खंड ९ - अध्याय २४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूताप्रत । तूं अपूर्व ज्ञान मज सांगत । एक श्लोकपद ऐकूनही होत । येथ ब्रह्ममय मानव ॥१॥
अहो आश्चर्य सुविख्यात । पापी चांडाळ एक ऐकत । मुद्‍गल पुराणाचा एक श्लोक पुनीत । त्यायोगें ब्रह्मभूत झाला ॥२॥
तरी संपूर्ण मुद्‍गलाचें श्रवण । करितां केवढें लाभेल पुण्य । तें माहात्म्य विशद करून । दयासिंधो मज सांगा ॥३॥
तेव्हां सूत शौनकास सांगत । सर्वं सशयाचा अंत करित । चांडाळास घेऊन जात । गणेशदूत स्वनगरासी ॥४॥
तें पाहून आश्चर्यसंयुक्त । यम ब्रह्मासमीप जात । त्या विधात्यास प्रणाम करित । नंतर म्हणते विनयानें ॥५॥
ब्रह्मदेवें संमानित । यमधर्म तेव्हां सांगत । मौद्‍गल पुराणाचें अद्‍भुत । माहात्म्य मजला आतां दिसलें ॥६॥
चांडाळ जो होता पापरत । त्यानें एक श्लोक ऐकून प्राप्त । ब्रह्मपद याचें रहस्य मजप्रत । कौतुक काय हें सांगावें ॥७॥
ऐसें सर्व ज ब्रह्मज्ञानयुक्त । स्वानदलोकीं जातात । हे पुराण जे ऐकत । ते उद्धरती सर्व लोक ॥८॥
त्यायोगें क्षीणता दूर होतां । विश्वास येईल तत्त्वता । तरी यत्नपर होऊन आतां । विश्वाचें रक्षा करावें ॥९॥
माहात्म्य या मुद्‍गलपुराणाचें । कैसें अपार केलें साचें । स्वांई मजला संपूर्ण त्याचें । वर्णन सांगा मीं अज्ञ असे ॥१०॥
यमधर्माचें ऐकून वचन । पितामह ब्रह्मा करी कथन । निःश्वास प्रदीर्घं । विप्रेशा देवरक्षक ऐक वचन ॥११॥
गणेशानें स्वभक्ति स्तव उदार । रचिलें स्वयं हें मोद्‍गल थोर । भक्तीनें यास प्रार्थितां नर । सर्व सिद्धि लाभतसे ॥१२॥
त्याचें माहात्म्य अशेष । जाणण्या समर्थं कोण विशेष । सुर्यपुत्रा हें निर्विशेष । मजही ज्ञात न महिमान ॥१३॥
ऐसें बोल्न स्वयं सहदेव । मुख्य देवासासी स्मरे एकभाव । विप्रेन्द्रा ते सर्व देव । येऊन कारण विचारिती ॥१४॥
ब्रह्मा सांगे तयांप्रत । धडला जो सर्व वृत्तान्त्त  । तो ऐकून ते देवही होत । खेदपूर्ण त्या वेळीं ॥१५॥
तेव्हां विष्णु तयांस सांगत । यमधर्मांसहित विधीप्रत । तुला करावी भक्तियुक्त । मौद्‍गल पुराणाची विधे ॥१६॥
ह्या पुराणाच्या तुलनेंत । समभार किती साधनें होत । ज्यानें साधेल हित । तें पहावें प्रत्यक्ष ॥१७॥
तें ऐकून विविध साधनें एकत्रित । करून एका पारडयांत । स्थापून तैसें हें पुराण ठेवित । दुसर्‍या पारडयांत ब्रह्मदेव ॥१८॥
परी मुद्‍गल पुराणाचें । पारडें जडचि राहिलें साचें । वजन करितां इतर साधनांचें । लघुत्व प्रत्यक्ष दिसून आलें ॥१९॥
तेव्हां सर्व देव मुनि खेदयुक्त । आदरानें विचार करित । या मौद्‍गल पुराणानें निश्चित । अर्व विश्व जिंकलें असे ॥२०॥
या मुद्‍गल पुराणाच्या श्रवणें प्राणी । विविध भोग भोगूनी । अंतीं ब्रह्मांत जातीत क्षणीं । योगिजनांसम विश्चित ॥२१॥
त्यायोगें स्वल्प काळांत । हें विश्व होईल विनष्ट । आपण सारे विहारवर्जित । होणार यांत संशय नसे ॥२२॥
तरी मौद्‍गल माहात्म्यांत । कोणतें विघ्न करावें उपस्थित । जेणें हे पुरान सोडून अन्यचित्त । देवादिक सारे होतील ॥२३॥
तेव्हां शंभु स्वयं सांगत । जें होणार तें होवो भविष्यांत । परी मौद्‍गल पुराण श्रवणांत । आणूं नका विघ्ने विचक्षण हो ॥२४॥
या पुराणाच्या मार्गांत । विघ्न आणितां क्रोधयुक्त । गजानन करील भस्मसात । ईश्वरासहित सर्व जग ॥२५॥
शिवाचें वचन ऐकत । तेव्हां सुरर्षी होत भयभीत । ब्रहस्पति तयांस म्हणत । गणपतीसी स्मरोनि चित्तीं ॥२६॥
गणेशानें महेशहो रचिलें । हें उत्तम विश्व भलें । नानाभावस्थ मौद्‍गल रूप दिले । रूप त्यानें तयासी ॥२७॥
मौद्‍गलांतचि गणनाथाचें वचन । देवही स्पष्ट आश्वासन । महाप्रलयपर्यंत जीवन । राहील निरंतर या विश्वाचें ॥२८॥
तैसें मौद्‍गल मार्गांत । विघ्न केव्हां येईल हेंही निश्चित । त्यानेंच ठरविलें असत । तें मिथ्या कदापि न होईल ॥२९॥
म्हणून गणेश्वरास प्रार्थून । नंतर विघ्न करा निर्माण । तरी क्षुब्ध न होईल गणेशान । ऐसें मजला वाटतसे ॥३०॥
बृहस्पतीचें ऐकून वचन । देव हर्षोत्फुल्ल मन । मुनिजनही आनंदून । म्हणती उत्तम उपाय हा ॥३१॥
तदनंतर ते विघ्नराजास स्तविती । कर जोडून प्रणाम करिती । नाना स्तोत्रें तेथ गाती । तेणें प्रसन्न गणराज ॥३२॥
स्वयं तेथ प्रकट होत । आकाशवाणीद्वारा सांगत । विकल्प मुद्‍गल पुराणांत । निर्माण करूनी व्हावें सुखी ॥३३॥
ती आकाशवाणी ऐकत । गणेशरूपाची साक्ष पटत । ब्रह्मदेव तेव्हां स्मरत । पुनरपि त्या गजाननासी ॥३४॥
ब्रह्मा नंतर निर्मित । विकल्प संशयाकार महातेजयुक्त । त्यास पाहून संशयग्रस्त । जाहले देव मुनिजन ॥३५॥
त्या सर्वांच्या चित्तांत । तत्क्षणीं ऐसा विकल्प येत । मौद‍गल पुराणानें निश्चित । विघ्नेश प्रसन्न का ॥३६॥
गणेश ब्रह्मनाथ असत । तो देहधारी कैसा होत । मणोनि मुद्‍गल पुराण कथित । हें सारें अर्थवादपर ॥३७॥
वेदादींतही वर्णन । रुच्यर्थ वाटे सगुण । ब्रह्म जें ब्रह्मस्थित महान । तेंच सर्वमान्य विशेषें ॥३८॥
ऐसा संशय व्यक्त करून । मायेनें मोहित होऊन । विकल्पानें युक्त मन । ते समस्त गेले स्वस्थानाला ॥३९॥
ते कोणत्या कारणें एकत्र । आले होते विचारार्थ । तें सारें ते विसरून जात । भ्रांतचित्त संशयानें ॥४०॥
तदनंतर मौद्‍गलाचा त्याग करिती । नाना भावपर चित्तीं । विप्र सारे मग्न होती । अन्य क्रियांत सर्वत्र ॥४१॥
विकल्प त्यांस विलोकित । जाहला अत्यंत हर्षयुक्त । पसरला तो त्रैलोक्यांत । नाना संशयकारक ॥४२॥
त्यायोगें सर्वजन । विसरले मुद्‍गल पुराण पावन । कालांतरानें तें पुराण । नष्टप्राय जाहलें ॥४३॥
अन्य पुराणें सर्व वेद गुप्त । नष्टवत झाले समस्त । कुठें तरी स्वल्पभावें स्थित । चराचर कर्महीन झाल्लें ॥४४॥
देव तैं  दुःखयुक्त होऊन । विकल्पाशीं लढण्या येती उन्मन । परी विचारप्रभावें पराभव पावून । नष्टवीर्य ते झालें ॥४५॥
तेव्हां देव सारे स्तवन करिती । गजानन देवास वंदिती । विकल्प हननास्तव प्रार्थिती । पुनरपि आकाशवाणी तैं झाली ॥४६॥
गजानन त्या रूपें सांगत । मुद्‍गल आज्ञावश समस्त । क्रिया कराल जरी जगांत । विकल्प तुमच्या वश होईल ॥४७॥
चिन्ता करूं नका मनांत । हें वचन संशयातीत । ऐसें बोलून थांबत । गणाधीश त्या वेळीं ॥४८॥
तेव्हां ते शिवविष्णु मुख्य अमर । जाहले हर्षनिर्भंर । कश्यपादी मुनिवर । मुद्‍गल योग्याकडे जाती ॥४९॥
मुद्‍गलांस प्रणाम करून । भावनम्र म्हणती वचन । विकल्पजयद उपाय सांगून । उपकृत आम्हां करावें ॥५०॥
त्यांची प्रार्थंना ऐकत । तेव्हा मुद्‍गल हास्ययुक्त । त्या समस्तांस पूजित । नंतर हितप्रद वचन बोले ॥५१॥
त्या मायायुक्त देवर्षींस सांगत । उपाय जो त्या वेळीं पुनीत । त्याचें वर्णन पुढिले अध्यायांत । रसाळ तें वाचावें ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे विकल्पविजयी नाम चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पंणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP