मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
व्रणालेपन बंधविधि

सूत्रस्थान - व्रणालेपन बंधविधि

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय अठरावा

आता " व्रणालेपन बंधविधि " नावाचा अध्याय जसा भगवान धन्वंतरींनी सांगितला आहे तसा सांगतो ॥१॥२॥

सर्व प्रकारच्या सुजेच्या विकारात लेप हा अगदी पहिला व सर्व सामान्य ( सारखाच उपयोग करणारा ) उपाय आहे . सूज दिसल्याबरोबर जर लेपाचा योग्य प्रयोग केला तर ती सूज बसते व पुढील यातना अर्थातच भोगाव्या लागत नाहीत . म्हणून ह्याला सर्व उपचारात श्रेष्ठत्व आहे . त्या लेपाचे प्रयोग त्या त्या विद्रधि वगैरे रोगांच्या चिकित्साप्रकरणांत सांगू . लेपानंतर दुसरा श्रेष्ठ उपचार म्हणजे " बंध " ( व्रण बांधणे ) हा आहे . त्यांच्या योगाने व्रणाचे शोधन होते , रोपण ( भरुन येणे ) होत व हाडे व संधी ह्यांना बळकटी येते .

लेप द्यावयाचा तो त्वचेवरील केसाचे वळण ज्या बाजूने त्याच्या विरुद्ध बाजूने ( प्रतिलोम ) द्यावा . केसाचे वळण असेल त्या बाजूने ( अनुलोप ) देऊ नये . प्रतिलोम लेप दिला असता लेप केसावर न बसता त्वचेवर व केसांच्या अगदी मुळांच्या छिद्रात बसतो . त्यामुळे ते रोमरंध्रांच्या द्वारे स्वेदवाहिन्यात शिरते , व आपले कार्य करण्यास समर्थ होते .

लेप वाळला की ताबडतोब धुवून अगर पुसून काढावा , हयगय करु नये . तथापि व्रण पीडनार्थ जो लेप मिश्रक अध्यायात सांगितला आहे , तो मात्र वाळला तरी काढण्याचे कारण नाही . त्यावाचून दुसरे लेप वाळल्यावर जर राखले ( ठेवले ) तर निरुपयोगी होतात व वाळल्याने ओढ मात्र लागते . ( पीडा होते . )

प्रलेह , प्रदेह व आलेप असे लेपाचे तीन प्रकार आहेत . त्यातील भेद ( १ ) प्रलेप नावाचा जो लेप करावयाचा तो थंड असून पातळ ( जाड नाही तो ) असा करितात . तो शोषक ( ओढून घेणारा ) किंवा विशोषी ( ओढून न घेणारा ) असा असतो . ( २ ) प्रदेह नावाचा लेप थंड किंवा ऊन दोषाच्या मानाने वात - कफ - दोषांवर ऊन व पित्तरक्त - दोषावर थंड व जाड करावा . ह्यावरुन लाथंबी करुन बसवितात त्याला प्रदेह म्हणतात . हा ओढ धरत नाही . ( ३ ) प्रलेप व प्रदेह ह्यांच्या मध्यम स्थितीतील लेपाला आलेप असे म्हणतात . तो रक्त व पित्त ह्यांचे शमन करणारा आहे . प्रदेहलेप वात व कफ ह्यांचे शमन करणारा आहे . तसाच तो सांधणारा , शोधन करणारा , रोपण ( भरुन आणणारा ) व सुजेतील वेदना दूर करणारा आहे .

ह्या प्रदेहनामक लेपाचा प्रयोग व्रणावर किंवा व्रण नसताना केवळ सुजेवरही करितात . जो लेप व्रणावर किंवा व्रण नसताना केवळ सुजेवरही करितात . जो लेप व्रणावर करितात त्याला कल्क ( मलम ) असे म्हणतात . हा व्रणातील स्त्राव बंद करितो म्हणून याला " निरुद्धालेपन " असेही म्हणतात . ह्याच्या योगाने व्रणातील स्त्राव बंद होतो . व्रणाला मऊपणा येतो . सडलेले मांस काढून टाकणे , व्रणाच्या आतील दोष नाहीसे करणे व व्रणाचे शोधन करणे ही कार्ये चालतात .

( हे जे निरनिराळे लेपाचे गुण म्हणून सांगितले आहेत त्याचा अर्थ तो तो गुण येण्याकरिता त्या त्या दोषानुरुप औषधांचे ह्या पद्धतीने लेप करावयाचे एवढाच समजावा ॥३॥६॥

न पिकलेल्या सुजेवर दोषानुरुप आलेप करणे हितकारक आहे . तो ज्या ज्या औषधींचा केला असेल त्या त्या औषधीच्या गुणाप्रमाणे त्या त्या दोषाचे शमन करितो . तो दाह , कंडु व ठणका ह्यांचा नाश करितो . त्वचा स्वच्छ करण्याविषयी हा श्रेष्ठ आहे . टोचणी व कंडू यांचाही नाश करितो . मनुष्याच्या मर्मस्थानी व गुप्त अवयवाच्या ठिकाणी अशा प्रकारचे जे रोग होतात , त्यांचे संशोधन करण्याकरिता शोधन करणार्‍या औषधांचा आलेपच करावा . लेप तयार केल्यावर पित्तदोष अधिक असेल तर त्यामध्ये सहावा हिस्सा तेल घालावे . वातदोष अधिक असल्यास चौथा हिस्सा घालावे आणि कफदोष अधिक असल्यास अष्टमाश ह्या प्रमाणाने त्यात स्नेह ( तेल वगैरे ) घालावा .

ह्या आलेपाच्या जाडीचे प्रमाण रेड्याचे ओले कातडे जितके जाड असते तितक्या जाडीचा करावा . आलेप हा रात्री देऊ नये , कारण त्या लेपाच्या शीतपणाने सुजेतील उष्णता कोंडते व ती कोंडल्यामुळे रोग वाढतो .

प्रदेह नावाचा लेप केल्याने साध्य होणार्‍या रोगावर दिवसा लेप करावा . त्यात विशेषतः पित्त व रक्तदोष असताना , आघातजन्य रोगात व विषयुक्त रोगात विशेषकरुन दिवसाचा लेप करावा .

रात्री तयार करुन ठेवलेला शिळा लेप दुसरे दिवशी उपयोगात आणू नये . एकदा केलेला लेप धुवून काढल्याशिवाय त्याजवर दुसरा लेप देऊ नये , कारण तो जाड होऊन बसला म्हणजे सुजेतील उष्णता वाढवितो आणि दाह व ठणका उत्पन्न करितो .

प्रदेह नावाचा लेप म्हणजे दामटी किंवा पोटीस . ह्याचा फायदा लेप केल्यावर वाळल्यावर वगैरे तो काढून पुनः तोच वाटून तयार करुन उपयोगात आणू नये . कारण तो शुष्क झाल्यामुळे निःसत्व झालेला असतो . तो जरी पुनः उपयोगात आणला तरी निष्फळच होतो ॥७॥१५॥

आता व्रणाच्या बांधण्याला उपयोगी पडणारी द्रव्ये सांगतो ती अशी :- तागाचे कापड , लोकरीचे कापड , दुकुल ( रेशमी अगर सूत ह्यांपासून केलेली उंची जाड कापड ), रेशमी कापड , षत्रोर्ण ( वाकाची गोणपाटे किंवा किलतान वगैरे ), चिनी सुताचे कापड , चामडे ( किंवा सोनेरी रंग देऊन चर्मतंतुनिर्मित उंची कापड ), झाडाच्या अंतरसाली , कडुभोपळ्याची कवचे , वेली , वेळूच्या कांबी , दोरी ( मोळाची वगैरे ), कापशीची अगर शेवरीची फळे , दुधावरील साय ( किंवा संतानिका म्हणजे मर्कटीवास ( एक कापडाचा भेद ) व सोने , कथील , शिसे वगैरे धातु , या पदार्थाचा उपयोग रोग व काल ह्यांना अनुसरुन करावा किंवा जसे कार्य पडेल त्याप्रमाणे करावा .

बंधाचे भेद व नावे - १ कोश , २ दाम , ३ स्वस्तिक , ४ अनुवेल्लित , ५ प्र . ( मु . ) तोली , ६ मंडल , ७ स्थगिका , ८ यमक , ९ खट्वा १० चीन , ११ विबंध १२ वितान , १३ गोफणा , १४ पंचांगी हे बंधनाचे मुख्य चौदा प्रकार आहेत . त्यांच्या आकृति नामसदृश्यावरुन सांगितल्यासारख्याच आहेत . तथापि टीकेवरुन त्रोटक माहिती पुढे देत आहे ती अशीः -

१ औषध लावून कोशाच्या आकृतीसारखा जो बंध बांधितात त्याला " कोषबंध " म्हणतात .

२ गुराच्या दाव्यासारखा जो बंध बांधतात त्याला " दामबंध " म्हणतात .

३ स्वस्तिकाकृतिबंध हा स्वस्तिकाप्रमाणे असतो .

४ जो बंध मागे वळवून घेऊन बांधतात त्याला " अनुवेल्लित " म्हणतात .

५ पुडाच्या आकाराचा व जाळ्यांप्रमाणे छिद्रे असलेला जो बंध तो " मुत्तोलीबंध . " याच बंधाला गोतुंडिका किंवा चालनी असे वैद्य म्हणतात .

६ जो वेष्टनाप्रमाणे गुंडाळलेला असतो त्याला " मंडलाकृति " म्हणतात .

७ औषध लावून कोषबंधाप्रमाणे बंध घेऊन वर पट्टा बांधतात त्याला " स्थगिकाबंध " म्हणतात . हा बांधतात व कोषबंध बांधीत नाहीत . हाच ह्यांच्यामधील फरक . ( हा विड्याच्या पानाच्या डब्याप्रमाणेही बांधतात . )

८ जवळ जवळ असलेल्या दोन व्रणांवर मंडलाकार ( गुंडाळून ) जो बंध बांधतात त्याला " यमकबंध " म्हणतात .

९ पायासारखे पुष्कळसे आकार असून ज्याला पुष्कळ फडकी लागतात त्याला " खटवाबंध " म्हणतात .

१० पुष्कळ फडक्यांनी जो बांधतात त्याला " चीनबंध " असे म्हणतात .

११ ज्या बंधामध्ये अनेक प्रकाराने आडवे उभे असे बरेच बंध बांधितात त्याला " विबंध " असे म्हणतात . याला सहा ठिकाणी गाठी द्याव्या लागतात .

१२ वितान म्हणजे " चांदवा " याच्या आकाराचा विस्तृत असा जो बंध " वितानबंध " असे म्हणतात . ( अर्थातच हा मस्तकाच्या जखमेला उपयोगी पडतो . )

१३ धोंडा फेकण्याकरिता जी गोफण केलेली असते तिच्या आकारासारखा जो बंध बांधतात त्याला " गोफणाबंध " म्हणतात .

१४ पाच अगाला पाच कांबी देऊन गोफणाकृति असा पाचही बाजूंनी बांधतात त्याला " पंचांगिबांध " म्हणतात .

ह्याप्रमाणे ह्या चौदा बंधांच्या आकृतीचे दिग्दर्शन टीकाकार डल्लण व हरणचंद्र ह्यांच्या दिग्दर्शनाप्रमाणे दिले आहे . एवढ्याने बंधाची कल्पना बिनमाहितगाराला तर मुळीच होणार नाही . तथापि काही कल्पना यावी म्हणून ते येथे केले . ह्या व इतर बंधासंबंधाने कितीही सविस्तर वर्णन लिहिले , तरी प्रत्यक्ष माहितगार वैद्याकडून हे बंध कसे बांधावे हे शिकल्याखेरीज , त्याची कल्पना देखील विद्यार्थ्याला येणार नाही . म्हणून हे बंध आधी बांधावयास शिकून मग पाहिजे तर वरील संक्षिप्त माहिती वाचावी . म्हणजे त्यांच्या आकृतीवरुन त्यांची नावे कशी मोजिली आहेत ह्याचा बोध होईल एवढेच . ह्यापेक्षा त्यांच्या वर्णनांचा उपयोग अभ्यासाच्या कामी होत नाही .

कोशबंध आंगठा किंवा बोटांची पेरी ह्या ठिकाणी द्यावा . दामबंध अडचणीच्या जागेला बांधावा . सांधे , कूर्चक ( पायाचा अंगठा व बोटे ह्यांच्यामध्ये " क्षिप्र " नावाचे मर्म आहे व त्या मर्मच्यावर दोन बाजूला दोन कूर्चक आहेत . ) भुवयांचा मध्यभाग , दोनी स्तनांमधील भाग , तळपाय , तळहात व कान या ठिकाणी स्वस्तिक बंध बांधावा . खांद्यापासून खाली सर्व हात व मांडी , पिंढर्‍या या ठिकाणी अनुवेल्लितबंध बांधावा . मान व उपस्थ या ठिकाणी प्रतोलीबंध बांधावा . दंड कुशी पोट , पाठ व मांड्या वगैरे वाटोळ्या अंगाच्या ठिकाणी मंडळबंध बांधावा . आंगठा , बोटे व उपस्थ यांच्या अग्रभागी स्थगिकबंध बांधावा . दोन व्रण जवळ जवळ असल्यास यमकबंध बांधावा . हनुवटी , आंख व गाल ह्यांचे ठिकाणी खट्वाबंध बांधावा . डोळ्याच्या कोपर्‍यावर चीनबंध बांधावा . पाठ व पोट व छाती या ठिकाणी विवंधबंध बांधावा . मस्तकाला वितानबंध बांधावा . ओठाच्या खालचा भाग , ओठ , नाक , खांदे व बस्ति या ठिकाणी गोफणबंध बांधावा . जत्रूच्या ( गळ्याच्या खालील फासळ्यांच्या ) वरच्या भागी पंचांगीबंध बांधावा . याप्रमाणे बंध व त्यांची ठिकाणे सांगितली आहेत . तथापि जो बंध शरीराच्या ज्या भागी चांगला बसेल तो त्या ठिकाणी बांधावा .

बांधाला गाठ मारावयाची ती जखमेच्या खाली वर किंवा बाजूला मारावी .

व्रणाला औषध लावल्यावर त्याजवर उंबराची वगैरे पाने किंवा जाडशी कापडाची घडी किंवा कापसाची घडी बसवावी , म्हणजे औषध इकडे तिकडे सरत नाही . नंतर सरळ न फाटलेले , सुरकुत्या न पडलेले व मऊ असे स्वच्छ कापड डाव्या हाताने धरुन उजव्या हाताने जखमेवर पट्टा बांधावा . गाठ द्यावयाची ती व्रणाच्या वरती देऊ नये . त्यायोगाने आसमंतात - भागी जखमेचे ठिकाणी पीडा होते .

नाडीव्रणाच्या छिद्रात औषधाची वात तयार करुन घालावयाची ते औषध व ती वात ही दोन्ही अति स्निग्ध , अति रुक्ष किंवा ह्या व्यतिरिक्त विषम प्रमाणाची नसावी . अशा रीतीने योग्य प्रमाणात स्निग्धता वगैरे आहे अशी वात औषध लावून तयार करावी . कारण अतिस्निग्धपणाने ओलसरपणा वाढतो . रुक्षपणा फार असल्यास जखमेस भेगा पडतात . म्हणून वात योग्य प्रमाणात करुन घालावी . ती सरळ चांगली न बसता वाकडी तिकडी बसली तर नाडीव्रणाचा जो मार्ग त्याच्या कोणत्या तरी बाजूस घासून पीडा करिते .

व्रणाच्या विशेष स्थानाप्रमाणे बंधाचेही गाढ ( आवळ ), सम ( मध्यम ) व सैल असे तीन प्रकार आहेत ॥१६॥२२॥

जो बंध घट्ट बांधला असतानाही पीडा देत नाही त्याला गाढ म्हणतात . जो ढिला असतो त्याला शिथिल म्हणतात आणि जो फार आवळ नाही आणि जो फार सैलही नाही त्याला समबंध म्हणतात .

नितंबभाग , कुशी , कांखा , वंक्षण ( कंबर व छाती मांड्या ह्यांचे दोन्हीकडील सांधे ( जांगाडे ), मांड्या व मस्तक ह्या ठिकाणी गाढ ( घट्ट ) बंध बांधावा . हात , पाय , तोंड , कान , गळा , उपस्थ , अंड , पाठ , बगला , पोट व छाती य ठिकाणी समबंध बांधावा . आणि डोळे व सांधे या ठिकाणी शिथिलबंध बांधावा .

जर पित्तजन्य व्रण असेल तर गाढबंधाचे ठिकाणी समबंधाच्या ठिकाणी शिथिल व शिथिलाचे ठिकाणी मुळीच बांधू नये . ह्याचप्रमाणे रक्तजन्यव्रणांमध्येही करावे . कफजन्यव्रण असता शिथिल बंधाच्या ठिकाणी समबंध द्यावा . समबंधाचे ठिकाणी गाढ द्यावा वा गाढबंधाचे ठिकाणी अतिशय गाढबंध बांधावा . याचप्रमाणे वातजन्यव्रणांतही करावे .

पैत्तिकव्रण शरदऋतु व ग्रीष्मऋतुमध्ये दिवसातून दोन वेळा सोडून बांधावा . याचप्रमाणे रक्तजन्यही दोन वेळ बांधावा . कफजन्यव्रण हेमंत व वसंतऋतूत तीन तीन दिवसांनी बांधावा . याचप्रमाणे वातजन्यव्रणासही करावे . याप्रमाणे वैद्याने विचार करुन योग्य वाटल्यास बंधात फरकही करावा .

सम व शिथिलबंधाऐवजी गाढबंध दिला असता वातीने घातलेले औषध निर्फळ होते ( गुण येत नाही ), आणि सूज व वेदना उत्पन्न होतात . गाढ व समबंधाऐवजी जर शिथिलबंध दिला तर वातीचे औषध निसटून पडते आणि बांधलेले फडके हालल्यामुळे व्रणाच्या काठाला घासून पीडा होते . गाढ व शिथिलबंधाच्या ठिकाणी समबंध दिला असता , गुण येत नाही .

बंध जसा पाहिजे तसा योग्य प्रमाणात बांधला गेला म्हणजे वेदना बंद होतात , रक्त स्वच्छ होते व व्रणाला मृदुपणा येतो .

व्रण जर मुळीच बांधला नाही तर त्यावर डांस , माशा वगैरे बसून त्रास देतात . तसेच गवत , लाकूड , दगड , धूळ , थंडी , वारा व ऊन वगैरे लागून पीडा होते . आणि व्रणामध्ये नानाप्रकारच्या वेदना व उपद्रव होतात . आणि त्याजवर केलेले लेप वगैरे दूषित होऊन वाळून जातात .

चुरलेले , एकमेकावर घासणारे , मोडलेले , निखळलेले , ठिकाणाहून सुटून लोंबू लागलेले वगैरे जे अस्थिभंगाचे प्रकार ते व हाडे , स्नायु , शिरा तुटणे वगैरे अपघात झाले असता होणारे विकार ताबडतोब व्यवस्थित बांधले असता लवकर बरे होतात आणि बांधण्याने व्रणाचा रोगी सुखाने निजतो , सुखाने चालतो व उभा राहतो . आणि ज्याला सुखाने झोप येते त्याचा व्रण लौकर भरुन येतो ॥२३॥३१॥

बंधनास अयोग्य

पित्त , रक्त , अभिघात , विष यापासून झालेले व्रण , जे सूज , दाह , बारीक फोड येणे , किंवा पिकणे . साली , टोचणी वगैरे वेदनांनी युक्त आहेत , तसेच जे क्षार किंवा विस्तवाने जाळलेले व पिकून ज्यातून कुजलेले मांस गळून पडते आहे असे व्रण केव्हाही बांधू नयेत ॥३२॥

कुष्ठि मनुष्याचे व्रण , अग्निने भाजल्यामुळे झालेले व्रण व मधुमेही मनुष्याच्या पुळ्या या पिकून त्यातील मांस पिकू लागले असता त्यावर बंध - बांधू नये , उंदराच्या विषाने झालेले असे व्रण बांधू नयेत , विषबाधेमुळे झालेले व कांठ धरलेले असे व्रण बांधू नयेत तसेच विषबाधेमुळे झालेले व्रणही मांसपाक असता बांधू नयेत . त्याचप्रमाणे गुदाचाही दारुण पाक झाला असता ( ते पिकले असता ) त्या ठिकाणीही बंध बांधू नयेत .

व्रण , जाणत्या वैद्याने देश , दोष व व्रण ह्यांची चांगली परीक्षा करुन , हवामान कसे आहे त्याचा विचार करुन , व्रणासंबंधी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्यांची विभागणी करुन , व्रणासंबंधी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्यांची विभागणी करुन ( आधी कोणच्या करावयाच्या व मग कोणाच्या करावयाच्या हे ठरवून ) नंतर योग्य दिसेल तो बंध बांधावा ॥३३॥३६॥

व्रणाच्या वर , खाली किंवा बाजूला गाठ द्यावी . याप्रमाणे गाठीचे तीन प्रकार आहेत .

आता बंध कसा बांधावा ते सविस्तर सांगतो .

व्रणात वात वगैरे घालून झाल्यावर त्यावर एक कापसाची जाड व मऊ घडी मागे सांगितल्याप्रमाणे ठेऊन त्याजवर मऊसा पट्टा बांधावा . व्रणात घालावयाची वात व औषध फार स्निग्ध किंवा फार रुक्ष असू नये . अतिस्निग्ध वात ओलसरपणा आणिते व अतिरुक्ष वात व्रणास फाडते . योग्य प्रकारे स्निग्ध असली तर ती व्रणाला भरुन आणिते . तीच चांगली घातली नाही तर व्रणाच्या बाजूला घासते .

वैद्याने व्रणाची चांगली परीक्षा करुन वाटल्यास तो उंच सखल करुन घ्यावा . त्यातील स्त्राव बंद करणे योग्य असल्यास बंद करावा व वाहू देणे असल्यास तसे करावे . त्याप्रमाणे जे योग्य दिसेल ते करावे . पित्तजन्य व्रणात किंवा रक्तजन्य व्रणात पट्ट्यांचा एकच वेढा द्यावा ; आणि कफजन्य व वातजन्यव्रणात ते एकापेक्षा अधिक द्यावे . व्रणातील पू व रक्त काढण्याकरिता तळहाताने दाबून अनुलोभ ( स्त्रावाची गति असेल त्या बाजूसच ) स्त्राव करावा . सर्व बंध असे बांधावेत की त्याचे पदर व संधि वगैरे आत लपून जावेत बाहेर दिसू नयेत .

विद्वान वैद्याने आपल्या कल्पनेप्रमाणे ओठ सांधण्याच्या कामी व हाड बसविण्याच्या कामी सांगितलेल्या विधिप्रमाणे योग्य दिसेल तो विधि करावा .

व्रण चांगला बांधल्याने उठताना , बसताना , निजताना , अनेक प्रकारच्या गाड्यातून वगैरे फिरताना व्रणाला पीडा होत नाही . जे व्रण मांस , त्वचा , सांधे , हाडे , कोठा , शिरा व स्नायु ह्यांच्या आश्रयाने होतात , तसेच जे फार खोल व विस्तृत असतात आणि सर्वही बाजूला सारखे नसतात , असे व्रण बंधावाचून बरे होणे शक्य नसते ॥३७॥४५॥

अध्याय अठरावा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP