मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
क्षारपाकविधि

सूत्रस्थान - क्षारपाकविधि

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय ११ वा

आता " क्षारपाकविधि " नावाचा अध्याय जसा भगवान धन्वंतरींनी सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥

शस्त्रे व अनुषस्त्रे ( म्हणजे शस्त्रकर्मात वापरण्यात येणारी उपकरणे ) ह्यामध्ये " क्षार " हे द्रव्य अत्यंत श्रेष्ठ आहे . कारण क्षाराने छेदन , भेदन व लेखन ही कामे करता येतात . तसेच क्षार हा त्रिदोषनाशक आहे . अतिकष्ट - साध्य रोगात देखील पिण्यासाठी उपयोगात आणला असता कार्य करतो . असा हा विशेष कार्य करणारा आहे ॥३॥

लेप केला असता दूषित त्वचा , मांस वगैरे काढून टाकतो . व्रणादिकांचे व दोषादिकांचे शोधन करितो . ( दुष्ट मांसादिकांना ) घासघासून झिरपून टाकतो . म्हणून त्याला रक्षण करणारा अथवा क्षार असे नाव दिले आहे ॥४॥

क्षार हा अनेक औषधींच्या संयोगाने होत असल्याने त्रिदोषनाशक आहे . हा श्वेतवर्ण असल्यामुळे सौम्य आहे . तथापि दाहकधर्म , पाचक ( व्रणाला ही कार्ये करण्याचे जे सामर्थ्य ते त्यांच्या सौम्यपणाला विरोध करीत नाही . आग्नेय औषधींचे गुण ह्यांत पुष्कळच आहेत . त्यामुळे हा तिखट आहे . तसाच तो तीव्र , उष्ण , पाचन ( अजीर्णादिकांचे पाचन करणारा ), विलयन ( सुजेला कमी करणारा ), व्रणाचे शोधन करणारा , व्रण भरुन आणणारा , व्रणाची लस शोधून घेणारा , स्तंभक ( जखमेतील रक्त वाहणे बंद करणारा ), लेखन ( घासून नष्ट करणारा ) तसेच कृमी , आम , कफ , कुष्ठ , विष व मेद ह्यांचा नाश करणारा पण अतिसेवन केला असता पुरुषत्वाचा नाशक आहे ॥५॥

क्षाराचे दोन प्रकार आहेत . एक प्रतिसारणीय ( लेपाचे उपयोगी ), व दुसरा पानीय ( पिण्याचे उपयोगी ).

त्यापैकी प्रतिसारणीय क्षार - काळे कोड , भगंदर , अर्बुद ( आवाळु ), अर्श ( मूळव्याध ), दुष्णव्रण , नाडीव्रण ( हाड्याव्रण ), चामकीळ , तीलकालक ( तीळ किंवा लासे ), न्यच्छ , व्यंग ( वांग ), मशक ( काळाचट्टा ), बाहेरील करट , कृमी व विषबाधा ह्याजवर लेपाकरिता सांगितला आहे . तसेच उपजिव्हक , अधिजिव्हा , उपकुश , दंतवैदर्भ आणि तीन प्रकारचा रोहिणीरोग ( घशातील गुळुंबे ) ह्या रोगावरहि मुख्यतः क्षाराचीच योजना सांगितली आहे .

पिण्याचा क्षार - गर ( जीर्णवीषबाधा ), गुल्म , उदर , अग्निमांद्य , अजीर्ण , अरुची , पोट डब्ब होणे ( आनाह ), मूत्रशर्करा , अश्मरी ( मुतखडा ), अंतरविद्रधि , कृमी , विषबाधा , मुळव्याध ह्या रोगामध्ये पोटात देतात .

रक्तपित , ज्वर हे विकार असलेले , पित्तप्रकृति , लहान मुले , वृद्ध माणसे अशक्त माणसे , भ्रम ( भोवळ ), महाशय , मूर्च्छा व तिमिररोग हे विकार ज्यांना आहेत त्यांना क्षार पोटात देणे अहितकारक आहे ॥६॥९॥

पानीय क्षारपाक विधि

प्रतिसारणीय क्षार काढण्याच्या पद्धतीने ह्या क्षाराचीही लाकड जाळून राखेत सहापट पाणी घालून तिसरा हिस्सा राखावे व वरील निवळ पाणी काढून घ्यावे . पुनः शिजविणेचे कारण नाही . हा पोटात देण्याची उत्तम मात्रा चार तोळे , मध्यम तीन तोळे व कनिष्ठ मात्रा दोन तोळे समजावी ॥१०॥

प्रतिसारण क्षारपाक विधि

प्रतिसारण क्षाराचे तीन प्रकार आहेत . ते असे - मृदु , मध्यम , तीक्ष्ण . हा क्षार तयार करावयाची रीत - हा क्षार तयार करणाराने शरदऋतूत स्नान वगैरे करुन शुचिर्भूत होऊन शुभ दिवशी पर्वताच्या शिखरावर वस्ती करुन चांगल्या जाग्यावर असलेली , किड्यांनी न खाल्लेली , अगदी लहान नाहीत व फार जीर्णही नाहीत अशी काळ्या फुलाची मोरव्यांची झाडे पाहून , अधिवासन करुन म्हणजे विनंती करुन दुसरे दिवशी उपटून आणावी . नंतर त्याचे तुकडे करुन चेचून वारा नसेल अशा ठिकाणी त्याची रास करुन त्या राशीत चुनखडीचे बारीक बारीक दगड ( खडे ) घालून तिळाच्या कांड्यांच्या अग्नीने पेटवावे . नंतर ते विझल्यावर त्यांची राख व चुनखडीचे खडे वेगवेगळे काढून घ्यावे .

ह्याच वरील पद्धतीने - कुडा ( काळा व पांढरा ), पळस , राळेचा वृक्ष , देवदार अगर पांगारा , बेहडा , बाहवा , लोध्र , रुई , त्रिधारी निवडुंग , आघाडा , पाडळ , करंज , आडुळसा , केळ , चित्रक , घाणेरा , करंज , अर्जुनसादडा , गोकर्णी किंवा उपळसरी , कणेर , सातवीण , टाकळी , चार प्रकारच्या गुंजा व कडु दोडकी ह्या वनस्पती मुळे , फळे , पाने ह्या सर्वांसह उपटून आणून त्यांच्या निरनिराळ्या राशी करुन वरीलप्रमाणे जाळून त्यांची निरनिराळी राख करावी . नंतर मोरव्याची राख दोन भाग व कुडा वगैरे वनस्पती केलेली राख एक भाग ह्याप्रमाणे मिश्र करुन ती मिश्र राख दोन द्रोण ( २०४८ ) वीसशे अठ्ठेचाळीस तोळे घेऊन त्यांत त्याच्या सहापट पाणी घालून किंवा गोमूत्र वगैरे घालावयास सांगितले असल्यास गोमूत्र घालून ( एक रात्रभर भिजत ठेवून ) नंतर वस्त्राने एकवीस वेळा गाळून घ्यावे व ते एका मोठ्या कढईत घालून वरचेवर पळीने ढवळीत उकळावे , तो स्वच्छ , रक्तवर्ण व बुळबुळीत झाला म्हणजे पुनः जाड वस्त्राने गाळून घ्यावा . आणि दुसर्‍या भांड्यात घालून चुलीवर ठेवून पुनः उकळावे . ह्या क्षारोदकांतून बत्तीस तोळे किंवा अठ्ठेचाळीस तोळे पाणी काढून ठेवावे , नंतर चुनखडी ( कच्ची ) भस्मशर्कारा ( भाजून निघालेले पूर्वीचे चुनखडे ), नदीतील शिंपा , शंखाच्या आतील गाठी हे जिन्नस ( कोंबडा , मोर , गिधाड , कंक व कपोत ( होल ) ह्यांच्या विष्ठा , गाईची वगैरे पित्ते , हरवाळ , मनणीळ व मीठ ही द्रव्येही घालावी असे अन्य ग्रंथाद्वारे हरणचंद्र म्हणतो . ) प्रत्येकी आठ पळे घेऊन ( बत्तीस तोळे घेऊन ), लोखंडाच्या भांड्यांत घालून अग्नीवर ठेवून ते निखार्‍याप्रमाणे लाल झाले म्हणजे त्या काढून ठेवलेल्या अठ्ठेचाळीस तोळे पाण्यात बुडवून , वाटून पीठ करुन त्या शिजत ठेवलेल्या क्षारोदकात घालावे . आणि एक सारखे सावधपणाने पळीने ढवळीत उकळावे . आणि तो आटून अतिशय घट्ट किंवा अतिशय पातळही राहणार नाही अशाविषयी खबरदारी राखावी . पाणी आटून क्षार आपणास पाहिजे त्या प्रमाणात तयार झाला म्हणजे लहान तोंडाच्या लोखंडाच्या घागरीत घालून तोंड बांधून गुप्त ठिकाणी ठेवावा . ( धान्यराशीन पुरुन ठेवावा .) हा मध्यमपाक क्षार .

ह्याच वरील क्षारोदकात वरील चुनखडी वगैरे द्रव्ये न घालता क्षार तयार केला तर तो मृदुक्षार होतो .

मागे अकरा श्लोकात सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या क्षारोदकात घालण्याकरिता आणखी दाती , द्रवंती ( उंदीरकानी किंवा मोगल एरंड ), चित्रकमूळ , कळलावी , काटेकरंजाची पाने , मुसळी , बिडलोण , सज्जिखार , पिवळा काटेधोतरा , हिंग , वेखंड , अतिवीष हे जिन्नस वस्त्रगाळचूर्ण करुन प्रत्येकाचे चूर्ण दोन तोळे करुन टाकावे आणि शिजवावे . ह्या क्षाराला तीक्ष्णपाकक्षार म्हणतात . ( शंभर मात्राच्या काळाच्या आत जर त्या क्षाराने एरंडाच्या पानाचा देठ जळला तर तो तीक्ष्णक्षार झाला असे हरणचंद्र म्हणतो )

ह्या क्षारांचा जसा व्याधींचा कमीजास्त जोर असेल त्या मानाने उपयोग करावा .

जुनाट झाल्यामुळे जर क्षार कमजोर असेल तर पूर्ववत क्षारोदक तयार करुन त्यात टाकून पचन करुन घ्यावा ॥११॥१५॥

अतिशय तीक्ष्ण नाही , फार मृदु नाही , दिसण्यांत शुक्लवर्ण ( पांढरा ), हाताला चिकण व मऊ लागणारा , बुळबुळीत , न पसरणारा , सोसण्यासारखा , फार आग वगैरे न करणारा , त्वरित कार्य करणारा , हे क्षाराचे आठ गुण आहेत .

अतिशय मृदु म्हणजे तीक्ष्ण नव्हे असा किंवा अतिशय पांढरा , अति उष्ण , अति तीक्ष्ण , अतिशय बुळबुळीत , अति प्रसरणशील , अति कठीण , कच्चा व हीन द्रव्यापासून तयार केलेला हे क्षाराचे दोष आहेत ॥१६॥१७॥

क्षाराचे लेपन करण्याचा विधि

क्षाराच्या लेपाने बरा होणारा रोग ज्याला झाला आहे , त्यालाकोणत्याहि प्रकारचा त्रास नाही अशा जागी बसवून मागे " आग्रोपहरणीय " नावाच्या पाचव्या अध्यायात सांगितलेल्या विधीने क्षार लावण्यासंबंधी सर्व प्रकारची सामग्री तयार ठेवावी व त्या रोग्यास आसपासच्या देखाव्याकडे पहाण्यास सांगून , पित्तविकार असल्यास घर्षण करावे , वातजन्य असल्यास लेखन ( खरवडणे ) करावे , आणि कफजन्य असल्यास किंचित छेदन ( थोड्या फासण्या टाकणे ) करावे व नंतर त्याजवर क्षार लावावा आणि शंभर मात्रांचा काळ जाईपर्यंत ( पांच - सांत मिनिटे ) थांबावे ॥१८॥

क्षाराचे कार्य

क्षार लावल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णवर्ण आला म्हणजे क्षाराने योग्य प्रकारे रोग दग्ध झाला म्हणून समजावे . नंतर त्या ठिकाणची आग वगैरे शांत होण्याकरिता कांजी , ताक वगैरे आंबट द्रव्ये , तूप व ज्येष्ठमधाची पूड एकत्र करुन त्यांचा लेप करावा . रोग जर दृढमूल - फार खोल असा - असेल आणि क्षाराने भाग निघत नसेल तर त्या ठिकाणी आंबट कांजीच्या तळचा राब , तीळ व ज्येष्ठमध ह्यांचा समभाग कल्क सर्व भागावर लावावा .

क्षाराने जखमेतील सर्व घाण निघून गेल्यावर तीळ व ज्येष्ठमध ह्यांचा कल्क तुपात तयार करुन त्याचा लेप करावा , तो व्रणाला भरुन आणणारा आहे .

वीर्याने उष्ण व आंबटपणाने तीक्ष्ण अशी कांजी क्षाराने होत असलेल्या आग वगैरे विकारांवर लावली असता ते शांत होतात . म्हणून वर एकोणीस श्लोकांत सांगितले आहे त्यावर शंका घेऊन उत्तर सांगतात की , हे वत्सा सुश्रुता , आग्नेय द्रव्यापासून तयार केलेला व अग्निसारखा प्रखर असा क्षार तीक्ष्ण व उष्णवीर्य अशा आम्लरसाने कसा शांत होतो असे तुझ्या मनांत येईल तर सांगतो , ऐक .

क्षारांमध्ये आम्लरस सोडून बाकीचे सर्व रस आहेत . त्यात तिखट रस आहेत . त्यांत तिखट रस पुष्कळ असून खारट रस कमी आहे . तो लवण ( खारट ) रस तीक्ष्णपणासह आम्लरसाशी युक्त झाला असता त्याला माधुर्य येते व त्यामुळे त्याचा तीक्ष्णपणा नाहीसा होतो . आणि पाण्याने जसा अग्नि शांत होतो त्याप्रमाणे त्या माधुर्याने क्षाराचा तीक्ष्णपणा शांत होतो ॥१९॥२५॥

क्षार लावल्यावर त्याचे कार्य झाल्यावर जर जखम योग्य प्रमाणात भाजून निघाली असेल तर त्या रोगापासून होणारे ठणका वगैरे विकार शांत होतात . हलकेपणा वाढतो व स्त्राव वगैरे बंद होतो . क्षार लावलेली जागा जर चांगली भाजून निघाली नाही तर त्यामुळे टोचल्यासारखी पीडा , कंडु , जडत्व व रोगाची जास्तच वाढ होणे हे विकार होतात .

जागा अति भाजली तर त्या ठिकाणी दाह होणे , पक्वपणा किंवा बारीक फोड येणे , लाली , अंग दुखणे , थकवा येणे , तहान , मूर्च्छा हे विकार होतात किंवा मरणही येते .

क्षाराने भाजून काढलेल्या जागी जर जखम झाली तर दोष व मूळ विकार ह्यांच्या अनुरोधाने चिकित्सा करावी ॥२६॥२७॥

पुढे सांगितलेल्या रोग्यांना क्षाराचे प्रयोग करु नयेत . अशक्त माणसे , लहान मुले , वृद्ध माणसे , भित्री माणसे , ज्यांच्या सर्वांगाला सूज आहे असा उदराचा रोगी , रक्तपित्ताचा रोगी , गर्भिणि , ऋतुमती स्त्री , ज्याला अतिशय ज्वर आहे असा , प्रमेहाचा रोगी , ज्याचा कोठा रुक्ष आहे तो , व्रणाने किंवा उरक्षताने क्षीण झालेला , तहान , मूर्च्छा ह्यांनी पीडित , नपुंसक , तसेच ज्या स्त्रियांचा गर्भाशय वगैरे स्थानापासून खालीवर सरला आहे , इतक्या रोग्याना क्षार प्रयोग करु नये .

त्याचप्रमाणे मर्मस्थान , शिरा , स्नायु , सांधे , तरुणास्थि ( नाक , कान , मान व डोळ्याचे कोपरे ह्या ठिकाणच्या हाडाना ’ तरुणास्थि ’ म्हणतात . ), ( कूर्चा ) शिवण , धमनी , गळा , बेंबी , नख ह्या ठिकाणी अंतर्गत सूज स्त्रोतसे , ज्या ठिकाणी अगदी थोडे मांस आहे अशा जागी आणि पापण्यावाचून डोळ्याच्या इतर आजारात क्षार प्रयोग करु नयेत .

क्षारसाध्य रोग असला , तरी देखील ज्याच्या अंगाला सूज आहे , हाडात ठणका आहे , ज्याला अन्नद्वेष आहे ( अन्न जात नाही ), हृदय व सांधे ह्या ठिकाणी पीडा आहे अशा रोग्यांना क्षाराचा प्रयोग उपयोगी पडत नाही .

जर अविचारी वैद्याने भलत्याच ठिकाणी क्षाराची योजना केली तर तो क्षार त्या रोग्याला विष , शस्त्र व विद्युतपात ह्यासारखा मृत्युकारक होतो . सुविचारी वैद्याने योग्य रीतीने योजला - असता भयंकर रोगाचा देखील त्वरित नाश करितो ॥२८॥३०॥

अध्याय अकरावा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP