मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
द्रवद्रव्यविधि

सूत्रस्थान - द्रवद्रव्यविधि

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय पंचेचाळिसावा

आता ‘‘द्रवद्रव्यविधि ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

जल वर्ग

आकाशातून पडणारे पावसाचे पाणी अव्यक्त रस (ज्यामध्ये कोणत्याही रसाची चव स्पष्ट कळत नाही ते ) असते . ते अमृताप्रमाणे निर्दोष (कोणत्याही दोषाचा प्रकोप न करणारे ) असून मनुष्याचे (प्राण्यांचे ) जीवन (प्राण धारण करणारे ) आहे . तसेच ते तृप्तिकारक , शरीराला , धारण करणारे (शस्त्रादिकांच्या आघाताने मूर्च्छा आली असता सावध करणारे ) हुषारी आणणारे , श्रम , थकवा , तहान मद (सुपारी वगैरे खाण्याने येणारा ), मूर्च्छा , तंद्रा (ग्लानी ), निद्रा (झोप ) व दाह ह्यांचा नाश करणारे व केवळ सर्व प्राणिमात्रांना हितकारक असे आहे .

तेच पावसाचे पाणी पृथ्वीवर पडल्यावर त्या त्या जमिनीच्या स्वाभाविक रसाच्या संसर्गाने कोणत्यातरी रसाने युक्त होते . तसेच ते गंगादि नद्या , सिंधु वगैरे नद , सरोवरे , तलाव वापी (पायर्‍या असलेली विहीर ), कूप (पायर्‍या नसलेली विहीर ), चौंडी (कुवा किंवा न बांधलेली विहीर ), झरा , उभ्दिद (कारंज्याप्रमाणे वर उडणारे पाणी ), विकिर (वाळू बाजूस सारून काढलेले पाणी ), पाटाचे पाणी व पल्लव (डबके किंवा अनुपदेशातील गवताने आच्छादित सरोवर ) इत्यादि निरनिराळ्या स्थानी पडल्यामुळे त्या ठिकाणचा विशेष असणारा रस त्या पाण्यात येतो .

तांबडी , काळवट , पांढुरकी , निळी , पिवळी व शुभ्र (शाडूची ) ह्या सहा प्रकारच्या रंगाच्या जमिनींर्पकी ज्या रंगाच्या मातीचा (जमिनीचा ) त्या पाण्याला संपर्क होईल त्याप्रमाणे म्हणजे तांबड्या जमिनीतील पाणी मधुर , काळपट जमीनीतील पाणी आंबट , पांढुरक्या जमिनीतील पाणी खारे , निळ्या जमिनीतील पाणी तिखट , पिवळ्य़ा जमिनीतील कडु व पांढर्‍या जमिनीतील तुरट . ह्याप्रमाणे अनुक्रमे ते ते रस पाण्यांत येतात , असे कित्येक आचार्यांचे मत आहे . हे जे कित्येक आचार्यांचे मत आहे ते समाधानकारक नाही ; कारण पाण्यामध्ये येणारा रस हा केवळ त्या स्थानाच्याच रसावर अवलंबून नाही . तो रस त्या स्थानामध्ये जो पृथिव्यादि पंचमहाभूतांचा परस्पर मिश्रपणाचा संबंध असतो त्यापासून उत्पन्न होतो . त्यामुळे त्या पंचमहाभूतांच्या मिश्रभावात जसा न्यूनाधिकपणा असेल त्याप्रमाणे त्या रसांत (रुचीत ) फरक असतो . त्यापैकी ज्या जमिनीत भूमितत्त्वाचे गुण जास्त असतात त्या ठिकाणच्या पाण्यात आंबट व खारट रस अधिक असतात . ज्या जमिनीत जलततत्त्वाचे गुण अधिक असतात त्या ठिकाणचे पाणी तिखट व कडवट असते . ज्या जमिनीत वायु तत्त्वाचे गुण अधिक असतात , त्या ठिकाणचे पाणी तुरट असते . आणि आकाशतत्त्वाचे गुण अधिक असतात त्या ठिकाणचे पाणी अव्यक्तरस (कोणत्याच रसाची रुची लागत नाही असे ) असते . आकाशतत्त्वही अव्यक्तरसात्मकच आहे , म्हणून अव्यक्तरस असणारे पाणी सर्व पाण्यांत श्रेष्ठ आहे . म्हणून ‘‘अंतरिक्षजल ’’ (पावसाचे पाणी ) प्यावयास न मिळेल तर हे अव्यक्तरस पाणी त्याच्या अभावी पिण्यास घ्यावे .

अंतरिक्ष पाण्याचे चार प्रकार आहेत . ते असे -धारजल , कारजल , तौशारजल व हैमजल . त्यापैकी धारजल हे श्रेष्ठ आहे . कारण ते फार हलके असते . त्या धारजलाचे आणखी दोन भेद आहेत . एक गांग व दुसरा सामुद्र . त्यापैकी गांगसंज्ञक जे अंतरिक्षजल ते प्रायः आश्विन महिन्यातील पावसाचे पाणी होय . त्या गांग व समुद्र पाण्याची परीक्षा करावी ती अशी - एका चांदीच्या भांड्यात ताजा साळीचा भात घासभर ठेऊन ते भांडे पाऊस पडत असता त्या पावसात ठेवावे . त्यात पावसाचे पाणी पडल्यावर एक मुहूर्तपर्यंत (दोन घटकांपर्यंत ) ते भांडे तसे ठेवावे . दोन घटिकांनी त्या भांड्यातील भाताच्या रंगात काही एक फरक न होता तो जसाच्या तसा राहिला तर त्या पावसाचे पाणी ‘‘गांग ’’ समजावे आणि त्या भाताचा रंग बदलला व शिते बुळबुळीत झाली तर ते पाणी ‘‘सामुद्र ’’ आहे असे समजावे . ते पिण्यास देऊ नये असे आहे , तथापि आश्विन महिन्यातील पावसाचे पाणी जरी सामुद्र असले तरी ते घेण्यास हरकत नाही . ते ‘‘गांग ’’ जलाप्रमाणेच गुण करिते . तथापि सर्व पावसाच्या पाण्यात ‘‘गांग ’’ पाणीच श्रेष्ठ आहे . ते आश्विन महिन्यात धरून साठवून ठेवावे . पांढरे शुभ्र व स्वच्छ असे वस्त्र पावसात (दांडीवर वगैरे लोंबत ) ठेवावे व त्याच्या शेवटाकडून गळणारे पाणी भांड्यात धरावे . अथवा वाड्याच्या अगर घराच्या (चुन्याने तयार केलेल्या अगर दगडाच्या फरशीच्या ) गच्चीवरील स्वच्छ पाणी धरून ठेवावे किंवा मातीच्या वगैरे स्वच्छ भांड्यात धरून ते सोन्याच्या , चांदीच्या अगर मातीच्या भांड्यांत साठवून ठेवावे . ते कोणत्याही काळात उपयोगात आणावे . ते न मिळाल्यास मग जमिनीवरील पाणी घ्यावे . पण ते आकाशतत्त्वाचे गुण अधिक असलेले असे अव्यक्तरसाचे घ्यावे . जमिनीवरील पाण्याचे सात प्रकार आहेत ते असे कोष -(विहिरीचे ), नादेय (नदीचे ), सारस (सरोवराचे ), ताडाग (तळ्य़ाचे ), प्रास्त्रवण (झर्‍याचे ), औभ्दिद - (खडकाच्या भोकांतून कारंज्याप्रमाणे वर उसळून खाली पडणारे ) व चौंड (न बांधलेल्या विहिरीचे ) ह्याप्रमाणे ‘‘भौजमल ’’ सात प्रकारचे आहे .

वर्षाऋतूत अंतरिक्ष किंवा औभ्दिद पाणी प्यावे . (स्नानादिकासही तेच वापरावे .) ; कारण ते अत्यंत गुणकारक असते . शरद्ऋतूत नदी , तलाव वगैरे सर्वच जलाशयातील पाणी स्वच्छ व निर्दोष असते त्यामुळे ह्या ऋतूत कुठलेही पाणी स्नानपानादिकात घेण्यास हरकत नाही . हेमंतऋतूत सरोवराचे अगर तलावाचे पाणी स्नानपानादिकात घ्यावे . वसंतऋतूत कू पाचे (ज्या विहिरीला पायर्‍या नाहीत अशा बांधीव विहिरीचे ) म्हणजे आडाचे किंवा डोंगरांतून वगैरे पाझरणार्‍या झर्‍याचे पाणी पिण्यास वगैरे घ्यावे . ग्रीष्मऋतूतही आडाचे किंवा झर्‍याचेच पाणी स्नानपानादिकात घ्यावे . प्रावृषऋृतूत (आषाढ -श्रावण महिन्यात ) चौडीचे (न बांधलेल्या विहिरीचे ) व पावसाच्या नव्या पाण्याशिवाय इतर सर्व जुने पाणी प्यावे ॥३ -८॥

दूषितजल लक्षण

कीटकादिकांचे मलमूत्र , त्यांची अंडी , त्यांची मृत शरीरे पाण्यात पडून कुजून त्या योगाने दूषित झालेले पाणी , गवत , झाडाची पाने पडून ती कुजल्यामुळे दूषित झालेले पाणी , किंवा काही निमित्ताने विपारी झालेले पाणी अशा प्रकारच्या कोणत्याही पाण्यात आंघोळ केली असता किंवा ते पाण्यात आले असता , तसेच वर्षाऋतूतील नवे पाणी स्नानपानादि उपयोगात आणले असता त्या मनुष्याला खरूज , कंडु इत्यादि त्वचेचे बाह्य़रोग व कोठ्यासंबंधी यकृत उदरादि होणारे अभ्यंतर रोग ताबडतोब होतात ॥९ -१०॥

चिखल (गाळ ), शेवाळ , (अंतर गंगेप्रमाणे केवळ पाण्यात येणारे एक जातीचे गवत ), कमळाची पाने , वगैरे वनस्पतीसमूहाने नेहमी झाकून गेलेले , सूर्यचंद्र ह्याचा ज्याला कधी स्पर्शही नाही असे , ज्याला कसलातरी चमत्कारिक वास येतो (किंवा दुर्गंध येतो ), ज्याला काही तरी एक प्रकारचा रंग आहे व आंबट , खारट अशी रुचीहि आहे असे पाणी दूषित (बिघडलेले ) म्हणून समजावे . अशा पाण्यात स्पर्श , रूप , रस , गंध , वीर्य व विपाकजन्य दोष असे सहा दोष असतात . ते असे -अंगाला स्पर्श सहन न होणे (खरखरीत लावणे ), बुळबुळितपणा , पाणी ऊन लागणे , किंवा अति गार असल्यामुळे तोंडात घेताच दांतातून कळा येणे हे दूषित पाण्याचे स्पर्शजन्य दोष आहेत . पाण्यात गाळ व रेती मिसळ असणे , पाण्यात शेवाळ असणे व पाण्याला निरनिराळे अनेक रंग असणे हे पाण्याचे रूपदोष आहेत . पाण्याला खारट , तुरट अशी काहीतरी चव लागणे हा पाण्याचा रसदोष आहे . पाण्याला दुर्गंधी येणे हा पाण्याचा गंधदोष आहे . जे पाणी उपयोगात आणिले असता तहान , जडत्व , पोटात दुखणे , व मळमळणे इत्यादि विकार करिते तो त्या पाण्याचा वीर्यदोष समजावा . जे पाणी प्याले असता पचण्याला फारच जड जाते किंवा मलमूत्रादिकांचा अवरोध करिते , तो त्या पाण्याचा विपाकदोष समजावा . हे जे पाण्याचे सहा दोष सांगितले ते अंतरिक्षजलात (आश्विनमासातील पावसाच्या पाण्यात ) नसतात .

दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी ते अग्नीच्या उष्णतेने कढवावे . किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात ) सकडून तापवावे . तापवून लाल केलेला लोखंडाचा गोळा , तापवून लाल केलेली स्वच्छ वाळू किंवा तापवून लाल केलेले मातीचे ढेकूळ (पक्क्या विटेचा तुकडा ) ह्यापैकी कोणतेही एक पाण्यात बुडवावे . नंतर त्या पाण्याला चांगला वास येण्याकरिता नागचाफा , सुवासिक कमळ , गुलाब (पाटला ) वगैरे वनस्पतीची सुवासिक फुले त्या पाण्यात टाकून ते सुवासिक करावे ॥११ -१२॥

सुवासिक फुलांच्या वासानी सुगंधित केलेले पाणी सोन्याच्या , चांदीच्या , तांब्याच्या , कांशाचा , काचेच्या किंवा मातीच्या भांड्यांतून प्यावे .

दूषित पाणी व आश्विनमासाव्यतिरिक्त किंवा अकाली पडणारे पावसाचे पाणी (अनर्तव ) असे दोनही प्रकारचे पाणी केव्हाही उपयोगात आणू नये ; कारण ते दोष (रोग ) उत्पन्न करणारे व अपथ्यकारक असते . जो कोणी दूषित पाणी वर सांगितल्याप्रमाणे अग्निसंस्कारादिकांनी शुद्ध न करता पितो , त्याला सूज , पांडुरोग , कडु वगैरे त्वचेचे रोग , अपचन , श्वास , खोकला पडसे , पोटशूळ , गुल्म व उदर हे रोग किंवा दुसरेही दोष वैषम्याने होणारे रोग त्वरित उत्पन्न होतात ॥१३ -१६॥

गढूळ पाणी स्वच्छ करणारे सात पदार्थ आहेत . ते असे —— निवळीचे बी , गोमेदमळ , कमळाचे मूळ , वस्त्र , मोती , स्फटिक ह्या सात पदार्थांपैकी कोणत्याही एका पदार्थाने पाणी स्वच्छ होते .

पाणी ठेवण्याचे पाच प्रकार आहेत ते असे -फलक (लाकडाच्या फळीचा पाट , चौरंग वगैरे ), तीन पायाची व वर अष्टपैलू फळी बसविलेली घडवंची , मोळादि गवताची चुंबळ , वेताची किंवा वेळूची विणून केलेली घडवंची (उदकमंचिका ) व शिंके असे पाणी ठेवण्याचे पाच प्रकार आहेत .

पाणी गार करण्याचे सात प्रकार आहेत ते असे —— (१ ) पाणी रुंद तोंडाच्या भांड्यात भरून वार्‍यात ठेवणे , (२ ) पाण्याच्या भांड्य़ावर वस्त्र गुंडाळून ते दुसर्‍या थंड पाण्यात गळ्य़ापर्यंत बुडेल असे ठेवणे , (३ ) पाण्यात काठी फिरविणे , (४ ) पंख्याने वारा घालणे , (५ ) जाड वस्त्रातून गाळून घेणे , (६ ) स्वच्छ व गार अशा वाळूत पाण्याचे भांडे गळ्य़ापर्यंत पुरून ठेवणे . (७ ) आणि पाण्याचे भांडे शिंक्यावर ठेवणे . असे हे पाणी गार करण्याचे सात प्रकार आहेत ॥१७ -१९॥

ज्या पाण्याला कसलाही वास नाही , कोणत्याही रसाची चव नाही , जे प्याले असता तहान शांत होते , तसेच जे पाणी पवित्र म्हणजे अमंगळ मनुष्यादिकांचा स्पर्श न झालेले व शीतल असते , तसेच स्वच्छ हलके व मनाला प्रिय वाटते ते पाणी उत्तम गुणकारक समजावे ॥२०॥

ज्या नद्या पश्चिमसमुद्राकडे वाहात जातात त्यांचे पाणी पथ्यकारक असते . कारण त्या नद्या जांगलदेशातून वाहणार्‍या असल्यामुळे ते हलके असते . पूर्वसमुद्राकडे वाहात जाणार्‍या असल्यामुळे त्यांचे पाणी जड असल्यामुळे पथ्यकारक नसते . दक्षिण दिशेकडे वाहाणार्‍या असल्यामुळे त्यांचे पाणी फारसे दोषकारक नसते . त्यापैकी सह्य़ाद्रिपर्वतापासून निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून कुष्ठरोग होतो . विंध्यपर्वतापासून निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून कुष्ठ व पांडुरोग हे उत्पन्न होतात . मलपर्वतापासून (मलबारातून ) निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून जंत वगैरे कृमीरोग उत्पन्न होतात . महेंद्रपर्वतापासून निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून श्लीपद व उदर हे रोग होतात . हिमालयपर्वतातून निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून हृद्रोग , सूज , शिरोरोग , श्लीपद व गालगुंड हे रोग उत्पन्न होतात . ज्या नद्या उज्जयिनीच्या पूर्वभागातील पर्वतापासून निघतात त्यांच्या पाण्यापासून व उज्जयिनीच्या पश्चिमभागातील पर्वतापासून निघणार्‍या नद्यांच्या पाण्यापासून मुळव्याधरोग उत्पन्न होतो . आणि पारियात्रपर्वतापासून निघणार्‍या नद्यांचे पाणी मात्र पथ्यकारक , आरोग्यकारक व शक्तिवर्धक असते ॥२१॥

ज्या नद्यांचे पाणी स्वच्छ असून अति जोराने वाहाते त्यांचे पाणी हलके असते आणि ज्या नद्यांचा प्रवाह मंद असतो व पाणी गढूळ व शेवाळाने आच्छादित असते त्या नद्यांचे ते पाणी जड असते .

मारवाड देशातील नद्यांचे पाणी बहुतेक कडवट , खारे व मधर असे असते . आणि ते पचनाला हलके असून कामोद्दीपन करणारे व अंगात शक्ती येण्याला हितकारक असे आहे ॥२२ -२३॥

नदी , विहीर , तलाव वगैरे भूमीसंबंधी कोणच्याही जलाशयातील पाणी आणावयाचे झाले तरी ते पहाटेच्या वेळेस (अरुणोदय होताच ) आणावे . कारण त्यावेळेस पाणी स्वच्छ व गार असते आणि स्वच्छता व शीतपणा हा पाण्याचा मुख्य गुण आहे ॥२४॥

ज्या पाण्यावर दिवसा सूर्यकिरण सारखी पडत असतात व रात्री चंद्राचा प्रकाश (चांदणे ) पडत असतो , ते पाणी जर रूक्ष असेल व अभिष्यंदिहि (कफकारक ) असेल तर ते अंतरिक्ष (गांग ) पाण्याच्या बरोबरीच्या गुणाचे असते .

आश्विनमासातील पावसाचे पाणी जर , चांगल्या निर्दोष भांड्यात साठविले असेल तर ते त्रिदोषनाशक , शक्तिवर्धक , रसायनाचे गुण करणारे व बुद्धिवर्धक असते . शिवाय ते जशा प्रकारच्या उत्तम भांड्यात ठेवावे त्या मानाने अधिक गुण करिते . म्हणजे तांब्यापेक्षा चांदीच्या व चांदीपेक्षा सोन्याच्या भांड्यातील पाणी अधिक गुणकारक असते .

चंद्रकांत मण्यातून स्त्रवणारे पाणी राक्षसबाधानाशक , अतिशय थंड , आनंददायक , ज्वर , दाह व विषबाधा ह्यांचा नाश करणारे , पित्तशामक व स्वच्छ असते .

मूर्च्छा , पित्तविकार , उष्णता , दाह , विषबाधा , रक्तदोष मदात्यय , भ्रम (घेरी ), थकवा , तमकश्वास , ओकारी व ऊर्ध्वगामी रक्तपित्त ह्या विकारात प्यावयास थंड पाणी हितकारक आहे .

कुशीतील शूळ , पडसे , वातरोग , गळ्य़ाचा अवरोध (घसा बसणे ), आध्मान , (पोट फुगणे ), कोठ्याची स्तब्धता (कोठ्यात आम साचणे ), वमन किंवा विरेचन औषध कोठा शुद्ध होण्याकरिता घेतले असेल त्या दिवशी नूतन ज्वरात , उचकी येत असता व सनेहपान केले असता थंड पाणी पिऊ नये ,

सर्वसाधारण कोणत्याही नदीचे पाणी वातकारक , रूक्ष , अग्निदीपक हलके व लेखन (मळ वगैरे काढून घेणारे ) आहे .

तेच नदीचे पाणी जड , किंचित् दाट व गोड असेल तर ते अभिष्यंदि (ओलसरपणा उत्पन्न करणारे ) व कफकारक असते .

तेच नदीचे पाणी जड , किंचित् दाट व गोड असले तर ते अभिष्यंदि (ओलसरपणा उत्पन्न करणारे ) व कफकारक असते .

सरोवराचे पाणी तहानेची शांती करणारे , बलकारक , तुरट व मधुर असून हलके असते .

तलावाचे पाणी वातकारक , गोड , किंचित् तुरट व कटु (तिखट ) विपाकी असते .

वापीचे (पुष्करिणि -चोहोकडून बांधलेले व पायर्‍या असलेले लहान तळे ) पाणी वात -कफ -नाशक किंचित खरे तिखट व पित्तकारक असते .

कूप म्हणजे आडाचे पाणी किंचित् खारे , पित्तकारक , कफनाशक अग्निदीपक व हलके असते .

चौडीचे (न बांधलेल्या विहिरीचे ) पाणी अग्निदीपक , रूक्ष व मधुर असून कफाला न वाढविणारे आहे .

झर्‍याचे पाणी कफनाशक , अग्निदीपक , मनाला समाधानकारक व हलके असते .

खडकातून वगैरे वर कारंज्याप्रमाणे उसळून येणारे पाणी मधुर , पित्तनाशक व विदाह (घशाशी जळजळ ) न करणारे असते .

वाळूत झरा करून काढलेले पाणी किंचित खारे , कफनाशक , हलके व अग्निदीपक असते , उघड्या पाटाचे पाणी मधुर , पचनाला जड व दोषकारक असते .

अनुपदेशातील डबक्याचे पाणी पाटाच्या पाण्यासारखेच असून त्याहीपेक्षा दोषकारक असते .

समुद्राचे पाणी दुर्गंधयुक्त , खारट व सर्व प्रकारचे दोष उत्पन्न करणारे असते .

अनूपदेशातील पाणी नानाप्रकारचे दोष (स्पर्शरूपादि ) उत्पन्न करणारे , अभिष्यंदि व उपयोगात (पिण्यास वगैरे ) आणण्यास निंद्य (त्याज्य ) असे असते .

अनुपदेशातील पाण्याचे दोष ज्यात नाहीत असे व उपयोगात आणण्यास पसंत असे जांगल देशातील पाणी असते .

आणि साधारण देशातील पाणी पचनाच्या वेळी विदाह (जळजळ ) न करणारे , तहान शमविणारे , हितकारक , गोड व थंड असे असते .

ऊनपाणी कफ , मेद , वात व आमदोष ह्यांचा नाश करणारे , अग्निदीपक , वस्तिशोधक , श्वास , खोकला व ज्वर ह्यांचा नाश करणारे व सर्वकाळी पथ्यकारक असे आहे .

तापविताना जे पाणी निश्चल (वर न येणारे ) असते , ज्याच्यावर फेस येत नाही , जे निर्मळ असते , ते पाणी आटून चतुर्थांश उरलेले हलके असून अत्यंत गुणकारक असते , रात्री तापविलेले शिळे पाणी शहाण्या वैद्याने केव्हाही कोणासही प्यावयास देऊ नये . कारण ते किंचित आंबट रसयुक्त झालेले असते . त्यामुळे ते कफाला प्रकुपित करिते व तहानही शमवीत नाही .

अतिमद्यपानामुळे झालेल्या रोगात तसेच पित्तजन्य रोगात तापवून गार केलेले पाणी द्यावे .

नारळाचे पाणी स्निग्ध , गोड , थंड , हृद्य , (मनाचे समाधान करणारे ,) अग्निदीपक , वस्तीचे शोधन करणारे , शुक्रवर्धक , पित्त व तहान ह्यांचा नाश करणारे व जड असे आहे .

दाह , अतिसार , रक्तपित्त , मूर्च्छा , अतिमद्यपानापासून होणारे विकार विषबाधा , तहान , ओकारी व भ्रम (घेरी ) ह्या विकारात तापवून गार केलेले पाणी प्यावयास हितकारक आहे .

अरुचि , पडसे , मळमळणे , सूज , क्षय , अग्निमांद्य , उदर , कुष्ठ , ज्वर , नेत्ररोग , व्रण व मधुमेह ह्या विकारांत पाणी फार थोडे प्यावे ॥२५ -४६॥

क्षीर वर्ग

गाय , शेळी , साड (उंटीण ), मेंढी , म्हैस , घोडी , स्त्री व करेणु (हत्तीण ) अशा आठ स्त्रीजातीचे आठ प्रकारचे दूध उपयोगांत आणितात . दूध हे अनेक औषधींच्या रसापासून उत्पन्न होत असल्यामुळे सर्व औषधींचे सत्वरूप , सर्व प्राणीमात्रांचे जीवन , जड गोड , बुळबुळित , थंड , स्निग्ध , स्पर्शाला सुखांवह (श्लक्षण ), सारक , मृदु असे आहे ; म्हणून ते सर्व प्राणीमात्रांना मानवते , असे वैद्यशास्त्रांत सांगितले आहे ॥४७ -४८॥

सर्व प्रकारचे दूध (कोणतेही दूध ) त्या त्या जातीच्या प्राण्यांना जन्मापासून त्याचे सात्म्य (खाण्याची सवय ) असल्यामुळे केव्हाही अहितकारक म्हणून त्याज्य केलेले नाही . (कोणालाही निषिद्ध नाही ). वात , पित्त , रक्त ह्यांच्या विकारात व मानसिक रोगात देखील हे अपथ्यकारक नाही . तसेच जे जीर्णज्वर , खोकला , श्वास , शोष (कोरड ), क्षय , गुल्म , उन्माद , उदर , मूर्च्छा , भ्रम , मदात्यय , दाह , तहान , हृद्रोग , बस्तिसंबंधी विकार , पांडुरोग , संग्रहणी , मूळव्याध , शूळ , उदावर्त , अतिसार , प्रवाहिका , योनिरोग , गर्भाचा स्राव होणे , रक्तपित्त , श्रम व कल्म (ग्लानी ) ह्यांचा नाश करिते . तसेच ते सर्व रोगनाशक (किंवा पापनाशक ), बलकारक , शुक्रवर्धक , वाजीकरण , रसायन , बुद्धिवर्धकमोडलेल्या हाडाला सांधणारे , आस्थापनबस्तिचे उपयोगी पडणारे , तारुण्य कायम राखणारे , आयुष्य वाढविणारे , जीवन (शरीराचे पोषक ), पौष्टिक , वमन , विरेचन व आस्थापनबस्तिप्रयोगात उपयोगी पडणारे आहे . हे ओजाशी समान गुणाचे असल्यामुळे ओजाची वृद्धि करणारे , तसेच लहान मुले , वृद्ध माणसे , व्रणाने किंवा उरःक्षताने क्षीण झालेले , भुकेने व्याकुळ झालेले ,, अति मैथुनाने व अति व्यायामाने कृश (अशक्त ) झालेले , ह्यांना हे अत्यंत हितावह आहे ॥४९॥

गाईचे दूध , किंचित अभिष्यंदि (ओलसरपणा उत्पन्न करणारे ), स्निग्ध , जड , रसायन , रक्तपित्ताचा नाश करणारे , थंड रुचीला गोड , मधुरविपाकी , जीवनीय (जीवनशक्ति उत्पन्न करणारे ) व उत्तम प्रकारचे व वात व पित्तदोषनाशक आहे .

शेळीचे (बकरीचे ) दूध गाईच्या दुधासारखेच गुणाने असून विशेषतः क्षयरोग्याला पथ्यकारक आहे . तसेच ते अगिनदीपक , पचनाला हलके , संग्राही (मळ घट्ट करणारे ), श्वास खोकला व रक्तपित्ताचा नाश करणारे आहे .

शेळ्य़ांच्या शरीराचा बांधा लहान असून त्या नित्य तिखट , कडु अशा वनस्पतींचा आहार करितात . पाणी फार थोडे पितात व हिंडण्याचा व्यायाम जास्त करितात . त्यामुळे त्यांचे दूध सर्व रोगांचा नाश करणारे असते .

उंटणीचे दूध रूक्ष , उष्ण थोडे खारट , मधुर व पचनाला हलके असते . शिवाय ते सूज , गुल्म , उदर , मूळव्याध , कृमी , कुष्ठ व विषबाधा ह्यांचा नाश करिते .

मेंढीचे दूध गोड , स्निग्ध , जड , पित्त व कफ वाढविणारे , केवळ वातविकारात पथ्यकारक आणि वातजन्य खोकल्यालाही हितकारक आहे .

म्हशीचे दूध अत्यंत अभिष्यंदि (स्रोतसांदिकात अतिशय बुळबुळीतपणा उत्पन्न करणारे ) गोड , अग्निमांद्यकारक , निद्राकारक , अतिशय थंड , आणि गाईच्या दुधापेक्षा अतिशय स्निग्ध व जड आहे .

घोडे वगैरे एक खुराच्या जातीच्या स्त्रीजातीचे (घोडीचे , वगैरे ) दूध ऊण , बलकारक , हातपाय ह्यांमधील वाताचा नाश करणारे , मधुर , किंचित आंबट व किंचित् खारट असे असून रुक्ष व हलके असते .

स्त्रियांचे दूध मधुर , किंचित तुरट , थंड , नाकात घालण्यास व डोळ्यातवर शिंपण्यास हितकारक जीवन (प्राणाचे पोषक ), हलके व अग्निदीपक आहे .

हत्तिणीचे दूध गोड , वृष्य (कामोद्दीपक ), किंचित तुरट , जड , स्निग्ध , शरीराला बळकटी आणणारे , थंड डोळ्य़ांना हितावह व शक्तिवर्धक आहे ॥५० -५८॥

कालानुसार दुधाचे गुण

सकाळच्या प्रहरी धार काढलेले दूध बहुतेक पचनाला जड , मलाचा वगैरे अवरोध करणारे व शीतल असे असते . कारण , रात्र ही स्वाभाविकच शीतगुणात्मक असते आणि जनावरांनाही रात्री व्यायाम नसतो , त्यामुळे त्यांच्या शरीराला जे मंदत्व आलेले असते त्यामुळे सकाळचे दूधही तसेच जडत्वादि गुणयुक्त होते ॥५९॥

तिसरे प्रहरी (अपराण्हकाळी ) धार काढलेले दूध -गुरे सकाळपासून रानात हिंडत असल्यामुळे उन्हाने त्यांची अंगे तापतात . हिंडण्याचा व्यायाम होत असतो व रानातील वाराही लागतो . त्यामुळे त्या जनावरांचे तिसरे प्रहरी काढलेले दूध -वाताचे अनुलोमन करणारे , श्रमनाशक व डोळ्य़ाला हितकारक असते .

निरसे दूध अभिष्यंदि (ओलसरपणा आणणारे ) व पचनाला जड असे असते .

तेच तापविले असता अनभिष्यंदि (ओलसरपणा न आणणारे ) व अत्यंत हलके असे असते .

स्त्रियांचे अंगावरील दूध वगळून बाकीची सर्व दुधे तापवून प्यावी , ती पथ्यकारक होतात . आणि स्त्रियांच्या अंगावरील दूध मात्र न तापविलेलेच हितकर असते .

धारोष्ण दूध (धार काढल्याबरोबर ऊन आहे तोपर्यंत घेतलेले दूध ) गुणाने श्रेष्ठ असते आणि धार काढून ते थंड झाल्यावर तितके गुणाने चांगले राहात नाही . धारोष्ण दुधाच्या उलट गुण करिते . (अपाय करिते .)

फार वेळ शिजविलेले दूध थंड झाल्यावर घेतले तर ते पचनाला जड व पौष्टिक असते .

ज्या दुधाला चांगला वास येत नाही , आंबट लागते , ज्याचा वर्ण बदलला आहे ,यय चव नाहीशी झाली आहे , जे खारट लागते किंवा ज्यात (नासल्यामुळे ) गठ्ठे बनले आहेत असे दूध अपायकारक असते . म्हणून ते वर्ज करावे ॥६० -६४॥

दही वर्ग

दही हे गोड , आंबट व अत्यंत आंबट असे तीन प्रकारचे आहे . दही हे किंचित् तुरट , व उष्ण असून पीनस , विषमज्वर (हिवताप ), अतिसार , अरुचि , मूत्रकृच्छ व कृशत्व ह्यांचा नाश करणारे , वृष्य , प्राणाला पोषक (हुषारी आणणारे ) व मंगल - (उत्तम शकुन ) कारक आहे .

कोणतेही दही अत्यंत अभिष्यंदि (ओलसरपणा उत्पन्न करणारे ) आहे . मधुर दही कफदोष व मेद ह्यांना वाढविणारे आहे . आंबट दही कफपित्तकारक आहे . आणि अत्यंत आंबट दही रक्ताला दूषित करणारे आहे .

अर्धवट विरजलेले दही जळजळ करणारे , मलमूत्र साफ करणारे व त्रिदोषकारक आहे .

गाईचे दही स्निग्ध , मधुरविपाकी , अग्निदीपक , बलवर्धक वातनाशक , पवित्र व रुचिदायक आहे .

शेळीचे दही कफपित्तनाशक हलके , वातदोष व क्षय ह्यांचा नाश करणारे , मूळव्याध , श्वास व खोकला ह्या रोगात पथ्यकारक व अग्निदीपक आहे .

म्हशीचे दही पचनकाळी मधुर , वृष्य (कामवर्धक ), वात व पित्तदोष ह्याना निर्दोष करणारे , आणि विशेषतः स्निग्ध व कफाला वाढविणारे आहे .

उटिणीचे दही पचनकाळी तिखट , जड , किंचित् खारट , मलभेदक , वातरोग , मुळव्याध , कुष्ठ , कृमि व उदररोग ह्यांचा नाश करणारे आहे .

मेंढीचे दही कफ , वात व मूळव्याध ह्यांना वाढविते . रुचीला व पचनकाळी मधुर असून अत्यंत अभिष्यंदि व त्रिदोषकारक आहे .

घोडीचे दही अग्निदीपक , डोळ्यांना हितकारक , वाताला वाढविणारे , रूक्ष , तुरट व कफ व मूत्रदोष ह्यांचा नाश करणारे आहे .

स्त्रियांच्या दुधाचे दही स्निग्ध , पचनकाळी मधुर , शक्तिवर्धक , तृप्तिकारक , जड , डोळ्यांना अत्यंत हितावह , त्रिदोषनाशक व गुणाने अत्यंत श्रेष्ठ आहे .

हत्तिणीचे दही पचनाला हलके , कफनाशक , उष्णवीर्य , परिणाम शूळाचा नाश करणारे , किंचित् तुरट व मळ वाढविणारे आहे .

हे जे वर निरनिराळ्या जातीच्या दह्यांचे वर्णन केले आहे त्या सर्व दह्यांत गाईचेच दही गुणांनी श्रेष्ठ आहे असे समजावे .

फडक्यात वगैरे धरून त्यातील सर्व पाणी काढून टाकलेले घट्ट (चक्का ) दही वातनाशक , कफकारक , स्निग्ध , पौष्टिक , पित्ताला फारसे न वाढविणारे व अन्नावर वासना उत्पन्न करणारे आहे .

दूध तापवून त्याचे केलेले दही हे गुणाने फार श्रेष्ठ आहे . तसेच ते वात -पित्त -नाशक , रुचिकारक , शुक्रवर्धक , अग्निदीपक आणि कफ व शुक्र ह्याची वाढ करणारी आहे .

साय काढून घेतलेले दही रुक्ष , ग्राहक (मळाला घट्ट करणारे ), मलमूत्रांचा अवरोध करणारे , वातकारक , अग्निदीपक , पचनाला फार हलके , किंचित् तुरट व रुचिप्रद आहे .

शरदऋतु , ग्रीष्मऋतु , व वसंतऋतु ह्या ऋतून दही खाण बहुधा हितकारक नाही . हेमंतऋतु , शिशिरऋतु ह्या ऋतूत मात्र दही खाणे प्रशस्त आहे . दह्यातील पाणी तहान व थकवा ह्यांचा नाश करिते . ते पचनाला हलके असून स्रोतसांची शुद्धि करणारे आहे . ते आंबट , किंचित् तुरट व मधुर असून कामवासना न वाढविणारे , कफवातनाशक , आनंददायक मनाला आवडणारे व मळाचे त्वरित भेदन करणारे आहे . तसेच ते तात्काळ बल देणारे व अन्न खाण्याविषयी इच्छा उत्पन्न करणारे आहे ॥६५ -८२॥

ह्या दह्याच्या वर्गात गोड दही , आंबट दही , अतिशय आंबट दही , अर्धवट विरजलेले दही - (अधमुरे ), तापविलेल्या दुधाचे दही , सायीचे दही , (किंवा दह्याची साय ), साय काढून घेतलेले दही अशा सात प्रकारच्या दह्यांचे गुण सांगितले आहेत आणि त्याचप्रमाणे दह्यातील पाण्याचेही गुण सांगितले आहे ॥८३॥ .

तक्रवर्ग

ताक मधुर , आंबट , किंचित् तुरट , उष्णवीर्य , पचनाला हलके , रूक्ष , अग्निदीपक , कृत्रिमविष (गर ) सूज , अतिसार , संग्रहणी , पांडुरोग , मूळव्याध , पांथरी गुल्म , अरुची , विषमज्वर , तहान , ओकारी , मळमळणे (तोंडातून लाळ गळणे ), शळ , मेद , कफदोष व वात ह्यांचा नाश करणारे पचनकाळी मधुर , मनाला आवडणारे , मूत्र्रकृच्छनाशक व स्नेहपानाच्या अतियोगाने होणार्‍या रोगांचा नाश करणारे व कामवासना न करणारे आहे ॥८४॥

साईसकट दह्यात अर्धे पाणी घालून रवीने घुसळून लोणी काढून घेतलेले व फार दाट किंवा पातळ नाही असे जे करितात त्याला ताक असे म्हणतात . ते आंबट मधुर व किंचित् तुरट असते . पाणी न घालता व लोणी न काढता नुसते दही घुसळून सारखे करितात त्याला ‘‘घोल ’’ असे म्हणतात .

व्रणाच्या अगर उरःक्षताच्या रोग्याला ताक खाण्यास देऊ नये . उन्हाळ्यात ताक देऊ नये . अशक्त मनुष्य , मूर्च्छा , भ्रम (घेरी ) दाह ह्या रोगाचे आजारी व रक्तपित्ताचा रोगी ह्यांना ताक खाण्यास देऊ नये .

हिवाळ्यात अग्निमांद्याच्या रोग्यास , कफजन्य सर्व रोगात , मलमूत्रादिकांचा व स्रोतसांचा अवरोध असता व वातविकारात ताक खाणे हितकारक आहे .

ताजे गोड ताक कफाचा प्रकोप करणारे व पित्तशामक असते आणि तेच आंबट झाले तर वातनाशक व पित्तकारक होते .

वातविकारात आंबट ताक , सैंधव (अगर मीठ ) घालून द्यावे . पित्तविकारात गोड ताक साखर घालून द्यावे आणि कफविकारातही ताक सुंठ , मिरे , पिंपळी व जवखार ह्यांचे चूर्ण घालून द्यावे .

तक्रकूर्चिका (चिकाच्या दुधात चतुर्थांश ताक मिसळून खरवस करितात ती ) मळाला घट्ट करणारी , वातकारक , रूक्ष व पचण्यास अतिशय जड आहे .

दही व ताक ह्यांची कूर्चिका केल्यानंतर (म्हणजे दह्यातील व ताकातील धनांश वेगळा काढणे ती कूर्चिका ) त्यातील जो द्रवांश राहतो तो मंड . तो ताकापेक्षाही पचनाला हलका असतो .

किलाट (दूध नासले म्हणजे त्यातील द्रवांश वेगळा व धनांश घट्ट होऊन वेगळा होतो , त्यापैकी जो घनभाग त्याला ‘‘किलाट ’’ म्हणतात .) हा पचनाला जड , वातनाशक , पुरुषत्व व निद्राकारक आहे .

पीयुष व मोरट . पीयुष म्हणजे गाय , म्हैस वगैरे व्याल्याबरोबर पहिल्या सात दिवसात त्यांचे जे दूध निघते त्याला पीयूष (चीक ) म्हणतात आणि सात दिवसानंतर ते दूध चांगले स्वच्छ होईपर्यंत त्याला मोरट (कावळे दूध ) असे म्हणतात . हा पीयूष व मोरट हे किलाटाप्रमाणेच गुणाने असून मधुर (गोड ), पौष्टिक व कामोद्दीपक असतात ॥८५ -९१॥

ताजे लोणी पचनाला हलके , शरीराची त्वचा नानुक करणारे , गोड , तुरट , किंचित् आंबट , थंड , बुद्धिवर्धक , अग्निदीपक , मनाला प्रिय , मळ घट्ट करणारे , पित्त व वातनाशक , कामोद्दीपक , जळजळ न करणारे , क्षय , खोकला , व्रण , तोंडाची कोरड , मुळव्याध व अर्दितवात ह्यांचा नाश करणारे आहे . शिळे लोणी जड , कफदोष व मेद ह्यांना वाढविणारे , शक्तिवर्धक , पौष्टिक , शोषनाशक आणि ते विशेषेकरून लहान मुलांना खाण्यास प्रशस्त आहे .

दुधावरील काढलेले अतिशय स्निग्ध , गोड , अतिशय थंड शरीराला नाजुकपणा आणणारे , डोळ्यांना हितावह , मळ , घट्ट करणारे , रक्तपित्त व नेत्ररोगनाशक , अंगाची कांती उज्जवल करणारे असे आहे .

दुधावरील साय वातनाशक , तृप्तिदायक , बलकारक , कामोद्दीपक , स्निग्ध , रुचिकारक गोड विपाककाळी मधुर , रक्तपित्तासंबंधी दोष नाहीसे करणारी व जड आहे ॥९२ -९४॥

दही वगैरे दुधाचे केलेले निरनिराळे पदार्थ हे गाईच्याच दुधाचे श्रेष्ठ म्हणून सांगितले आहे , म्हणून वरील वर्णन गाईच्याच दही , ताक वगैरे पदार्थाचे समजावे . इतरांच्या दह्याचे , ताकांचे वगैरे गुण त्या त्या जनावरादिकांच्या दुधाच्या गुणावरून जाणावे ॥९५॥

धृतवर्ग

तूप हे सामान्यतः मधुर , सौम्य , मृदु , थंडवीर्य , किंचित् अभिष्यंदि , स्निग्धपणा देणारे , उदावर्त , उन्माद , अपस्मार , (फेपरे ), शूल , ज्वर , आनाह , आणि वातपित्तविकार ह्यांचे शमन करणारे , अग्निदीपक , स्मरणशक्ति , बुद्धि धारणाशक्ति , अंगकांति , स्वर , सौंदर्य , नाजुकपणा , ओज , तेज व शक्ति ह्यांना वाढविणारे , आयुष्यदायक , कामोद्दीपक , पवित्र , तारुण्य कायम राखणारे , जड , डोळ्यांना हितकारक , कफाला वाढविणारे , पाप व दारिद्र्य़ दूर करणारे , विषनाशक व राक्षसादिकांची बांधा दूर करणारे आहे ॥९६॥

गाईचे तूप विपाककाळी मधुर , थंड , वातपित्त व विषदोषनाशक , डोळ्य़ांना फारच हितकारक , शक्तिवर्धक , आणि गुणाने अत्यंत श्रेष्ठ असे आहे . शेळीचे

तूप अग्निदीपक , डोळ्यांना हितकारक , बलवर्धक , खोकला , श्वास व क्षय ह्या रोगांत पथ्यकारक व पचनाला हलके आहे .

म्हशीचे तूप मधुर , रक्तपित्तनाशक , पचनाला जड , कफकारक वातपित्तनाशक व अतिथंडवीर्य आहे .

उंटिणीचे तूप विपाककाळी तिखट , सूज , कृमि व विषबाधा ह्यांचा नाश करणारे , अग्निदीपक , कफवातनाशक , आणि कुष्ठ , गुल्म व उदररोग ह्यांचा नाश करिते .

मेंढीचे तूप पचनाला हलके , पित्ताला न वाढविणारे आणि कफ , वात , योनिरोग , शोष व कंपवात ह्या रोगांत हितकारक आहे . स्त्रियांच्या दुधाचे तूप डोळ्याला फारच हितकारक , अमृताप्रमाण गुणकारक , शरीर पुष्ट करणारे , अग्निदीपक , पचनाला हलके व विषबाधानाशक आहे .

हत्तिणीचे तूप तुरट , मलमूत्राचा अवरोध करणारे , किंचित् कडु , अग्निदीपक , पचनाला हलके असून कफ , कुष्ठ ,य विषदोष व कृमी ह्यांचा नाश करिते .

दुधाचे लोणी काढून त्याचे केलेले तूप व मळ घट्ट करणारे असून रक्तपित्त , भ्रम , मूर्च्छा ह्यांचा नाश करणारे आणि डोळ्य़ांच्या रोगाला पथ्यकारक आहे .

तुपावरील निवळ (पातळ तूप ) तूप पुष्कळ दिवस ठेविले म्हणजे त्याचा घनभाग कणीदार होऊन खाली राहतो व अगदी पाण्यासारखा निवळ भाग वर असतो तो मंड , मधुर , सारक , योनिशूळ , कानांतील शूळ , डोळ्य़ांचा शूळ व मस्तकशूळ ह्यांचा नाश करितो . आणि तो बस्तिकर्मात , नाकात घालण्यात , व डोळ्यावर घालण्यास प्रशस्त आहे म्हणून सांगितले आहे .

दहा वर्षांचे जुने तूप सारक , विपाककाळी तिखट , त्रिदोषनाशक , मूर्च्छा , मदात्यय , उन्मत्त वायु , उदर , ज्वर , गर (कृत्रिम विप ) शोष फेपरे , योनिशूळ , कानातील ठणका , डोळ्य़ाचा ठणका व मस्तकशूळ ह्यांचा नाश करिते व अग्नि प्रदीप्त करते . हेही बस्तीकर्मात , नाकांत घालण्यास व डोळ्यावर घालण्यास योग्य म्हणून सांगितले आहे ॥९७ -१०७॥

जुने तूप तिमिर (अंधत्व ), श्वास , पीनस , ज्वर , कास (खोकला ), मूर्च्छा , कुष्ठ , विष , उन्माद , ग्रहबाधा व अपस्मार (फेफरे ) ह्यांचा नाश करिते .

एकशे अकरा वर्षाचे जुने तूप राक्षसबाधा नाश करणारे आहे . ह्या तुपाला ‘‘कुंभसर्पि ’’ असे म्हणतात . आणि एकशे अकरा वर्षापेक्षाही अधिक जुने जे तूप त्याला ‘‘महाघृत ’’ असे म्हणतात . ज्यांना भूतबाधा (भूतोन्माद ) आहे त्यांनी हे ‘‘महाघृत ’’ नेहमी प्यावे . हे कफाचा नाश करिते . ज्यांना वातविकार आहे , त्यांनीही हे प्यावे . हे शक्तिवर्धक , पवित्र , बुद्धिवर्धक आणि विशेषतः तिमिर (काचबिंदु ), ह्या रोगांचा नाश करिते . हे सर्व प्रकारची भूतबाधानाशक आहे व फार गुणवाह आहे ॥१०८ -१११॥

तलवर्ग

तेल (तिळाचे तेल ) हे अग्नितत्त्वात्मक असून उष्ण , तीक्ष्ण , गोड , मधुरविपाकी , पौष्टिक , तृप्तिदायक , व्यवायी (पचनापूर्वीच सर्व शरीर व्यापणारे ), सूक्ष्म , स्वच्छ , पचनाला जड , सारक , विकासी (स्रोतसे वगैरे मोकळी करणारे ), कामोद्दीपक , त्वचेला सुंदर बनविणारे , स्रोतसांची शुद्धि करणारे , बुद्धिवर्धक , त्वचेला मऊ करणारे , मांसाला कठिणपणा आणणारे , अंगाचा वर्ण चांगला करणारे व शक्तिवर्धक आहे . तसेच नेत्रांना हितकर , मूत्राचा अवरोध करणारे , लेखन (मेदनाशक ), कडु व किंचित् तुरट व्रणशोथाचे पाचन करणारे , वात , कफ , ह्यांचा नाश करणारे , कृमिनाशक , कृशत्व आणणारे , पित्तकारक , योनी , कान व मस्तक ह्या ठिकाणचा शूळनाशक , गर्भाशयाचे शोधन करणारे आहे . तसेच ते मोडलेले , फुटलेले , भोसकलेले , चुरलेले , स्थान सोडून खाली आलेले , जागच्याजागी हालणारे , व्रण पडलेले (उरःक्षत वगैरे ), पिचलेले , सांधा तुटलेले , अशा प्रकारचे व्रण (जखमा ), तसेच फुटलेले , क्षार किंवा अग्निकर्म ह्यांच्या योगाने जखम झालेला , सांधा निखळलेले , फाडलेले , आघात होऊन चेचलेले , वेडेवाकडे मोडलेले , चित्ता , वाघ वगैरेंनी लचका तोडलेले , इत्यादि अनेक प्रकारचे जे व्रण त्यांच्या ठिकाणी वर शिंपण्याच्या कामी , वर लावण्याच्या कामी व त्या त्या भागाला बुडवून ठेवण्याच्या कामी तिळाचे तेल फार प्रशस्त आहे .

तिळाचे तेल बस्तिकर्मात , पिण्याकरिता , नाकात घालण्याकरिता , कानात व डोळ्य़ात घालण्याकरिता अन्नपानादिकातही वाताचे शमन होण्याकरिता उपयोगात आणावे .

एरंडतेल तेल गोड , ऊष्ण , तीक्ष्ण , अग्निदीपक , किंचित् तिखट व तुरट सूक्ष्म , स्रोतसांची शुद्धि करणारे , त्वचेला हितकारक , कामवर्धक , मधुरविपाकी तारुण्य कायम राखणारे , योनिमार्गाचे व शुक्राचे शोधन करणारे , आरोग्यदायक , बुद्धि , कांति , स्मरणशक्ति व शरीरसामर्थ्य ह्यांना वाढविणारे , वातकफनाशक आणि विरेचनाने निघणारे दोषनाशक आहे .

कडुनिंबाचे बी , जवस , करडई , मुळ्य़ाचे बी , देवडांगरीचे बी , कुड्याचे बी , कडुदोडक्याचे बी , रुईचे बी , कापलेचे बी , हस्तिकर्ण (भूपलाश ) ह्यांचे बी , (कित्येक हस्तिकर्ण म्हणजे तांबडा एरंड असे म्हणतात ), काळे जिरे पिलू (किंकण चे बी ) करंजाचे बी हिंगण्याचे बी शेवग्याचे बी , शिरस (सर्षप -सरसो ), सूर्य फुलाचे बी , वावडिंगातील बी , करड कांगोणीचे बी , ह्या सर्वाची तेले सामान्यतः तीक्ष्ण , हलकी , ऊष्णवीर्य , तिखट , विपाकी , सारक , आणि वात , कफ , कृमि , कुष्ठ , प्रमेह व शिरोरोगनाशक आहेत ॥११२ -११५॥

त्यापैकी जवसाचे तेल वातनाशक , गोड , बलनाशक , विपाककाळी तिखट , डोळ्य़ांना अपथ्यकारक , स्निग्ध , ऊष्ण , जड व पित्तकारक आहे .

शिरसाचे तेल कृमिनाशक , कडु व कुष्ठनाशक , हलके , कफ , मेद व वात ह्यांचा नाश करणारे , लेखन , तिखट व अग्निदीपक आहे .

हिंगण्याच्या बियाचे तेल कृमिनाशक , किंचित् कडु , हलके , कुष्ठरोग व कृमी ह्यांचा नाश करणारे आणि दृष्टीचा , शुक्राचा व शक्तिचा नाश करणारे आहे .

करड्याचे तेल तिखटविपाकी व सर्व दोषांना (तीनही दोघांना ) वाढविणारे आहे . शिवाय ते विदाहकारक असून , रक्तपित्तकारक , तीष्ण व डोळ्य़ांना अपथ्यकारक आहे ॥१२० -१३०॥

काडेचिराईत , तिवस , बेहडे , नारळ , बोर , अक्रोड , जीवंती ; चारोळी , कांचन , सूर्यफुलाची वेल , तवसे (काकडी भेद ), वाळुक , काकडी व कोहाळा वगैरे वनस्पतींच्या बियांची तेले मधुर , मधुरविपाकी , वात्तपित्तशामक , शीतवीर्य , अभिष्यंदि , मूत्र साफ करणारी व अग्निमांद्यकारक आहेत .

मोहाची झाडे . शिवण व पळस ह्यांच्या बियांची तेले ,य गोड , किंचित् तुरट व कफपित्तनाशक आहेत .

तुवरक (ह्यांची झाडे पश्चिमसमुद्रकिनार्‍याला असतात व फळे वाटाण्याएवढी येतात ) व बिब्बे , ह्यांची तेले ऊष्ण , मधुर , तुरट व किंचित् कडु असून वात , कफ , कुष्ठ , मेद , प्रमेह , कृमी ह्यांचा नाश करणारी आणि वमन व विरेचन ह्या दोनीही मार्गानी दोष काढून टाकणारी आहेत .

सुरूचे झाड , देवदार , नद्याभ्र (गंडीर ), शिसवी , अगर , ह्या वनस्पतीच्या खोडांतून तेल असते . ती तेले तिखट , कडु व तुरट असतात . ती व्रणाचे शोधन करितात . आणि कृमि , कफ , कुष्ठ , व वातनाशक असतात .

कडु भोपळा , कोशिंबा , दांती , घरधारा , शिकेकाई , नीळ , कपिला व सांखवेल ह्यांची तेले तिखट , कडु व तुरट असतात . तशीच ती विरेचनाने कोठ्याचे शोधन करितात .

कृमि , कफ , कुष्ठ व वात ह्यांचा नाश करितात आणि व्रण शोधन करितात .

सांखवेलीचे तेल सर्व दोषांचे शमन करणारे , किंचित् कडु , अग्निदीपक , लेखन , बुद्धिवर्धक , पथ्यकारक व रसायनाचे गुण करणारे आहे .

पहाडीचा वेल (पहाडमूळ घेतात ) किंवा निशोत्तर ह्याचे तेल मधुर , अतिथंड , पित्तनाशक वाताचा प्रकोप करणारे व कफ वाढविणारे आहे . (जज्झटाच्या मताने ‘‘एकैषिका ’’ म्हणजे निशोत्तरच असे आहे .)

आंब्याचे तेल किंचित् कडु अतिशय सुगंधी , वातकफनाशक , रूक्ष , गोड व तुरट . आंब्याच्या रसाप्रमाणेच अतिपित्तकारक नाही असे आहे . (हे आंब्याचे तेल म्हणजे आंबा देठापासून तोडला असता त्यापासून निघते ते तेल असे गयदासाचे मत आहे . पण इतरांच्या मताने ते आंब्याच्या आतील बीचे (कोईचे ) असे आहे .)

फळापासून निघणारी जी तेले येथे सांगितली आहेत त्यांचे गुण व कार्य ह्याचे थोडक्यात वर्णन सांगितलेच आहे . बाकी राहिलेल्या फळापासून निघणार्‍या तेलाचे गुण त्या त्या फळांच्या गुणांवरून व कर्मावरून जाणावे .

ह्या तैलवर्णात संक्षेपतः जेवढे म्हणून ‘‘स्थावर स्नेह ’’ सांगितले आहेत तेवढे सामान्यतः तिळाच्या तेलासारखेच गुणाने आहेत असे समजावे आणि ते सर्वही ‘‘स्नेह ’’ (तेले ) वातनाशक आहेत .

तुवरक (ह्यांची झाडे पश्चिमसमुद्रकिनार्‍याला असतात व फळे वाटाण्याएवढी येतात ) व बिब्बे , ह्यांची तेले ऊष्ण , मधुर , तुरट व किंचित् कडु असून वात , कफ , कुष्ठ , मेद , प्रमेह , कृमी ह्यांचा नाश करणारी आणि वमन व विरेचन ह्या दोनीही मार्गानी दोष काढून टाकणारी आहेत .

सुरूचे झाड , देवदार , नद्याभ्र (गंडीर ), शिसवी , अगर , ह्या वनस्पतीच्या खोडातून तेल असते . ती तेल तिखट , कडु व तुरट असतात . ती व्रणाचे शोधन करितात . आणि कृमि , कफ , व वातनाशक असतात .

कडु भोपळा , कोशिंबा , दांती , घरधारा , शिकेकाई , नीळ , कपिला व सांखवेल ह्यांची तेले तिखट , कडु व तुरट असतात . तशीच ती विरेचनाने कोठ्याचे शोधन करितात .

कृमि , कफ , कुष्ठ व वात ह्यांचा नाश करितात आणि व्रण शोधन करितात .

सांखवेलीचे तेल सर्व दोषांचे शमन करणारे , किंचित् कडु , अग्निदीपक , लेखन , बुद्धिवर्धक , पथ्यकारक व रसायनाचे गुण करणारे आहे .

पहाडीचा वेल (पहाडमूळ घेतात ) किंवा निशोत्तर ह्याचे तेल मधुर , अतिथंड , पित्तनाशक , वाताचा प्रकोप करणारे व कफ वाढविणारे आहे . (जेज्झटाच्या मताने ‘‘एकैषिका ’’ म्हणजे निशोत्तरच असे आहे .)

आंब्याचे तेल किंचित् कडु , अतिशय सुगंधी , वातकफनाशक , रूक्ष , गोड व तुरट . आंब्याच्या रसाप्रमाणेच अतिपित्तकारक नाही असे आहे . (हे आंब्याचे तेल म्हणजे आंबा देठापासून तोडला असता त्यापासून निघते ते तेल असे गयदासाचे मत आहे . पण इतरांच्या मताने ते आंब्याच्या आतील बीचे (कोईचे ) असे आहे .)

फळापासून निघणारे जी तेले येथे सांगितली आहेत त्यांचे गुण व कार्य ह्याचे थोडक्यात वर्णन सांगितलेच आहे . बाकी राहिलेल्या फळापासून निघणार्‍या तेलाचे गुण त्या त्या फळांच्या गुणांवरून व कर्मावरून जाणावे .

ह्या तैलवर्णात संक्षेपतः जेवढे म्हणून ‘‘स्थावर स्नेह ’’ सांगितले आहेत तेवढे सामान्यतः तिळाच्या तेलासारखेच गुणाने आहेत असे समजावे . आणि ते सर्वही ‘‘स्नेह ’’ (तेल ) वातनाशक आहेत .

सर्व प्रकारच्या तेलात तिळाचे तेल हे गुणकर्माने श्रेष्ठ आहे . ‘‘तिल ’’ ह्या द्रव्यापासून ते निघते म्हणून त्याला तैल (तेल ) असे म्हणतात . आणि बाकीची ही इतर सर्व पदार्थांची तेले तिळाच्याच तेलासारखी गुणाने असल्याने व स्वरुपानेही तशीच असल्याने त्यांनाही तेल म्हणण्याचाच प्रघात पडला आहे ॥१२० -१३०॥

ग्राम्य पशु , अनुपदेशांतील व जलचर प्राणी ह्याची वसा (चरबी ), मेद (मांदे ) व मज्जा हे स्नेह पचनाला जड , ऊष्ण , मधुर , व वातनाशक आहेत . जांगलदेशातील जनावरे , एक खुराची जनावरे व मांसभक्षक वाघ वगैरे हिंसक पशु इत्यादिकांचे चरबी , मांदे व मज्जा हे स्नेह पचनाला हलके थंड व रक्तपित्तनाशक आहेत . प्रतुद (टोचून भक्ष्य खाणारे ), विष्कीर (पायाने उकरून भक्ष्य मिळविणारे ) ह्यांची चरबी , मांदे व मज्जा वगैरे स्नेह कफनाशक आहेत .

तूप , तल , वसा , मेद व मज्जा हे पाच स्नेह तुपापेक्षा तेल अशा क्रमाने उत्तरोत्तर गुणाने पचनाला जड व वातनाशक ह्या गुणांनी अधिक आहेत ॥१३१॥

मधुवर्ग

मध हा सामान्यतः मधुर , किंचित तुरट , रूक्ष शीत , अग्निदीपक , शरीराचा वर्ण चांगला करणारा , पचनाला हलका , त्वचेला नाजुक करणारा लेखन , हृद्य (मनाला आवडणारा ), वाजीकरण , मोडलेल्या , हाडाला सांधणारा , व्रणादिकांचे शोधन करणारा , व्रणाला भरून आणणारा , संग्राही , डोळ्य़ांना हितकारक . डोळे , अंगाची त्वचा व कफादि दोष ह्यांना सुव्यवस्थित ठेवणारा , सूक्ष्म स्त्रोतसांतूनही संचार करणारा , आणि पित्त , कफ , मेद प्रमेह उचकी , श्वास खोकला अतिसार ओकारी तहान कृमी व विष ह्यांचा नाश करणारा , आनंददायक व त्रिदोषाचे शमन करणारा आहे . हा आपल्या लघु (हलका ) ह्या गुणाने कफनाशक आहे . चिकटपणा , माधुर्य व तुरट ह्या गुणांनी वातपित्तनाशक आहे ॥१३२॥

‘‘ पुत्तिका ’’ नावाच्या पिंगट वर्णाच्या मोठ्या माशा असतात त्यांनी जमविलेला जो मध त्याला ‘‘ पौत्तिकमध ’’ म्हणतात . भुंग्यासारख्या मोठ्या माशा असतात त्यांनी तयार केलेला तो ‘‘ भ्रामरमध ’’ पिंगट वर्णाच्या लहान माशांनी जमविलेला तो ‘‘ क्षौद्रमध ’’ पिंगट वर्णाच्या मोठ्या माशांनी जमविलेला तो ‘ छात्रमध ’ ; तीक्ष्ण तोंडाच्या पिवळ्य़ा भुंग्यासारख्या माशा असतात त्यांनी साठविलेला ती ‘ आर्ध्यमध ’ कारण त्या माशांचे नाव ‘ अर्ध्य ’ असे आहे . ( हा मध माळव्यात जरत्कारूच्या आश्रमात मोहाच्या झाडाच्या फुलातून गळत असतो .)

कपिल वर्णाचे बारीक किडे वारुळात असतात व तेथेच ते मध साठवितात , त्या मधाला ‘उद्दालक ’ म्हणतात . झाडाच्या डोलीत राहणार्‍या एक जातीच्या मधमाशा आहेत . त्या काही झाडाच्या पानावरील मध जमा करितात तो ; पान म्हणजे दल किंवा त्या माशांनाही ‘दल ’ अशी संज्ञा आहे . म्हणून ह्या मधाला ‘दालमध ’ असे म्हणतात . ह्याप्रमाणे ह्या मधाच्या आठ जाती आहेत ॥१३३॥

‘ पौत्तिकमध ’ हा विषारी तोंडाच्या माशापासून उत्पन्न होत असल्यामुळे विशेषतः रूक्ष , ऊष्ण , वात , रक्त व पित्त ह्यांना वाढविणारा , कफाला तोडून काढणारा , विदाही व मद उत्पन्न करणारा आहे . चिकट व अतिशय गोड असल्याने ‘ भ्रामरमध ’ फार जड असतो . ‘ क्षौद्र ’ नावाचा मध विशेषतः थंड , हलका व लेखन आहे . ‘ माक्षिकमध ’ क्षौद्रमधापेक्षा अतिशय थंड व रूक्ष असून गुणाने श्रेष्ठ आहे . ‘ अर्ध्यमध ’ डोळ्य़ांना फारच हितावह , कफपित्तनाश करण्याला फार चांगला , तुरट , विपाककाळी तिखट , शक्तिवर्धक , किंचित कडू व वाताला न वाढविणारा आहे . ‘ औद्दालक ’ मध रुचिकारक , स्वर चांगला करणारा आणि कुष्ठ व विषनाशक आहे . ‘ दालमध ’ तुरट , उष्ण , आंबट , पित्तकारक , तिखटविपाकी , असून ओकारी व प्रमेह , ह्यांचा नाश करणारा आणि रूक्ष आहे .

नवा मध पौष्टिक , कफाचा फारसा नाश न करणारा व सारक आहे आणि जुना मध मेद व स्थूलपणा ह्याचा नाश करणारा , ग्राहक व अतिशय लेखन आहे .

अग्निसंयोगाने पक्व केलेला मध त्रिदोषनाशक असून अपक्व मध आंबट व त्रिदोषकारक आहे . (मधाला अग्निसंस्कार विरूद्ध आहे म्हणून कित्येकांच्या मते पक्वमध म्हणजे पोवळ्य़ात मध तयार होऊन फार दिवस राहिलेला .)

मध हा अनेक औषधीप्रयोगातून योजना करून दिला असता पुष्कळ रोगाचा नाश करितो . मध हा अनेक वनस्पतींपासून तयार होत असल्यामुळे तो अत्यंत योगवाही (ज्या ज्या औषधीयोगातून योजावा त्यासारखे गुण करणारा आहे ॥१३४ -१४२॥

रस , वीर्य , विपाक , वगैरे गुणांनी परस्परविरूद्ध अशा नाना प्रकारच्या वनस्पतींच्या फुलांच्या रसापासून व विषारी मधमाशांपासून उत्पन्न होत असल्यामुळे मधावर उष्ण उपचार उपयोगी नाहीत ॥१४३॥

मध तयार करणार्‍या मधमाशा विषारी असल्यामुळे मधालाही थोडा विषाचा संभव येतो , त्यामुळे कोणत्याही जातीचा मध असो , तो उष्ण पदार्थाशी विरूद्ध आहे . म्हणून उष्ण प्रकृतीच्या किंवा उन्हात अगर विस्तवाच्या धगीने तापलेल्या मनुष्यास उष्ण पदार्थाशी किंवा ऊन पाण्याशी वगेरे मध देऊ नये . तसाच तो उन्हाळ्यात व उन्हाच्या वेळेही देऊ नये . जर कदाचित गैर माहितीने अशा प्रकारे मध थोडा जास्त खाण्यात आला तर तो विषाप्रमाणे मारक होतो .

तसेच मध हा अतिशय सूक्ष्म (सुकुमार ) व थंड असून अनेक औषधींच्या रसापासून तयार होत असल्यामुळे विशेषतः तो उष्ण पदार्थाशी विरूद्ध आहे . त्याचप्रमाणे तो पावसाच्या पाण्याशीही विरूद्ध आहे . (तथापि अर्ध्यजातीचा मध उष्ण पदार्थाशी विरूद्ध नाही .)

वांती होण्याकरिता ऊन (अशा द्रव ) पदार्थांशी मध दिला असता तो वर सांगितल्याप्रमाणे विरूद्ध होत नाही . कारण वमनाचे औषध वांतीबरोबर पडत असल्यामुळे त्याचा

कोठ्यामध्ये पाकही होत नाही व तो कोठ्यात राहतही नाही . (असे आहे तथापि वमन प्रयोगात देखील ऊन पदार्थांशी मध देण्याचा परिपाठ नाही . कारण कदाचित वमनाचे औषध पचन झाले तर अपाय होण्याचा संभव आहे .)

मधाच्या अजीर्णइतके कोणतेही अजीर्ण कष्टप्रद नाही . कारण अजीर्णावर करावे लागणारे उष्ण उपचार मधाला विरूद्ध पडत असल्यामुळे कोणत्याही जातीच्या मधाचे अजीर्ण असले तरी ते विषाप्रमाणे मनुष्याचा नाश करिते ॥१४४ -१४७॥

इक्षुवर्ग

ऊस हे सामान्यतः मधुर , मधुरविपाकी , जड , थंड , स्निग्ध , शक्तिवर्धक , वृष्य (कामवर्धक ), मूत्रल (लघवी जास्त करणारे ), रक्तपित्तनाशक आणि कृमि व कफदोष उत्पन्न करणारे आहेत .

ऊसाच्या पुष्कळ जाती आहेत . त्या अशा -पौंड्रक (मिश्र रंगाचा ). भीरुक , वंशक , श्वेतपोरक , (श्वेतपोरक ), कातर , तापस , काष्ठेक्षु , सुचिपत्रक , नेपाल , दीर्घपत्र , नीलपोर , कोशकृत अशा ह्या ऊसाच्या बारा जाती त्याच्या मोठेपणावरून झाल्या आहेत . आता त्याचे गुण सांगतो .

अतिशय थंड , गोड , स्निग्ध , पौष्टिक , कफकर , सारक , विदाह न करणारा , जड व कामवर्धक , असा पौंड्रक नावाचा ऊस आहे . भीरूक ऊसाचेही असेच गुण आहेत . वंशक ऊस ह्या दोन्ही उसाप्रमाणेच गुणाने असून किंचित खारट आहे . शतपोरक ऊस वंशकाप्रमाणेच गुणाने असून किंचित उष्ण व वातनाशक आहे . ह्याचप्रमाणे काष्टेक्षूचे गुण आहेत . पण तो वाताचा प्रकोप करणारा आहे . सुचिपत्र , नीलपोर , नेपाल व दीर्घपत्रक हे ऊस वातकारक , कफपित्तनाशक , किंचित् तुरट , व विदाहकारक आहेत आणि कोशकार ऊस जड , थंड , आणि रक्तपित्त व क्षय ह्यांचा नाशक आहे .

ऊस बुडख्याकडे अतिशय गोड असतो . मध्यभागी मधुर असतो , आणि शेंड्याकडे व डोळ्य़ांच्या ठिकाणी किंचित् खारट असतो .

दातांनी चाऊन खाल्लेला उसाचा रस विदाह न करणारा . कफकारक , वातपित्तनाशक , मुखशुद्धिकारक व कामवर्धक असा आहे .

घाण्याने काढलेला उसाचा रस पचनाला जड , विदाही व विष्टंभी (वाताचा अवरोध करणारा ) आहे .

शिजविलेला उसाचा रस जड , सारक , स्निग्ध , तीक्ष्ण (तात्काज परिणामकारक ) व कफवातनाशक आहे ॥१४८ -१५८॥

काकवी पचनाला जड , गोड , अभिष्यंदि , पौष्टिक , कामेच्छा न होऊ देणारी , आणि त्रिदोष वाढविणारी आहे .

गूळ किंचित् खारट , मधुर , फार थंड नाही असा , स्निग्ध , मूत्राचे व रक्ताचे शोधन करणारा , फारसा पित्ताला कमी न करणारा , वातनाशक , मेद , कृमि व कफदोष ह्यांना वाढविणारा व कामवासना उत्पन्न करणारा आहे .

शुद्ध (मळ काढून स्वच्छ केलेला ) गूळ पित्तनाशक , गोड , वातनाशक व रक्ताचे शोधन करणारा आहे .

तोच जुना गूळ गुणाने अधिक असून अतिशय पथ्यकारक आहे .

मत्स्यंडिका (साखर तयार करण्याकरिता मळी काढून अतिशय स्वच्छ केलेला गुळाचा राब ) खंड (पिठीसाखर ), शर्करा (खडीसाखर ) ह्या उत्तरोत्तर अति स्वच्छ (निर्मळ ) असल्यामुळे एकापेक्षा दुसरी ह्या क्रमाने थंड , स्निग्ध , अतिजड , अतिगोड , वृष्य (कामवर्धक ), रक्तपित्तनाशक व तहाननाशक आहेत .

हे जे साखरेचे प्रकार सांगितले त्यामध्ये ज्या ज्या मानाने निर्मळपणा अधिक असेल त्या त्या मानाने , त्यांच्यामध्ये गोडी जास्त असते , आणि त्याच मानाने स्निग्धपणा , जडत्व , थंडपणा व सारकपणा हे गुणही अधिक असतात .

मत्स्यंडिका , पिठीसाखर व खडीसाखर हे जिन्नस तयार करताना त्यांतून त्याचा मळरूप जो रस गळतो , त्याचेही गुण त्या मत्स्यंडिका , पिठीसाखर व खडीसाखर ह्यांच्या गुणासारखेच असतात .

केवळ सत्त्वरूपाने तयार झालेली साखर जितकी निर्मळ व क्षाररहित असेल त्या त्या मानाने ती गुणाने जास्त होते असे समजावे .

मधाची साखर ओकारी व अतिसारनाशक , रूक्ष कफाला व मळादिकांना छेदन करणारी , कफादि दोषांना स्वच्छ ठेवणारी , किंचित् तुरट , गोड , मधुर व विपाकी आहे .

धमाशाची साखर गोड , तुरट , किंचित् कडू , कफनाशक व सारक आहे .

जेवढ्या म्हणून साखरेच्या जाती सांगितल्या , त्या सर्व दाह शांत करणार्‍या , रक्तपित्तनाशक आणि ओकारी , मूर्च्छा व तहान ह्यांचा नाश करणार्‍या आहेत .

मोहाच्या फुलांच्या रसाची तयार केलेली काकवी रूक्ष , वातपित्तकारक , कफनाशक , किंचित् तुरट , मधुरविपाकी , आणि वस्तीच्या ठिकाणी दोष उत्पन्न करणारी आहे ॥१५९ -१६९॥

मद्यवर्ग

सर्व जातीचे मद्य पित्तकारक , आंबट , रुचिकर , अग्निदीपक , मलभेदक , कफवातनाशक , मनाला प्रिय , बस्तिशोधक , पचनाला हलके , विदाहकारक , उष्ण , तीक्ष्ण , इंद्रियांना तरतरी आणणारे , विकासी (स्त्रोतसाचे मार्ग खुले करणारे ) आणि मलमूत्र साफ करणारे आहे . आता त्याचे विशेष गुण सांगतो ऐक .

द्रक्षाचे मद्य हे मधुर रसापासून तयार होते व ते विदाही नसल्यामुळे रक्तपित्ताच्या विकारात देण्यास वैद्यांनी निषिद्ध धरले नाही . द्राक्षाचे मद्य मधुर , रूक्ष , किंचित् तुरट , हलके , लवकर पचणारे , सारक आणि शोष व विषमज्वरनाशक आहे .

खजुराचे मद्य द्राक्षाच्या किंचित् गुणाने कमी , वातप्रकोप करणारे , स्वच्छ , रुचिकारक , कफनाशक , चिकटून असलेल्या दोषांना खरडून काढणारे , हलके , किंचित् तुरट व गोड , मनाला प्रिय , सुवासिक व इंद्रियांना प्रसन्नता आणणारे आहे .

सुरा संज्ञक मद्य हे खोकला , मुळव्याध , संग्रहणी , मूत्राघात व वातदोष ह्यांचा नाश करिते . हे स्त्रियांच्या दुधाची वाढ करिते , रक्तदोष व क्षय ह्यांना हितकारक आहे . शिवाय पौष्टिक व अग्निदीपक आहे . (सुरा ही पीठ व किण्व (दारुचा राब ) ह्यापासून बनवितात . त्यामुळे ही दिसण्यात लाल व गढूळ असते .)

श्वेतसुरा ही खोकला , मुळव्याध , संग्रहणी , श्वास , पडसे ह्यांचा नाश करिते . आणि मूत्र , कफ , स्तन्य (अंगावरील दूध ) रक्त व मांस ह्यांना वाढविते . (ही पांढरी वसु तांदुळाचे पीठ व किण्व ह्यापासून करितात .)

प्रसन्ना (मधावरील निवळ ) ही ओकारी , अरुची , हृदय व कुशी ह्यामधील टोचण व शूळ ह्यांचा नाश करिते . तसेच कफ , वात , मुळव्याध , मलमूत्रादिकांचा व स्रोतसांचा अवरोध नाहीसा करिते व आनाहरोगाचा नाश करिते .

सातूपासून केलेली सुरा पित्तकारक , किंचित् कफकर , रूक्ष व वात वाढविणारी आहे . मधूलिका नावाची सुरा मलमूत्राचा अवरोध करणारी , जड , व कफकर , आहे . (मधूलिका ही गव्हाची किंवा मोहाच्या फुलाची बनवितात .)

बेहड्याची सुरा (अक्षिकि ) ही रूक्ष , अति कफ न करणारी , वृप्य (कामवर्धक ) व पाचक आहे .

सातूच्या भाजलेल्या पिठापासून एक सुरा करितात . तिला ‘‘कोहल ’’ म्हणतात . हा रुचीला फार चांगला असून तीनही दोष वाढविणारा , मलाचे भेदन करणारा व कामवासना कमी करणारा आहे .

जगल नावाची सुरा संग्राही , ऊष्ण , पाचक , रूक्ष , आणि तहान , कफ व सूज ह्यांना वाढविणारी आहे . तशीच ती हृद्य (मनाला प्रिय ) आणि प्रवाहिका , पोटात गुडगुडणे , मुळव्याध , वातरोग व शोष ह्यांचा नाश करिते . (जगल ही तांदुळाचा भात व किण्व ह्यापासून बनवितात . डल्लणाच्या मताने मद्याचा खालचा राब जो टाकून देतात तो .)

वक्वस (वरील जगलातील द्रवभाग नाहीसा केला म्हणजे जो घन भाग राहतो तो ) हा निःसत्त्व असल्यामुळे मलादिकांचा अवरोधकारक वातप्रकोप करणारा व अग्निदीपक आहे .

गुळाचा सीधू हा अग्निदीपक , मलमूत्र साफ करणारा , स्वच्छ , किंचित् मदकारक , जड , किंचित् तुरट , गोड , पाचक व अग्निदीपक आहे .

साखरेचा सीधू हा मधूर , रुचिकारक , अग्निदीपक , बस्तिशोधक , वातनाशक , मधुरविपाकी , हृद्य व इंद्रियांना तरतरी आणणारा आहे .

शिजविलेल्या उसाच्या रसाचा सीधूही त्याच्या सारखाच गुणाने असून शक्तिवर्धक , अंगांचा वर्ण चांगला करणारा , सारक , सुजेचा नाशक अग्निदीपक , हृद्य , रुचिकारक ,

आणि कफदोष व मुळव्याध ह्यांना पथ्यकारक आहे .

अपक्व रसाचा सीधू हा दोषांना खरडून काढणारा , सूज व उदरनाशक , अंगाचा वर्ण चांगला करणारा , पाचक , स्वर चांगला करणारा , विबंध (स्रोतसादिकांचा रोध ) नाशक , व मुळव्याधीला पथ्यकारक आहे .

बेहेड्याचा सीधू हा पांडुरोगनाशक , व्रणाला हितकर , मळ घट करणारा , हलका किंचित् तुरट व मधुर पित्तनाशक आणि रक्ताला स्वच्छ करणारा आहे .

जांभळाचा सीधू (शिर्का ) हा मलमूत्राचा अवरोध करणारा , तुरट व वातकारक आहे . (हा जांभळाच्या फळांचा रस , चिरफळांचा काढा , गूळ व धायटीची फुले ह्यांच्या संयोगाने करितात ॥१७० -१८६॥

सुरासव हे तीक्ष्ण , हृद्य , मूत्रल , कफवातनाशक , जिभेला आवडणारे , ज्याचा मद पुष्कळ वेळ टिकतो असे व वातनाशक आहे .

मधाचे आसव हलके , कफाला छेदून काढणारे , प्रमेह , कुष्ठ व विषरोग ह्यांचा नाश करणारे , किंचित् कडु व तुरट , सुजेचा नाश करणारे , तीक्ष्ण , गोड व वात न वाढविणारे आहे .

मैरेय हे तीक्ष्ण , तुरट व मदकारक , मुळव्याध , कफ व गुल्म ह्यांचा नाश करणारे , कृमी , मेद व वातनाशक , मधुर व जड आहे . पीठाची सुरा (दारू ) गुळादिकांचे आसव व मध एकत्र करूनकरितात ते .उसाच्या रसाचे आसव शक्तिवर्धक पित्तनाशक , वर्णकारक व हृद्य असे आहे .

मोहाच्या फुलाचा सीधू विदाही , अग्निदीपक , शक्तिवर्धक , रूक्ष , तुरट , कफनाशक , आणि वातपित्ताचा प्रकोपकारक आहे . (हा मोहाच्या फुलांचा करितात . ह्यांत कोणी गूळ घालतात .)

कंद , मुळे व फळे ह्यांच्या आसवांचे गुण त्या त्या वनस्पतीच्या रसावरून जाणावे .

नवे मद्य अभिष्यंदि जड , वातादि दोषांचा प्रकोप करणारे , दुर्गंधी , बेचव , मनाला न आवडणारे व विदाहकारक आहे . (नवे म्हणजे एक वर्षाच्या आतील .) जुने (एक वर्षानंतरचे ) मद्य सुगंधी , अग्निदीपक , हृद्य (मनाला आवडणारे ), रुचिकारक , कृमिनाशक , स्त्रोतसे मोकळी करणारे , हलके व वातकफनाशक आहे .

अरिष्ट हा द्रव्यांचा संयोग व त्याजवरील संस्कार ह्यांच्या योगाने आसवापेक्षा गुणाने जास्त असतो . हा अनेक दोषांचा नाश करणारा , वातादि दोषांचे शमन करणारा , अग्निदीपक , कफवातनाशक , सारक , पित्ताला न वाढविणारा , शूळ , पोट फुगणे , उदर पांथरी , ज्वर , अजीर्ण व मुळव्याध ह्यांना हितकर आहे .

पिपल्यादि गणांतील द्रव्यांचा केलेले अरिष्ट गुल्म व कफरोगनाशक आहे .

रोगनाशक असे अरिष्ट चिकित्स्थानांत त्या त्या रोगाच्या चिकित्सेत सांगण्यात येईल .

कुशल वैद्याने अरिष्ट , आसव व सीधू ह्यांचे गुण व कार्य त्यांच्या संस्कारानुरूप विचार करून सांगावे .

जे मद्य दाट , विदाहकारक (पिताना घशात दाह करणारे ) ; दुर्गंधी , बेचव , जंतयुक्त , जड , मनाला न आवडणारे , नवे , तीक्ष्ण , उष्ण , वाईट भांड्यांतील , थोड्याच औषधी द्रव्यांनी (घायटीची फुले वगैरेंनी ) तयार केलेले , मद्याच्या घागरीतून काढून दुसर्‍या भांड्यांत रात्रभर ठेवल्यामुळे शिळे झालेले , अतिशय पातळ , बुळबुळीत , आणि भांड्यांतील मद्य संपून तळाला थोडे राहिलेले अशा प्रकारचे मद्य केव्हांही प्यावयास घेऊ नये .

जे मद्य थोड्या द्रव्यापासून बनविले असते ते , नवे , बुळबुळित व जड असते ,ते मद्य कफ वाढविणारे , व पचनाला जड असते .

जे मद्य दाट , तीक्ष्ण व उष्ण असते ते विदाहकारक असून पित्ताला वाढविते .

जे मद्य अति पातळ , दुर्गंधी , जंतुयुक्त असते , ते बेचव व मनाला न आवडणारे असते . ते वाताचा प्रकोप करते .

त्याचप्रमाणे रात्रीचे शिळे मद्यही वातप्रकोपकारक आहे आणि हे वरील सर्व दोष ज्या मद्यामध्ये आहेत ते मद्य वातादि सर्व दोषांचा प्रकोप करिते .

जे मद्य फार दिवसाचे जुने झाल्यामुळे आंबट रसयुक्त झाले आहे ते अग्निदीपक , कफवातनाशक , रुचिकारक , स्वच्छ , सुगंधी असे असते , ते पिण्याला योग्य असून मादक असते ॥१८७ -२०३॥

रस व वीर्य ह्यांच्या योगाने ह्या मद्याचे पुष्कळच प्रकार आहेत . त्यापैकी कोणतेही मद्य प्राशन केले तरी ते जठराग्नीच्या संयोगाने हृदयाचे ठिकाणी येऊन आपल्या वीर्यप्रभावाने धमनीमध्ये शिरून ऊर्ध्व मार्गाने वर मस्तकाकडे जाऊन मन , कान , डोळे वगैरे इंद्रिय यांना आपल्या सूक्ष्म , उष्ण , तीक्ष्ण व विकासी (सांध्याची बंधने शिथील करणे ) ह्या गुणांनी क्षुब्ध करून त्वरित कैफ (मद ) उत्पन्न करिते .

मद्यपान केल्यापासून कफप्रकृतिच्या मनुष्याला उशीराने कफ येतो . वातप्रकृतिच्या मनुष्याला त्याहून लवकर कैफ येतो . आणि पित्तप्रकृतिच्या मनुष्याला फार जलद कैफ येतो .

सात्त्विक गुणप्रधान प्रकृत्तिच्या मनुष्याला मद्याचा कैफ आला असता तो पवित्रपणा , परोपकार , बुद्धि , आनंद व शरीर सुशोभित करण्याविषयीच्या इच्छा दर्शवितो , (अशी त्याला इच्छा होते .) आणि त्याला गायन , अध्ययन , सौभाग्य व रतिक्रीडा ह्या कराव्याशा वाटतात .

रजोगुणप्रधान प्रकृतिच्या मनुष्याला मद्याचा कैफ आला असता तो दुःखी होतो . आत्महत्त्येसारखे साहसकर्म करण्यास प्रवृत्त होतो आणि सतत भांडण करितो .

तामसप्रकृतिच्या मनुष्याला मद्याचा कैफ आला असता अमंगळपणा , झोप , दुसर्‍याचा हेवा करणे , अगम्यागमनाची इच्छा व असत्य भाषण ह्या गोष्टी त्याच्याकडून घडतात .

शुक्त (किंवा चुक्र ) हे रक्तपित्तनाशक , कफाला तोडणारे , खाल्लेले अन्न पचविणारे , हृद्य , कफनाशक व तिखटविपाकी आहे . (एका स्वच्छ भांड्यात दह्याची निवळ , मध , गूळ व कांजी एकत्र करून ते तीन दिवस धान्यात पुरून ठेऊन काढितात . त्याला शुक्त म्हणतात .)

ह्या शुक्तामध्ये वनस्पतीचे कंद वगैरे घालून जे संधान करितात त्यांचे गुणही शुक्ताप्रमाणेच असतात .

गुडशुक्त (गुळाचे ), रसशुक्त (उसाच्या रसाचे ), मधुशुक्त , पूर्वीच्या क्रमाने म्हणजे मधुशुक्ताहून रसशुक्त व रसशुक्ताहून मधुशुक्त अतिशय जड व अभिष्यंदकारक आहेत .

तुषांबु (कांजीचा भेद ) हे अग्निदीपक , हृद्य , हृद्रोग , पांडुरोग , व कृमि ह्यांचे नाशक , संग्रहणी व मुळव्याधनाशक आणि मलभेदक आहे . ‘सौवीरक ’ (हेही कांजीचा भेदच आहे .) हेही गुणाने तसेच आहे . (तुषांबु सारखेच आहे .) धान्याम्ल (कांजी ) हे धान्यापासूनच तयार होत असल्यामुळे जीवनकारक , दाहनाशक , ते अंगास लावल्याने व प्राशन केल्याने वातदोष , कफदोष , व तहान ह्यांचा नाश करिते . तसेच ते हलकेही आहे . ह्याच्या गुळण्या केल्या असता ते आपल्या तीक्ष्ण गुणाने कफाचा नाश करिते .

तोंडाचा बेचवपणा , दुर्गंधिपणा मल , शोष (कोरड ) व थकवा ह्यांचा नाश करिते . हे अग्निदीपक , आमाचे पाचक , मलभेदक , आस्थापन , बस्तिकर्मात हितकारक , आणि समुद्रकाठच्या लोकांना मानवणारे असे आहे ॥२०४ -२१६॥

मूत्रवर्ग

गाय , म्हैस , शेळी , मेंढी , हत्तीण , घोडी , गाढवीण व उंटीण अशा आठ जनावरांची मूत्रे सामान्यतः तीक्ष्ण उष्ण , तिखट कडू , किंचित खारट , हलकी , शोधन करणारी (काठ्यांचे वगैरे ) कफ , वात , कृमि मेद , विष , गुल्म , मूळव्याध , उदर , कुष्ठ , सूज , अरूची व पांडुरोग , नाशक , हृद्य , व अग्निदीपक आहेत .

सर्व मूत्रे तिखट , तीक्ष्ण , उष्ण , किंचित खारट , हलकी कोठ्याची शुद्धि करणारी , कफवातनाशक , कृमि , मेद व विष ह्यांचा नाश करणारी , मूळव्याध , उदर , गुल्म , सूज , अरुचि व पांडुरोगनाशक मलभेदक , हृद्य , अग्निदीपक व पाचक आहेत .

गोमूत्र तिखट , तीक्ष्ण , उष्ण , किंचित् खारट असल्यामुळे वात न वाढविणारे , हलके अग्निदीपक , पवित्र , पित्तकारक , कफवातनाशक आणि शूळ , गुल्म , उदर , आनाह ह्या रोगात देण्यास प्रशस्त , रेच होण्याकरिता व आस्थापन व बस्तिकर्मात योजण्यास उपयोगी आहे . मूत्राने बरे होण्यासारखे जे रोग आहेत त्या सर्व रोगावर गाईचे मूत्र योजावे .

मूळव्याध , उदर , शूल , कुष्ठ , प्रमेह , कोठा शुद्ध नसल्यास त्याच्या शोधनार्थ , आनाह , सूज , गुल्म , व पांडुरोग ह्या विकारात म्हशीचे मूत्र योजावे .

शेळीचे मूत्र खोकला , व श्वासनाशक , सूज , कावीळ व पांडुरोगनाशक , रुचिला तिखट व कडु असून वाताला किंचित् वाढविणारे आहे .

मेंढीचे मूत्र , खोकला , पांथरी , उदर , श्वास , शोष , (क्षय ) व मलावरोध ह्या विकारात पथ्यकारक आहे . हे तिखट , कडु व किंचित् खारट असून उष्ण व वातनाशक आहे .

घोडीचे मूत्र , अग्निदीपक , तिखट , तीक्ष्ण , उष्ण असून वातविकार व उन्माद वगैरे मानसिक विकार ह्यांचा नाश करणारे , कफनाशक आणि कृमि व द्रदु (गजकर्ण ) ह्या रोगांचा नाश करणारे आहे .

हत्तिणीचे मूत्र , किंचित् तिखट , खारट , मलभेदक , वातनाशक , पित्ताचा प्रकोप करणारे व तीक्ष्ण आहे . हे क्षारकर्मात व किलास (तांबडे कोड ) रोगात योजावे .

गाढविणीचे मूत्र गर (कृत्रिम विष ) व मानसिक विकार (फेपरे वगैरे ) ह्यांचा नाश करणारे , तीक्ष्ण , संग्रहणीचा नाश करणारे , अग्निदीपक , कृमिरोग आणि वात व कफनाशक आहे .

उंटीणीचे मूत्र सूज , कुष्ठ , उदर , उन्माद , वातरोग , कृमिरोग व मुळव्याध ह्यांचा नाश करणारे , आणि विषनाशक आहे आणि मनुष्याचे मूत्र हे विषनाशक आहे ॥२१७ -२२८॥

बहुतेक द्रव द्रव्यांचे गुणदोष संक्षेपाने ह्या अध्यायात संागितले आहेत . ते समजून घेऊन देशकालादिकांच्या स्थित्यनुसार त्यांची जो बुद्धिवान् वैद्य योग्य तऱ्हेने योजना करील तो राजालाही औषध देण्यास योग्य होईल ॥२२९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP