खंड ९ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शुक्लकृष्णगतींचें वर्णन । करी मुद्‍गल महर्षे प्रसन्न । ज्यायोगें मुक्ति लाभून । संसारतारकयोग्य सर्वतारक ॥१॥
मुद्‍गल तेव्हां दक्षात सांगती । कर्माची त्रिविध गती । कर्म अकर्म विकर्म असती । त्यांचें सांगतों वर्णन ॥२॥
स्वधर्म वर्जित सर्व कर्म । तें जाणावें विकर्म । स्वधर्मसंयुक्त जें कर्म । भोगवासनायुक्त असे ॥३॥
तें कृष्णगतिप्रद कर्म । ब्रह्मार्पणतेनें स्वधर्मस्थ कर्मं । तें शुक्लगतिमय अभिराम । मुक्तिद तें अकर्मक ॥४॥
अग्नि ज्योती उत्तरायण । दिवस शुक्तगतिमय जाण । मुक्तिदायक परम पावन । ऐसीं लक्षणें दक्षा असतीं ॥५॥
चंद्रज्योती धूम रात्री । दक्षिणायन ही कृष्णगति । ती जन्ममृत्यूची रीती । पुनर्जन्मप्रद असे ॥६॥
त्यांच्या भेद लोकहितार्थं । सांगतों मीं सांप्रत । ज्यानें द्वैध त्यागून ब्रह्मांत । विरत होईल साधक ॥७॥
निष्काम कार्यं करून । जेव्हां येतें नरा मरण । रात्री असता दक्षिणायन । त्या नरा देवता न नेती ॥८॥
देवभोग तिरस्कारित । ब्रह्मार्पणपरायण असत । त्या नराचें काय हित करित । देव स्वर्गसुखप्रद ॥९॥
म्हणून दहन होता तो जात । अग्नि ज्योतिरादि मार्गांत । दिवस होता प्राप्त । दैवतग तो होतो ॥१०॥
उत्तरायण लागता जात । तो सूर्य मंडळांत । मंडळाच्या प्रळयीं नाश होत । तैं तो पुरुषग होई ॥११॥
महाप्रलयवेळीं प्रकृति पुरुष । जेव्हां पावती विनाश । तेव्हां तो ब्रह्मांत जात । ब्रह्मभूत तैं होईल ॥१२॥
सकामक कर्म करून । दिवसा असता उत्तरायण । मृत नरास भानु न स्वीकारी मन । कारण त्याचें कामनायुक्त ॥१३॥
उन्हाळयांत धूमसंस्थ । जेव्हां रात्र सुरू होत । तेव्हां तिचा आश्रय घेत । तैसाचि राहे तो नर ॥१४॥
दक्षिणायन लागतां आनंदें पाहन । तत्क्षणीं विमानांत बसत । आकाशमार्गें स्वर्गांत । जाईल तो नर तेव्हां ॥१५॥
चांद्र ज्योतीचा आश्रय घेऊन । स्वकर्मज भोग भोगून । कर्मप्रमाणमार्गें जाण । जात तो नाना स्वर्गपरायण ॥१६॥
विधि तेथला सांगेन । चंद्रकला समुद्‍भूत मधुर पान । अमृत देवलोकांत पिऊन । स्वर्गांत भोगद तो धन्य ॥१७॥
येथ जें पूर्ण कर्म करित । नर तें होय अमृत । त्यायोगें चंद्रलोकांत । त्यायोगें कलायुक्त सर्व ॥१८॥
शुक्त पक्षीं क्रमानें वाढत । हा चंद्र अमृतयुक्त । पूर्णिमेच्या रात्रीं दिसत । स्वयंपूर्ण पूर्णमंडळ ॥१९॥
कृष्णपक्षीं देव समस्त । क्रमानें अमृतपान करित । चंद्रसंस्थ तें उपभोगित । तृप्तिकारक आकंठ ॥२०॥
त्यायोगें तृप्त होत समस्त । त्या त्या महिन्यानुसार मनांत । अमावास्था दिनीं पडत । औषधींत चंद्रमा ॥२१॥
म्हणून औषधी न तोडाव्या । अमावास्यादिनीं राखाव्या । चंद्रसंयोगयुक्ता मानाव्या । सुखपरायण त्या सार्‍या ॥२२॥
म्हणून चंद्रभव सर्व अमृत । देवभूमींत वर्तत । चांद्रः स्वर्ग ऐसें म्हणत । म्हणून वेदवादी जन ॥२३॥
देवांची विविध कर्में करून । सकाम कर्मांगदेव पूजून । ती क्रिया समर्पण करून । जाई त्या त्या देवलोकीं ॥२४॥
त्या त्या लोकांचें सुख अनुभवित । नाना योगांनीं युक्त । भोग भोगून अंतीं अवतरत । मेघमंडळांत तो जीव ॥२५॥
तेथ जलमय होऊन । वृष्टिरूपें भूमिवर पतन । नंतर औषधिस्थ राहून । तदनंतर अन्नमय ॥२६॥
त्यापुढें पुरुषवीर्यांत । तो जीव प्रवेश करित । तें वीर्य स्वीयोनींत । पडता स्त्रीजठरीं प्रवेशे ॥२७॥
तेथ तत्त्वें त्याच्यांत । दक्षा प्रवेशती निश्चित । क्षेत्रज्ञ तेथ । संस्थित । तत्त्वांनी क्षेत्र निर्माण करी ॥२८॥
त्याचा विधि तुज सांगत । जो गर्भोंपनिषदांत वर्णित । तेथ एक दिवसांत । स्त्रीवीर्यांत रक्तमय ॥२९॥
त्यांत संमीलन करून । तदाकार होतो नर लाभून । त्यानंतर तीन दिवसांनीं जाण । भेदरूप तो होतो ॥३०॥
बुडबुडा पांच दिवसांनीं होत । सात दिवस जातां पेशी लाभत । त्यानंतर तीन दिवसांनीं फुलत । जीव जननी उदरांत ॥३१॥
पंचवीस दिवसांनी मांसरूप होत । कठिण होत एका महिन्यांत । दोन महिन्यांनी शिरयुक्त । गर्भ आईच्या उदरांत ॥३२॥
तिसर्‍या महिन्यांत कंठयुक्त । चतुर्थमासीं त्वचायुक्त । पांचव्या मासीं जंतू होत । इंद्रियादींनीं क्रमें युक्त ॥३३॥
सहाव्या महिन्यांत तो होत । अवयवादि संयुक्त । नख रोम समन्वित । मुखसंयुक्त तेव्हां गर्भ ॥३४॥
तेव्हां इंद्रियसंभूत । ज्ञान त्यास क्रमानें होत । सहा महिने पूर्ण होत । आकृति तैं पूर्ण होई ॥३५॥
पूर्व कर्मानुसार जी योनि लाभत । तैशी आकृति प्राप्त । इंद्रियें तदनुसार फुटत । सातव्या महिन्यांत चेतना येई ॥३६॥
मग मातेच्या उदरांत । तो गर्भ चलन वलत करित । मातेच्या दुःखाने युक्त । पोटांत अवकाशविहीन ॥३७॥
तेव्हां तो जंतूनीं पीडित । होई क्षणांत मूच्छित । पुनरपि संज्ञा लाभत । अति कोमल मानव ॥३८॥
आठव्या महिन्यांत बुद्धियुक्त । सांख्य योगपर होत । सनातन ब्रह्म ध्यात । अतिसंकोचें त्रस्त तेव्हां ॥३९॥
जंतु त्यास उदरांत पीडिती । मातेच्या आहारदोषें होती । वेदना त्या गर्भाप्रती । शीत उष्मादि भोजनें ॥४०॥
गर्भं दूःख तें जाणून । त्याची निवृत्ति व्हावी म्हणून । आदरें सांख्ययोगपर होऊन । गणनायका त्या भजतसे ॥४१॥
तेव्हां त्यास होत ज्ञात । परम सौख्यद पावन । अनंत जन्मींचें दुःख पाहून । दुःख त्याचें शमतसे ॥४२॥
अनन्य मनानें देवास स्तवित । महामति स्तोत्र गात । गर्भवास प्रशांत्यर्थ । ब्रह्मभूयार्थ आदरानें ॥४३॥
गर्भ मातेच्या उदरांत । गजाननाचें स्तोत्र गात । गणनाथासी मीं वंदित । ब्रह्मयासी ब्रह्मरुपासी ॥४४॥
अनाथाच्या प्रणाथास । विघ्नेशास ज्येष्ठराजास । देवांसी देवदेवेश मूर्तीस । अनादीसी तुज नमन ॥४५॥
परेशासी आदिपूज्यासी । सर्वपूज्यासी सर्वांच्या सर्वरूपासी । सर्वादीसी परब्रह्मासी । सर्वेशा तुज नमो नमः ॥४६॥
गजाकारस्वरूपासी । गजाकारमयासी । गजमस्तकधारकासी । गणेशा तुज नमो नमः ॥४७॥
आदि मध्यांतभावासी । स्वानंदासी आदिमधयंतहीनासी । आदिमध्यांतगासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी नमन असो ॥४८॥
सिद्धिबुद्धिविहारीसी । सिद्धिबुद्धिमयासी । ब्रह्मेशासी शिवासी । शक्तीसी माझें नमन असो ॥४९॥
भानुरूपासी विष्णूसी । मायिकांना मायेनें मोहदासी । गणाधीशा नमन तुजसी । पुनः पुनः मीं करीतसें ॥५०॥
किती करावें स्तवन । जेथ वेदादी धरिती मौन । शांति धरिती योगी जन । म्हणोनि नमितों भक्तीनें ॥५१॥
मज गर्भदुःखांतून वाचवी । शरणागतावर कृपा करावी । जन्ममृत्युविहीन पदवी । द्यावी मज तुझी पदभक्ती ॥५२॥
ऐसी स्तुति गर्भ करित । नऊ महिनें जेव्हां पूर्ण होत । प्रसूतिज महावायू फेकित । मातेच्या उदराबाहेर जीवासी ॥५३॥
वायूनें होऊन विचलित । त्या गर्भास मूर्च्छा येत । संकीर्णांन दुःखयुक्त । योनिमार्गें पडे धरणीवरी ॥५४॥
जन्मानंतर सावधान । होतां विसरे उत्तम ज्ञान । बाळभावें करी रुदन । धरणीतळावर पडून ॥५५॥
गर्भागारीं जैं केलें । सर्व तें स्मरण फलहीन झालें । ज्ञानादिक सर्व विसरलें । भूमीवरी तैं विभिन्न ॥५६॥
जैं नरें न साधिलें । कर्म भूमींत ज्ञानादिक भलें । तेव्हां गर्भज दुःख सगळें । भोगी जीव प्रजापते ॥५७॥
ऐसी ही कृष्णा गति तुजसी । सांगितली सर्व विशेषीं । जन्ममृत्यु करी जंतूसी । सुखदुःखप्रदायिनी ॥५८॥
हें गर्भकृत स्तोत्र वाचील । जो मानव तो भोग भोग भोगील । अन्तीं स्वानंदाप्रत जाईल । गर्भवास चुकेल त्याचा ॥५९॥
म्हणोनि विशेषें जाणावें । मानवानें हें स्तोत्र वरवें । त्यानें जन्ममृत्यूच्या सुटावें । फेर्‍यांतून गणेशकृपेनें ॥६०॥
आतां अन्य अर्थ सांगेन । सुखप्रद जो महान । शुक्ल कृष्णगतिसंस्थ असून । ज्यानें ज्ञान त्यांचें होय ॥६१॥
भक्तिमुक्ति प्रलोभार्थ । निरंतर कर्म करावें येथ । स्वधर्म संयुक्त नाना दैवत । योगवेत्त्या नरानें ॥६२॥
उत्तरायणांत सूर्य असत । दिवसा तेव्हां जो नर मृत । तो अग्निलोकीं जात । तपोयुक्त होतो सदा ॥६३॥
तेथ भोगाची इच्छा जळून । जाईल शक्तिजवळी श्रद्धावान । महमति तेथ अभिमान सोडून । दिवसा दिवाकराकडे जाई ॥६४॥
तेथ अति ध्यानयुक्त । आत्मरूपाचें चिंतन करित । अंतरात्म्यास सोडून जात । वैकुंठाप्रत तो जीव ॥६५॥
तेथ आनंद त्यागून । शिवाकडे करी गमन । तें साक्षित्व तेथ त्यागून । जाई स्वानंदाप्रत निश्चयें ॥६६॥
तैं गणेश्वरास तेथ पाहून । ब्रह्मीभूत होतो नर पावन । शुक्लगतिप्रभावत महान । ऐसा असे प्रजापते ॥६७॥
जेव्हां सूर्य दक्षिणायनांत । असे तेव्हां मृत रात्रींत । भुक्तिमुक्तिपर तो जात । स्वर्गलोकीं नंतर नर ॥६८॥
नाना स्वर्गफळें भोगत । आपापल्या कर्मानुसार तेथ । पुनरपि भूमिवरी पडत । मोक्षरुचि तो होतो ॥६९॥
तेथ शुक्लगतीचा आश्रय घेत । योगी मोक्षास जात । ऐसा हा मार्ग गतींचा असत । पुरातन मार्ग दक्ष प्रजापते ॥७०॥
तो एक देवतेचा आश्रय घेत । त्या देवतेचा तत्पर भक्त । उपासनाविधानें भजत । सद्धर्मस्थ त्या देवतेसी ॥७१॥
तो मृत्यूनंतर जात । आपुल्या इष्ट देवांच्या लोकांत । तत्क्षणीं चंद्रसूर्याख्य मार्ग नसत । प्रकीर्तिंत लोकांत ॥७२॥
तेथ भोग भोगून पडत । परत त्या इहलोकांत निश्चित । त्रिगुणात्ममय देव असत । त्यांचा नाश होतांची ॥७३॥
परी गणेश्वरास जो भजत । मानव या इहलोकांत । तो स्वानंद लोकीं जात । ब्रह्मीभूत तो होईल ॥७४॥
स्वानंदनाशहीन । ब्रह्मसुखप्रद पावन । स्वानंदीं आश्रय पावून । ब्रह्मीभूत म्हणून नरा ॥७५॥
मरणसमयीं दाहहीन । तेजतत्त्वांचा आश्रय घेऊन । अथवा धूम्रतत्त्वांत मिळून । शुक्लकृष्णगतिश्रित ॥७६॥
पूर्ववत्‍ सर्व आख्यात । प्रजापते त्या जीवाचें चरित । ऐश्यापरी गतींचा विस्तार तुजप्रत । सांगितला दक्ष प्रजापते ॥७७॥
म्हणून गणेश्वराचा आश्रय घेत । त्याचें हित सदा होत । तो योगक्षेम चालवित । अनन्यहृदय भक्तांचा सदा ॥७८॥
दक्षा तूही गणेश्वरास भजशील । तरी शुक्लकृष्णगती सुटतील । ब्रह्मभूतमय भाव लाभशील । यांत कांही संशय नसे ॥७९॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन शुक्लकृष्णगतियोगो नाम द्वाद्वशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP