खंड ९ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । आतां लययोग सांगेन तुजप्रत । जेणें चित्त लय पावत । ब्रह्मांत योग जाणून ॥१॥
लय चतुर्विध असत । नित्य नैमित्तिक ख्यात । प्राकृत आणि सारस्वत । ऐसे हे चार प्रकार ॥२॥
क्रर्म अकर्म विकर्माख्य ज्ञात । नित्य लय हें पंडित मत । कर्मानुकूल भावें होत । जनांचें जननादिक ॥३॥
क्षणक्रमापासून आरंभून । आयुष्यान्तपर्यंत राहून । गर्भाधान अवस्था प्रकाशन । त्या लययोगें होतें ॥४॥
ब्रह्मदेवाच्या दिवसाचा अंत । होई तेव्हां तो कुंठित । नैमित्तिक लये होत । त्रिलोकलयकारक जो ॥५॥
शुभाशुभयुक्त जंतू समस्त । लय पावती त्या समयांत । शुभाशुभ फळें हीन होत । कर्मकुंठण कारणें ॥६॥
स्वर्ग मंडलपर्यंत । त्रेलोक्य प्रलय पावत । तेवढयाप्रमाणें ज्ञात । नित्य लय बुधजनमतें ॥७॥
आतां नैमित्तिक लय वर्णन । करितों संक्षेपें पावन । चार युग सहस्त्र प्रमाण । ब्रह्म देवाचा दिवस एक ॥८॥
नैमित्तिक दिनान्त होत । तेव्हां हा लय होत । म्हणून नैमित्तिक ज्ञात । सर्वअर्थंकोविद मतें ॥९॥
प्राकृत लय तीन अवस्थायुत । महाकारण गत उक्त । तत्वांचा एक भाव होत । स्थूलसूक्ष्मसमांच्या ॥१०॥
प्रकृतिस्थ म्हणून प्राकृत । या लयास विबुधवर्णित । आतां लय सारस्वत । योगप्रद तुज सांगतों ॥११॥
निरोधचित्तभावें ज्ञात । पंचचित्तलयात्मक समस्त । मनोवाणीमय विश्व वर्तत । नानास्वभावगत जाण ॥१२॥
मनोवाणीविहीन नो असत । त्यास म्हणती असंप्रज्ञात । वाणीनें भाव होत व्यक्त । मन तेथ जात असे ॥१३॥
नानापदार्थभावत्वें असत । सर्व प्राण्यांचें मन बहिर्गत । वाणीविहीन जें वर्तत । तें ब्रह्म जाण ह्रद‍गत ॥१४॥
समाधीनें तेथ राहत । तादृश सर्वदा चित्त । वाणी द्विविधा आख्यात । ब्रह्माकार जगन्मयी ॥१५॥
त्य उभयतांचा नाश होत । तेव्हं सारस्वत लय म्हणत । सरस्वी लय पावत । योगभावें म्हणोनी ॥१६॥
महावाक्यादि संयुक्त । तो ख्यात सारस्वत । सारस्वत लयें होत । चित्त पंचविध सर्वदा ॥१७॥
त्याचा चिंतामणींत । लय करून रहा योगिसंमत । हें सर्व योगद आख्य़ात । संक्षेपानें दक्षा तुला ॥१८॥
हा महायोग गुप्त राखित । योगी होशील निश्चित । हा योग पात्रहीनाप्रत । कोणास तूं सांगू नको ॥१९॥
जरी अपात्रास सांगशील । तरी भ्रांशद हा होईल । नासनाहीन जे असतील । गणेशज्ञानलालस ॥२०॥
ऐशा साधकांस हा सांगतां । शुभप्रद हा होईल तत्त्वता । याविषयीं कारण ऐकतां । संशय तुझा लय पावेल ॥२१॥
योगाकार गणेशान । जेव्हां क्रीडासक्त मन । तेव्हां सिद्धिबुद्धि माया दोन । वचन त्यासी सांगती ॥२२॥
गणनायका आमुच्यासहित । जरी तूं क्रीडा करूं इच्छित । तरी नानाभावप्रदर्शनें सांप्रत । आच्छादूं तुज गणेशा ॥२३॥
वेदादी ग्रंथ वाणीमयी । गाथा गजानना सुखमयी । त्यायोगें स्वरूपाची तुझ्या शब्दमयी । मानवांसी नंतर सांगतील ॥२४॥
त्यायोगें ब्रह्मनाथा तुज जाणतील । मानवादी निर्मल । तुझ्या उपासनेनें ब्रह्मभूत होतील । गणनायका जगतांत ॥२५॥
तुज आच्छादण्या न शक्त । वाणीस्था गणनायका सांप्रत । म्हणून आनंदे किंचित । उपाय तूं येथ करावा ॥२६॥
ऐसें त्यांचें वचन ऐकून । तयांस बोले गजानन । देवींनो खेदाचें न कारण । वाणीस मी संमोहवितों ॥२७॥
जेव्हां मी मोहवीन वाणीस । माझें वर्णन भ्रांतिद जनास । प्रदूढ अर्थयुक्त सर्वांस । सत्यार्थ भाषितही होईल ॥२८॥
गूढार्य देवेश योगीश । तैसेंचि तत्त्वदर्शी ज्ञानेश । न जाणतील त्यायोगें ते ईश । भावें मज न भजतील ॥२९॥
सिद्धिबुद्धियुक्त ब्रह्म । वाणी प्रकटवील मनोरम । परी गणेशमय गाथा पावन । योगदा ती न सांगेल ॥३०॥
सिद्धिबुद्धिमय समस्त । जगद्‍ब्रह्म जो सेवित । त्यायोगें शुद्ध होत । तो नर मज जाणील ॥३१॥
सिद्धियुत ब्रह्मातीत । सिद्धिदायक जो असत । तो हा गणनाथ वर्तंत । सिद्धिचा पति प्रमाण ॥३२॥
बुद्धियुत ब्रह्मातीत । गणेशव असे ख्यात । बुद्धीचा पति साक्षात । या प्रमाणआधारानें ॥३३॥
ऐश्यापरी त्रैविध्यग वर्णील । वाणी मजल सुनिर्मल । सिद्धिबुद्धि ब्रह्म सबळ । शास्त्रांत त्रिविध ज्ञात असे ॥३४॥
ऐसें बोलून गणेशान । पुनः मौन साधून । बैसला तया नमून । भक्ति परम दुःखित झाली ॥३५॥
भक्ति म्हणे गजाननासी । वर दिला तूं सिद्धिबुद्धीसी । त्यायोगें मज भक्तीसी । विसरतील मानव सदा ॥३६॥
भक्तिविहीन नर होतील । मज कोणीही न विचारील । म्हणोनि दुःखयुक्त अबल । निरंतर मी फिरेन ॥३७॥
म्हणोनि गणाध्यक्षा करी पालन । माझें तूं दया करून । भक्तियुक्त व्हावे जन । ऐसें करी कृपाळा ॥३८॥
ऐसें ऐकून गणाध्यक्ष म्हणती । भक्तीसी जी दुःखित अती । भक्तितूर्ण ते स्मित करिती । शोक करूं नको कल्याणी ॥३९॥
माझ्या भक्तींत निमग्न । ऐसे देवासुर नागादि होऊन । तुझा आश्रय घेऊन । कृतकृत्य तुज करतील ॥४०॥
नाना देवतांची भक्ति करिती । जन्मोजन्मीं अति प्रीती । त्यांवरी संतुष्ट होऊन देती । अग्निपूजा रुचि देव ॥४१॥
तदनंतर अग्नि समाराधून । नाना यज्ञपरायण । ते भक्तियुक्त होऊन । निरंतर अग्निसी तुष्ट करिती ॥४२॥
त्याच्या कृपायोगें नर होतील । देवी भक्तियुक्त निर्मल । देवीची भक्ति करतील । भजतील तिला निःसंशय ॥४३॥
ऐसा बहुकाल जात । तेव्हां ती संतुष्ट होत । त्या भक्तास उपदेशित । सूर्याची महाभक्ति कृपेनें ॥४४॥
तदनंतर रवीस भजतील । सौरपूजनीं रमतील । ऐसा बहुत काळ जाईल । तेव्हां सूर्य तुष्ट होई ॥४५॥
तो दृध वैष्णवी भक्ति । त्या भक्तांच्या चित्तीं । स्वकृपेनें निर्मून त्या रीती । विष्णुपूजक जनांस करील ॥४६॥
विष्णूस भावसमन्वि । लोक तेव्हां भजत । बहुत काळ ऐसा जात । तेव्हां विष्णु तुष्ट होईल ॥४७॥
तो स्वयं स्वभक्तांस देईल । शैवी भक्तीची दीक्षा निर्मल । ते सदाशिवास भजतील । भक्तिभावें सर्वदा ॥४८॥
ऐसा बहुत काळ जात । शंभु त्यांवरी प्रसन्न होत । त्या भक्तांस उपदेशित । गणेश्वराची परम भक्ति ॥४९॥
तेव्हां त्या भक्तीनें जन । मज भजतील प्रसन्न । त्यायोगें शांति लाभून । योगपरायण होतील ॥५०॥
ब्रह्मीभूत ते होतील । तथापि जे मज भजतील । ऐशा मद्‍भक्त होतील । नरादिक सर्व प्राणी ॥५१॥
तुझ्यासहित भक्ति मज भजतील । त्यांच्या वश मी सबळ । तुझ्यासम प्रिय मज नसेल । अन्य कांहीं जगतांत ॥५२॥
जेथ भक्तिदेवि तूं जाशील । तेथ माझें दास्यत्व असेल । स्वानंद लक्ष लाभ अमल । सिद्धिबुद्ध भक्ता देईन ॥५३॥
हा माझा देह भक्तीच्या अधीन । भक्तांच्या पुढयांत राहीन । भक्त होऊन मी प्रसन्न । दासासम सर्वदा ॥५४॥
भक्ते कर्माहून तप दुश्चर । तपाहून ज्ञान थोर । निःसंगपददायक उदार । ज्ञानाहून अधिक योग असे ॥५५॥
योग शांतिदायक असत । त्याहून महाभक्ते तूं निश्चित । मज अधिक प्रिय होशील सतत । भक्तीहून श्रेष्ठ कांहीं नसे ॥५६॥
महाभागे हें शास्त्रसंमत । तूं चिंता करूं नको मनांत । अन्य जें गूढ रूप वाणी सांगत । तदर्थ तुझें प्रिय करीन ॥५७॥
माझ्या भुजांत स्थित । मुद्‍गल हा सर्व दर्पहर्ता व्यक्त । तोच ब्राह्मण होऊन सतत । संचार करील भूतळीं ॥५८॥
तो माझें पुराण रचून । वेद्स्तुत महान । गूढार्थद्योतन पूर्ण । सर्वांसी भक्तिमार्गीं लावील ॥५९॥
स्वरूप माझे त्या पुराणांत । प्रकट जो नर पाहत । तें एकचित्त वा ऐकत । तेव्हां पूर्ण रूप तुझें भक्ते ॥६०॥
परी माझी तूं दुर्लंभ भक्ति । होशील जगांत निश्चिती । म्हणून अल्पज्ञ देवी मज न भजती । कदापिही भक्तीनें ॥६१॥
मौद्‍गल शास्त्रांत विघ्न । भ्रमप्रद मीच निर्मीन । अश्रद्धायुत जन होऊन । तें शास्त्र नष्ट होईल कधींतरी ॥६२॥
भक्ते तुझा भाव रक्षिण्यास । निर्मिलें मुद्‍गलपुराण सुरस । याहून प्रिय काय करण्यास । सांगसी तूं मजलागीं ॥६३॥
ऐसें त्याचें वचन ऐकून । हर्षली भक्ति करी वंदन । गणेशासी पूजून । भावगंभीर स्तब्ध झाली ॥६४॥
हें विघ्नेश्वराचें गुह्य तुजप्रत । दक्षा सांगितलें राख गुप्त । हें शास्त्र माझें सतत । दक्ष तूं सर्व भावांत ॥६५॥
दक्षाहून अधिक दक्ष । ऐसा कोण असे सुदक्ष । म्हणून तुज ठेवून साक्ष । शास्त्र उत्तम सांगितलें ॥६६॥
ह्रदयस्थ गणेशानें प्रेरित । त्याच्या आज्ञेनें आख्यात । हें उत्तम शास्त्र ह्रद‍गत । येथ दक्षा तुजला श्रद्धेनें ॥६७॥
ह्या विधीनें दक्षा भजावें । तूं गणनायका भक्तभावें । त्यायोगें ईस्पित तुज लाभावें । गाणपत्य ऐसी व्हावी ख्याती ॥६८॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन गणेशरहस्ययोगो नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजानार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP