मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
कौलपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

भारुड - कौलपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासी आत्मारामपंत कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशीर्वाद उपरी । तुम्हांस देहगांवचें ठाणें दिल्हें आहे । तर ठाण्यांत सावधपणें वर्तणूक करणें । तेथें ममताई पाटलीण । तिनें लटिकेंच दंभ उभे केले आहे । कामक्रोधादि षड्‌वैरी चाकर ठेवून । लोभमोहाचे फांसे सिद्ध करून ठेविले आहेत । म्हणून तुम्हांस सूचना मात्र लिह्ली । विषयाचा लोभ न धरणें । निजहितासी अंतर न करणें । सत्य मिथ्या जाणोन । विचाराची वाट धरणें । अविचारपणा सोडून देणें । विवेक सद्भाव यांसी मित्रत्व विशेष असूं देणें । त्याचे बुद्धीनें गांवची लावणी करणें । उत्तम चार वर्णास कौल देऊन । धैर्याचा नांगर धरून । शेतांमधील खडे काढुन । वासनेच्या पालव्या तोडून । संशयाच्या काशा गोळा करून । भूमिका शुद्ध करून । मग भक्ति ज्ञान वैराग्य तिफनी करून । सद्गुरु मुखीं निजबीज पेरणें । तेथें शुद्धसत्त्वाचा मेघ वर्षेल । तेथें सत्याचा माळा घालून । कुतर्क पाखरूं उडवून देणें । जागोजागीं विश्वास रक्षण ठेवून । शेतांतील माल अवघाच गोळा करून । समस्त षड्‌गुणऐश्वर्य बैल जुंपून । अवघा माल खळ्यांत आणून । पुष्कळ काढून । स्वानंदाची रास करणें । तेथें सिद्ध साधकें मागुतें येतील । त्याला भक्तिच्या पायलीनें । अवघाच माल मोजून देऊन । सहहुजूर ब्रह्मपुरास येणें । सांगितल्या गोष्टींत बाकी ठेवाल तर । चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरणें लागेल । मग पुनरपी तुम्हांवर कोणाचा दस्त लादेल । खरें चालावें जन्ममरणाची वाट खुंटेल । म्हणून जनार्दन सद्‍गुरुकृपेचा सागर । तेणें एक जनार्दनीं आनंदमय समाधान झाले । द्वैताचा लेश उरला नाहीं । सच्चिदानंदरूप । प्रत्ययास येऊन समाधान पावलें । हें कौलपत्र ॥ १ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP