खंड ९ - अध्याय २७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती शौनकासी । महायोगी पुलस्त्य भाद्रपदमासीं । प्रतिपदेपासून गणेशासी । पूजून मौद्‍गलपुराण वाचित ॥१॥
तेथ विप्रादी श्रवणार्थ येत । तथाविधि अन्यजनही ऐकत । भक्तितत्पर अर्थयुक्त । नित्य मौद्‍गल निरूपण करी ॥२॥
गणेशार्थ विचक्षण । करीतसे पुराणाचें विवरण । तेथ एक सर्प बिळांत बसून । भयप्रेरित तें ऐके ॥३॥
एके दिवशी भाग्यप्रेरित । जेव्हां मुनि सर्व रात्रीं निद्रित । तेव्हां तो सर्प बाहेर येत । बिळांतून हलूवारपणें ॥४॥
मार्गातून सुखें जात । तेथ एक मुंगुस वनस्थ । दैवयोगें त्या भुजंगास पाहत । आलें ठार मारावया ॥५॥
त्यांचें युद्ध आवेशें होत । बलाढय नकुल सर्पास वधित । तो पडला वनांतरीं मृत । गाणपदूत त्यास नेती ॥६॥
त्वरित करिती ब्रह्मभूत । त्यास जाणून विस्मित । सर्व देवेंद्रादि म्हणत । आनंदाश्रुपूर्णं नयन त्यांचें ॥७॥
अहो मौद्‍गल माहात्म्य अघटित । अवर्णनीय हें असत । न कळत हें पुराण सर्प ऐकत । किंचित अंश त्याचें फळ हें ॥८॥
आतां ब्रह्ममय स्थित । संपूर्ण पुराण जे ऐकत । त्यांसी केवढें फळ लाभत । त्याचें न करवें अनुमान ॥९॥
संपूर्ण मौद्‍गल जे ऐकती । ते गणेश्वर लोकनाथ होती । जाणावे पावनार्थ जगतीं । ऐसें माहात्म्य अकल्पित ॥१०॥
नरजन्म लाभून मौद्‍गलपुराण । जे न करिती येथ श्रवण । ते मायेनें वंचित जाण । वृथा धिक्कृत जीवन त्यांचें ॥११॥
विघ्नराजा नमन तुजसी । धरातलीं या नरदेहासी । नित्य मौद्‍गलसंसक्त करावे आम्हांसी । आम्हा सर्व मानवां ॥१२॥
धिक्कार स्वर्गांचा देवदेवेशांचा । लाभून ज्यासी कर्मफळाचा । जें जें कर्म देव करिती त्याचा । व्यर्थत्वें होय निरर्थ जन्म ॥१३॥
कीटपतंगांचाही जन्म यावा । भारतांत साधुसंग घडावा । तेणें ब्रह्मभूतत्व जीवा । लाभेल यांत न संशय असे ॥१४॥
हा सर्प मनुष्यवाणीहीन । यास नसे जपज्ञान । परी भावबळें मौद्‍गल ऐकून । ब्रह्मीभूत हा झाला ॥१५॥
स्वानंदांत राहे सांप्रत । तर मग जो मनुष्य जातींत । तो भावबळें पारायण ऐकत । तो प्राप्त करी गजानन ॥१६॥
ऐसें बोलू्न अमरादि जातत । आपापल्या स्थानाप्रत । आतां सर्वसौख्यकर सांप्रत । सांगतों हें परम रहस्य ॥१७॥
आश्विन पूर्णिंमेस तें होत समाप्त । मौद्‍गल वाचन तै हर्षयुक्त । श्रोते पूजिती पुराण भक्तियुक्त । महायोगी पारणा नंतर करी ॥१८॥
तदनंतर प्रतिपदेस करी निसर्जन । त्यांची आज्ञा धरून । सर्व परतले स्वाश्रमीं प्रसन्न । गणेशभजनीं रत झाले ॥१९॥
इहलोकीं अखिल भोग भोगून । अंतीं स्वानंदलोकीं जाऊन । ब्रह्मभूत ते सारे होऊन । गणेश्वरा पाहून धन्य झाले ॥२०॥
ऐसें हे सर्व निवेदिलें । सार्धैकमासज फळ सगळें । मौद्‍गल श्रवणें जें जाभलें । भाद्रपदमासादि संभूत ॥२१॥
ऐश्यापरी अनंत प्राणी । ब्रह्मभूतत्व लाभोनी । तरले त्या सर्वांचें भाग्यवर्णनीं । अशक्य मौद्‍गल श्रवणाचे ॥२२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे मुद्‍गलदक्षसंवादे भाद्रपदादिसार्धैकमासश्रवणमाहात्म्यवर्णनं नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP