खंड ९ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्‍गलास । वर्णंन करी जीवन्मुक्त सौख्य स्थितीस । त्याच्या शुभ अशुभ कार्यास । कोणती गति लाभतसे ॥१॥
कायिक वाचिक मानसिक । कर्म तैसें सांसर्गिक । योगिकृत त्याची गति परैक । कोणती असे तें सांग ॥२॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । जीवन्मुक्त योगी असत । स्वयं स्वेच्छाचारी सत । प्रारब्धप्रेरित साक्षात्‍ तो ॥३॥
नित्य आदरें वर्तत । स्वयं ब्रह्मांत स्थित । बिंब वसत त्याच्या चित्तांत । योगिकृत कर्म न बंधप्रद ॥४॥
तो अन्य जनांसम करित । कार्यें परी दोषवर्जित । ब्रह्मांत ब्रह्मभूत असत । म्हणोनि शुभाशुभहीन तो ॥५॥
प्रारब्धानें तो प्रेरित । योगी पुण्य आचरत । तीर्थयात्रादिक समस्त । यज्ञदेवपूजादि आचरे ॥६॥
सतत शुचितासमायुक्त । नित्त धर्मंपरायण वर्तत । तथापि पुण्याचें फळ न भोगत । हेंही जाण निश्चित तूं ॥७॥
अथवा पूर्वजात प्रारब्धनियमित । पापें तो नित्य्त करित । ब्रह्महत्यादिक मातृगमनादिक समस्त । दैवयोगें पानचौर्यादि ॥८॥
ऐसा पापसमाचार । जरी योगी असे खरोखर । तरी पापफळ न भोगित नश्वर । अन्य सामान्य जनापरी ॥९॥
पूर्वजन्मार्जित प्रारब्ध करवित । तीं तो पापें करी सतत । योगी तो परी कांहीं न करित । निर्लेप सदा राहतसे ॥१०॥
मरण समयीं जीं मति । तैसी पावे मानव गति । जो अयोगयुक्त योगी जगतीं । ब्रह्मरूप तो होत असे ॥११॥
हें सारें संशयनाशार्थ । कथिलें तुज हें ब्रह्मसुत । योग्यांचें कर्मज माहात्म्य सांप्रत । अंशतः मीं या वेळीं ॥१२॥
योगी योगसमायुक्त । पापें कधीं न आचरत । धर्मनिष्ठ तो वर्तत । यांत संशय मुळीं नसे ॥१३॥
लोकोद्धारकर योगी समस्त । ते पापहिंसादि न आचरत । फलहीन स्वभावें करित । धर्म नित्य हे योगी ॥१४॥
लोकोपकारार्थ ब्रह्मपरायण । करी लोकांचें कल्याण । कदाचित्‍ पूर्व संस्कारें हातून । पाप त्याच्या करी घडलें ॥१५॥
परी त्यास पाप न लागत । हें पूर्वीच सांगितलें तुजप्रत । योगी प्राण्यासी दुःखदायक । पापकृत्य कां करील ॥१६॥
सर्वत्र तो गणनाथ पाहत । अनन्यचक्षू पुण्यानें होत । सुखसंयुक्त विश्व होत । त्याच्या योगें सर्वदा ॥१७॥
प्रारब्ध योग्यांचें न पापकारक होत । पुण्यकर्म न पुण्ययुक्त । योगार्थ धर्मंसंयुक्त । ब्रह्मार्पण विधानयोगें ॥१८॥
ऐशापरी जन्मजन्मांत । प्राज्ञ जेव्हां यत्न करित । तेव्हां योगी तो होत । त्यास कांहीं न बाधे ॥१९॥
तेथ प्रारब्ध कैसें होत । दुर्बुद्धिदायक जगतांत । महायोगी तो धर्मयुक्त । सदा होतो हें निश्चित ॥२०॥
आतां योगिजनांची स्थिती । सांगतों आतां त्याची गती । क्रमयुक्तयोगी जगतीं । भ्रांत कदापि न होतसे ॥२१॥
चित्त निरोधकारक महायोग । साधून महायोग सुभग । पंचविध चित्तत्याग । करून होतो मानव योगी ॥२२॥
चित्तांत चिंतामणीस जाणून । चित्त्तासहित सहसा गान । तदाकार तो योगी पावन । ब्रह्मांत होतो सदा रत ॥२३॥
प्रारब्ध योग्यांसी नसत । भोगप्रद शास्त्रसंमत । जेव्हां हठयोगी असत । प्रारब्ध चालक प्रयत्नें ॥२४॥
देहपात तो जरी करित । आत्महत्येचें पाप न तयाप्रत । आयुष्य जरी त्याचें असत । तरी देह त्यजी तो निश्चयें ॥२५॥
तथापि योगसंयुक्त । तो योगी देह न त्यागित । प्रारब्धाचें अतिक्रमन न करित । प्रयत्नपूर्वक तो कदा ॥२६॥
शांतियुक्त स्वभावें राहत । जें होणार तें होवो म्हणत । मायामोहानें वर्जित । यांत संशय मुळीं नसे ॥२७॥
देहपातानें काय लाभत । तैसेंचि देहरक्षणें प्राप्त । हें सर्वं गणनाथाचें रचित । तैसेंचि घडो त्या समयीं ॥२८॥
ऐसा निश्चय चित्तानें करित । शांतियुक्त स्वभावें वर्तत । स्वधर्मस्थित आचरित । जी जी क्रिया मार्गीं येई ॥२९॥
वर्णाश्रमयुक्त असत । जो योगी तो सर्वदा आचरित । स्वधर्मज कर्म जगांत । निःसंगभावें सर्वदा ॥३०॥
देहकर्ममय प्रख्यात । तेथ अकर्मी कुठोन होत । अवस्थात्रय संभूत । करून न केलें असें घडे ॥३१॥
जर कर्मत्याग करून । राहीन योगपरायण । तरी देहनिपात होऊन । नष्ट होय निःसंशय ॥३२॥
अन्नभक्षणरूप जें असत । कर्म जाग्रत्स्वप्नादिक सतत । सर्व सोडून जीवित । राहील कैसा सांग दक्षा ॥३३॥
जें जें याच्याकडून घडत । ती ती योग्यक्रिया ख्यात । म्हणून कर्ममय देह वर्तत । त्यानें धर्म आचरावा ॥३४॥
जर जीव देण्यास उद्युक्त । योगी असेल तो ज्ञात । द्वंद्वभाव सहन करण्या असमर्थ । ऐसें निश्चित जाणावें ॥३५॥
अशांतियुक्त ओत असत । योगहीन जैसा नर जगांत । तैसा द्वंद्व पाहून होत । असमर्थ तें सहन करण्या ॥३६॥
गणेशानें स्वेच्छया जें केलें । तें सह्य केलें । जें जें त्यानें मला दिलें । या विचारें नित्य शांति ॥३७॥
जो योगी शांतिहीन । त्याचा प्रभाव कदापि न । ब्रह्मभूत महा श्रेष्ठ पावन । सर्व प्राणिमात्रांत ॥३८॥
म्हणून वर्णाश्रमस्थ जो असत । तो योगी तें तें कर्म करित । ब्रह्मार्पणभावें ह्रदयांत । ध्याऊन सदा गजाननासी ॥३९॥
जर तो स्वधर्मसंयुक्त । धर्मोक्त कर्मं न आचरित । त्यास अक्रिय पाहून जन समस्त । त्यजतील स्वधर्मासी ॥४०॥
म्हणून लोकोपकारार्थ । योग्यानें स्वकर्म करावें सतत । अन्यांस कर्मपर जगांत । करावें त्यानें स्ववश ॥४१॥
धर्मपालक योग्यानें जगांत । सत्कर्मं करावें सतत । कारण तैसेंचि सर्व करित । अनुकरण त्याचें विशेषें ॥४२॥
त्यानें आनंदें प्रमाण । केलें जें कर्म पावन । तेंच कर्म सर्व जन । मान्य करिती निश्चित ॥४३॥
ब्रह्मांत राहून जें कर्म करित । तें बंधप्रद न कदापि होत । ब्रह्मप्राप्तिकर फळ असत । त्याचें ऐसें पंडित म्हणती ॥४४॥
योगी जें कर्म करिती । लोकसंग्रहार्थ जगतीं । असक्त राहून स्वचित्तीं । नित्य नैमित्तिक तें न बंधद ॥४५॥
सदा ब्रह्ममयत्वें कांहीं न करित । देह स्वभावज भाव वर्त्त । अन्य मार्गही तुज सांगत । दक्षा ऐक चित्त देऊन ॥४६॥
जे जन योग्यास निंदिती । अथवा त्याची स्तुति करिती । ते पापभोक्ते होती । अथवा पुण्यकारक अनुक्रमें ॥४७॥
योग्यानें जें पाप केलें । तें पाप त्यास स्पर्शू न शकलें । परी निंदकाच्या उदीं बसलें । सर्वदा हें निश्चित ॥४८॥
जें पुण्य योगी करित । तें त्यास न स्पर्शित्त । परी त्याची जे स्तुति करित । त्यांना तें लाभे स्वभावज ॥४९॥
म्हणून योग्याची निंदा न करावी । विचक्षणें मति नियंत्रित ठेवावी । योग्यांची सेवा करावी । तेणें सौख्ययुक्त होई नर ॥५०॥
योगी जरी वनांत राहत । प्रारब्धानें तो नियंत्रित । फलादिक तेथ खात । शांतियुक्त नित्य राहतसे ॥५१॥
तेथ त्याचे निंदक नसत । तैसेंचि सेवक वनांत । एकटा महायोगी भोगित । शुभाशुभ परिणाम ॥५२॥
तेथ देहपात होतां होत । योग्याचें कर्म मृत । शुभाशुभ निराधार वर्तत । उषोषणपर होऊनियां ॥५३॥
हें तुज दक्षा कथिलें । ब्रह्मीभूताचें चेष्टित सगळें । योगमय कर्म पूर्ण भलें । श्रवणमात्रें शुभद होय ॥५४॥
आतां ज्ञानात्मक परम योग । सांगतो तुज सुभग । योग्यांत सुखदशांतियुक्त सुयोग । विशेषें जें सर्वदा ॥५५॥
देह कर्मात्मक ख्यात । तेथ योग आचरावा पुनीत । ब्रह्मार्पणतेनें कर्म करित । शांतिधारक योगिजन ॥५६॥
ज्ञान स्फूर्तिमय ख्यात । हृदयांत जें सर्वदा स्थित । विवेकात्ममय तेथ । ज्ञानयोग आचरावा ॥५७॥
ह्रदयांत जें जें ज्ञान असेल । नाना योगार्थं सौख्यप्रद होईल । अथवा विषर्थांना बाधक सबळ । तें सारें त्यागावें ॥५८॥
उत्पत्तिनाशसंयुक्त । ज्ञान तें विषयबोधधयुक्त । सौख्यप्रद ज्ञान वर्तत । योगभूमि प्रभावज ॥५९॥
उपाधियुक्त एक असत । अनुपाधिक अन्य ख्यात । तें उभय त्यागून योगी होत । महायश या जगांत ॥६०॥
सकल ज्ञानांत योग श्रेष्ठ । ज्ञानमय योग तो वरिष्ठि । योग त्यांत व्हावें लीन सतत । ब्रह्मीभूत स्वभावें ॥६१॥
ब्रह्मांत मीं ब्रह्मभूत । मज ज्ञान कैसें होत । नानाभ्रांतिकर ह्रदयस्थ । त्यागून ब्रह्मपर होईल ॥६२॥
ऐश्यापरी सर्व ज्ञान त्यागून । ह्रदयांत सांचला जो घन । शांतियुक्त योगी होऊन । राहो ब्रह्मपरायण ॥६३॥
मी कर्ता कदापि नसत । तैसाचि न करविता निश्चित । मायामोहयुत जे मज म्हणत । कर्मकारी भ्रमाने ॥६४॥
मी साक्षी शरीराचा असत । जें देहाणें केलें असत । तं मी न केलें असत । ब्रह्म मी त्या अतीत ॥६५॥
जी जी स्फूर्ति मज होत । ती ती माया भ्रांतिदा करित । न तिच्यांत संस्थित । जीव सदा साक्षिस्वभाव ॥६६॥
मोहयुक्त जो असत । अथवा जो मोहवर्जित । मायेनें मज ऐसें जाणत । तो अयोगी न संशय ॥६७॥
ऐश्यापरी महायोगी राहत । साक्षिसम जगतांत । हृदयज्ञानयोगस्थ । त्यागून स्फूर्तिभव भ्रम असे ॥६८॥
सर्वत्र रसहीन जें मन । त्या माहात्म्याचें प्रसन्न । शांतियुक्त दक्षा होऊन । ब्रह्मीभूत तें नित्यद ॥६९॥
ऐसा हा तुज योग सांगितला । ज्ञानात्मक विशेषें भला । साक्षिवत्‍ देहसंस्थ जो झाला । तो वर्तत लेशमात्रे मत्प्रभावें ॥७०॥
यापुढें समयोगाचें श्रवण । करी दक्षा स्थितिपरायण । जो जाणतां ब्रह्मभूत कदाचन । शांतिहीन होईल ॥७१॥
देह कर्ममय तेथ वर्तत । कर्मयोगे आचरित । मन विवेकरूप स्थिप । साक्षित्व तेथ आचरेल ॥७२॥
जेथ मी ब्रह्म होत । दक्षा तेथ हें द्वंद्व कैसें राहत । त्याचें रूप तुजप्रत । विशेषें सांप्रत सांगतों ॥७३॥
देह कर्ममय ख्यात । विवेक कर्मविवर्जित । हें द्वंद्व त्यागून आचरित । महायोगी समयोग ॥७४॥
देहांत मीं कर्ममय । ह्रदयांत साक्षित्वें निर्भय । उभयतांच्या योगभावें निर्मळ होय । किंचित जाण निश्चयानें ॥७५॥
जरी विवेकहीन देह असत । तरी तो कर्म करूं न शकत । देहहीन मन ज्ञानद होत । ऐसें कोणाच्या विषयीं घडे ॥७६॥
आनंदमय भावें संस्थित । मीं तदात्मक उभयतांत । म्हणून देहमन करित । आपापले व्यापार सदा ॥७७॥
देहांत कर्ममय मी असत । विवेकधारक ह्रदयांत । द्विविध माया रचित । सदा आनंद धर्मग मीं ॥७८॥
त्यांच्या समानभावें स्थित । मी सर्वदा संशय नसत । अनुपाधि उपाधि वर्जित । ब्रह्मसंज्ञ मीं सर्वंदा ॥७९॥
म्हणून समयोगाचा आश्रय । ब्राह्मांतर एकभावें होय । जैसें ब्रह्म संस्थित होय । तैसें तेथ आचरावें ॥८०॥
देहांत कर्मकर होऊन । ह्रदयांत साक्षिमय पावन । उभय तें परित त्यागून । आनंदावस्था आचरावी ॥८१॥
जें जें उभय भावयुक्त । नाना भेदमय असत । तेथ योगमय होऊन सतत । रहावें आनंदसंयुत ॥८२॥
आनंदाच्या समायोगें ख्यात । ब्रह्मानंद तो श्रेष्ठ । उभयतांच्या विषयीं पंडित । तादृश कर्म आचरती ॥८३॥
माझ्या संगयोगें प्रवर्तत । उभय शरीत मन प्रवर्तत । उभय आचरावें परी शाश्वत । त्या वर्जित तो परमात्मा ॥८४॥
ही आनंद रूपाची गाथा । योग्यांनीं पूर्वी कथिली तत्त्वता । ब्रह्मीभूत होऊन चित्ता । शांति लाभूत रहावें ॥८५॥
यापुढील प्रजानाथा अवस्था । सुखप्रद ऐक आतां । सहजा ख्याती सर्वथा । महायोगी आचरित ॥८६॥
देह कर्ममय उक्त । तेथ योग आचरित । ब्रह्मार्पण भावें सतत । योगिसत्तम कर्मंयोग ॥८७॥
ह्रदयांत साक्षिभावें रहावें । त्यांच्या अतीत स्वभावें । समभाव धारण करून रहावें । त्रिविधभावें अवस्थात्रयांत ॥८८॥
त्यांत निस्मृति भावानें । भ्रांतीनें वा विस्मरणें । जरी विपरीत कर्म घडणें । तरी खेद न धरावा ॥८९॥
त्रिविध असस्थायुक्त । तें तें मायाधीन असत । म्हणेनि पराधीन ख्यात । तुर्यरूप तें स्वाधीन ॥९०॥
ऐसें शास्त्रांत सतत । सांगितलें असें बोधयुत । तुर्येच्छेनें त्रिधाभूत । चालतें यांत न संशय ॥९१॥
स्वप्रारब्धसंयुक्त । सदा भ्रांतासम स्थित । परी त्या तुरीयाची नसत । कोणतीही अहंकृती ॥९२॥
जैसें कर्म करित । तैसें प्राणी फळ भोगित । म्हणून प्रारब्धयोगें विस्मृत । परम स्थिती मी समजलों ॥९३॥
योगरूप जी परम स्थिती । तुर्य प्रेरित जगतीं । त्याची झाली मज विस्मृति । प्रारब्ध हेंच कारण तेथ ॥९४॥
अथवा ज्ञातमोहें विपरीत । मीं सारें असे करित । योगस्थि पूर्ण त्यागून । आरंभित । प्रारब्ध तें मुख्यत्वें ॥९५॥
प्रारब्धधारक ख्यात । तुरीय हें संशयातीत । त्याच्या इच्छेनें जें संभवत । तेच योगप्रद होईल ॥९६॥
पराधीन मीं अत्यंत । तुर्येच्छेनेम समन्वित । साक्षित्व कर्म करित । आनंद वा यांत संशय नसे ॥९७॥
सदा स्वाधीन भावानें राहत । तुर्यग ब्रह्म सतत । तुरीयांनी जें क्रीडा करित । त्यास कोणतें बंधन ॥९८॥
जें जें संभवत अथवा कृत । तुरीयावस्थेंत संशयातीत । तेथें कोठें मी राहत । तेथ प्रभु खेळे स्वेच्छेनें ॥९९॥
ही सहजावस्था वर्णिली । प्रजापते तुजला भली । जें जें जन्मत तेथ राहिली । न करतां कांहीं प्रयत्न ॥१००॥
जें कृत जन्मापासून स्वयमेव प्रवर्तंत । त्यायोगें योग सहज ज्ञात । तुर्य संज्ञा त्यास असत । आतां स्वानंदाख्य वर्णितों ॥१०१॥
तेथ योगस्वरूप नाम । ऐक सुखप्रद स्थिति अभिराम । तुर्य भावाख्य स्वाधीन । त्रिधा पराधीन ॥१०२॥
त्यांच्या योगें निजात्मस्थ शोभन । निजात्म्यांत योगिजन । त्रिविध क्रीडारूप असून । चौथा तुर्य खेलक ज्ञात ॥१०३॥
त्यांच्या योगें प्रजानाथा होत । स्वानंदस्थ योगिजन सतत । ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । ऐश्या योग्याच्या जीवनीं ॥१०४॥
स्वाधीन वा पराधीन नसत । मायायुक्त तें सारें वर्तत । योगस्थितीचा आश्रय घेत । बुधें आचरावें ध्येय आपुलें ॥१०५॥
चारांचा संयोग भावमय । त्यांत रहावें निर्भय । कर्मयोगाच्या आश्रयें कर्तंव्य । पावन देहचेष्टा सदा ॥१०६॥
ज्ञानयोगीं आश्रय पावून । साक्षित्वानें सर्वंदा राहून । आश्रय समयोगाचा घेऊन । आनंदयुक्त असावें ॥१०७॥
सहजावस्था स्वीकारून । विपरीतें शोक लाभेल महान । चारांनीं संयुक्त होऊन । तैसेचि ते चार वर्जित करावें ॥१०८॥
योगमसी दक्ष अवस्था लाभून । रहावें योग्यानें प्रसन्न । निजरूपांत नसे अवस्था ज्ञान । त्यांत नसे अवस्थाधारक ॥१०९॥
त्यांच्या योगें असे ख्यात । योगमयी व्यवस्था सतत । तिचा आश्रय घेऊन चित्तांत । शांतिहीन न व्हावें ॥११०॥
आतां योग अवस्था द्वितीय । अयोगधरा पूर्णा ज्ञेय । निवृत्तिदायिका जी होय । तिचें ऐक स्वरूप ॥१११॥
ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । त्या योगानें आश्रय घ्यावा युक्त । जेव्हां निवृत्तिसंयुक्त । शांतिहीन तो न होईल ॥११२॥
ब्रह्मांत जो ब्रह्मसंस्थ । त्यास नसे आगत गत । मायेने जो ब्रह्मभूत । अवस्थाधारक तेथ कैसा ॥११३॥
जें करित अथवा करवित । तेथ न गुंतून राहत । मायामय हें निश्चित । पंचक हें पंचकांत खेळे ॥११४॥
जर मीं पंचकग नसत । तरी त्याचें कृत्य मज न बाधत । आधारास आधार्य होत । परिणामकारी सर्वदा ॥११५॥
मज कैसें जीवन मरण । जन्मयोग अवस्था महान । मायामोहयुक्त हें जाण । ऐसें बुधजन सांगती ॥११६॥
आतां योगमयी पूर्ण । अवस्था तुज ज्ञानदा सांगेन । संयोग अयोगहीन । जिनें शांत योगी न होय ॥११७॥
मी ब्रह्मांत ब्रह्मभूत । माझ्यांत मायामय पंचक कैसें वसत । जें मायाहीन अयोगपर असत । तेथ पंचक प्रकाशे कैसें ॥११८॥
विधिनिषेधयुक्त चित्त । विधि निषेधहीन तेंच होत । देहानें कर्मयोग ह्रदयांत । निर्णाण होतो ज्ञानग ॥११९॥
उभयत्र सम वर्तत । तुर्यांत सहजात्मक ख्यात । सर्व संयोगभावांत । स्वानंदाख्य तो प्रवर्ततसे ॥१२०॥
निवृत्तींत अयोगाख्य असत । शांतियोगक योगांत । ऐसा नानाविध योगयुक्त । रहावें महामती योग्यानें ॥१२१॥
ब्रह्मीभूत तो निश्चित । ऐसी योगस्थिति सांगितली तुजप्रत । ब्रह्मीभूत सुखप्रद जी होत । योग्यांचा ऐशापरी देहनिर्वाह ॥१२२॥
वर्णाश्रमस्थित जो योगी असत । तो उत्तम स्थिति पाळित । लोकसंग्रह कार्यांत रत । परी कर्मफळांत असक्त असे ॥१२३॥
जेव्हां वर्णाश्रम त्यागून । पंचमाश्रमाचा आश्रय घेई पावन । त्यास स्थितिरूप कदाचन । संशय कांहीं यांत नसे ॥१२४॥
विधिनिषेषहीन असत । विनायक हा सतत । जें जें तो सहन करित । तें तें सर्व योगरूप ॥१२५॥
जर वेद प्रमाण स्थितियुक्त । तरी वर्तें विधियुत । जेव्हां स्थितिविहीन व्यक्त । तेव्हां विधि निषेषें राहत्से ॥१२६॥
म्हणून स्थितियुत का स्थितिहीन । वर्णाश्रम त्यागून । विनायकापरी योगिजन । सर्वतंत्रस्वतंत्र असे ॥१२७॥
जें जें असे मनोवांच्छित । तें तें शांतीनें आचरित । विधि निषेधहीन वर्तत । ब्रह्मरसाचा धारक तो ॥१२८॥
हें सर्व योगिचरित । तुजला सांगितलें पुनीत । ब्रह्मभूताहून अतीत । पूर्ण तें आचरावें निरंतर ॥१२९॥
ही योगस्थिति ऐकत । अथवा जो ही वाचित । त्यास लाभे सारें ईप्सित । अंतीं योगमय होत गणेशनिष्ठ ॥१३०॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे योगास्थितिवर्णनयोगो नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्णनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP