्त्र घेऊन आलेले , शुभ्र पोषाखाशिवाय दुसर्‍या रंगाचा पोषाख केलेले , ओले वस्त्र धारण करणारे , जुनाट वस्त्र धारण करणारे , एकाच उजव्या खांद्यावर उपरण , टाकून येणारे , एकाच अगर मलीन वस्त्र परिधान केलेले . हीनांग असलेले , अधिक अंगाचे (एकवीस बोटे असलेले वगैरे ) उद्विग्न (ज्याचे चित्त ताळ्यावर नाही असे ) पांगळे वगैरे विकृतांगाचे व उग्र किंवा भयंकर स्वरूपाचे असे दूत अशुभ समजावे .

ज्यात काही तात्पर्य नाही असे निरस भाषण करणारे , कठोर बोलणारे व अमंगळ शब्द उच्चारणारे दूत अशुभ समजावे ॥३ -८॥

हातांनी गवताच्या काड्या मोडीत अगर एखादे लाकूड मोडीत येणारे वरचेवर नाकाला व स्तनाला स्पर्श करणारे , अंगावरील वस्त्राचे शेवट , करंगळी जवळील बोट , केस , (शेंडी वगैरे ) नखं अंगावरील लव व वस्त्राचे आंचळ ह्यांना स्पर्श करणारे , कान -नाकादिकांची द्वारे , हृदय , गाल , मस्तक छाती व कुशी ह्या ठिकाणी हात ठेवून येणारे , करटी , दगड , भस्म , हाड , कोंडा व निखारे हातात घेऊन येणारे , नखांनी जमीन खरवडणारे , हातातील वस्तु टाकून देणारे , ढेकळे फोडणारे , अंगाला तेल अगर चिखल माखलेले , तांबड्या फुलांच्या माळा किंवा तांबडे गंध लावलेले , पिकलेले किंवा निरुपयोगी फळ किंवा अशाच प्रकारचा पदार्थ हातांत असलेले , नखाने दुसरे नख धरणारे , हाताने पाय धरणारे , जोडा किंवा चामडे हातात घेऊन येणारे , कुष्ठादि रोगपीडित , कुटिल आचरणाचे , रडत श्वास टाकीत येणारे (दमल्यामुळे ) डोळ्याला विकार असलेले , वैद्याच्या दक्षिण दिशेला बसणारे , दीनपणाने हात जोडणारे , एक पायावर उभे राहणारे , अशा प्रकारचे दूत जर वैद्याकडे आले तर ते निंद्य (अशुभ ) सूचक समजावे .

वैद्य दक्षिणेकडे तोंड करून बसला असताना , अपवित्र स्थळी असताना , विस्तव पेटवीत असताना , स्वयंपाक करीत असताना , एखादे पशूवमलमूत्रादिकांचा त्याग करीत असताना , नग्न असताना , एखादे पशुवधादि क्रूर कर्म करीत असताना , नग्न असताना जमिनीवर निजला असताना , मलमूत्रादिकांचा त्याग करीत असताना , अपवित्र असताना , केस मोकळे सोडून बसला असताना , अभ्यंग केलेला असताना , घामेजलेला असताना , व्याकूळ चित्त असताना जे दूत वैद्याकडे जातात तेही वैद्याने अशुभच समजावे .

तसेच वैद्याच्या घरी काही दैवी किंवा पैत्रिक (पित्रतिथि वगैरे श्राद्धादि ) कार्य चालू असताना एकादा भूकंपादि उत्पात झाला असता , दिवसा , माध्यान्हकाळी , मध्यरात्री किंवा सकाळी , सूर्योदयापूर्वी व संध्याकाळी येणारा दूत अशुभ समजावा .

कृत्तिका , आर्द्रा , आश्लेषा , मघा , मूळ , पूर्वात्रय , व भरणी ह्या नक्षत्रावर येणारा दूत अशुभ समजावा .

चतुर्थी , नवमी , षष्ठी , अमावस्या व पौर्णिमा ह्या तिथिला वैद्याकडे येणारे जे दूत तेही अशुभच समजावे ॥९ -१९॥

घामेजलेले . उन्हाने तप्त झालेले , दिवसा माध्यान्हसमयी आलेले , वैद्य विस्तवापाशी असताना त्याच्या सन्निध आलेले , अशा प्रकारचे दूत पित्तरोग असलेला रोगी असेल तर अशुभ समजावे . आणि तोच कफदोषात्मक रोग असेल तर त्याला ते शुभफलदायक आहेत . ह्या एवढ्या लक्षणावरून बाकीची वातरोगासंबंधाची वगैरे दूतचिन्हे सांगितल्यासारखीच आहेत . ती वैद्याने आपल्या बुद्धितार्तम्याने ज्या त्या रोगासंबंधाने विभागून जाणावी .

जसे थंडी वारा चालू असता जर दूत आला तर तो वातविकाराच्या रोगाला अशुभ असतो .

रक्तपित्त , अतिसार , व प्रमेह हे रोग असता पाण्याचे धरण धरलेल्या ठिकाणी जर वैद्याची व दूताची गाठ पडली तर ते शुभचिन्ह समजावे . ह्या प्रमाणे त्यांचे विभाग जाणून

बाकीचेही दूत व त्यांची लक्षणे बुद्धिवान् वैद्याने ओळखावी .

शुभ्र पोषाख केलेला , स्नान वगैरे करून पवित्र असा , गौर किंवा श्यामवर्ण , पाहिल्याबरोबर समाधानकारक , रोग्याच्या जातीचा अगर गोत्राचा , असा दूत कार्यसिद्धि करणारा समजावा . बैल किंवा घोडा ह्यांच्या गाडीतून आलेला , समाधानवृत्तीचा , पायांनी चालत आलेला , शुभकारक हालचाल करणारा , स्मरणशक्ति उत्तम असलेला , कर्तव्य व प्रसंग जाणणारा , स्वपराक्रमाने कार्य करणारा (स्वतंत्र बुद्धीचा ), प्रौढज्ञानाचा , अलंकार धारण केलेला , मंगलकारक भाषण वगैरे करणारा असा दूत कार्यसिद्धिदायक समजावा .

शुर्चिर्भूत व उत्तम अशा जागी पूर्वाभिमुख तोंड करून पवित्रपणाने व स्वस्थ वृत्तीने वैद्य बसला असता त्यावेळी त्या वैद्याकडे येणारा जो दूत तो कार्य सिद्धिदायक समजावा .

( विचार संशोधकाने करावा ॥२० - २६॥

शुभाशुभ शकुन

मांस , पाण्याने भरलेली घागर , छत्री किंवा आबदागिरी , ब्राह्मण , हत्ती , गाय , बल व शुभ्रवर्ण दूध वगैरे पदार्थ हे रोग्याच्या घरी जाताना समोर दिसले तर शुभ समजावे . पुत्रवती स्त्री (मुलाला कडेवर घेऊन असलेली ), वासरासहित गाय , अंगावर अलंकार घातलेली मुलगी , मासे अपक्वफळ , स्वस्तिक (मोत्याचा कंठा -हार ) लाडू , दही , सोने , तांदुळ भरलेले भांडे , रत्ने , सुप्रसन्न वृत्ति असलेला राजा , ज्वालायुक्त निर्धूमअग्नि , घोडा , हंसपक्षी , मोर , वेदध्वनी , नगार्‍याचा आवाज , मेघांचा गडगडाट , शंखाचा आवाज , मुरलीचा आवाज , रथाचा आवाज , रथाचा ध्वनी , सिंहाची गर्जना , गाईचे हंबरणे , बैलाचा शब्द , घोड्याचे खेकाळणे , हत्तीचा शब्द , हंसाचा शब्द , डाव्या बाजूला घुबडाचा शब्द आणि हृदयाला आनंददायक असे संभाषण ह्या सर्व गोष्टी रोग्याच्या घराकडे जाणार्‍या वैद्याला अगर प्रवासाला निघालेल्या मनुष्याला उत्तम शुभफल देणार्‍या आहेत .

पान , फुले , फळे ह्यांनी युक्त , विकारहित (न -वठलेले ) असे क्षीर वृक्ष (पिंपळ , उंबर , वड वगैरे ) व त्याजवर बसलेले , अथवा आकाशातून उडणारे , घर , ध्वज (झेंडा -पताक ) तोरण व बहुले ह्यांच्या आश्रयाने बसलेले , पूर्व किंवा उत्तर दिशा शांत असून त्या बाजूने मंजूळ शब्द करणारे , वैद्याच्या पाठीमागून येणारे , असे पक्षी जर समोर दिसतील तर तो शुभशुकून कार्यसिद्धी करणारा होतो .

वठलेली झाडे , वीज पडून जायबंदी झालेले झाड , ज्याला पालवी नाही असे झाड , वेलीने गुरफटलेले झाड , काट्याचे झाड , अशा प्रकारच्या झाडावर बसेलेले किंवा दगड , राख , हाड , विष्टा , भुसकट , कोळसे , धूळ ह्या ठिकाणी अगर जैनांचे देवालय अगर समाधी , वारूळ ह्या ठिकाणी बसलेले , विषमरीतीने बसलेले असे पक्षी , तसेच उग्र व कर्कश आवाज करणारे पक्षी समोरून येणारे , दिशा उन्हाने वगैरे प्रखर असताना ओरडणारे असे पक्षी जर समोर दिसले तर ते अशुभ समजावे . असल्या शकुनाने कार्यसिद्धी होत नाही . ज्यांची नावे पुल्लिंग वाचक आहेत असे पक्षी डावीकडून गेले असता शुभ व ज्याची नावे स्त्रिलिंगी आहेत असे पक्षी उजवीकडून गेले असता ते शुभ समजावे . कोल्हे

किंवा कुत्रे जर उजवीकडून डावीकडे गेले तर ते शुभ समजावे . आणि मुंगुस व तासपक्षी हे डावीकडून उजवीकडे गेले तर शुभ समजावे . आणि ससा व साप हे दोनीही बाजूस गेले तरी अशुभच समजावे . तसेच भास (गिधाडातील लहान जात ) व घुबड हेही डावे उजवे कसेही गेले तरी अशुभच समजावे . घोरपड व गरूड ह्यांचे दर्शन किंवा शब्द ऐकणे हे प्रवास समयी अशुभच समजावे . वर जे दूत अनिष्ठ सांगितले आहेत , त्याचसारखी माणसे जर समोर दृष्टीस पडतील तर तीही अशुभ सूचकच समजावी . हुलगे , तीळ ,

कापूस , कोंडा , दगड , भस्म (राख ) कोळसे व चिखल ह्यांनी भरलेले असे भांडे समोर दिसणे , तसेच ‘‘प्रसन्ना ’’ नावाच्या मदिरेवाचून इतर मद्याने भरलेले किंवा तांबडे शिरस (अगर मोहर्‍या ) यांनी भरलेले भांडे समोर दिसणे अशुभ समजावे . प्रेत , वाळलेली लाकडे , पळसाची वाळलेली पाने किंवा लाकडे , ह्यांची वाटेत गाठ पडणे अशुभकारक आहे , त्याचप्रमाणे भ्रष्ट झालेला मनुष्य , चांडाळ , दरिद्रि व अंधळे लोक व शत्रू ह्यांची वाटेत गाठ पडणे अशुभ समजावे .

मंद वाहणारा , थंड , पाठीमागून येणारा व सुवासिक असा वारा शुभ समजावा . जोराने वाहणारा , उष्ण , ज्याला वास चांगला नाही असा व समोरून येणारा वारा अशुभ समजावा .

गाठी , आवाळूं वगैरे कापून बरे करण्याचे जे रोग त्या कामासाठी जाताना (लाकूड वगैरे ) कापण्याचा शब्द ऐकूं येणं शुभावह आहे . करट (अंतरविद्रधिसुद्धा ), उदर , गुल्म ह्यांच्या संबंधात भेद्य (फाडण्याचे ) शब्द शुभ असतात . रक्तपित्त व अतिसार वगैरे आजाराच्या बाबतीत रुद्ध (आडविण्याविषयीचे ) शब्द शुभ असतात . ह्याच रीतीने रोगाच्या अनुरोधाने त्या त्या प्रकारचे शब्द शुभ समजावे .

आक्रोश (गलबला ), अरेरे वगैरे खेदवाचक शब्द , मोठ्याने रडण्याचा आवाज , वांतीचा आवाज , वायु सरण्याचा आवाज , मलविसर्जनाचा आवाज , आणि गाढव व उंट ह्यांचे ध्वनी हे अशुभ समजावे .

निषेधप्रदर्शक शब्द , काही पदार्थ फुटल्याचा शब्द , शिंकेचा आवाज , वैद्याचा पाय वगैरे अडखळणे , कोणीतरी कोणास तरी मारणे , व वैद्याचे मन प्रसन्न नसणे , ह्या गोष्टी

वैद्याच्या घरी किंवा वैद्य बाहेर निघण्याच्या वेळी घडल्या तर तो अपशकून समजावा .

रोग्याच्या घरात प्रवेश करिताना प्रत्यक्ष रोग्याच्या सन्निध देखील ह्या चिन्हासंबंधी बारकाईने लक्ष ठेवावे . परंतु प्रत्येक घरातून ह्या गोष्टी (एक दोन अथवा अधिक रीतीने ) वरचेवर घडत असतील तर त्या जमेत धरू नयेत . (त्याबद्दल शुभाशुभ मानू नये .)

वैद्य आपल्या घरातून बाहेर पडताना किंवा रोग्याच्या घरात शिरताना केस , भस्म (राख ), हाडे , लाकडे दगड , कोंडा , कापूस , काटे , वर पाय करून ठेवलेली खाट , मद्य , पाणी , चर्बी , तेल , तीळ , गवत , नपुंसक मनुष्य , पांगळा वगैरे व्यंग मनुष्य , हातपाय मोडलेला मनुष्य (किंवा पडका पदार्थ ), मुंडण केलेला , काळे वस्त्र परिधान केलेला , अशा प्रकारचे पदार्थ किंवा लोक दृष्टीस पडतील तर तो अशुभ समजावा .

रोग्याच्या घरात वैद्य आल्यावर भांड्याची वगैरे उतरंड कोसळणे , जमिनीत पुरलेली वस्तु उपटून काढणे ,य काहीतरी मोडणे , काहीतरी पडणे , घरातून कोणीतरी बाहेर जाणे , वैद्याला बसावयास दिलेले आसन (पाट वगैरे ) फुटणे , रोग्याने खाली मान घालून बसणे , वैद्याशी भाषण करिताना आपले अंग चोळणे किंवा भिंत व बिछान्यावरील वस्त्रे चोळवटणे , आपले हात , पाठ , व डोके हालविणे , वैद्याचा हात धरून रोग्याने आपल्या डोक्याला किंवा छातीला लावणे , ही सर्व अशुभ चिन्हे समजावी . तसेच जो रोगी वैद्याला वर तोंड करून विचारतो व आपले अंग साफसूफ करण्याच्या नादात असतो व ज्या रोग्याच्या घरात वैद्याचा अपमान होतो तो रोगी बरा होत नाही . ज्या रोग्याच्या घरी

वैद्याचा सन्मान होतो तो रोगी बरा होणार म्हणून समजावे .

ही जी वर दूतादिकांची शुभाशुभ चिन्हे सांगितली आहेत , ती जशी शुभ किंवा अशुभ होतील त्यासारखे रोग्याचे शुभ किंवा अशुभ निश्चयाने होतेच असा नियम आहे . म्हणून वैद्याने दूतादिशुभाशुभ चिन्हे अवश्य पहावी ॥२७ -५३॥

शुभाशुभ स्वप्ने

आता शुभाशुभ स्वप्ने सांगतो -रोग्याचे इष्टमित्र किंवा स्वतः रोगी ह्यापैकी कोणालाही जशी शुभ किंवा अशुभ स्वप्ने दिसतील , त्यासारखे शुभ किंवा अनिष्ट फळ येते . शुभस्वप्नाने रोगी बरा होतो व अशुभ स्वप्ने दिसली तर रोगी नष्ट होण्याचा संभव असतो .

अंगाला तेल लावून उंट , वाघ , गाढव , डुक्कर , रेडा , ह्यापैकी कोणत्याही वाहनावर बसून जो दक्षिणेकडे गमन करितो तो निरोगी असल्यास आजारी पडतो व रोगी असल्यास यमसदनाला जातो .

तसेच तांबडे वस्त्र नेसलेली , काळी , हसतमुखी , मोकळे केस सोडलेली अशी स्त्री स्वप्नामध्ये ज्याला बांधून नाचत दक्षिणेकडे ओढीत नेते , चांडाळाकडून स्वप्नामध्ये ज्याला दक्षिणेकडे ओढीत नेले जाते , ज्याला स्वप्नात पिशाच्चे किंवा सन्याशी आलिंगन देतात (कवटाळतात ), ज्याला विक्राळ तोंडाची श्वापदे वरचेवर हुंगतात , जो स्वप्नात तेल अथवा मध पितो , जो चिखलात रुततो , (चिखलात रुतणे हे तात्काळ मृत्युसूचक आहे ), जो चिखलाने आपले सर्वांग माखून नाचतो व हसतो , जो नग्न होऊन मस्तकावर तांबड्या फुलाच्या माळा घालतो , ज्याला छातीवर वेळु , बोरू , किंवा ताड ही झाडे उगवतात , ज्याला स्वप्नांत मासा गिळतो किंवा जो मातीच्या उदरांत प्रवेश करितो , जो पर्वताच्या शिखरावरून खाली पडतो ; किंवा अंधार असलेल्या घळीत पडतो , जो पाण्याच्या प्रवाहांतून वाहात जातो , जो स्वप्नांत मुडण (हुजामत ) करितो , जो पराजित होतो , बांधला जातो किंवा कावळे वगैरे पक्ष्यांकडून जिंकला जातो , आकाशातून तारे पडलेले पहातो , दिवा किंवा डोळा गेलेला पाहतो , जो देवाच्या मूर्ति कापत आहेत अथवा भूमी कंप होतो आहे असे पहातो , ज्याला स्वप्नात वांती किंवा रेच होतात , ज्याचे दात पडतात , जो शेवरीच्या झाडावर चढतो , तसेच पळस , यज्ञांतील पशु , बांधण्याचा खांब , वारूळ , कडुनिंबाचे झाड , फुललेला कांचनाचा वृक्ष किंवा चिता त्याजवर चढतो , ज्याला स्वप्नात कापूस , तेल , पेंड , लोखंड , मीठ व तीळ हे पदार्थ मिळतात , जो शिजलेले अन्न खातो , व जो स्वप्नात सुरा (पिठाचे मद्य ) पितो , (इतर मधुर मद्य स्वप्नात पिणे शुभ आहे असे स्वप्नाध्यायात लिहीले आहे ) तो निरोगी असला तर आजारी होतो व रोगी असला तर मृत्यु पावतो ॥५४ -६६॥

वातादि दोषानुरूप प्रकृतिच्या मनुष्याला त्या त्या दोषानुरूप (वाताने आकाश गमन , पित्ताने विद्युतादि दर्शन व कफाने हंसादि पक्षी दर्शन वगैरे ) पडलेली स्वप्ने , स्वप्न पडल्यानंतर जागृत झाल्यावर त्यांचे विस्मरण झालेले स्वप्न , प्रथम वाईट स्वप्न पडून नंतर पुनः चांगले स्वप्न पडले तर त्या पहिल्या स्वप्नाचे फळ नाश पावते . ते विहत स्वप्न , काळजीमुळे किंवा एकाद्या गोष्टीचा निजध्यासाने पडलेले स्वप्न आणि दिवसा पडलेले स्वप्न ही स्वप्ने निष्फळ समजावी .

तापाच्या रोग्याचे स्वप्नामध्ये कुत्र्याशी सख्य (मैत्री ) होणे , क्षयरोग्याचे वानराशी सख्य होणे , उन्मादाच्या रोग्याने राक्षसासी स्नेह करणे (संबंध ठेवणे ), अपस्माराच्या रोग्याने पिशाच्चाशी मिसळून वागणे , प्रमेह व अतिसारी रोग्याने पाणी पिणे , कुष्ठी मनुष्याने तेल पिणे , गुल्माच्या रोग्याच्या पोटावर झाड उगवणे , मस्तक -रोग्याच्या मस्तकावर झाड येणे , ओकारीच्या रोग्याने शेंगोळ्य़ा (शुष्कुली ) खाणे , श्वास व तहानेच्या रोग्याने स्वप्नात मार्ग चालणे , पांडुरोगाच्या मनुष्याने हळदीचे अन्न खाणे ,

आणि रक्तपित्ताच्या रोग्याने स्वप्नात रक्त प्राशन करणे ह्याप्रमाणे त्या त्या रोग्यांच्या स्वप्नात त्याच्याकडून गोष्टी घडल्या तर ते नाश पावणार असे समजावे .

दुःस्वप्नदोष परिहार

अशा प्रकारची वाईट स्वप्ने जर कोणास दिसली तर त्याने प्रातःकाळी उठून यत्नपूर्वक , ब्राह्मणाला उडीद , तीळ , लोखंड व सोने ह्याचे यथाशक्ति दान करावे . शुभप्रद मंत्रांचा जप करावा . त्रिपदा गायत्रीचाही जप करावा .

रात्रीच्या पहिल्याच प्रहरात जर वाईट स्वप्न पडले तर पुनः मनात शुभचिंतन करून निजावे . किंवा ब्रह्मचर्य सांभाळून , अनन्यभावाने दुःस्वप्ननाशक अश एकाद्या वेदमंत्राचा जप करावा . (प्रथम ) प्रहरातील स्वप्न निष्फळ असते तथापि दुःस्वप्नाच्या भीतीस्तव असा परिहार करावा अशुभ स्वप्न दिसले तर ते कोणालाही सांगू नये , व एखाद्या देवालयात तीन रात्रीपर्यंत रहावे . नित्य ब्राह्मणाची पूजा केली असता दुःस्वप्नाच्या दोषापासून मुक्तता होते .

शुभफलदायी स्वप्ने

आता शुभफल देणारी अशी स्वप्ने सांगतो . देव , ब्राह्मण , गाय , बैल , हे असलेले मित्र व राजे , प्रज्वलित अग्नि , साधु , स्वच्छ पाण्याचे जलाशय ह्यांना (ह्यांपैकी कोणालाही ) स्वप्नात जो पहातो तो रोगी असल्यास व्याधीपासून मुक्त होतो . निरोगी असल्यास त्याचे कल्याण होते व त्याला द्रव्यलाभ होते .

तसेच मांस , मासे पांढर्‍या फुलांच्या माळा , पांढरी वस्त्रे व फळे पहातो त्याला द्रव्यलाभ होतो व रोग असला तर तो बरा होतो .

मोठा थोरला राजवाडा अगर देवालय , फळांनी युक्त असा वृक्ष , हत्ती व पर्वताचे शिखर ह्यांजवर जो आरोहण करितो त्याला द्रव्यलाभ होतो व रोग असल्यास नाहीसा होतो .

नदी , नद किंवा समुद्र हे क्षुब्ध झाले असून (तुडुंब भरले असून ) त्याचे पाणी गढूळ झालेले पहातो व ते तरून पलिकडे जातो त्याचे कल्याण होते . त्याला द्रव्यलाभ होतो व व्याधी असल्यास बरा होतो .

ज्याला स्वप्नात सर्प (लहानसा व श्वेतवर्ण ), जळू अथवा भुंगा ह्यापैकी कोणी दंश केला तर त्याला आरोग्य प्राप्त होऊन द्रव्याचाही लाभ होतो .

अशा स्वरूपाचे शुभ स्वप्न जो रोगी पहातो तो दीर्घायू आहे असे वैद्याने समजावे आणि त्याला यथायोग्य औषधोपचार करावे ॥६७ -७०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP