मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
द्रव्यसंग्रणीय

सूत्रस्थान - द्रव्यसंग्रणीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय अडतिसावा

आता ‘‘द्रव्यसंग्रणीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

सर्व द्रव्यांचे ‘‘गण ’’ समुदाय अथवा वर्ग एकंदर सदतीस आहेत ॥३॥

विदारिगंधादिगण

साळवण , भुई कोहाळा , गांगेरुकी (पांढर्‍या फुलांच्या चिकणा किंवा तुपकडी ), सहदेवी (हिला भांबुरडी म्हणतात . ही पिवळ्या फुलांची व जांभळ्या फुलाची अशी दोन प्रकारचे आहे .) गोखरू , पिठवण , शतावरी (दिवसमावळी ), पांढरी व काळी उपळसरी , जीवक , ऋषभक (बैलमालेबंद ), रानउडीद , रानमूग , रिंगणी व डोली , पुनर्नवा (अभावी वसू ), एरंड हंसपादी (तांबडी लाजाळु ), वृश्चिकालि (विंचूचे झाड . ह्याला विंचूच्या आकाराची फळे येतात . ही मेढशिंगीचा एक भेद आहे .) कुहिली ह्या औषधांच्या समुदायाला ‘‘विदारिगंधादिगण ’’ असे म्हणतात .

हा ‘‘विदारिगंधादिगण ’’ वातापित्तनाशक आहे आणि क्षय , गुल्म , अंग दुखणे , ऊर्ध्वश्वास व खोकला ह्यांचाही नाश करितो ॥४ -५॥

आरग्वधादिगण

वाहवा , गेळफळ , शुद्र बोरे (लहान बोरे ), वेहेकळ , कुडा , पहाडीचा वेल , पाडळ , मोरवेल , इंद्रजव , सातवीण , कडुनिंब , पिवळा व निळा कोरांटा , गुळवेल , चित्रक , शार्ङगेष्टा (गजग्याचा वेल किंवा लताकरंज असा अर्थ आहे . पण डल्लणाच्या मताने कोकमाची किंवा कांगोणी आहे .) लहान व मोठा करंज , कडु पडवळ , काडेचिराईत व कारली हा अरग्वधादिगण , कफ व विष ह्यांचा नाश करणारा आहे . शिवाय प्रमेह , कुष्ठ , ज्वर वांती , कंडु ह्यांचा नाश करणारा आहे . शिवाय प्रमेह , कुष्ठ , ज्वर वांती , कंडु ह्यांचा नाश करणारा व व्रणशोधक आहे ॥६ -७॥

वरुणादिगण

वायवर्णा , अर्जुनसादडा , गोड व कडु शेवगा , देवडांगरी , मेढशिंगी , घाणेरा करंज , थोर करंज , मोरवेल , टाकळी , तांबडी व निळी कोरांटी , तोंडली , थोर बकूर (किंवा रक्तमांदार ), तांबडा आघाडा , चित्रक , शतावरी , बेल , मेढशिंगी , सर्व जातीची दर्भ , रिंगणी व डोरली . हा वरुणादिगण कफ व मेद ह्यांचा नाशक आहे . आणि मस्तकशूळ , गुल्म व अंतरविद्रघि (आंतील तोंडाचे करट ) यांचा नाश करतो ॥८ -९॥

वीरतर्वादिगण

वेलंतर (विरतरू याला कांटे असून शमीसारखी बरीक पाने असतात वाग्भटाने विरतरु म्हणजे वेल्लंतर ह्यालाच म्हटले आहे . विरतरु ह्याचा अर्थ अर्जुनसादडा आहे , पण वाग्भटाने वेल्लंतर स्पष्ट म्हटले असल्यामुळे तो घेता येत नाही .) पिंपळी व निळी कोरांटी , दर्भ , बांडगुळ , नागरमोथे , देवनळ , (ह्यांची पाने दुर्वासारखी असून हा आतून पोकळ असतो .) कुश व काश (दोन्ही दर्भाचे भेद आहेत ) पाषाणभेद , अग्निमंथ (तेजोवृक्षअभावी टाकळी ), मोरटा (मोरवेल किंवा उसाचे मूळ ), बकूळ , तांबडा आघाडा , टेंटू , काळी कोरांटी , इंदविर (ह्या काळ्या कोरांटीतीलच एक भेद आहे किंवा कमळ ) सूर्यफुलाचे झाड , गोखरू . हा वीरतर्वादिगण वातविकाराचा नाशक आहे . आणि मूतखडा , मूत्रशर्करा , मूत्रकुच्छ् मूत्राघात ह्या रोगांचा नाशक आहे ॥१० -११॥

सालसारादिगण

सागवनाचे खोड , रोळेचे झाड , खैर , पांढरा खैर , शेण्या खैर , सुपारी , भूर्जपत्र , मेढशिंगी , तिवस , पांढरा चंदन व तांबडा चंदन , शिसवा , शिरसाचा वृक्ष , असाणा , घावडा , अर्जुनासादडा , ताड , शालवृक्ष , (मोठा सागवान वृक्ष ) करंज , घाणेरा करंज , थोर राळेचा वृक्ष , कृष्णागर , मेलयपर्वतावरील चंदन . हा सालसारादिगण कुष्ठनाशक आहे . आणि प्रमेह , पांडुरोग , कफ व मेद ह्यांचा नाशक आहे ॥१२ -१३॥

रोध्रादिगण

रोध्र , पटाणीरोध्र , पळस , टेंटू , अशोक , भारंगी , कायफळ , एलावलुक (एळ्य़ाबोळ -कर्नाटकी भाषेत ‘‘कलंगडळ ’’ म्हणतात .) साळईचा वृक्ष , जिंगिनी (मोईचे झाड ), कळंब , राळेचे झाड व केळ .

हा रोध्रादिगण मेद व कफनाशक आहे . योनीदोष नाशक , स्तंभक (अतिसारनाशक व रक्तस्तंभक ) शरीराचा वर्ण चांगला करणारा व विषनाशक आहे ॥१४ -१५॥ .

अर्कादिगण

रुई , मंदार (ह्यांचा चीक नाहीसा होत नाही ), लहान व थोर करंज , नागदंति (नागाळी -मोगली एरंड ), आघाडा , भारंगी , रास्ना , इंद्रपुष्पी (कळलावी ) किंवा काळ्या फुलांचा करंज , थोरली व धाकटी किन्ही , विंचूचे झाड , थोरमालकांगोणी व हिंगणबेट .

हा अर्कादिगण कफ , मेद व विष ह्यांचा नाशक आहे . आणि कृमि , कुष्ठ ह्यांचा नाश करितो . व विशेषतः प्रमाणाचे शोधन करितो ॥१६ -१७॥

सुरसादिगण

तुळस , पांढरी तुळस मरवा , अजबला (रान तुळस ) रेाहिस गवत , सुंठाधिगवत (गवती चहा ), मोहरी , काळा अजबला , कासविंदा नाकशिंकणि , खरपुष्पा , (रानतुळशीचा एक भेद ), वावडिंग , कायफळ , पांढरी व काळी निर्गुडी , गोरखमुंडी , उंदीरकानी , फंजी (भारंगी ) किंवा फांज , (फांजीचा वेल समुद्रशोकाच्या वेलीसारखा असतो .), जळपिंपळी , कांगोणी व निंबारा . हा ‘‘सुरसादिगण ’’ कफ व कृमि ह्यांचा नाशक -आहे आणि पडसे , अरुचि , श्वास , खोकला , ह्यांचा नाश करितो व व्रणाचेही शोधन करितो ॥१८ -१९॥

मुष्कादिगण

मोरवा , पळस , धावडा चित्रक , गेळ्याचे झाड , किंवा मदन म्हणजे तगर आणि वृक्षक म्हणजे कुडा , शिसवा , त्रिधारी निवडुंग व त्रिफळा .

हा ‘‘मुष्कादिगण ’’ मेद व शुक्रदोषनाशक आहे . आणि प्रमेह , मुळव्याध , पांडुरोग व शर्करा (मूत्रकर्शरा ) ह्यांचा नाशक आहे ॥२० -२१॥

पिंपल्यादिगण

पिंपळी , पिंपळमूळ , चवक , चित्रक , आले (सुंठ ), मिरे गजपिंपळी , रेणुकबीज वेलदोडे , अजमोदा , (ओवा ), इंद्रजव , पहाडमूळ , जिरे , शिरश , निंबार्‍याचे बी , हिंग , भारंगी ,

बडीशेफ , अतिविष , वेखंड , वावडिंग व कुटकी . हा ‘‘पिप्पल्यादिगण ’’ कफनाशक , आणि पडसे वात , अरुची , ह्यांचा नाश करितो . अग्नी प्रदीप्त करितो . गुल्म व शूळ ह्यांचा नाश करिती व आमाचे पाचन करितो ॥२२ -२३॥

एलादिगण

वेलदोडे , तगर , कोष्ठ , जटामांसी , रोहिस गवत , दालचिनी , तमालपत्र , नाकेशर , गहुला , रेणुकबीज , वाघनखी , नखला , किरमाणी ओवा , भुणेर , विशेषधूप , (किंवा गुग्गुळ ), रानटी दालचिनी , चोर ओवा , एलावालुक (काळा बोळ ), गुग्गुळ , राळ , साळईचा डिंक , शिलारस , कृष्णासागर , पाच , वाळा , देवदार , केशर , पुत्रागाच्या फुलांतील केशर , (किंवा सोनचाफ्याच्या फुलांतील केसर .)

हा ‘‘एलादिगण ’’ वात -कफ -नाशक , विषनाशक , अंगाचा वर्ण चांगला करणारा , कंडु , प्रेमह -पीटिका व कोठ (शीत पित्ताच्या गांधी ) ह्यांचा नाश करितो ॥२४ -२५॥

वचादि व हरिदादिगण .

वेखंड , नागरमोथे , अतिविष , हिरडे , देवदार , व नाकेशर व हळद , दारुहळद , पिठवण , इंद्रजव व ज्येष्ठमध हे ‘‘वचादि व हरिद्रादि ’’ दोन गण स्तन्यशोधक (अंगावरील दुधासंबंधी दोष घालविणारे ) आमातिसाराचा नाश करणारे व विशेषतः दोषांचे पाचन करणारे आहेत ॥२६ -२८॥

श्यामादिगण

पांढरे निशोत्तर , वरधारा , तांबडे निशोत्तर , थोर दांती सांखवेल , लोध्र , कपिला , बकाणानिंब , (किंवा कडुपडवळाचे मूळ ), सुपारी द्रवंति (लहान एरंड , रान एरंड ), कडु इंद्रावण , बाहवा , लहान व मोठे करंज गुडूची , (गुळवेल ), शिकेकाई (किंवा शेर ) बोकडी , बोकड मुंगळी , त्रिधारी निवडुंग आणि काटे धोत्रा (ह्याला पिवळी फुले येतात व चीकही पिवळा असतो . कोणी पिसोळा म्हणतात . हा ‘‘श्यामादिगण ’’ गुल्म व विषबाधा नाशक आहे . आणि पोट फुगणे , उदर ह्यांचा नाश करणारा , मलाचे भेदन करणारा (मळ पातळ करणारा ) व उदावर्तनाशक आहे ॥२९ -३०॥

बृहत्यादिगण .

डोरली , रिंगणी , इंद्रजव , पहाडमूळ , ज्येष्ठमध .

हा ‘‘बहुत्यादिगण ’’ पाचक व वातपित्तनाशक आहे . आणि कफ अरुची , हृद्रोग , मूत्रकृच्छ (उन्हाळे ) ह्या रोगांचाही नाश करितो ॥३१ -३२॥

पटोलदिगण

कडुपडवळ , पांढरा व तांबडा चंदन , मोरवेल , गुळवेल , पहाडवेल , व कुटकी .

हा ‘‘पटोलादिगण ’’ पित्त , कफ व अरुची ह्यांचा नाशक आहे . आणि ज्वरशामक , व्रणाला भरून आणणारा , वाती , कडु आणि विष ह्यांचा नाश करणारा आहे ॥३३ -३४॥

काकोल्यादिगण

काकोली , क्षीरकाकोली , जीवक , ऋषभक , रानमुग , रानउडीद , मेदा , महामेहा , गुळवेल , काकडशिंगी , वंशलोचन , पद्मकाष्ठ पुडरीक वृक्ष (हा ज्येष्ठमधापेक्षा किंचित मोठा असतो .) ऋृद्धि (मृरडशेंग ), मनुका , जीवंती व ज्येष्ठमध .

हा ‘‘काकोल्यादिगण ’’ रक्तपित्त व वातनाशक , आहे आणि जीवन , (थकवा नाहीसा करणारा , आयुष्य वाढविणारा ) पौष्टिक , शुक्रवर्धक , स्तनातील दूध वाढविणारा व कफकारक आहे ॥।३५ -३६॥

ऊषकादिगण .

खारी माती , सैधव , शिलाजित , भस्मकासीस व पुष्पकासीस अशी दोन प्रकारची हिराकस , हिंग कलखापरी (किंवा मोरचूत .)

हा ‘‘ऊषकादिगण ’’ कफनाशक व मेदनाशक असून मूतखडा , मूत्रशर्करा मूत्रकृच्छ व गुल्म ह्यांचा नाश करणारा आहे ॥३७ -३८॥

सारिवादिगण

उपळसरी , ज्येष्ठमध , रक्तचंदन , पद्मकाष्ठ , शिवणीची फळे , मोहाची फुले व वाळा .

‘‘ सारिवादिगण ’’ तहान व रक्तपित्तनाशक आहे . आणि पित्तज्वरनाशक असून विशेषतः दाहनाशक आहे ॥३९ - ४०॥

अंजनादिगण .

सौवीरांजन (सुरमा ), रसांजन (दारुहळदीपासून केलेले ), नागकेशर , गहुला , निळे कमळ , वाळा (किंवा जटामांसी ), कमळाच्या फुलातील केसर व ज्येष्ठमध .

हा ‘‘अंजनादिगण ’’ रक्तपित्तनाशक , विषनाशक आणि अंतर्गण दाहनाशक आहे ॥४१ -४२॥

परुषकादिगण

फालसा , द्राक्षे , कायफळ , डाळिंब , राजादन (खिरणीचे फळ किंवा चारोळी ), निवळीची फळे , सागवनाची फळे व त्रिफळा . हा ‘‘परुषकादिगण ’’ वातनाशक , मूत्रदोषांचा नाशक हृद्य (हृदयाला हितावह ), तृषानाशक व रुचिप्रद आहे ॥४३ -४४॥

प्रियगवादि व अंबष्ठादिगण

गहुला , लाजाळू , घायटी , पुन्नाग (उंडीण ), नाकेशर , पांढरा चंदन , तांबडा चंदन , मोचरस , रसांजन कायफळ (कुंभ्याचे झाड ), सुरमा , कमळातील केसर , मंजिष्ठ व धमासा . चुका (किंवा कांगोणी ), धायटीची फुले , लाजाळु , टेंटु (किंवा वेत ), ज्येष्ठमध , बेलफळातील गर , पठाणी , रोध्र , पळस , नंदीवृक्ष (शिवण किंवा नांदरुख ) व कमळातील केसर . हे ‘‘प्रियंगवादि व अंबष्ठदिगण ’’ पक्वातिसारनाशक , मोडलेले हाड सांधणारे , पित्तविकाराला पथ्यकर व व्रणाला भरून आणणारे आहेत ॥४५ -४७॥

न्यग्रोधादिगण

वड , उंबर , पिंपळ , पिंपणी , ज्येष्ठमध , अंबाडा , अर्जुनसादडा , आंबा , कोशिंब (रान आंबा -हा लाल रंगाचा असतो .), लाखेचे झाड , लहान व मोठ्या फळाची जांभह , चारोळी , ज्येष्ठमध , (किंवा मोहाचा वृक्ष ) कायफळ , वेत , कळंब , बोर (मोठे ), टेंभुरणी , साळई वृक्ष , रोध्र , बिब्बा , पळस व पारोसा पिंपळ .

हा ‘‘न्यग्रोधादिगण ’’ व्रणाचे शोधन व रोपण करणारा , मळाला घट्ट करणारा , मोडलेल्या हाडाला साधणारा रक्तपित्तनाशक , दाह व मेद यांचा नाश करणारा व योनी रोगांचा नाशक आहे ॥४८ -४९॥

गुडूच्यादिगण

गुळवेल , कडुनिंब , धने , रक्तचंदन व पद्मकाष्ठ , हा ‘‘गुडूच्यादिगण ’’ सर्व ज्वरांचा नाशक व अग्निदीपक आहे . आणि मळमळणे , अरूचि , ओकारी , तहान व दाह ह्यांचा नाशक आहे ॥५० -५१॥

उत्पलादिगण .

निळे कमळ , तांबडे कमळ , तांबुस पांढरे कमळ , सुगंधी निळे कमळ , कुवलय -किंचित् निळे श्वेत कमळ , पांढरे कमळ व ज्येष्ठमध ,

हा ‘‘उत्पलादिगण ’’ दाह व रक्तपित्तनाशक आहे आणि तहान , विषबाधा , हृद्रोग , वांति , मूर्च्छा , ह्यांचा नाशक आहे ॥५२ -५३॥

मुस्तादिगण

नागरमोथे , हळद , दारुहळद , हिरडे , आवळकाठी , बेहडे , कोष्ठ पांढरे वेखंड , तांबडे वेखंड , पहाडमूळ , कुटकी , शार्गैष्टा (चिरपोटाणिकिंवा लताकरंज ), अतिविष , वेलची , बिब्बे व चित्रक .

हा ‘‘मुस्तादिगण ’’ कफनाशक आहे . योनीदोषनाशक , स्तनांतील दुधाची शुद्धि करणारा व पाचक आहे ॥५४ -५५॥

हरितक्यादिगण

हिरडे , बेहडे व आवळे .

ह्याला ‘‘हरितक्यादिगण ’’ म्हणतात . ह्यालाच त्रिफळाही म्हणतात . हा कफपित्तनाशक प्रमेह व कुष्ठनाशक , डोळ्याला पथ्यकारक , अग्निदीपक , व विषमज्वरनाशक आहे ॥५६ -५७॥

त्रिकटुगण

पिंपळी , मिरे , सुंठ ह्या औषधांना , ‘‘त्रिकटु ’’ असे म्हणतात . ह्याला हा ‘‘त्र्यूषण ’’ असेही म्हणतात . हे कफ व मेदनाशक , तसेच प्रमेह , कुष्ठ , त्वचेचे रोग , ह्यांचा नाश करणारे , अग्निदिपक , गुल्म , पीनस व अग्निमांद्य ह्यांचा नाश करिते ॥५८ -५९॥

आमलक्यादिगण

आवळाकाठी , हिरडे , पिंपळी व चित्रक .

ह्याला ‘‘आमलक्यादिगण ’’ म्हणतात . हा सर्व ज्वराचा नाश करणारा आहे . डोळ्यांना हितकारक आहे , अग्निदीपक धातुवर्धक (कामोद्दीपक ) आहे आणि कफ व अरुचिनाशक आहे ॥६० -६१॥

त्रप्वादिगण

कथील , शिसे , ताम्र (तांबे ), रुपे (चांदी ) पोलाद , सोने व मंडूर . हा ‘‘त्रप्वादिगण ’’ गर (विषबाधा ) व कृमि ह्यांचा नाश करण्याविषयी फार उत्तम आहे . आणि तहान , विषबाधा , हृदयाचा रोग , पांडुरोग व प्रमेह ह्यांचा नाशक आहे .

॥६२ -६३॥

लाक्षादिगण

लाख , थोर बाहवा , कुडा , कणेर , कायफळ , हळद , दारुहळद , कडुनिंब , सातवीण , जाई व त्रायमाण . हा ‘‘लाक्षादिगण ’’ तुरट , कडू , मधुर , कफपित्तजन्य , रोगनाशक , कुष्ठ व कृमीनाशक व दुष्ट व्रणाचे शोषण करणारा आहे ॥६४ -६५॥

पंचमुळे (लघु पंचमूळ .)

आता पंचमूळांचे प्रकार सांगतो .

गोखरू , डोरली , रिंगणी , साळवण , पिठवण .

ह्याला ‘‘लघु पंचमूळ ’’ म्हणतात . हे तुरट , कडु व मधुर आहे . तसेच ते वातनाशक , पित्तशामक , पौष्टिक व बलवर्धक आहे . ह्या पंचमुळात गोखरूच्याऐवजी कोणी एरंडमूळ घेतात ॥६६ -६७॥

मोठे पंचमूळ

बेल , टाकळीमूळ , टंटू , पाडळ व शिवणमूळ . ह्याला ‘‘मोठे पंचमूळ ’’ म्हणतात . हे कडु , किंचित मधुर , पचनाला हलके , कफवातनाशक व अग्निदीपक आहे ॥६८ -६९॥

दशमुळे

ह्यावरील लहान व मोठ्या पंचमूळांना दशमुळे म्हणतात हा दशमुळादिगण श्वासनाशक , कफ , पित्त व वातनाशक , आमाचे पाचन करणारा व सर्व ज्वरनाशक आहे .

॥७० -७१॥

वल्लिपंचमूळ व कंटक पंचमूळ

भूई कोहळा , उपळसरी , हळद , गुळवेल व मेढशिंगी (किंवा काकडशिंगी ) ह्यांना ‘‘वल्लि पंचमूळ ’’ म्हणतात .

करवंद , गोखरू , कोरांटी , शतातरी व बोर ह्यांना कटक पंचमूळ म्हणतात .

ही दोनीही पंचमुळे रक्तपित्तनाशक , वात , पित्त व कफजन्य अशा तीनही प्रकारच्या सुजेची नाशक सर्व प्रमेहनाशक व शुक्रदोषनाशक आहेत . (त्यापैकी वल्लि पंचमूळ हे विशेषतः कफनाशक , वातनाशक , मूत्रल , वृष्यशुक्रवर्धक व इंद्रियांचे मार्ग शुद्ध करणारे आहे ॥७२ -७४॥

तृण पंचमूळ .

कुश (लहान मऊ पानाचा दर्भ ) काश (लांब पानाचादर्भनल ) (देवनळ ), दर्भ (मोठा , खरखरीत पानाचा दर्भ ), काडेक्षु (वेडा ऊस ) किंवा ऊस .

ह्यांना ‘‘तृणपंचमूळ ’’ म्हणतात . हे मूत्रसंबंधी रोग , रक्तपित्त , ह्यांचा नाश करिते . हे तृणपंचमूळ दुधाशी दिले असता ह्या वरील विकारांचा त्वरित नाश करिते .

ह्या पाच पंचमुळापैकी पहिली दोन लघु व मोठे ही दोन वातनाशक आहेत . शेवटचे तृणपंचमूळ पित्तनाशक आहे आणि राहिलेली दोन वल्लि पंचामूळ व कंटक पंचामूळ ही दोन कफनाशक आहेत . ॥७५ -७७॥

त्रिवृत्तादिगण

त्रिवृतादि गण दुसरीकडे (पुढील अध्यायात ) सांगू .

हे औषधाचे गण ह्याठिकाणी थोडक्यांत सांगितले आहेत . ह्यांची सविस्तर माहिती पुढे चिकित्सास्थानात सांगेन . दोषांचे बलाबल जाणून ह्या गणातील औषधाचे लेप , काढे , तेले , तुपे , इतर पेय प्रयोग (अवलेह वगैरे ) ज्या ठिकाणी जो योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांची निवड करून बुद्धिवान् वैद्याने योजना करावी .

मागे सांगितल्याप्रमाणे विधियुक्त औषधे आणून ती ज्या घरांमध्ये धूर , वारा , पाऊस व ओल ह्यांचा उपद्रव कोणाच्याही ऋतूंमध्ये बिलकूल नाही अशा घरात संग्रह करून ठेवावी .

दोष मिश्र आहेत का भिन्न आहेत ह्यांची परीक्षा करून त्या धोरणाने गणातील औषधेही योग्य त्या रीतीने दोन गणांची मिश्र किंवा एकाच गणाची योजावी . तसे एकादा गण स्वतंत्र योजावा . वाटल्यास दुसर्‍या गणांतील औषधे त्यांत मिश्र करावी , अथवा एकाच गणातील औषधे त्यांत मिश्र करावी , अथवा एकाच गणातील एक दोनचार अशी वाटेल तेवढीच योजावी किंवा गणांतील सर्व औषधे योजावी ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP