खंड ९ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । सूत शौनकाप्रत सांगत । भार्गव वंशज कपिल नामें असत । सर्वशास्त्रपारंगत । कपिलवरेंच तो जन्मला ॥१॥
तो सुधर्मज तपाचरण करित । योगानिष्ठ अत्यंत । योगार्थ तो शुनक मुनीस भेटत । विनयें त्यास प्रणाम करी ॥२॥
आर्जवयुक्त तेथ राहत । महाभागा स्वपित्यास विचारित । योगशांतिप्रद योग मजप्रत । नाथा मजसी सांगावा ॥३॥
तूं गुरु मजप्रत । भव सागरांतून तारी त्वरित । शुनक तेव्हां त्यास सांगत । विश्वें ब्रह्में हीं ज्यापासून ॥४॥
उत्पन्न होतीं राहतीं । ज्या आधारें त्यांची स्थिति । ज्यांच्या ती लीन पावती । तो हा लंबोदर योगप्रद ॥५॥
त्याच्या उदरांत स्थित । ब्रह्म विश्व समस्त । त्यास भज तूं सतत । त्यानें शांति लाभेल तुला ॥६॥
ब्रह्मीभूत तूं होशील । अन्यथा मुक्ति न प्राप्त निर्मल । सिद्धिबुद्धिविमोहित दुर्बंळ । भ्रांतीत तूं राहशील ॥७॥
ऐसें बोलून महायोगी थांबात । शुनक त्यास कपिल नमित । आपुल्या आश्रमीं परतत । त्याची आज्ञा घेऊन ॥८॥
लंबोदर चरित मौद्‍गलांत । तें तो जपे भक्तियुक्त । गणेशास नित्य पूजित । भक्तिभावपरायण ॥९॥
त्यानें संतुष्ट होऊन । गणेश देई वरदान । योग शांतिप्रद त्याचें ज्ञाने । कपिलासी भक्तवात्सल्यें ॥१०॥
शांतियुक्त स्वयं होऊन । योगी जपे तें चरित महाण । नित्य पूजापर मन । लंबोदराच्या सान्निध्यांत ॥११॥
तेथ आश्चर्य एक होत । एक बैल समीपस्थ । रोगक्रांत तें पुराण ऐकत । लंबोदर माहात्म्यपर ॥१२॥
तें संपूर्ण चरित्र ऐकत । जरी तो बलीवर्द ज्ञानरहित । त्यायोगे रोगमुक्त त्वरित । जाहला तो हर्षभरें ॥१३॥
हें न कळतांही ऐकत । तरी तो बैल होता मृत । जाहला खरोखर ब्राह्यीभूत । ऐसा प्रभाव या चरित्राचा ॥१४॥
ऐसे नाना जन लाभत । स्वानंद श्रवणमात्रें जनांत । अंतीं ते होत ब्रह्मीभूत । वर्णनातीत वृत्त त्याचें ॥१५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे लंबोदरचरितवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP