खंड ९ - अध्याय ३०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत म्हणत सुमेधा नाम राजा असत । नानाधर्मपरायण महाबळवंत । मानी दाता चाक्षुषांत । सर्वशास्त्रार्थ तत्त्वज्ञ ॥१॥
द्विज देव अतिथीस असत । प्रिय तो महा सप्तद्वीपाधिप ज्ञात । करी राज्य श्रद्धायुक्त । सर्वांसी सदा हितकर्तां ॥२॥
परी वंध्यदोषयुक्त । नृप तो दुःख फार करित । नाना उपाय योजित । पुत्रप्राप्तिस्तव आदरें ॥३॥
परी त्यास पुत्र न झाला । मोदप्रद जो होत पित्याला । या विचारें दुःख मनाला । पत्नीच्या तैसें त्याच्याही ॥४॥
धर्मपत्नीचा विचार घेऊन । तिच्यासह राज्य सोडून । प्रधानांवरी राज्यधुरा ठेवून । घोर वनांत तो गेला ॥५॥
भ्रांतचित्त तो सुमेधा भटकत । तेव्हां भयद महावन पाहत । मरणाचा निश्चय करित । महावनांत त्या प्रवेशल ॥६॥
तेथ व्याघ्र मृग सर्प असत । ते त्या राजास पाहत । प्रियेसहित भ्रांतियुक्त । महायोगींद्र क्रतु भाग्यें आला ॥७॥
त्या क्रतु मुनीस नमित । राजा भक्तीने स्त्रीसहित । त्या विधिपुत्रास स्तवित । तेजोयुक्तास हे प्रजापते ॥८॥
त्या स्तुतीनें संतुष्ट होत । नंतर त्या महिपालास आश्वासन देत । राजा दुःख कोणतें तुझ्या मनांत । घोरवनीं कां आलास ? ॥९॥
राजा तेव्हां स्ववृत्तान्त । त्यास संपूर्ण सांगत । तो ऐकून ध्यानयुक्त । जाहला तो मुनिसत्तम ॥१०॥
तदनंतर तो क्रतु सांगत । त्या नृपास आनंदवित । मौद्‍गलपुराण श्रवण करी निश्चित । पुत्र तुला होईन ॥११॥
राजशार्दूंल तें ऐकून मुदित । त्या प्रणाम करून जात । आपल्या नगरांत बोलावित । पुरोहितास आपुल्या ॥१२॥
त्याचा ऐकून वृत्तान्त । शांडिल्य गुरू सर्व शास्त्रज्ञ म्हणत । महीपालास हर्षभरित । मौद्‍गल पुराण मी आणवीन ॥१३॥
तें सर्वसिद्धिप्रद पुराण । नृपा तुज ऐकवीन । चिंता करूं नको वचन । हें शांडिल्य गुरूचें ॥१४॥
ऐसें बोलून तो जात । क्रतु योगींद्रासमीप त्वरित । यथान्याय मौद्‍गल ऐकत । लिहवून घेतलें तें समग्र ॥१५॥
तें करून संपन्न जात । सुमेधस नृपाप्रत । तया हितकारक वचन सांगत । मौद्‍गला सम अन्य नसे ॥१६॥
हें अनुपम शास्त्र सर्वसिद्धिप्रद । क्रतुप्रसादें मज विशद । आतां नित्य ऐका बोधप्रद । संपूर्ण हें मुद्‍गल पुराण ॥१७॥
ऐसें ऐकून स्वयं करित । वाचनास हर्षभरित । नृपसत्तम तें ऐकत । प्रणाम करून । भक्तिपूर्वक ॥१८॥
सुमेधा म्हणे पहा मूहर्त । शुभप्रद सांप्रत । त्या वेळेपासून अविरत । मौद्‍गल मजसी सांगावें ॥१९॥
शांडिल्य तेव्हां नुपास म्हणत । क्षणभंगुर हा देह असत । याचा विश्वास कांहीं नसत । विघ्नराजाचें स्मरण करावें ॥२०॥
तोच मुहूर्त शुभ मानून । नृपशार्दूल गणेशास स्मरून । सर्वसिद्धिप्रद पुराण । स्मरण करावें केव्हांही ॥२१॥
गणपती तेथें स्मरण । तोच शुभ मुहूर्त जाणून । करावा प्रारंभ मनापासून । ऐसा नृपा तूं विचार करी ॥२२॥
तें नृपास मान्य होत । मौद्‍गल पुराण नित्य ऐकत । शांडिल्य तें सार्थ वाचित । धर्मवेत्ता जो महान ॥२३॥
तदनंतर स्वल्प काळानंतर । राजपत्नी गर्भवती होऊन समग्र । राजसदन हर्षनिर्भर । राजा तोयला अत्यंत ॥२४॥
योग्य काळीं होत । प्रसूत । पुत्र झाला सर्वलक्षणयुक्त । राजा नित्य नेम ऐकत । मुद्‍गल पुराण आनंदानें ॥२५॥
एकनिष्ठ भावें आदरें श्रवण । केलें त्यानें पुराणश्रवण । त्यायोगें गणेशप्रिय होऊन । नगरासहित गेला गणेशलोकीं ॥२६॥
तेथ गणेशास पाहत । त्यायोगें होत ब्रह्मभूत । समग्र प्रजाजनांसहित । पुराणश्रवणाचें हें श्रेष्ठ फळ ॥२७॥
शांडिल्यही नवांत जाऊन । नित्य करी विघ्नेशाचें भजन । गणेशाच्या पुढयांत मुद्‍गलाचे वाचन । केलें त्यानें भक्तीनें ॥२८॥
नित्य होऊन तत्पर । भावयुक्त करी वाचन तो उदार । शांतियोगयुक्त करी थोर । होऊन सेवी गणपतीसी ॥२९॥
सर्वत्र सर्वमान्य होत । ब्राह्मण श्रेष्ठ अग्रणी ख्यात । अंतीं गणेश्वराप्रत जात । योगिवंध महायश झाला ॥३०॥
त्याच्या आश्रमांत ख्यात । गणेशाचें क्षेत्र अद्‍गभुत । त्याचें दर्शन घेतां लाभत । सर्व सौख्य जनांसी ॥३१॥
ऐसे जे नित्य जपत । मौद्‍गल पुराणे जन जगांत । ते येथ भोग समस्त । भोगून अंतीं ब्रह्मभूत होती ॥३२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे मुद्‍गलदक्षसंवादे मौद्‍गलनित्यश्रवणमाहात्म्यवर्णनं नाम त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP