खंड ९ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्षा तुज वेदशास्त्रार्थ संमत । भावना एक सांगेन सांप्रत । नाना मतांचें भय त्यागित । तेणें योगी नर होईल ॥१॥
न्यायशास्त्रज्ञ म्हणती जगांत । चैतन्य हें मुख्य ब्रह्म वर्तत । चैतन्यानें जेव्हां युक्त । तेव्हांच स्वकार्यपरायण झाले ॥२॥
सर्वं प्रकाशक म्हणून । चैतन्यास ब्रह्मसंज्ञा पावन । जेव्हां चैतन्यविहीन । तेव्हां सर्वं नाश पावे ॥३॥
पंचचित्तात्मयोगें ब्रह्मसंज्ञित । चैतन्य यांत संदेह नसत । शब्दार्थांची अनेकता असत । परी यांत एकवाक्यता ॥४॥
तार्किक म्हणती सर्व अभेद । पर असे तो विशद । ब्रह्म वेदान्तवादांत निर्विंवाद । शास्त्रसंमत तो असे ॥५॥
पंचचित्तमय भेदाभेद । योग्यांनीं केला असे विशद । योग एकार्थभावाख्य सर्वद । असे अर्थप्रमाणानें ॥६॥
धर्मशास्त्रवेत्ते सर्व म्हणती । बोधाहून न अन्य परम पद जगतीं । ब्रह्म बोधमय निश्चिती । मुख्य भावाभाव वर्जित ॥७॥
पंचचित्तगत धर्म असत । त्यागावा त्यानें योग समस्त । धर्मं होईल यांत संदेह नसत । ब्रह्मधर्मधर प्रभू ॥८॥
सांख्य म्हणती सांख्य ब्रह्म । जें संख्याविवर्जित अनुपम । विबोधाहून अन्य न ब्रह्म । क्रीडाहीन प्रभावें ॥९॥
तेथ पंचविध चित्त । योगानें संख्येनें होत व्यक्त । तेच योगाख्य होत । शब्दमानप्रमाणें ॥१०॥
मीमांसक म्हणती पर संवेद्य । कारण ब्रह्म असे थोर । तेथ अन्य नसे कांहीं व्यग्र । ब्रह्मांत जें संस्थित असे ॥११॥
पंचचित्ताचा त्याग करून । ब्रह्मरूप तें करी महान । मीमांसेनें स्वयं योगीजन । योगवाच्यपर होईल ॥१२॥
ऐसें नाना मतांनीं युक्त । सांगती शास्त्रभेदरत । ब्रह्म नानाविध दक्षा वर्णित । तेंच योगगत होईल ॥१३॥
शक्ति हेंच ब्रह्म म्हणत । त्याहून परत कांहीं नसत । ऐसें म्हणती शाक्त । द्वंद्वसंयोग जेथ होई ॥१४॥
शक्ति ती पंचम चित्तगत । ब्रह्मांत असे अंतर्भूत । निरोधाख्य चित्त परिगृहीत । त्या चित्तास देवी म्हणती ॥१५॥
सौर ब्रह्म ऐसें सौर म्हणत । सूर्य परात्पर विश्वांत । त्याहून परतर कांहीं नसत । सर्वाधार तो या प्रमाणानें ॥१६॥
भेदात्मक सारें जागवित । नित्य आदरें राहत । त्यायोगें योगमय सूर्य होत । यांत कांहीं संशय नसे ॥१७॥
विष्णु ब्रह्म ऐसें म्हणती । वैष्णव जन ते दृढभक्ति । त्याहून परपद नसे जगतीं । सदा आनंद प्रमाणानें ॥१८॥
चित्त जें पंचम तेथ । मोह सोडून तदात्मक होत । ब्रह्मायोगे योग वर्तत । आनंद यांत संशय नसे ॥१९॥
शैव म्हणती शैवब्रह्म । वेदांत त्याहून न परतर मनोरम । मोहविहीन तो अभिराम । परम श्रेष्ठ शिव असे ॥२०॥
निरोध त्रिविध असत । दक्षा तो पराधीन संशयातीत । तत्रस्थ योगारूपाख्य वर्तत । स्वाधीन तत्त्व योगगत ॥२१॥
ऐसें नानामतांनीं युक्त । स्वस्वदेवपरायण असत । त्या त्या देवतेस प्रमाण मानित । शब्दांच्या अर्थानुसार ॥२२॥
अनेक अर्थ शब्दांचे असत । त्यांत काय न संभवत । सर्व शब्द योगार्थवाच्य होत । योगिजनांच्या क्रमानें ॥२३॥
अन्नप्राणादिक शब्द । ब्रह्मवाचक सर्वद । ते सर्वही योगप्रद । दक्षा होती ब्रह्म धारणामुळें ॥२४॥
वेदांत ज्ञान आतां सांगेन । सर्वंमान्य जें प्रमाण । शास्त्रें तदंगभूत ज्ञान । सांगेन दक्षा आतां तुज ॥२५॥
जो सर्वभावांत मायायुत । जाणतो तत्त्व सतत । मायाहीनप्रभावें योगयुक्त । राहतसे सर्वकाळ ॥२६॥
तोच ब्रह्ममुख्य असत । सर्वांत यांत संशय नसत । ब्रह्मांप्रत ऋचा सांगत । प्रज्ञान योगगत स्मृत ॥२७॥
पंचचित्तभव सर्व जो जाणत । तोच तो योग तद‍गत । त्या त्या भावें संवर्जित । होतो प्रभु तयाचा ॥२८॥
अहंब्रह्म मीच ब्रह्म उक्त । ऐसें सर्वदोषविवर्जित शोभत । तें ब्रह्म सदा यजुर्वेंदोक्त । मुख्य असे परतःपर ॥२९॥
पंचचित्तभव भेद असत । त्यांतच जो भेदवर्जित । तो योग प्रजानाथा वर्तत । योगशास्त्रप्रमाणें ॥३०॥
मायामोहयुत जें असत । मायामोहविवर्जित । त्यांच्या योगें ब्रह्म वर्तत । सामवेदोक्त परम असे ॥३१॥
मायामोहयुक्त जें ब्रह्म । त्याहून स्वानंदाख्य परम । अयोग तें मायाहीन अनुपम । त्यांच्या योगें योगगत ॥३२॥
ब्रह्म ब्रह्मांत संस्थित । मनोवाणीमय तें नसत । तैसें मनोवाणीविहीन नसत । अथर्वंवेदोक्त हें वचन ॥३३॥
मनोवाणीमय संप्रज्ञात । मनोवाणीहीन । असंप्रज्ञात । ऐसें वेदार्थयुक्त । महावाक्य सांगती ॥३४॥
योगाख्य तीं वाक्यें ज्ञेय । योगसेवें न सर्वंथैव । कर्मादी शब्द ब्रह्ममय । ऐसें बुधजन सांगती ॥३५॥
ते योगसंज्ञ समस्त । योग्यांच्या मतें शब्द वर्तंत । सर्वंशास्त्रमतैक्य कथित । शब्दधारणेनें या ॥३६॥
तें जाणून मोहहीन । सदा होतो मानव पूर्णं । नानामतैक्य योगसाधन । चित्तभूमि निरोधानें ॥३७॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्‍गलदक्षसंवादे योगामृतार्थंशास्त्रें चित्तभूमिनिरोधेन नानामतैक्ययोगी नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP