मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि २

सूत्रस्थान - अन्नपानविधि २

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


कुधान्यवर्ग

हारीक , सांवे , देवभात , शांतनु (देवभाताची एक जात . ही पाण्यात होते ), वर्‍या , उद्दालक (रानहारीक ), राळे मधूलिका व नांदीमुखी (ही साधारण गव्हासारखी असतात ), कुरुविंद , गवेधुक (कसई नावाच्या गवताच्या बी ), सरकर्णिका (एक धान्य ), वरु (वरा धान्य ), तोदपर्णी , मुकुंदक आणि वेणुयव (वेळूचे बी ) इत्यादी धान्ये कुधान्य (तृण धान्य ) वर्गात मुख्य आहेत ॥२१॥

सर्व प्रकारची तृण धान्ये सामान्यतः किंचित तुरट , गोड , रूक्ष , तिखटविपाकी , कफनाशक , मूत्रावरोधक , व वातपित्ताचा प्रकोप करणारी आहेत .

त्यापैकी हारीक हे तुरट , मधुर , थंड व पित्तनाशक आहेत . आणि देवभात , सांवे व शांतनु (देवभाताचा एक भेद ) हेही गुणाने हारीकाप्रमाणे आहेत .

काळे , तांबडे , पिवळे , व पांढरे असे राळ्याचे चार प्रकार आहेत . हे उत्तरोत्तर (काळ्य़ापेक्षा तांबडे असे ) गुणांनी श्रेष्ठ असून रूक्ष व कफनाशक आहेत .

मधूली (क्षुद्र गहु ) हे मधुर , थंड , व स्निग्ध आहेत आणि नंदीमुखी (खपली गहु ) ही गुणाने तसेच आहेत .

वरूक धान्य हे अत्यंत द्रवशोषक असून मुकुंदक धान्यही त्यासारखेच आहे .

वेळूचे बी रूक्ष , उष्णवीर्य तिखटविपाकी , मूत्रावरोधक , कफनाशक , तुरट व वात वाढविणारे आहे ॥२२ -२६॥

मृग , रानमुग , वाटाणे , मटकी , मसुरा , पांढर्‍या मसुरा , हरभरे , सतीनक (मोठे वाटाणे ), त्रिपुट (वाल ), हरेणु (हिरवे वाटाणे ) व तुरी इत्यादि द्विदलधान्ये आहेत .

सर्व द्विदल धान्ये ही सामान्यतः किंचित् तुरट गोड , थंड , तिखटविपाकी वातकारक , मलमूत्रबद्धक आणि कफपित्तनाशक आहेत .

त्यापैकी मुग हे फारसे वातकारक नसून दृष्टी (नजर ) स्वच्छ करणारे आहेत . मुगामध्ये हिरवे मुग हे श्रेष्ठ असून रानमुग हे गुणाने मुगासारखेच आहेत .

मसुरा मधुरविपाकी असून मलबद्धक आहेत . मटक्या ह्या कृमिनाशक आहेत . वाटाणे वातकारक आहेत .

तुरी कफपित्तनाशक असून वाताला न वाढविणार्‍या आहेत .

हरभरे वातकारक , थंड , गोड , किंचित तुरट , रूक्ष , कफनाशक , रक्तपित्तनाशक व पुरुषत्वनाशक आहेत . ते तुपाशी मिश्र करून (तुपात तळून ) खाल्ले असता अत्यंत त्रिदोषनाशक आहेत . हेरुणू (हिरवे वाटाणे ) व सतीनका (वाटाण्याची एक जात ) हे मलबद्धक आहेत . ह्या द्विदलधान्यापैकी मुग व मसुराखेरीज करून बाकीची सर्व द्विदलधान्ये पोटात वात संचित करून पोट फुगविणारी आहेत .

उडीद हे मळ मूत्र ह्यांचा भेद (पातळ ) करणारे , जड , स्निग्ध , उष्ण वृष्य (कामवर्धक ), मधुर , वातनाशक , तृप्तिकारक , स्त्रियांचे दूध वाढविणारे विशेषतः शक्तिवर्धक , आणि कफ व शुक्रवर्धक आहेत . अळसुंदे (अलसांद्रे ) म्हणजे चवळ्य़ा ह्या तुरट असल्यामुळे मळ पातळ न करणार्‍या , मूत्र न वाढविणार्‍या , कफाला न वाढविणार्‍या , मधुरविपाकी , रूचीला गोड तृप्तिकारक , दुधाची वाढ करणार्‍या व रूचिकारक , आहेत .

गोड्या कुहिलीचे बी व खाज कुहिलीचे बी ही गुणांनी उडदासारखीच आहेत . रानउडीद हे रूक्ष , तुरट व विदाह (जळजळ ) न करणारे आहेत .

हुलगे हे उष्ण , तुरट , तिखटविपाकी , कफवातनाशक ,शुक्राश्मरी व गुल्मनाशक , संग्राहक (मळ बांधीव करणारे ) आणि पिनस व खोकला ह्यांचा नाश करणारे आहेत . रानहुलगे हे आनाह (पोट फुगणे ), मेद , मुळव्याध , उचकी व श्वासनाशक रक्तपित्तकारक , कफनाशक आणि विशेषतः डोळ्य़ांच्या रोगाचे नाशक आहेत .

तीळ हे सामान्यतः किंचित् तुरट , मधुर , किंचित कडू , संग्राहक (मळ बांधीव करणारे ), पित्तकारक , उष्ण , मधुरविपाकी , बलवर्धक , स्निग्ध , व्रणावर लेप करण्यास चांगले , दातांना बळकटी आणणारे , अग्निवर्धक , बृद्धिप्रद , मूत्र कमी करणारे , त्वचेला हितकारक , केसांची वाढ करणारे , वातनाशक व जड आहेत . सर्व तिळांच्या जातीत काळे तीळ हे गुणांनी श्रेष्ठ आहेत . पांढरे मध्यम आहेत आणि ह्याहून इतर सर्व तीळ गुणांनी फार कनिष्ठ आहेत ॥२७ -४०॥

सातु हे किंचित् तुरट , मधुर , थंड , तिखटविपाकी , कफपित्तनाशक , व्रणावर लेप करण्यासाठी तिळाप्रमाणे नित्य हितावह , मलमूत्रबद्धक , मळ व वायु ह्यांची वाढ करणारे , देहाला बळकटी आणणारे , अग्निवर्धक , बुद्धिप्रद , चांगला करणारे , अंगाचा वर्ण चांगला करणारे , किंचित् चिकट , शरीराचा स्थूलपणा कमी करणारे , लेखन , मेदनाशक , वातनाशक , तृषाशामक , अति रूक्ष आणि रक्त व पित्त ह्यांची शुद्धि करणारे आहेत .

निःशूक काळे व तांबूस असे सातु (अतियव ) हे सातूपेक्षा गुणाने फारच कमी आहेत .

गहु मधुर , जड , शक्तिवर्धक , शरीर बळकट करणारे , शुक्रवर्धक , रुचिकारक , स्निग्ध , फार थंड , वातपित्तनाशक , मोडलेल्या हाडाला साधणारे , कफनाशक व सारक आहेत .

शेगेंतील धान्ये ही सर्व धान्ये सामान्यतः रूक्ष , तुरट , विषनाशक , शोष (क्षय ) नाशक , शुक्रनाशक , कफनाशक , दृष्टीला कमीपणा आणणारी , जळजळ करणारी , तिखटविपाकी , रसकाळी गोड , मलमूत्रबद्धक व पित्तकारक आहेत .

पांढरी काळी , पिवळी व तांबडी अशी जी अनेक प्रकारची शेंगेतील धान्ये आहेत ती सांगितलेल्याच क्रमाने श्रेष्ठ आहेत . म्हणजे पांढरी धान्ये सर्वात श्रेष्ठ , काळी त्याहून कमी , पिवळी त्याहून कमी व तांबडी कनिष्ठ अशी आहेत . तशीच ही सर्व धान्ये उष्ण असू रसकाळी व पाककाळी तिखट आहेत .

रानमुग व रानउडीद ह्यांच्या शेंगा , मुळ्य़ाच्या शेंगा व घेवडा वगैरे इतर वेलाच्या शेंगा ह्या रसकाळी व पाककाळी मधुर , बलवर्धक आणि पित्तनाशक आहेत .

सर्व डाळीच्या धान्याच्या ओल्या शेंगा घशाशी जळजळ करणार्‍या , अत्यंत रूक्ष आहेत . ह्या जिरण्यापूर्वी पोटात गुडगुड वाजते , पोट फुगते व नंतर त्या पचन होतात . ह्या वातकारक आहेत . तशाच त्या रुचिकारक व पचण्याला फार जड अशा आहेत .

करडे हे तिखट , तिखटविपाकी , कफनाशक , व विदाहकारक असल्यामुळे अपथ्यकारक आहेत .

जवस हे उष्ण , मधुर , वातनाशक , पित्तकारक व तिखटविपाकी आहेत . पांढरे शिरस रसकाळी व पाककाळी तिखट आणि रक्तपित्ताचा प्रकोप करणारे आहेत . अति तीक्ष्ण , उष्ण , रूक्ष व कफवातनाशक आहेत . काळे शिरसही गुणाने ह्यासारखे आहेत .

त्या त्या धान्यांच्या योग्य हंगामावाचून भलत्याच वेळी झालेली (अनार्तव ) रोगट धान्ये , अपक्व धान्ये चांगल्या जमिनीत न झालेली धान्ये आणि नवी धान्ये गुणाने चांगली असत नाहीत . नवे धान्य अभिष्यंदि असून एक वर्ष होऊन गेलेले जुने धान्य पचनाला हलके असते . मोड आलेले धान्य घशाची जळजळ करणारे , पचनाला जड , मलमूत्रांचा अवरोध करणारे आणि डोळ्य़ांना अपायकारक आहे ॥४१ -५१॥

ह्याप्रमाणे साळीपासून शिरसापर्यंत अनेक प्रकारची धान्ये , त्यांचे निरनिराळे प्रकार , त्यांचा हंगाम (काल ), खाण्याचे प्रमाणे , त्यांचे पचनादि संस्कार व मात्रा

( कमीजास्त प्रमाण ) ह्या सर्व गोष्टी धान्यवर्गात सांगितल्या ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP