मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अग्निकर्माध्याय

सूत्रस्थान - अग्निकर्माध्याय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय १२ वा

आता ’ अग्निकर्माध्याय ’ जसा भगवान धन्वंतरीनी सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥

चिकित्साकर्मात क्षारापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे . कारण अग्नीने दग्ध झालेले रोग पुनः उत्पन्न होत नाहीत , आणि औषधोपचार , शस्त्रप्रयोग व क्षारकर्म ह्या प्रयोगांनी जे रोग बरे झाले नाहीत ते ह्या अग्नीप्रयोगाने बरे होतात ॥३॥

अग्निकर्मासंबंधी साधने

अग्नि - कर्माची उपकरणे ती अशी - पिंपळ्या , शेळीच्या लेंड्या , गाईचा दात , बाण , सळई , जांबवोष्ठ ( जांभळाच्या अकाराचा एक दगड ), इतर सोने , चांदी वगैरे लोहजाती , मध , गूळ , तेले .

त्यापैकी पिंपळीपासून सळईपर्यंतचे पदार्थ त्वचेच्या रोगाकरिता उपयोगांत आणावे . जांबवोष्ठ इतर धातु मांसगत रोगात उपयोगात आणावे . मध , गूळ व तेले हे पदार्थ शिरा , स्नायु , संवि व अस्थिरोग या करिता घ्यावे . शिरा म्हणजे रक्तवाहिन्या . त्यांचे ठायी अग्निकर्म वर्ज्य असून तेथे ते कसे सांगितले ह्या शंकेचे समाधान असे की , शिरादिकांच्या रोगाला अग्निकर्म वर्ज्यच आहे , पण त्यांचा छेद केला असता रक्ताची अतिप्रवृत्ती ती बंद करण्याकरिता हे करावयाचे . भद्रशौनकाचे असे मत आहे की , त्वचा , मांस व सांधे ह्या ठिकाणचा वायु त्वचेला डाग दिल्याने शांत होतो . आणि मासापर्यंत डाग दिला असता शिरादिकांच्या ठिकाणचा वायु शांत होतो . ह्या वचनाने शिरा वगैरे डागण्याचे कारणच नाही ॥४॥

शरद व ग्रीष्म ऋतु वर्ज्य करुन कोणत्याही ऋतूंत अग्निकर्म करावे . त्यांतही अग्निकर्माने साध्य होणारा व्याधी वाढलेला असेल तर त्या ऋतूंच्या विरुद्ध थंड हवेची आहार - विहार वगैरे शीत असे ठेवून त्या ऋतूंतही अग्निकर्म करावे . सर्व अग्निकर्मामध्ये रोगावर सर्व ऋतुत स्निग्ध व पौष्टिक अन्न खाण्यास घालून अग्निकर्म करावे . पण मुतखडा , भगंदर , मुळव्याध व मुखरोग यात जेवणापूर्वी करावे .

कित्येकजण अग्निकर्म दोन प्रकारचे आहेत असे सांगतात . एक त्वचेपर्यंत डाग देणे व दुसरे मांसापर्यंत डाग देणे . शिरा , ( रक्तवाहिन्या ) स्नायु , सांधे व अस्थि ह्या ठिकाणी देखील अग्निकर्म निषिद्ध मानण्याचे कारण नाही . परंतु काश्यपाच्या मताने शिरादिकांचे ठिकाणी अग्निकर्म करु नये . फारच असाध्यत्वासारखा रोग असल्यास मधादिकांनी करावे असे चक्राचे मत आहे ॥५॥७॥

अग्निकर्म करताना ( डाग देताना ) त्या ठिकाणी आवाज होणे , घाण येणे , त्या ठिकाणी त्वचा आकसणे ही लक्षणे दिसली की त्वचा दग्ध झाली असे समजावे . कपोतवर्ण ( काळसर तांबुस ) किंचित सूज , वेदना , शुष्क व संकुचित अशी जखम होणे ही लक्षणे दिसली म्हणजे मांस दग्ध झाले असे समजावे . काळावर्ण , जखम वर उचलून येणे व स्त्राव बंद होणे , ही लक्षणे शिरा व स्नायु दग्ध झाले असता होतात . रुक्ष व तांबुस रंग येणे , कर्कश ( खरबरीत ) व कठिण असा व्रण ( जखम ) होणे ही लक्षणे संधि व हाड दग्ध झाले असता होतात ॥८॥

डाग देणे तो शिरोरोग व अधिमंथ ( नेत्ररोग ) ह्या विकारात भुवई , ललाट व शंख ( आंख ) ह्या ठिकाणी द्यावा . पापण्याचे रोगावर आळित्याची ओली घडी बुबुळावर झाकून पापण्याच्या केसांच्या छिद्रच्या ठिकाणी डागावे .

त्वचा , मांस , शिरा ( रक्तवाहिन्या ) स्नायु , सांधे व हाडे ह्या ठिकाणी वाताने अत्यंत वेदना होत असल्यास उंच वाढलेले , कठीण व ज्याला स्पर्शज्ञान होत नाही असे जखमेचे मांस , व्रण , कोणत्याही प्रकारची गाठ ( प्रमेहावाचून ), मूळव्याध , अर्बदु ( आवाळु ) , भगंदर , अपची , श्लीपद , चामखीळ , तीळ , आंत्रवृद्धि , संधी व रक्तवाहिनी कापली असता त्या ठिकाणी , नाडीव्रणातून अतिशय रक्तप्रवाह होत असल्यास त्या ठिकाणी डाग देण्याचा प्रयोग करावा .

डाग द्यावयाचा तो वलयाकृति ( वर्तुळ ) बिदुच्या आकाराचा ( नुसता एक टिपका ), आडवी , उभी किंवा तिर्कस रेषा किंवा सळईने ( तापविलेल्या ) घासणे , असे डाग देण्याचे रोगानुरुप अनेक प्रकार आहेत ॥९॥११॥

रोगाचे आश्रयस्थान , मर्माच्या जागा , रोग्याचे बलाबल ह्यांची बारकाईने पहाणी करुन तसेच रोग व काल ( ऋतु ) ह्यासंबंधी विचार करुन नंतर वैद्याने डाग देण्याचा प्रयोग करावा ॥१२॥

योग्य प्रकारे डाग देऊन झाल्यावर त्या ठिकाणी तूप व मध ह्यांचा लेप करावा , म्हणजे वेदना कमी होतात .

पित्तप्रकृति , ज्याच्या कोठ्यात आगंतुक जखमेने रक्तसंचय झाला आहे तो , ज्याचा कोठा फुटला आहे तो , ज्याच्या जखमेतील शल्य काढले नाही तो , अशक्त , लहान मूल , वृद्ध मनुष्य , भित्रा , जो अनेक जखमांनी पीडला आहे तो व स्वेदकर्माला जे वर्ज्य ते यांना अग्निकर्म ( डाग देण्याचा प्रयोग ) करु नये ॥१३॥१४॥

अन्य प्रकाराने भाजल्याची लक्षणे

आता अन्य प्रकाराने भाजले असता त्याचे लक्षण सांगतो . स्निग्ध ( तूप वगैरे ) किंवा रुक्ष ( लाकूड वगैरे ) द्रव्यांचा आश्रय करुन अग्नी भाजतो . अग्नीने तप्त झालेले तेल हे सूक्ष्म शिरामधून त्वरित शिरणारे असल्यामुळे त्वचेच्या छिद्रातून आत प्रवेश करुन त्वरित दाह करिते . ( जाळते .) त्यामुळे तेलाने भाजल्याठिकाणी अधिक वेदना व जखम होते .

ह्या अग्निदग्धव्रणाचे प्लुष्ट , दुर्दग्ध , सम्यगदग्ध व अतिदग्ध असे चार प्रकार आहेत , त्यापैकी अतिशय पोळल्यामुळे त्या जागेचा रंग बदलतो त्याला प्लुष्ट ( पोळलेले ) असे म्हणतात . भाजल्याने तीव्र फोड येतात , त्याठिकाणी आग लागल्यासारखी पीडा होते , लाली येते , पक्वपणा , वेदना होतात व त्या फार वेळाने किंवा दिवसांनी कमी होतात . त्याला ’ दुर्दग्ध ’ असे म्हणतात . योग्य प्रकारे भाजले तर ( डागले तर ) ते फार आत जात नाही . त्या ठिकाणी पिकलेल्या ताडाच्या फळासारखा रंग येतो . ती जागा जशी असावी तशी असते , वर उचलेली किंवा खळगा पडल्यासारखे नसते . व मागे त्वचादिकांच्या योग्य डागल्याची जी लक्षणे तीही ह्यात असतात . फारच भाजून अंग जळले तर जखमेतून मांस गळू लागते . अवयव तुटून पडतात ; रक्तवाहिन्या , स्नायु , संधीधी हाडे तुटतात किंवा फुटतात . आणि ज्वर , दाह , तहान , मूर्च्छा वगैरे उपद्रव होतात . ह्याची जखम लवकर बरी होत नाही , फार दिवस लागतात . बरी झाली तरी त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे त्वचा येत नाही , तिचा रंग बदलतो . असे हे अग्नीने भाजल्याचे चार प्रकार आहेत . हे माहीत असले म्हणजे वैद्याला आपले कर्म ( चिकित्सा ) साधण्यास बरे पडते ॥१५॥१६॥

अग्निदाहाने प्रकुपित केलेले रक्त संतप्त झाल्यामुळे वेगाने पित्तास वाढविते . पित्त व रक्त हे दोन्ही पदार्थ घटक द्रव्याने व रसाने तुल्य वीर्य असल्यामुळे , अग्नीने भाजल्याठिकाणी तीव्र वेदना होतात . आणि ही दोन्ही स्वभावतःच विदाहक असल्यामुळे दाह होतो , फोड येतात व ज्वर आणि तहानही वाढतात .

आता भाजल्याठिकाणची जखम वगैरे बरी होण्याकरिता त्याजवर उपाय सांगतो .

पोळले असेल त्या ठिकाणी सोसेल अशा बेताने ( स्वेदन करावे ) व लेपही उष्ण औषधानेच करावे . कारण शरीरात उष्णता वाढल्याने रक्तही उष्ण होते व त्या कारणाने पातळ होऊ लागते . पाणी हे स्वभावतःच थंड असल्यामुळे भाजलेल्या भागावर घातले असता ते रक्ताला स्तब्ध करीते . त्यामुळे पाण्यापासून आग जास्तच होते . म्हणून उष्ण उपचारानीच बरे वाटते . शीत उपचारानी वाटत नाही .

दुर्दग्ध अग्निव्रणावर थंड व उष्ण असे मिश्र उपाय करावे म्हणजे तूप लावावे व थंड दूध , उसाचा रस शिंपणे अशा शीत क्रिया कराव्या .

सम्यकदग्ध अग्निव्रणावर वंशलोचन ( किंवा शंखजिरे ), पिंपरणीची साल , रक्तचंदन , सोनकाव व गुळवेल ह्याचे अत्यंत सूक्ष्म असे वस्त्रगाळ चूर्ण करुन ते तुपात खलून लावावे . ग्राम्य ( घोडे वगैरे ), अनूप ( रानडुकर्रे वगैरे ), औदक ( कासव , खेकडे वगैरे ) ह्या प्राण्यांचे मांस वाटून त्याने लेप करावा . आनी सारखा दाह होत असेल तर पित्तजन्य विद्रधीवरील उपाय करावे .

अतिदग्धव्रणावर लोंबत असलेले मांस काढून शीत उपाय करावे . तांदुळाच्या कण्या , टेंभुर्णीची साल किंवा सालीवरील खरपुड्या ही दोन्ही ( काहीच्या मताने त्यात निरडलेल्या रांजणाची खापरी घ्यावी ) अगर तिन्ही एकत्र खलून तुपात मलम करुन लेप करावा . जखमेवर गुळवेलीची पाने झाकावी किंवा पाण्यातील वनस्पतींची ( कमळाची वगैरे ) पाने झाकावी आणि सर्व उपाय पित्तजन्यविद्रधिप्रमाणे करावे .

मेण , ज्येष्ठमध , लोध्र , राळ , मंजिष्ठ , रक्तचंदन व मोरवेल ही सर्व औषधे समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन ते ( चौपट ) तुपात घालून थोडे पचन करावे . हे ( मलम ) सर्व अग्निदग्धाव्रणावर भरुन आणण्याला फार चांगले आहे .

तेलाने भाजले तर त्यावर रुक्ष औषधांचे लेप करावे ( आणि लाकूड वगैरे ) द्रव्याने भाजले तर त्याजवर तूप लावणे वगैरे स्निग्ध उपाय करावे ॥१७॥३२॥

अतिशय धुराने घुसमटलेल्या माणसाची लक्षणे सांगतो . अतिशय धूर लागला असता दम लागतो , अतिशय शिंका येतात . अतिशय धापा टाकतो , खोकतो , डोळ्याची आग होते , डोळे लाल होतात , श्वास टाकताना त्यातून धूर बाहेर येतो , त्याला दुसर्‍या पदार्थाचा वास येत नाही , जिभेला रुचि कळत नाही , कानात ऐकू येत नाही , तहान , दाह व ज्वर ह्या विकारानी पीडित होतो , काम करण्याची ताकत नसते व त्याला मूर्च्छा येते . अतिशय धूर लागलेल्या मनुष्याला ही लक्षणे होतात , त्याजवर उपाय सांगतो ऐक . त्याला वांति होण्यासाठी तूप व उंसाचा रस एकत्र करुन पाजावा . किंवा द्राक्षांचा रस व दूध पाजावे अगर साखरमिश्रित पाणी पाजावे , अथवा मधुर व आंबट असे रस त्याला वांती होईपर्यंत पाजावे . वांति झाली म्हणजे कोटा शुद्ध होतो व श्वासातून येणार्‍या धुराचा वासही जातो . ह्याच उपायाने थकवा , शिंका व ज्वर हे विकार शांत होतात . तसेच दाह , मुर्च्छा , तहान , पोट फुगणे , श्वास व खोकला हे विकार अतिशय वाढलेले असले तरी कमी होतात . मधुर , खारट , आंबट व तिखट अशा पदार्थांचे कवल ( तोंडात धरण्याच्या गोळ्या ) तोंडात धरावयास द्यावे , म्हणजे त्याला वास , रुची वगैरे ज्ञानेंद्रियांचे विषय समजू लागतात , मनाला हुषारी वाटते . विद्वान वैद्याने त्या रोग्याला योग्य प्रमाणात ( कडक नाही असे ) शिरोविरेचन द्यावे , म्हणजे त्याने त्याची दृष्टी साफ होते , मस्तकाचीही शुद्धी होते व मानही मोकळी होते . ह्याला घशाशी जळजळ न करणारे , हलके व स्निग्ध असे अन्न खाण्यास द्यावे ॥३३॥३५॥

उष्ण असा वारा व कडक ऊन लागून कोणी घाबरा झाला ( होरपळला ) असता त्याला नेहमी थंड उपाय योजावे .

अत्यंत थंडी ( किंवा बर्फ वगैरे ), वारा व पाऊस ह्यांच्या गारठ्याने जो भाजल्यासारखा होतो ( होरपळतो ) त्याला स्निग्ध व उष्ण उपाय करावे . तसेच अतितेजाने ( कोणच्याही प्रकारच्या प्रखर तेजाने - विजेने वगैरे ) कोणी दग्ध झाला तर त्याजवर काही उपाय चालत नाहीत , तथापि वीज पडून जरी कोणी दग्ध झाला असला तरी त्याजवर तो जिवंत आहे तोपर्यंत तेल लावणे , शीतकषायादिक अंगावर शिंपणे किंवा तशा प्रकारचे लेप करणे वगैरे उपाय करावे ॥३८॥३९॥

अध्याय बारावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP