खंड ९ - अध्याय १८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूतासी । धन्य तूं ज्ञानराशी अससी । आम्हां सर्वांहून तुजसी । अधिक श्रेष्ठ ज्ञान असे ॥१॥
तुझ्यासम या त्रिभुवनांत । नसे संशयनाशक ज्ञानवंत । सर्वसंशयहीन मी असत । धन्य मज तूं केलेंस ॥२॥
आतां मुनिसमन्वित । कृतकृत्य मीं झालों निश्चित । यामुद्‍गलासम अश्रुत । परात्पर श्रेष्ठ या जगीं ॥३॥
त्या मुद्‍गलानें सांगितलें । म्हणून मौद्‍गल हें भलें । कर्त्यासम हें झालें । अनन्यतम श्रेष्ठ जगीं ॥४॥
वेदशास्त्रपुराणांत । जी नाना मतमतांतरें वर्तत । त्यांचें निकूंतन करित । मौद्‍गल मुद्‍गलाकार हें ॥५॥
हें सर्वसारप्रकाशक । मुद्‍गल योगी मान्य एक । त्रैलोक्यांत ज्ञात योगींद्र पावक । अभिमानहीन यथार्थकारी ॥६॥
मुद्‍गलानें पुराण रचिलें । मुद्‍गलाकृति तें झालें । त्याचा अवमान करिती ते सगळे । नरकांत जातील दुष्ट नर ॥७॥
मुद्‍गल हातांत धरून । यमदूत त्यांना करितील ताडन । मुद्‍गलासम वक्ता महान । योगींद्र अन्यत्र न दिसेल ॥८॥
ऐसा न झाला न पुढें होणार । सांप्रतही ऐसा नसत नर । निरहंकारयुक्त सुंदर । भाषणशैली मुद्‍गलाची ॥९॥
पुराणें सर्व स्वस्वब्रह्मपर । स्वदोष दडविती अभिमानपर । यथार्थ भाषण करिती सर्व । पुराणें मुनी देवताही ॥१०॥
त्यायोगें भिन्नमतांचा विलसत । प्रकाश त्यांत उपजत । मौद्‍गल सर्वमान्य असत । यथार्थ भाषण हें माझें ॥११॥
निरहंकार मुद्‍गलाचा थोर । अभिमान असे महाघोर । देवयोग्यासही अजेय दुर्धर । चूर्ण केलें मुद्‍गलाणें ॥१२॥
त्या अभिमानास करित । मुद्‍गल हा जीववर्जित । म्हणून हा एक मुद्‍गल ख्यात । ह्यासम श्रेष्ठ हाच असे ॥१३॥
ऐसें महर्षींचें मत । यांत कांहींच आश्चर्य नसत । सूता सर्वमान्य तत्त्व सांगत । मुद्‍गल सदा श्रोत्यांसी ॥१४॥
अही गणेशाच्या हातून पडत । भूमीवरी मुद्‍गल करस्थित । तो मनुष्याकार रूप घेत । अंगिरसानें पाळिला ॥१५॥
तोच हा मुद्‍गलयोगी महान । योगरूपाचें करी प्रकाशन । त्यांत काय आश्चर्य कारण । अभिमानवर्जित तो मुनींद्र ॥१६॥
मुद्‍गल दक्षांचा संवादयुक्त । पुराण अंगिरानें वर्णित । शांतिप्रद ऐकिलें समस्त । शौनक म्हणे सूतासी ॥१७॥
आतां सविस्तर सांग जमसी । या पुराणाच्या महिम्यासी । याच्या श्रवणाच्या रीतीसी । सांग विधी कोणता ॥१८॥
कोणत्या विधीनें श्रवण करावें । पूर्वी कोणी केलें तें सांगावें । कोण कोण सिद्धि लाभले । मानदा याच्या श्रवणानें ॥१९॥
या पुराणाचें पारायण । कैसें करावें सांग संपूर्ण । भिन्नभिन्न खंडाचें श्रवण । कोणी केलें तेंही सांगा ॥२०॥
गणेशाचीं चार पुराणें असत । त्यांच्या श्रवणमात्रें कोणतें फळ लाभत । तें फळ सारखें वा भिन्न असत । तें सर्व सांगून संशय हरा ॥२१॥
तेव्हां सूत सांगत । एकवीस भेदांनी तो ब्रह्मनायक खेळत । गणेश प्रणवाकार ख्यात । ब्रह्मांड पुराणांत हें वर्णन ॥२२॥
ब्राह्म पुराणीं बारा भेदांत । बुद्धिचालक तो खेळत निर्गुंण सगुणाधार वर्तंत । प्रणवाचा प्रचालक ॥२३॥
गणेश पुराणीं मुर्तिमंत । मुख्य द्वंद्वभावें खेळत । बुद्धिस्थ तैसा प्रणवस्थ । ती त्यांची योगात्मक कृती ॥२४॥
प्रणवात्मक भावपर । उपासना कां असे थोर । ह्रदयांत तो क्रीडाकर । त्याचें क्रीडाकांड गणेशपुराणी ॥२५॥
मौद्‍गल पुरानांत वर्णित । अष्टविध तो योगधारक ज्ञात । संयोग अयोगांचा योगरूप वर्तत । पुर्ण सुशांतिप्रद ॥२६॥
त्यांची फळें सांगेन । गणेश ज्ञानकारक पावन । संशयवर्जित तें ऐंकून । मुनिजन जाहले सारे ॥२७॥
त्रिगुणात्मक देव पांच ख्यात । ब्रह्मा विण्षु शिव ज्ञात । सूर्य शक्ति सर्वत्र लोकांत । परी पूजाविधिमतीं भिन्नता ॥२८॥
विधि म्हणजे ब्रह्मदेव जगांत । पूज्य ऐसें एक म्हणत । मध्यस्थ जे नर असत । ते ब्रह्मलोकीं जाती शास्त्रमतें ॥२९॥
अन्य शिवादि चारांच्या भजनीं सक्त । ते जन भक्तीनें जात । त्या त्या देवतेच्या लोकांत । सगुणोपासक शिवादींचें ॥३०॥
गुणात्म शिवादींचे भक्त । त्या त्या लोकीं जाऊन भोनित । परम श्रेष्ठी भोग परी पडत । पुनरपि भाग्यें भूमीवरी ॥३१॥
त्या देवांच्या कृपेनें होत । प्रणवांत रुचियुक्त । तदनंतर ते भजत । प्रणवाकार गणराजासी ॥३२॥
ब्रह्मप्राप्तिस्तव यत्न करिती । आनंदानें तें जगतीं । त्या गणेशाच्या कृपेनें होती । ज्ञानयुक्त ते साधक ॥३३॥
प्रणवसंस्थाच्या अतीत । जो असे बुद्धिधारक उदात्त । त्या बुद्धिपतीस ह्रदयांत । पूर्णरूपास यत्नें भजती ॥३४॥
शमदमपर असत । नानाभावविवर्जित । बुद्धिस्थास त्या समाराधित । त्यांची कृपा ते लाभती ॥३५॥
तेव्हां ते गणनाथास भजती । शुंडादंडें विराजत तो जगतीं । एकनिष्ठ स्वभावें होती । तत्पर नित्य आदरानें ॥३६॥
योगप्राप्त्यर्थ यत्न करित । आनंदानें ते भक्त । गणेश उपासनायुक्त । मंत्रध्यानपरायण ॥३७॥
गाणपत्य अभिमान धरिती । गणेशाहून परम भाव न मानिती । कुठेंही केव्हाही जगतीं । वेदशास्त्रपुराणाधारें ॥३८॥
तदनंतर त्याच्या कृपायोगें भजत । मौद्‍गलस्थ एकदन्त । योगशांति लाभून होत । योगीश जे गणेशभक्त ॥३९॥
ऐशा क्रमें तें होती । विपेंद्रा गणपप्रिय जगतीं । विभिन्न फळ लाभती । पुराणीपासक ख्यात ॥४०॥
प्रणवोपासक जें असत । मानिती ते सर्वं सामान्य भावांत । गजाननासी देहयुक्त । त्यांचें करितों विवेचन ॥४१॥
जरी सत्यत्वें गणेश प्रणवरूप वर्तत । तरी देहधारी कैसा असत । अवयवादि संयुक्त । गणनाथ कैसा संभवेल ॥४२॥
सर्वं हें विश्व ओंकार असत । तेथ भिन्न कांहीं नसत । या विधीनें भावयुक्त । भजन त्याचें होत असे ॥४३॥
त्याच्या परता बुद्धिसंस्थ । ऐशा गणेशास जे भजत । ते सर्वरूप त्यास मानित । यांत संशय कांहीं नसे ॥४४॥
बुद्धीच्या पर बुद्धिसंस्थ । बुद्धीचा प्रकाशदाता वर्तत । ब्रह्म तेथ कोठून विलसत । प्रणव तो अर्थसंयुक्त ॥४५॥
मनोवाणीविहीने जें ब्रह्म । त्या ब्रह्माहून परम । गणेश्वरास मानिती मनोरम । ते भ्रांतिज कुठें ॥४६॥
ऐसा भजती गणेशभक्त । विघ्नेश प्रणवर्जित । ब्रह्म पुराणीं स्थित । जाण ते भक्त मुनिसत्तमा ॥४७॥
त्याच्याहून पर गणेशानास । भजती जे गाणेशस्थास । गणेशार्थंवरहस्य जाणून विश्वास । दृढ होतसे तयांचा ॥४८॥
प्रणव प्रणवाकार । गणेश सगुण स्मृत थोर । ओंकारवर्जित हा पर । बुद्धिस्थ निर्गुण ज्ञात होतय ॥४९॥
प्रणव तो बुद्धिसंस्थ । तत्पर ब्रह्मद वर्तत । त्यांच्या प्रीत्यर्थ होत देहधारी गजानन ॥५०॥
गकार प्रणवाकार ख्यात । णकार बुद्धीचा चालक वर्तत । त्यांचा स्वामी हा गणेश असत । गजमुखादि चिन्हयुक्त ॥५१॥
गाणपत्य स्बभावें भजती । निरंतर त्यासी एकमती । एकनिष्ठ ते होती । विप्रा सर्वही गणेशयोगी ॥५२॥
तदनंतर ते भक्तिसंयुक्त । मौद्‍गलीं पूर्णरूप सेवित । त्रयाचा द्योतकपूर्ण वतंत । त्यांच्या योगें गजानन ॥५३॥
योगरूप हा गणेश । त्रिरूपधर विशेष । कार्यांर्थ क्रीडासंयुक्त ईश । मायाद्वय योगें होई ॥५४॥
प्रणव हा जगदाकार । चिकाकार बुद्धिस्थित थोर । त्यांचा आत्मा हा उदार । गजवक्रादि चिन्हयुक्त ॥५५॥
ऐसें जाणून गणेशास भजत । तीन भावांत स्थित । मौद्‍गलस्था सदा उपासत । विप्रा योगज्ञ योगरूपीसी ॥५६॥
तेथ भजन पंचधा ज्ञात । तें जाणतां भक्तेंद्रनृप जगांत । होशोल महामुने निश्चित । म्हणोनि चित्त दे येथ ॥५७॥
मूर्तिसंस्थ गणेशास भजती । पूजादि मार्गे भावभक्ती । मंत्रस्तवनादींनी आराधिती । देहधारी सुखप्रदांनीं ॥५८॥
जगदाकार जीवमय प्रभूस । भजती सर्वत्र प्रणवास । सर्वत्र गणेशभक्त संस्थास । सर्वांचें हित वांछिती ॥५९॥
ऐसा नरोत्तम न करित । अशुभ कोणाचेंही जगांत । या विधीनेंही तोषवित । गणनायकासी ते भक्त ॥६०॥
द्वंद्वभाव अवलोकून । साक्षिवद्‍ भाववर्जित होऊन । बुद्धिस्थ देवास तोषवून । भक्ति करी भक्तवत्सल विघ्नेशाची ॥६१॥
धर्माधर्मादिक भ्रम त्यागित । महामति बुद्धिभाव सोडित । निःसंग तो राही सतत । म्हणे मी कर्ता करविता नसे ॥६२॥
न मी देहस्थ बुद्धिस्थ । आनंदयोगें ब्रह्म मीं निर्मळ सतत । निर्लिप्त लिप्तही न वर्तत । ती अवस्था भक्ति म्हणती ॥६३॥
त्या भक्तीनें सुप्रीत । गणेश्वर सदा निर्मल आत्मा होत । गणेशाहून मीं भिन्न नसत । केवळ देहधर्म चाले ॥६४॥
गणेशभक्तिसंयुक्त । मौद्‍गलस्थ परतत्त्व भजत । स्वयं गणेश्वर होऊन त्रिविधस्थ । तीन मार्गांनी नित्य भजे ॥६५॥
शांतिभक्तिसमन्वित । तिघांच्या योगभावें त्रिविध ज्ञात । स्वतःस त्रिविध जाणून भजत । अनन्यमनें साधक ॥६६॥
तीन भावांनी या युक्त । महायश योगी भजत । गणेशास गणपाकार ख्यात । मौद्‍गलज्ञ विचक्षण ॥६७॥
ऐसें गणेश्वराचें भजन । मानदा तूं करी एकमन । त्यायोगें योगींद्रवंद्य तूं पावन । गाणपत्य तूं होशील ॥६८॥
प्रथम देहधारक शंभु मुख्यास । सेवून वर आवाहित । जीव स्वरूपस्थास त्या अतीत । प्रणवाकृति धारकांस ॥६९॥
तदनंतर बुद्धिगतांस पूजित । त्यायोगें भक्तिदरा लाभत । गणेशास देहगासी सेवित । तोही भक्त अनन्यभावें ॥७०॥
तदनंतर मौद्‍गलस्थ योगरूप जाणत । योगी योगपरायण होत । त्रिविधसंस्थ गणेशास पूजित । गणपप्रिय या क्रमानें ॥७१॥
हें सारें तुज सांगितलें । भजन गणपाचें सगळें । स्वरूप त्रिविध झालें । त्रिमार्गद्योतक संपूर्ण ॥७२॥
हें ऐकून शौनक म्हणत । अठरा पुरानें विख्यात । अन्य उपपुराणेंही सांगत । अमितबुद्धी व्यासमहर्षि ॥७३॥
जैसे वेद तैसे उपवेद । ख्यात असती विशद । ते वेदसम नसती सर्वद । ऐसें विप्र मानिती ॥७४॥
तैसेंचि उपपुराणांत । गाणेश्वर पुराण अंतर्भूत । मौद्‍गल हें तरी अधिक फलयुक्त । कैसें विप्रें सांगितलें ॥७५॥
सूत सांगे शौनकाप्रत । जैसा देवपति इंद्रास म्हणत । सर्वत्र विप्र जगांत । उपेंद्र विष्णु विनायक आम्हां ॥७६॥
इंद्राहून अधिक भावें युक्त । विष्णु विनायक वर्तंत । तैशीच उपपुराणें होत । ब्रह्म सायुज्यप्रदायक ॥७७॥
आधीं पुराणें ऐकून । तदनंतर साधन करून । पात्र होत भक्तजन । उपपुराणांच्या अभ्यासांती ॥७८॥
ऐसें जाण सर्वत्र पुराणांत । वेदोपवेदासम जेथ नसत । ब्रह्मयाचा निश्चय हेतुयुक्त । मोहनार्थं लोकांसी ॥७९॥
भ्रांतिभावप्रकाशनें होत । गणेशरूप गूढ वर्णित । म्हणून गणेश्वरभक्ति ज्ञात । सुदुर्लभ पुराणीं ॥८०॥
पुर्वपुण्यबळयुक्त । ऐसे योगीही गणेशभक्ति लाभत । मौद्‍गल पुराण साहाय्यें ज्ञात । गणेशस्वरूप जनांसी ॥८१॥
परिपूर्ण ह्या पुराणें होत । अन्यथा भ्रांति निर्माण होत । गणेशरूपासम ख्यात । अठरावा अध्याय गोड हा ॥८२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे योगामृतार्थशास्त्रे नवमे खंडे दक्षमुद्‍गलसंवादे गणेशस्वरूपक्रमवर्णनं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP