खंड ९ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष प्रार्थी मुद्‍गलासी । क्षेत्रक्षेत्रज्ञ रहस्य मजसी । सांगावें सर्वगत ब्रह्म तत्त्वासी । ज्यानें ज्ञान त्यांचें होईल ॥१॥
मुद्‍गल तयास सांगत । देह क्षेत्रमय ज्ञात । देही क्षेत्रज्ञ निश्चित । त्यांच्या योगें उत्थान होतें ॥२॥
महद्‍ब्रह्म त्यांच्या योगांत । स्वतः उत्थान संज्ञायुक्त । आतां क्षेत्रांत अंतर्भूत । सर्व गोष्टी तुज सांगतों ॥३॥
पंचमहाभूतें पंचतन्माब्रे अंतर्भूत । पंच ज्ञानेंद्रियें पंचकर्मेंद्रियुक्त । पांच वायु पांच देवता क्षेत्रांत । तैसींच दहा इंद्रियें ॥४॥
द्वेष इच्छा धृति अव्यक्त । चेतना दुःख सुख मोहनयुक्त । चित्त बुद्धि स्थूल सूक्ष्म व्यक्त । कारण तुरीयक तैसें ॥५॥
ह्यांचा योग होतो ज्यांच्यांत । त्यास क्षेत्रसंज्ञा असत । सदा एकभावरूप भेद वर्णित । क्षेत्रज्ञ तो जाणावा ॥६॥
क्षेत्रांत राहून तो सर्वान्तर्यामीपद प्राप्त । त्यांच्या योगें ब्रह्म व्यक्त । दृश्यादृश्यविवर्जित । दृश्यादृश्यमय पूर्ण बोधरूप ॥७॥
स्थूल सूक्ष्म समाख्य भाव । त्यायोगें मायेचा प्रभाव । तो क्षेत्रज्ञात सोडून पराधीनभाव । प्रजापते नित्य आदरें ॥८॥
चार भेदांनीं विशेषें मोहित । होतो क्षेत्रज्ञ अत्यंत । मीं देह स्वरूप असत । ऐसें व्यर्थ तो मानतो ॥९॥
नंतर क्षेत्राच्या भोगार्थ भ्रमत । नाना कर्मांत रत । त्रिगुणांत भ्रमण त्याचें सतत । अहं ममात्म रूपें ॥१०॥
तदनंतर तमोगुण त्यागून । राजस गुण धारण करून । अंतीं राजसही त्यागून । सात्त्विक गुण संभवेल ॥११॥
त्यासमयीं तुरीयाचा आश्रय घेऊन । गणेशाचें करावें भजन । सर्वण पंचम तो सध्या असून । ब्रह्मीभूत त्याच्या कृपेनें नर ॥१२॥
इहलोकीं जें कर्म सुखप्रद । पापरूपमय तें न जाण समग्र । देहभोगकर नरकप्रद । शिश्नोदरपरायण तें तामसकर्मं ॥१३॥
तेथ तामस कर्मांत रत । तें दुःख भोगून महाअद्‍भुत । पुनरपि रोगादिसंयुक्त । नीच योनींत जन्म पावे ॥१४॥
काणत्व मूकत्वादि दोषयुक्त । दारिद्रयादींनीं पौडित । होती ते तामस पापसंयुक्त । भोगहीन सर्वदा ॥१५॥
पुनर्जन्मांत जरी पाप करिती । तरी अंतीं यमगृहीं भोगिती । दण्ड त्याचा नंतर पडती । पुनः पुनः नरकांत ॥१६॥
म्हणून तमोगुणस्थ स्वभाव सोडून । धर्मार्थधृतियुक्त होऊन । सुदैवयोगें मानव सुमन । प्रयत्न करिती कल्याणार्थ ॥१७॥
आतां राजस भावाचें वर्णन । ऐक दक्षा चित्त देऊन । राजसगुणांनी युक्त जन । भोगप्रद कर्में सतत करिती ॥१८॥
वासनासंयुक्त स्वधर्मस्थ । तेंच राजस जाण नानाभावगत । राजसजन सर्व भोग भोगित । पुनरपि पतन त्यांचें होई ॥१९॥
येथ जैसें कर्म करिती । तैसें फळ ते लाभती । स्वल्पभावें राजससंभव कर्म करिती । मृत्यूनंतर पुनः भूमीवर ॥२०॥
अथवा विविध नीच योनींत । ते राजस जन्म घेत । जन्ममृत्युपरायण होत । परी नरक त्यांसी नसे ॥२१॥
स्थावर जंगमाचा आश्रय घेती । पुनः पुनः ते जन्मती । तेथ दुःख सुखें भोगिती । यांत संशय कांहीं नसे ॥२२॥
ऐसा राजसमार्गं सांगितल । संक्षेपानें दक्षा तुजला । आतां सात्त्विक मार्ग वर्णनाला । प्रारंभ मीं करितसे ॥२३॥
कामवर्जित सात्त्विकमार्ग । स्वधर्मस्थ जन अनुसरित सुभग । ब्रह्मार्पण करिती कर्म सौख्यग । नानाविध ते सात्त्विक जाण ॥२४॥
त्यायोगें शुक्लगतीनें जाती । मोक्षासी ते निश्चिति । म्हणोनि सत्त्वगुणें युक्त होती । मानव यत्नें करोनी ॥२५॥
यापरता तुरीय मार्ग कथन । संक्षेंपे मीं करीन । स्वभावें चित्त रसहीन । देहसमन्वित तैं होतें ॥२६॥
तेव्हां तुर्यं कर्म संभवत । नानाविध ब्रह्माकारा समस्त । जें जें तुर्यरत कर्म करित । तें तें ब्रह्मपद होतें ॥२७॥
स्तुति निंदात्मक कांहीं तेथ नसत । देवभक्तादिकहीन प्रतिष्ठित । ब्रह्मांत समभावें वर्तत । तुर्यमार्गी साधक सदा ॥२८॥
अंतरांत सर्वंभावांत । विश्वरूपीय तो पाहत । तेव्हां तुरीयगत कर्मं होत । न अन्य कोण्या प्रकारें ॥२९॥
ऐश्या परी सर्व समत्वें वर्तत । तें तुरीयक कर्मंत ज्ञात । प्रारब्धयोगें लाभत । ब्रह्माच्या रसभावानें ॥३०॥
अंतीं अस्मितामयांत । लीन होतो त्यांच्यांत । महाकारणभावें होत । त्रिगुणचालक तुरीय कर्में ॥३१॥
आपुले कैवल्यकर्माचें वर्णन । सांगेन ऐक एकमन । विधिनिषेधहीन जें वर्तन । जें स्वेच्छेनें होत असे ॥३२॥
तें ब्रह्मभूयपर जाण । पांचवें योगिसंमत संपूर्णं । कर्ता देह यांत संदेह न । तुरीयक प्रेरक ख्यात असे ॥३३॥
तेथ राहून विचार करित । मी कोण या प्रश्नाचा अविरत । न मीं नर न ब्रह्म साध्य असत । निरंतर मजलागीं ॥३४॥
भ्रांतीनें सर्व दिसत । मायेनें हें माझ्यांत । स्वेच्छेनें ब्रह्म खेळत । चतुर्भेदमय परम ॥३५॥
शुभाशुभ त्यास नसत । वृथा अहंता नर । त्यागित । ऐशा अनुभवानें शांत होत । अन्यत्र रस त्यास न वाटे ॥३६॥
ब्रह्मरसांत निमग्न । होतो कैवल्य कर्मरत जन । चतुर्विध भावांत स्थान । देहिस्वरूपाचें वर्ततसे ॥३७॥
देहभ्रांतिविहीन करून । सोऽहं मी तोच हा भाव बिंबून । थाक्रमें योगींद्र महान । नरोत्तम होत असे ॥३८॥
हें क्षेत्रक्षेत्रज्ञ साधन समस्त । कथिलें विस्तारें तुजप्रत । वर्णाश्रमाचार सांप्रत । ऐक आतां सर्वसुखद ॥३९॥
हे वर्णाश्रम पाळिता । लाभत । धर्म अर्थ काममोक्ष समस्त । चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त । होती आचारधर्म पाळितां ॥४०॥
चित्तेंन्द्रियें वश्य ठेवित । क्षमा आर्जंव तपोयुक्त । शुचिता श्रुत्तिस्मृति ज्ञानयुक्त । ज्याच्या ठायीं वर्तती ॥४१॥
जो वेदाधारविहीन । कर्म न करी कदाचन । सदा ब्रह्मपर असे म्हणून । ब्राह्मण या नामें ख्यात ॥४२॥
आतां क्षत्रिय धर्माचें कथन । ऐक दक्षा चित्त देऊन । शौर्य दक्षता दृढता दंडधारण । युद्धांत सदा संमुखता ॥४३॥
शरणागताचें संरक्षण । धृति तेजस्विता उदारपणा । सुनीतीनें लोक पाळण । पंचकर्में हीं क्षत्रियाचीं ॥४४॥
क्रयविक्रय भूमिकर्षण । गाईंचें करी पालन । ऐशीं त्रिविध कर्में वैश्य जन । करीतसे निष्ठेनें ॥४५॥
तीन वर्णांची सेवा करित । दान घेत नाममंत्र जपत । पुराण श्रवण नित्य करित । पुराणिकाच्या मुखांतून ॥४६॥
ऐसें अंत्यजांचें कर्मं वर्तंत । कर्मं द्विजमुखें पुराणोक्त । शूद्रासम अस्पृशत्व नसत । अन्य द्विजादिवर्णांत ॥४७॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुळांत । यज्ञोपवीत विधि करित । वेदादिक ते अभ्यासित । ब्रह्मवर्यव्रत धरोनी ॥४८॥
भिक्षा मागून नित्य जेवित । गुरुची आज्ञा पाळित । गायत्रीचा जप करित । त्रिकाळांत हे त्रिवर्ण ॥४९॥
सायंप्रातः हवन करित । जितेंद्रय हे त्रिवर्ण असत । सोडा अथवा बारा वर्षें आचरित । ब्रह्मचर्य परम निष्ठेनें ॥५०॥
पंचयज्ञपर सतत । नित्य नैमित्तकर्मे करित । विवाह करीत प्रयार्थ । ऋतुकाळीं पत्नीसुख भोगी ॥५१॥
नंतर वानप्रस्थ आश्रमांत । स्त्रीसंगाचा त्याग करित । अथवा स्त्रीसह वनांत । संगवर्जित राहतो ॥५२॥
वन्यभावें सर्व कर्में करित । तपश्चर्येंत मग्न असत । नखलोमांनीं सदा युक्त । गांवांत न प्रवेश करी ॥५३॥
वायुभक्षणादिक आचरत । मनानेंही स्त्रीसंग टाळित । चित्त निग्रह करून संन्यस्त । भिक्षान्न खाऊन निर्वाह करी ॥५४॥
पैशासही स्पर्श न करित । धन सारे वर्ज्य मानित । ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । तदर्थ सदा श्रम करी ॥५५॥
साक्षिवत्‍ देहांत राहत । मौनादि नियम पाळित । अथवा दंडहीन तो वर्तत । ज्ञान हाचि दंड त्याचा ॥५६॥
ऐसा संन्यासाश्रम घेऊन । सदा राही आत्मरत महान । मुक्तिमार्गं मय शास्त्र पावन । केवळ त्याचाच विचार करी ॥५७॥
अन्य शास्त्रांस न स्पर्शित । ऐसा संन्यासी ख्यात । चारवर्णाश्रमविहीन वर्तत । तो पांचवा योगी जाणा ॥५८॥
विधिनिषेधहीन । तो विनायक शोभन । ऐसें हें स्वधर्माचरण । सर्वही तुज सांगितलें ॥५९॥
याचें पालन करित । त्या नरास बह्म प्राप्त । तेव्हां दक्ष पुनरपि प्रार्थित । धर्मार्थकाममोक्षरूप सांग ॥६०॥
ब्रह्मीभूत नराचें स्वरूप वर्णन । भ्रमनाशकर माज लागून । सांगा श्रेष्ठ पुरुषार्थ पावन । कोणता असे तेंही सांगा ॥६१॥
कोणी काम श्रेष्ठ म्हणती । कोणी कामाची स्तुति गाती । कोणी अर्थास श्रेष्ठ ठरविती । मोक्ष श्रेष्ठ अन्यांस ॥६२॥
कोणी ब्रह्मभूय़ श्रेष्ठ मानित । याचा निर्णय काय असत । तें सांगा सर्व मजप्रत । मुद्‍गल तेव्हां सांगती ॥६३॥
धर्मानें ब्रह्मलोक लाभत । ब्रह्मा सर्व समान असत । स्वधर्माख्य ज्ञात । धर्म म्हणजे स्वधर्मं ॥६४॥
अर्थ म्हणजे समर्थभाव । त्यानें ईशलोकप्राप्तीचा संभव । ईश्वराहून अन्य समर्थं भाव । युक्त नसे ब्रह्मांडांत ॥६५॥
काम हा भोगात्मक ख्यात । विष्णुलोक प्रदान । असत । तो लक्ष्मीपति देत । नाना काम सर्व जनांसी ॥६६॥
मुक्ति सौरात्मिका ख्यात । सूर्य हाच पुरुष ज्ञात । शुक्त मार्गधर साक्षात । पूर्ण साक्षी विभावसू ॥६७॥
ब्रह्मीभूतमय वर्तत । स्वनंदपूर्ण योगद असत । त्याहून परता लोक नसत । स्वानंदलोक श्रेष्ठ असे ॥६८॥
अन्य एक ऐक वृत्त । पांचही हे योगप्रद उचित । योगार्थ वाचक सर्व असत । त्यांतला भेद सांगेन ॥६९॥
योगधर्मांत लाभ्त । योग सर्व मानवांसी जगांत । योगाहून अन्य श्रेष्ठ नसत । म्हणून हा अर्थं रूढ ॥७०॥
योगकामास योग लाभत । सर्वभावें निश्चित । मायेचें संवरण त्यागित । तैं मौक्षयोग साधतसे ॥७१॥
ब्रह्म ब्रह्मांत वेदांत । वसतसे संशयातीत । तें योगसाधनें होने । योगी ब्रह्मभूत निश्चयें ॥७२॥
धर्म अर्थं काम मोक्ष । योगशास्त्रांत चार प्रत्यक्ष । भिन्न मायामय परोक्ष ब्रह्मीभूत पांचवा असे ॥७३॥
ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । योगी त्या नरास म्हणत । ब्रह्माहून भिन्न नसत । ब्रह्मगत परम सर्वदा ॥७४॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन क्षेत्रक्षेत्रज्ञज्ञानयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP